मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥५६॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥५६॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुपरंपरायै नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥
परिज्ञानाश्रम श्रीगुरु शंकर । परिज्ञानाश्रम शंकर सद्गुरु ॥ केशव वामन कृष्ण पांडुरंग । आनंदाश्रम कल्पतरु ॥ॐ॥ॐ॥ॐ॥
जयजया जी सद्गुरुराया । नवही आश्रमां तुमच्या पायां । आणि आमुच्या श्रीगुरु सदया । करितों नमन आतां मी ॥१॥
गुरुपरंपरेसी करोनि वंदन । करूं आतां ग्रंथ संपूर्ण । एक एक अक्षरेंकरोन । स्तुति करूंया आपण हो ॥२॥
परिज्ञानाश्रम - श्रीगुरुराया । त्वां अवतरुनी धरणीं या । सारस्वतांसी दिधलें आश्रया । ऐशिया तुजला नमन असो ॥३॥
रिता ठाव तुजांचोनी । नाहीं निश्र्चयें साऱ्या त्रिभुवनीं । ऐशिया तुजला नमन असो ॥४॥
ज्ञानदान करावयालागीं । महादेवचि तूं आलासि हो जगीं । रूप धरोनि संन्यासी योगी । ऐशिया तुजला नमन असो ॥५॥
नाम तुझें हो गोड रुचिकर । वदतां चित्तीं आनंद थोर । महिमा तुझी असे अपार । ऐशिया तुजला नमन असो ॥६॥
श्रमलासि बहुत भक्तांसाठीं । घडिघडी रक्षिलें तयां संकटीं । ठेविली पूर्ण कृपादृष्टी । ऐशिया तुजला नमन असो ॥७॥
मठ स्थापुनी भंडिकेरीसी । राहिलासी जन उद्धरावयासी । परंपरा वाढली तव कृपेसरशी । ऐशिया तुजला नमन असो ॥८॥
श्रीगुरुनाथा तूं भक्तमेळा । सकाम निष्काम सांभाळिला । नाहीं स्वार्थ अणुमात्र आपुला । ऐशिया तुजला नमन असो ॥९॥
गुह्य जें निजात्मज्ञान । तेंही दिधलें सद्भक्तांलागुन । न करने देवा माझेनि वर्णन । ऐशिया तुजला नमन असो ॥१०॥
रुसला जरी भक्त तुजवरी । तूं न क्षोभसी अणुमात्र त्यावरी । अधिचि प्रेम करिसी निर्धारीं । ऐशिया तुजला नमन असो ॥११॥
शंकराश्रमा श्रीगुरुनाथा । तूंचि सर्व जगाचा त्राता । तूंचि सर्व कर्ता करविता । ऐशिया तुजला नमन असो ॥१२॥
करितां तुझी स्तुति बापा । चुकती जन्ममरणांच्या खेपा । दाविला जना मार्ग मोपा । ऐशिया तुजला नमन असो ॥१३॥
रमविलें कैसें भक्तांचे मन । गुरुप्रेमांत क्षणेच ओढोन । लोहचुंबकापरी तूं जाण । ऐशिया तुजला नमन असो ॥१४॥
परिज्ञानाश्रम तृतीय आश्रमा । अगाध असे तुझी महिमा । वर्णवेना अज्ञां आम्हां । ऐशिया तुजला नमन असो ॥१५॥
रिपु सहाही क्षणेंचि दवडुनी । भवभय तोडिसी भक्तांचें तूं झणीं । काय तुझी अगाध करणी । ऐशिया तुजला नमन असो ॥१६॥
ज्ञानामृत पाजुनी सकलां । दाविलें लगबगें निजस्वरूप डोळां । भोगविला स्वानंदसुखमोहळा । ऐशिया तुजला नमन असो ॥१७॥
नामस्मरण करितां तुझें बा । मोक्ष सन्मुख राहे उभा । काय वर्णावी नामाची शोभा । ऐशिया तुजला नमन असो ॥१८॥
श्रवण करितां तुझे सद्गुण । दुर्गुण नासती आमुचे संपूर्ण । अगाध महिमा तुझी जाण । ऐशिया तुजला नमन असो ॥१९॥
मनीं चिंतितां तुझी मूर्ती । अणुतात्र चिंता न ये चित्तीं । तूं मी एक होय निश्र्चितीं । ऐशिया तुजला नमन असो ॥२०॥
शंकराश्रमा चतुर्थ गुरुवरा । तूंचि सर्व जनांसी आसरा । होउनी भार वाहिला सारा । ऐशिया तुजला नमन असो ॥२१॥
करुणासागरचि तूं एक । समानचि तुजला सकळिक । भेद नसे राजारंक । ऐशिया तुजला नमन असो ॥२२॥
रवि दे प्रकाश सर्वां समान । तैसी तव कृपा सदा प्रसन्न । ना बघसी भक्ताभक्त म्हणोन । ऐशिया तुजला नमन असो ॥२३॥
सकाम निष्काम दोन्ही भक्तांसी । सारखाचि तूं प्रसन्न होसी । एवं सर्व समान तुजसी । ऐशिया तुजला नमन असो ॥२४॥
दर्शन घेतां तुझे देवा । नासे सारा प्रपंच ठेवा । चित्त शुद्ध होय तेव्हां । ऐशिया तुजला नमन असो ॥२५॥
'गुरुराज मी' ऐसा अभिमान । नसे तुजला अणुमात्र जाण । सारें ब्रह्मचि तुजलागोन। ऐशिया तुजला नमन असो ॥२६॥
रुदन करितां बालकें माय । लगबगेंचि धांवुनी जाय । तैसा तूं धांवलासि रक्षाया सदय । ऐशिया तुजला नमन असो ॥२७॥
केशवाश्रमा सद्गुरुराया । उद्धरिले सकलां येउनी अवनीं या । देह झिजविला भक्तांस्तव सदया । ऐशिया तुजला नमन असो ॥२८॥
शरण जो येई त्यासि न दवडिसी । परमार्थाची गोडी लाविसी । उबग नसतां घडिघडी बोधिसी । ऐशिया तुजला नमन असो ॥२९॥
वर्णाश्रमविहित कर्म । शिकविलें देवा सर्वां उत्तम । किती शुद्ध तुझें प्रेम । ऐशिया तुजला नमन असो ॥३०॥
वामनाश्रमा श्रीसद्गुरुवरा । दाविला सुमार्ग जनांसी तूं खरा । सीमा नाहीं तव उपकारा । ऐशिया तुजला नमन असो ॥३१॥
महिमा असे तुझी अपार । कैशी वर्णूं मी अज्ञ पामर । कर्ता करविता तूंचि साचार । ऐशिया तुजला नमन असो ॥३२॥
नसे तुजला मानावमान । निंदा स्तुति दोन्ही समान । निजानंदीं सदा मग्न । ऐशिया तुजला नमन असो ॥३३॥
कृष्णाश्रम सद्गुरु माउली । सद्भक्तांसी निश्र्चयें पावली । नानापरी लीला दाविली । ऐशिया तुजला नमन असो ॥३४॥
षट्‌ संपत्ति तुझिया चरणीं । लोळती आपणचि स्वयें येउनी । साऱ्या सद्गुणांची खाणी । ऐशिया तुजला नमन असो ॥३५॥
नच करिसी तूं कवणावरी द्वेष । अथवा प्रीति नाहीं विशेष । ऐसा तूं ब्रह्मचि निर्विशेष । ऐशिया तुजला नमन असो ॥३६॥
पांडुरंगाश्रमा श्रीगुरुराजा । अवतरलासि तूं भक्तकाजा । साक्षात दत्तात्रेयचि माझा । ऐशिया तुजला नमन असो ॥३७॥
डुरकाळ्या घालुनी मीपणाच्या । विषय सेवाया धांवतों साचा । ज्ञानखड्गें नाश करिसी अहंपणाचा । ऐशिया तुजला नमन असो ॥३८॥
रंगलासी निजप्रेमामाझारी । सर्वत्र बघसी ब्रह्मचि निर्धारीं । परी अतिदक्ष स्वधर्मव्यवहारीं । ऐशिया तुजला नमन असो ॥३९॥
गर्व न धरिसी अणुमात्र अंतरी । शांत हृदय तुझें असे भारी । सकलां आधार तूंचि भूवरी । ऐशिया तुजला नमन असो ॥४०॥
आनंदाश्रम श्रीगुरु सदया । आलासि जना उद्धरावया । देह झिजविनी भक्तकार्या । ऐशिया तुजला नमन असो ॥४१॥
नंदकुमार श्रीकृष्णचि आला । चित्रापुर - ग्रामीं अवतरला । स्वलीलेंने भक्तसमूह आकळिला । ऐशिया तुजला नमन असो ॥४२॥
दाविला सन्मार्ग निजभक्तांसी । लोभ न धरितां अणुमात्र मानसीं । प्रवचनद्वारें सकलां बोधिसी । ऐशिया तुजला नमन असो ॥४३॥
श्रद्धासंपन्न केलें जनांसी । प्रवचनबळानें आपुल्या परियेसीं । प्रेमेंचि जनांचें मन आकर्षिसी । ऐशिया तुजला नमन असो ॥४४॥
मन हें तुझे किती कोमल । न दुखविसी कवणानें तूं दयाळ । युक्तीनें लाविसी सुमार्गीं सकळ । ऐशिया तुजला नमन असो ॥४५॥
करिसी धर्मजागृति सत्वर । आळस नाहीं तुज अणुमात्र । सर्वां सांवरिसी वारंवार ऐशिया तुजला नमन असो ॥४६॥
लक्ष देउनी सारा समाज । समदृष्टि ठेवुनी सकलांवरि सहज । करिसी रक्षण देवा आज । ऐशिया तुजला नमन असो ॥४७॥
परिस - संगें लोह होय सुवर्ण । तैसा तूं निजभक्तांलागुन । सहवास करितां होय ज्ञान । ऐशिया तुजला नमन असो ॥४८॥
तदाकार होतसे मन हें । तुझें नाम घेतां पाहें । महिमा अपार तुझी गुरुमाये । ऐशिया तुजला नमन असो ॥४९॥
रूप पाहतां तुझें सुंदर । आणिक नच येती विचार । 'मी ब्रह्म' ऐसा होय निर्धार । ऐशिया तुजला नमन असो ॥५०॥
ऐसे तुम्ही गुरुमहाराज । नऊ आश्रम झाले आज । केलें आम्हां भक्तांचे काज । अति उत्साहें हो पाहीं ॥५१॥
नवरत्नांचा सुंदर हार । कंठीं धरितां प्रेमपुरःसर । मुन्यावरी तेज अपार । विलसे निश्र्चयें श्रोते हो ॥५२॥
कैसें पहा तुम्ही आतां । नऊही आश्रम एकचि तत्वतां । नऊ रत्नें आलीं हातां । परम प्रेमळ हो पाहीं ॥५३॥
जे झाले आठही आश्रम । नवव्या - आश्रमी तेंचि प्रेम । भरले पूर्ण तेथें उत्तम । नाहीं संशय यामाजीं ॥५४॥
साखरेच्या बाहुल्या अनेक । त्यांसी नाना रंगरूप देख । परी गोडी त्या सर्वांची एक । न होय वेगळिक कदापिही ॥५५॥
तैसें आठही आश्रमांचें प्रेम । एकचि असे शुद्ध परम । आतां जे आनंदाश्रम । त्यांतही तेंचि प्रेम वसे ॥५६॥
त्यांची मूर्ति बघतां उत्तम । सर्वही येती त्यांत आश्रम । एवं सर्वांचे एकचि प्रेम । सत्य सत्य त्रिवाचा ॥५७॥
नऊ आश्रमांची नवरत्नें सुंदर । त्यांचा आनंदाश्रम सुकुमार हार । घालितां कंठी मनोहर । आणिक कांहीं नलगेचि ॥५८॥
कंठीं म्हणिजे हृदयीं धरावे । श्रीमदानंश्रदाम भावें । ऐमें करितां निजसुख पावे । अविलंबेंसीं हो पाहीं ॥५९॥
नऊही आमुच्या मठाचे स्वामी । ब्रह्मज्ञानी अंतर्यामीं । हणोनि त्यांसी म्हणतों आम्ही । नऊ रत्नें हीं सुंदर पैं ॥६०॥
सर्व मिळोनि एकचि हार । 'रत्नांचा हार' म्हणती त्या नर । तैसे नऊ आश्रम नऊ रत्नें थोर । त्यांचा हार ऐका हो ॥६१॥
नऊ आश्रम मिळोनि एक । आनंदाश्रम हार सुरेख । एवं नवरत्नांचा निश्रयात्मक । आनंदश्रमचि हार पहा ॥६२॥
नऊ रत्नें पृथक पृथक् । गुंफितां सुवर्णीं हार एक । सर्वांची कांति देख । एकचि दिसे निश्र्चयेंसी ॥६३॥
तैसे नऊही आश्रम । रत्नें हीचि वेगळी उत्तम । ज्ञानसुवर्णीं गुंफिनां नाम । आनंदाश्रम एकचि हार दिसे ॥६४॥
हृदयीं विश्वान धरितां दृढतर । पोंचती निश्र्चयें श्रीसद्गुरुवर । सकाम निष्काम भक्तां साचार । पार घालिती सकलांसी ॥६५॥
अमो ऐसी सद्गुरुमाउली । किती शांत सांगूं ये वेळीं । कांहीं दिवस राहतां जवळी । कळे सहजचि सकलांसी ॥६६॥
इतुका भार घेउनी कैसे । करिती जनांचा उद्धार साहसें । काय उद्धार केला असे । सावध चित्तें परिसा हो ॥६७॥
साऱ्या मठाचा भार वाहती । केवळ जनांच्या कल्याणासाठीं । त्याहुनी आन कांहीं नेणती । आमुचे गुरुराज निश्र्चयेंसीं ॥६८॥
जगाचें कल्याण करावयासी । अवतार घेतला निश्र्चयेंसी । संशय नाहीं येविषीं । प्रत्यक्ष बघतों आपण पैं ॥६९॥
मागें कथिलें बहुत ठिकाणां । मठ हा केवळ जनकल्याणा । यांत स्वामी सद्गुरुराणा । यांचा स्वार्थ ना कांहीं ॥७०॥
कुणीही म्हणेल कासया मठ । की भटजींचे भराया पोट । आम्हीं सोसुनी नाना कष्ट । द्यावी कासया वर्गणी ती ॥७१॥
तरी ऐका त्याचें उत्तर । श्रोते हो करोनि चित्त एकाग्र । आम्हांस्तव भटजी - मठ - गुरुवर । करितां विचार सहज कळे ॥७२॥
भटजी कासया ठेविले तेथ । आमुच्या पूर्वजीं सांगा त्वरित । देवाचा विनियोग व्हावा समस्त । हाचि हेतु त्यांचा पैं ॥७३॥
नाना उत्सव रुद्राभिषेक । हे घडावे दिन नित्य सकळिक। भटजीवांचुनी निश्र्चयात्मक । कार्यें सहसा न घडती हीं ॥७४॥
तेवींच भटजी पूर्वजीं ठेविले । आमुच्यास्तवचि निश्र्चयें सगळे । नातरी भटजी आपापुलें । भरती पोट अन्यस्थळीं ॥७५॥
आपुलें पोट भरावयासी । अनेक धंदे असती जनांसी । परी ने सोडोनि मठापाशीं । रहावें लागे लोकांस्तव ॥७६॥
अन्यांपरीच भटजी निश्र्चयें । धंदे नोकरी करोनि स्वयें । पोट भरतील नाना उपायें । याहुनी होतील बहुत सुखी ॥७७॥
पहा कैसें तें सांगूं ऐका । होत श्रीमंत अन्य उपायें देखा । व्यापार धंदा करितां निका । कधीं तरी होय श्रीमंत तो ॥७८॥
अथवा गेला नोकरीवरी । तेथेंही पगार वाढे वरिवरी । मग तो श्रीमंत होय निर्धारीं । हें बघतों आम्हीं अवनीं या ॥७९॥
सकलही जरी श्रीमंत न होती । कुणी कुणी श्रीमंत असती । नोकरी अथवा अन्य रीतीं । होती पहा श्रीमंत ॥८०॥
परी येथें मठामाझारीं । नाहीं पगारवाढ वरिवरी । मग कैंची श्रीमंती त्यां तरी । येईल सांगा कोठूनि ती ॥८१॥
एवं येथें आमुच्या मठासी । राहतां श्रीमंती न ये भटजींसी । हें बघतों आपण दिननिशीं । उघड्या डोळ्यांनी जाणा हो ॥८२॥
म्हणोनि आमुच्यासाठींच भटजी । राहती सदा मठामाजीं । आपुला स्वार्थ सोडुनी सहजीं । नाहीं संशय यामाजीं ॥८३॥
दावा एकही भटजी श्रीमंत । कष्ट न करितां कोण असे त्यांत । एवं भटजींस दोष देतां निश्र्चित । पापचि लागे आम्हांसी ॥८४॥
जरी आलें म्हातारपण । तरी त्यांनी कष्टावें आपण । म्हणोनि भटजी आम्हांस्तव जाण । राहती धार्मिक बुद्धीनें ॥८५॥
जरी भटजी गेले इथें तिथें । वैदिक वृत्ति त्यजूनि पहा ते । तरी धर्मकर्में समस्तें । बुडालीं असतीं सारी हो ॥८६॥
मग कैंचे स्वामी कैंचा मठ । झाली नसती त्यांची भेट । सारांश भटजींचे उपकार उत्कृष्ट । न विसंबावे कदापिही ॥८७॥
भटजीवरोनि आमुचा मठ । ऊर्जितस्थितीस आलासे स्पष्ट । आणिक बोलावें न लगे श्रेष्ठ । भटजी सारे म्हणोनियां ॥८८॥
एवं भटजींवरोनि सद्गुरुचरण । लाभले आम्हां जनांलागून । म्हणोनि दोष न द्यावा आपण । भटजींलागी सर्वथा ॥८९॥
त्यांनी देतां दोष आपण । स्वामींसीच तो लागे जाण । यामाजीं न धरा अनुमान । श्रोते हो तुही अणुमात्र ॥९०॥
ते जे स्वामींची करिती सेवा । प्रेमपूर्वक धरोनि भावा । आणि सत्कर्में पूजादि करिती देवा । निष्काम मनें प्रेमभरें ॥९१॥
आमुच्या मठाच्या भटजींसारिखी । निरिच्छ वृत्ति न मिळे त्रैलोकीं । कवणापाशीं न मागती कीं । दक्षिणाही सर्वथा ॥९२॥
कुणीही स्त्रिया भटजींकडुनी । करविती पादपूजा संनिधानीं । दक्षिणा द्यावी भटजींलागुनी । तरीच पुण्य लागे तयां ॥९३॥
परी भोळ्या भाबड्यांसी । नसे विदित कित्येकांसी । म्हणूनि न देतां दक्षिणा परियेसीं । करविती पूजा कांहीं जन ॥९४॥
परी मठाच्या भटजींलागुनी । अणुमात्र स्वार्थ नाहीं म्हणुनी । दक्षिणेवीण पूजा करुनी । प्रेमपूर्वक देती ते ॥९५॥
इतुकी त्यांची निःस्वार्थ वृत्ति । अंगी असे निष्काम भक्ति । वर्णन कराया माझी मति । मंद अतितर हो पाहीं ॥९६॥
धन्य धन्य मठांतील भटजी । तैसेंच आचारी नौकर आजी । राहती जे जे मठामाजीं । विपुल पुण्य त्यांचें पैं ॥९७॥
भाग्यवान त्यांच्यासमान । नाहीं साऱ्या त्रिभुवनीं कवण । जे पाहनी त्यांचे चरण । नेही धन्य होती पहा ॥९८॥
म्हणोनि भटजींस द्यावा मान । यथाशक्ति दक्षिणा देऊन । आणि करावें सद्भावें नमन । भक्तिपूर्वक तयांसी ॥९९॥
श्रीकृष्णसंगें गोपाळ । रामासंगें वानरदळ । तैसे भटजी आमुच्या स्वामींजवळ । शोभती प्रेमळ भक्त खरे ॥१००॥
तेचि श्रीस्वामींचे रक्षण । करिती मातेपरी जाण । त्यांचे उपकार अगणित म्हणोन । न विसरावें भटजींसी ॥१०१॥
भक्तांची सेवा करितां आपण । पाप सारें जाय नासोन । कसलीही सेवा कराया लाज न । धरावी चित्तीं अणुमात्र ॥१०२॥
जरी प्रसंग पडला एकवेळ । भांडीं धुणीं त्यांचीं समूळ । कामें करावी निर्लोभें सकळ । तेव्हांचि तुष्टेल भगवंत ॥१०३॥
एवं भटजी हे स्वामींचे भक्त । दोष न द्यावा सर्वथा त्यांप्रत । इतुकीच प्रार्थना तुम्हांप्रत । माझ्या सारस्वत मायबापां ॥१०४॥
ऐशियांसी देतां दोष । त्याहुनी पाप अन्य ना विशेष । स्तवन केलिया आम्हांस । लाभेल पुण्य अमित पहा ॥१०५॥
पुण्य कैंचे जरी म्हणाल । तरी पहा सेवेचें फल । आम्हांसी अणुमात्र लाभेल । स्तवितां सेवितां तयांसी ॥१०६॥
मठासी देतां द्रव्य विपुल । विशेष पुण्य आम्हां लाभेल । भटजींची सेवा आमुची होईल । नाहीं संशय यामाजीं ॥१०७॥
म्हणोनि मठासी वर्गणी अथवा । स्थिरता - फंडानी पैसा द्यावा । पुण्य पदरीं पडेल तेव्हां । आम्हां सारस्वत जनांच्या ॥१०८॥
तेवींच तोंबत बंधुद्वय । आणि हट्टंगडी शंकरराय । झटती वारंवार पाहोनि समय । मठाची उन्नति व्हावया ॥१०९॥
जयें तेथें वर्गणीसाठीं । नेमिली पहा त्यांनी कमिटी । हातीं कार्य घेतले उठाउठीं । आपुल्या मठाचे प्रेमभरें ॥११०॥
पांडुरंगाश्रम मुक्त झालियावरी । कांहीं कारणास्तव लोकांनी खरी । वर्गणी न देतां योग्य अवसरीं । बहुत वरुषें घालविलीं ॥१११॥
वर्गणी जरी नाहीं दिधली । मठाचा खर्च न राहे मुळीं । सहजचि कर्ज त्या वेळीं । झालें बहुत मठाप्रति ॥११२॥
तये समयीं मंगेशभट्ट । शुक्लभटजी नामें श्रेष्ठ । भोळे भाविक निष्कपट । होते जाणा प्रेमळ ते ॥११३॥
श्रुतिस्मृत्युक्त नित्यकर्में मठामाजीं व्हावी जी नमें । लोप होऊं न देतां प्रेमें । करविली त्यांनीं न चुकतां ॥११४॥
रथोत्सवादि नैमित्तिक । तींही कर्में करविलीं सकळिक । होता जागृत सदसद्विवेक । आपुल्या  मंगेशभटजींचा ॥११५॥
तेवींच त्यांनी लोकापवादा । न जुमानितां, सद्गुरुपदा । स्मरुनी केलीं सत्कर्में सदा । निर्भयचित्तें प्रेमभरें ॥११६॥
मठासी कर्ज होनां अपार । जनांचा गैरसमज झाला थोर । कीं मंगेशभटजी मणेगार । यांचाचि दोष हा सारा ॥११७॥
झाला घोटाळा समजुतीचा । साऱ्या जनांच्या मनाचा । परी विचार करितां दिसेल साचा । नाहीं भटजींचा अपराध ॥११८॥
खचितचि आमुचे मंगेशभटजी । जरी नसते मठामाजीं । नरी सत्कर्माचा आजी । लोप झाला असता हो ॥११९॥
लोकापवादा न भितां आपण । कार्यें केलीं धरोनि अभिमान । न बघती गृहस्थ जरी ढुंकोन । तरीही भार वाहिला तो ॥१२०॥
पहा जनांनीं न देतां वर्गणी । कार्यें सारीं करावीं तीं झणीं । तेव्हां कर्ज न करितां कुणीं । कैसीं कार्यें करावीं तीं ॥१२१॥
मठासी कर्ज झालें म्हणोन । मंगेश शुक्ल भटजींस आपण । दोष सर्वथा न द्यावा जाण । निरपराधी ते असती पैं ॥१२२॥
होते ते परम संभावित । हें वेगळें सांगावें नलगे येथ । त्यांचे सद्गुण असती ज्यां विदित । त्यांसीच कळे हें सारें ॥१२३॥
त्यांचें स्मरण करावें घडीघडी । इतुकी त्यांच्या संगतीची गोडी । कैसी म्हणाल तरी तांतडी । ऐका सावध सांगतों ॥१२४॥
जरी घेतला नसता त्यांनीं भार । मठाची अवनति होती थोर । श्रीस्वामीही निश्र्चयें दूर । गेले असते तीर्थाटना ॥१२५॥
मठामाजीं न होतां सत्कर्में । कैसे राहतील स्वामी प्रेमें । तेव्हां 'क्लब - मित्रसमाज' या नामें । प्रसिद्ध झाला असता मठ ॥१२६॥
म्हणोनि शुक्ल मंगेश भटजी । यांचे उपकार बहुत असती आजि । आभार मानावे जगामाजीं । फेडाया नच होय आमुचेनि ॥१२७॥
अमो आर्ता कराया वर्णन । मंदमतीसी मजलागोन । कैसें कळेल सांगा आपण । श्रोते तुम्ही सज्जन हो ॥१२८॥
माझा बंधु अण्णाजी आणि । वडील मंगेशभट्ट यांनीं । सुचविलें होतें मजलागोनि । कीं लिहावे सद्गुण त्यांचे हे ॥१२९॥
परी नाहीं लिहिलें कांहीं । शुक्ल  - मंगेशभटजीचें पाहीं । कीं मजला आठव नाहीं । पडली भूल मजप्रति ॥१३०॥
ग्रंथ समाप्त होउनी बहुत । वरुषें झाली असती खचित । पुनरपि नक्कल करावया समस्त । नाना विघ्नें आलीं हो ॥१३१॥
ग्रंथ पडला तैसाचि खालीं । लिहिणें न होय निश्र्चयें मुळीं । तेव्हां मजला वेळोवेळीं । वाटे कां येती विघ्नें हीं ॥१३२॥
तईं अवचित आठवलें मजला । कीं शुक्ल - मंगेशभटजी यांजला । विसरलों मी ये वेळां । म्हणूनी विघ्नें येती पैं ॥१३३॥
तेव्हां केली प्रार्थना गुरुवर - । पांडुरंगाश्रमस्वामींनी सत्वर । लिहितों त्यांचे सद्गुण थोर । करवीं ग्रंथ सफलचि हा ॥१३४॥
तेव्हांपासोनि पुनरपि लिहावया । स्फूर्ति उद्भवली हृदयीं माझिया । सद्गुरुइच्छा असे कैशिया - । परीची पहा श्रोते हो ॥१३५॥
असो हट्टंगडी, तोंबत आदिकरोनि । यांनींही शिरीं भार घेवोनि । पुनरपि सुरू केली वर्गणी । फेडिलें कर्ज शीघ्र पहा ॥१३६॥
त्यांचेही उपकार अगणित । झाले आमुच्यावरी शाश्वत । तेवींच स्वामी लाभले आम्हांप्रत । पूर्वपुण्य हें आमुचें कीं ॥१३७॥
तैशा लोकां आम्ही स्मरावें । स्मरोनि आपणही तैसेंच झटावें । तरीच सार्थक होईल बरवें । जाणा आपुल्या जन्माचें ॥१३८॥
एवं आमुचें कल्याण व्हावया । स्वामी मठाची उन्नति करावया । पुढें सरसावें धांवूनियां । तरीच कार्य साधेल ॥१३९॥
कल्याण काय होय यांत । हें मागें जईंतईं कथिलें बहुत । आणिक सांगावें न लागे येथ । ग्रंथ वाढेल येणेंचि ॥१४०॥
एवं मठ हा आमुच्यासाठीं । आणि सद्गुरुमूर्ति गोमटी । तीचि रक्षी आम्हां संकटीं । ठेवावा दृढ भाव तच्चरणीं ॥१४१॥
अमो आतां मठ आणि श्रीस्वामी । सदा घ्यावे अंतर्यामीं । तेणेंचि इहपर सुखासी आम्ही । पोंचूं सायास न करितां ॥१४२॥
तेचि आम्हां अज्ञ जनांसी । भार घालितां निश्र्चयेंसी । सकल कार्यांत आम्हांसी । रक्षिती निश्र्चयें जाणा हो ॥१४३॥
परिसा लहानसी एक कथा । श्रीस्वामीचि आम्हां रक्षिता । कैसें तेंचि सांगूं आतां । सद्गुरुकृपें अणुमात्र ॥१४४॥
येचि वर्षीं मार्गशीर्षमासीं । शके अठराशें सदसष्टवरुषीं । साधनसप्ताह - समयासी । रक्षिले जनांसी तें एका ॥१४५॥
सप्ताहासी प्रेमेंकरून । देशोदेशींचे येती जन । धरोनि हृदयीं श्रीगुरुचरण । उत्सुकतेनें बहुतचि ॥१४६॥
कासरकोडापासुनी शिरालीं । मोटार जनांसी घेउनी आली । येतां संनिध ग्रामाजवळी । काय वर्तलें पहा हो ॥१४७॥
एक कोस असतां गांव । मोटारीचें चाक अपूर्व । टुणुक्‌ करोनि घेई धांव । वांकली मोटार तत्काळ ॥१४८॥
उडालें चाक पडलें धरणीं ॥ मोटार तैसीच थबके स्थिरावुनी । पहा कैसी विचित्र करणी । आनंदाश्रम - सद्गुरूंची ॥१४९॥
जरी उडालें चाक थोर । तरी पडली नाहीं मोटार । एकीकडे वांकली अणुमात्र । जेव्हां गेलें चाक त्याठायीं ॥१५०॥
पहा कैसी सद्गुरुमहिमा । न कळे ती अज्ञांसी आम्हां । कैंचीही न लागे उपमा । वर्णूं न शकों आम्ही ती ॥१५१॥
नातरी चाक जातां उडोनि । मोटार कैसी न पडली धरणीं । अणुमात्र धक्का लागतांक्षणीं । पडे मोटार निश्र्चयेसीं ॥१५२॥
सद्गुरुमठासी येती जन । साधनसप्ताहाकारण । सद्गुरूचि आला धांवून । कराया रक्षण भक्तांचें ॥१५३॥
म्हणोनि सद्गुरुमहिमा अगाध । भार घालुनी धरितां गुरुपद । तोचि रक्षी हें असे सिद्ध । निजभक्तांसी प्रेमानें ॥१५४॥
असो आजवरी कथिलें चरित्र । सद्गुरुकृपेंचि परम पवित्र ॥ नातरी मी अज्ञ पामर । काय ग्रंथ रचितों पैं ॥१५५॥
जितुकें वर्णन करावें ऐसी । इच्छा जाहली श्रीगुरूंच्या मानसीं । तितुकेंचि करविलें सहजेंसीं । मजला निमित्त करोनियां ॥१५६॥
कर्ता करविता सद्गुरुनाथ । आम्ही मानव काय करीत । त्यांच्या इच्छेपरीच होत । सकल कार्य पहा हो ॥१५७॥
आमुच्या मनीं असे अनेक । परी सारेंच न मिळे सुरेख । सद्गुरुइच्छेवीण सम्यक । न होय कार्य कोणतेंही ॥१५८॥
निजभक्तांच्या कल्याणावांचुनी । ते न इच्छिती आन मनीं । ते जें करिती कार्य धरणीं । तें हितार्थचि भक्तांच्या ॥१५९॥
म्हणोनि सद्गुरु आपुल्यालागीं । जैसें ठेविती तैसें जगीं । त्यांतचि समाधान मानावें वेगीं । खिन्न न व्हावें अणुमात्र ॥१६०॥
अमुकें करितां प्रार्थना गुरूची । पुरविली कामना सारी त्याची । पावला तत्काळ त्याला धांवतचि । मीं काय पाप केलें पैं ॥१६१॥
मी इतुकें प्रार्थितों दिननिशीं । तरी कां न पावे मजसी । ऐसें बोलणें अपराध परियेसीं । सत्य जाणा हो आमुचा ॥१६२॥
आम्हीं मानसीं धरावें दृढ । सद्गुरुमाउली प्रेमळ गोड । सर्वांचे सारिखें पुरवी कोड । भेद नाहीं त्यां अणुमात्र ॥१६३॥
जरी न पुरवी मनोरथ । तरी तेणें हितचि होय निश्र्चित । अहित कदापि न करीत । कवणाचेही निर्धारें ॥१६४॥
म्हणोनि सद्गुरु जैसें ठेविती । त्यांतचि हित असे निश्र्चितीं । ऐसें समजोनि रहावें चित्तीं । अति शांत समाधानें ॥१६५॥
सद्गुरु हेचि आम्हांसी । तारक असती निश्र्चयेसीं । शरण जावें सद्भावें त्यांसी । मानावमान न धरितां ॥१६६॥
सद्गुरुमहिमा असे अपार । वर्णितां उबग न ये अणुमात्र । त्यांचे गुण गोड पवित्र । तेव्हां कैंचा वीट पहा ॥१६७॥
सद्गुरु हा परिपूर्ण देव । त्याचीण नाहीं रिता ठाव । तोचि भरला जगीं सर्व । तीर्थक्षेत्रीं देवालयीं ॥१६८॥
त्यांच्या सत्तेवीण सर्वथा । पानही न हाले तत्त्वतां । सारा व्यवहार त्यांच्या हातां । कर्ता करविता तेचि पैं ॥१६९॥
त्यांच्या इच्छेपरीच होय । इच्छाच त्यांची आनंदमय । म्हणोनि ते जें करिती कार्य । आनंदचि असे त्यामाजी ॥१७०॥
तेवींच सद्गुरु जैसें ठेविती । त्यांत आनंद मानावा निश्र्चितीं । सकाम निष्काम दोघांसी तारिती । नका धरूं शंका अणुमात्र ॥१७१॥
म्हणोनि जावें त्यांसी शरण । दृढतर त्यांचे धरावे चरण । तेणेंचि चुके जन्म - मरण। न धरा अनुमान यामाजीं ॥१७२॥
परमहंस आनंदाश्रम । शिवानंदतीर्थ साक्षात् परब्रह्म । यांच्या कृपाप्रसादें षट्‌पंचाशत्तम । अध्याय गुरुदासें संपविला ॥१७३॥
स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां पापें नासती थोर । षट्‌पंचाशत्तमाध्याय रसाळ हा ॥१७६॥
अध्याय ॥५६॥
ओंव्या ॥१७४॥
ॐ तत्सत् - श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥६॥        
॥ इति षट्पंचाशत्तमोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 23, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP