मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥३०॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥३०॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीपांडुरंगाश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ ॐ ॥
श्रीमत्परमहंस अष्टम । श्रीसद्गुरु "पांडुरंगाश्रम - । स्वामी गुरुमहाराज की जय" प्रथम । बोलुनी वंदन करूं तुजला ॥१॥
मद मत्सर आणि लोभ । काम क्रोध मोह दंभ । हे षड्रिपु, हाचि चित्तीं सूक्ष्म कोंब । करी विघ्न परमार्था ॥२॥
तमोगुण अंगीं फार । म्हणोनि कामादिक हे दुस्तर । माजुनी राहिले करोनि घर । हृदयांतरीं या माझ्या ॥३॥
परी ते करितां थोर प्रयत्न । तव कृपेनें जातील पळून । तरी देवा आणिक लपून । बैसला एक अनिवार ॥४॥
रजोगुण हाचि पाहीं । त्याहुनी विशेष अधिकचि राही । चंचळ अवघें मन हें होई । स्थिरे कांहीं क्षण एक ॥५॥
मर्कटापरी विषय-फळासी । बघुनी झोंबे मन हें दिननिशीं । तेव्हां काय करावें यासी । तूंचि सांगें बा मजला ॥६॥
हंबरतां वत्स धेनु धांवे । तैसा तूं भक्तां पावसी स्वभावें । ऐशा तुजला कैसें विसरावें । सद्गुरुराया कृपाघना ॥७॥
सद्विचार तुजवांचोनी । कवणही सांगूं न शके त्रिभुवनीं । म्हणोनि तूं अवतार घेउनी । येसी भक्तकार्यासी ॥८॥
श्रीपाद श्रीवल्लभ । तूंचि भेटलासी भक्तां सुलभ । घेतला सकलांनीं अमितचि लाभ । योग्यांसही दुर्लभ तूं ॥९॥
पांडुरंगाश्रम नाम सुंदर । घेउनी आलासी येथें भूवर । करावया जनांचा उद्धार । झिजविला देह हा आपुला ॥१०॥
डुलतचि रहावें ऐसें वाटे । तुझे गुण गातां ऐकतां नेटें । निरतिशयानंद स्वयें भेटे । ऐसे गोमटे गुण तुझे ॥११॥
रंग आला तूं येतांचि । उन्नति झाली आमुच्या मठाची । भक्ति वाढली बहुत जनांची । वर्णूं न शकें तव गुण बा ॥१२॥
गातां तुझें सद्गुणगान । वृत्ति होय बहु तल्लीन । ऐसें तुझे सद्गुरो ! महिमान । न कळे आम्हां अज्ञांसी ॥१३॥
श्रवण करितां आपुली कीर्ति । सारी फिटूनि जाय भ्रांति । ऐसी ऐकिली तव प्रख्याति । सद्गुरुस्वामी दयाळुवा ॥१४॥
मनीं ध्यातां तुझी मूर्ति । विषय खोटे निश्र्चित वाटती । अहाहा काय तव अद्भुत शक्ति । नवलाई तुझी गुरुनाथा ॥१५॥
स्वानंद - साम्राज्य तुझें सारें । त्यावरी राज्य ना आणिक दुसरें । म्हणुनी 'सद्गुरुमहाराज' तुज रे । म्हणती सकलही प्रेमानें ॥१६॥
मीपणरूप शत्रु मारुनी । स्वस्वरूप - राज्य घेतलें तूं झणीं । साऱ्या जगाचा तूंचि बा धनी । अससी निश्चयें गुरुराया ॥१७॥
गुरुराज-संनिधीं केला वास । बाळपणींच घेउनी संन्यास । परमार्थमार्गीं अति हौस । ऐसा गुरुनाथ तूं माझा ॥१८॥
रुजला सद्गुरुबोध हृदयीं । कांहीं केल्या तो नच जाई । झालासि निमग तूं त्या ठायीं । सचित्स्वरूपामाजीं हो ॥१९॥
मग काय सांगूं सदया । उणीवता नसे आम्हां जगीं या । शरण जातां आपुल्या पाया । नाहीं भय तें अणुमात्र ॥२०॥
हाताजवळी असतां अन्न । भुकेला जेवीत सहजचि आपण । तैसा तूं असतां संनिध जाण । बोधामृतासी ना तोटा ॥२१॥
राहे जरी अन्नाच्या डोंगरीं । अज्ञ बालक तें नेणे अंतरीं । भूक लागतां रडतसे भारी । भलतेंचि मागे खावयासी ॥२२॥
जर असे तो बुद्धिवंत । खटपट करूनि जेवी त्वरित । एवं भुकेचें शमन करीत । आपुल्या ज्ञानें देहाचें ॥२३॥
कीड मुंगी सारे जीव । पोटासाठी झटती सर्व । मग कैसा भुकेला मानव । दवडील अन्न रुचकर तें ॥२४॥
जरी आम्हां पाहिजे बोध । तरी बाहेर कां करावा शोध । तूं असतां आम्हां संनिध । कोण दवडील ही संधि ॥२५॥
यथार्थ करितां श्रवण । तव कृपें उणीवता नाहीं जाण । म्हणोनि आलासि देवा तूं धांवून । निजभक्तांसी ताराया ॥२६॥
'हंस' पक्षी क्षीर-नीर । एकत्र असतां दूध साचार । दूधचि गिळुनी समग्र । पाणी सारें मोडी पैं ॥२७॥
तैसे स्वामी सद्गुरुवर । 'परम' म्हणजे उत्कृष्ट थोर । सत्य हें धरी निरंतर । त्याग तो करी मिथ्याचा ॥२८॥
म्हणोनि देवा तुजला खास । म्हणती निश्चयें 'परमहंस' । ऐसें संत वदती सुरस । स्वामी तुजला कृपाघना ॥२९॥
ऐशी तव मूर्ति सुंदर । केला निजभक्तांचा उद्धार । त्यापरीच देवा मजवर । करीं कृपा गुरुराया ॥३०॥
अणुमात्र तुझें करावें वर्णन । म्हणोनि सरसावलों जाण । परी तूं देवा कां बा येऊन । स्फूर्ति न देसी कवनातें ॥३१॥
मजला नाहीं भक्ति म्हणोनि । न येसी की मांग तूं झणीं । अथवा विश्वास नाहीं चरणीं । म्हणूनि न येसी की सांगें ॥३२॥
बाळाच्या अंगीं बहुत दुर्गुण । म्हणोनि मातेनें देतां टाकून । कुठे जाईल बाळ तें अज्ञ । सांग देवा दयाळा ॥३३॥
एकाची भक्ति परम थोर । एक किंचित करी तो नर । मी तरी अभक्तचि खर । परी तूंचि होसी उद्धर्ता ॥३४॥
अज्ञ म्हणोनि टाकितां आपण । कवणासी जाऊं आतां शरण । जगीं नाहीं सद्गुरूवीण । अन्य त्राता मानवांसी ॥३५॥
म्हणोनि देवा तुजचि शरण । आलों उद्धरीं मजलागोन । एकचि मागतों आतां जाण । देईं देवा निजभक्ति ॥३६॥
अष्टम हीच 'सख्य' भक्ति । आणि देईं बा तूं विरक्ति । तैसीच देईं निजसुखशांति । ऐसी प्रार्थना तव पायीं ॥३७॥
असो आतां सद्गुरुदेवा । करवीं ग्रंथ पूर्ण ही सेवा । देउनी स्फूर्ति निश्चय बरवा । करवीं कार्य मजकडुनी ॥३८॥
तुज काय असाध्य जगतीं । अवतार अससी त्रैमूर्ती । यांत संशय नाहीं चित्तीं । प्रभो दयाळा गुरुराया ॥३९॥
रज-तम-सत्त्व मिळोनि । एकचि ऐसें दाविलें जनीं । एवं त्रिगुणातीत असोनि । आलासि येथें अवनीं या ॥४०॥
ऐसा तूं माझा दत्तात्रेय । प्रगटला जगदोद्धारा सदय । महिमा तुझी अवर्णनीय । कैसी वर्णूं बा देवा ॥४१॥
मी काय वर्णूं ताता । तूंचि सर्वही कर्ता करविता । माझ्या जिव्हाग्रीं बैसुनी आतां । तूंचि वदत्रीं तव स्तोत्रा ॥४२॥
तुझें स्वरूप धरोनि मानसीं । बोलतों सत्वरी आतां येविषीं । पडतां बालक माता जैसी । धांवे तैसा तूं येईं ॥४३॥
मी जरी विसरें तुजला । तूं न विसरें या तव बाळा । आहे निश्र्चयें पोटीं कळवळा । नाहीं संशय यामाजीं ॥४४॥
असो आतां श्रोते हो सकल । तुम्ही तिष्ठत आहां ये वेळ । पांडुरंगाश्रम - सद्गुरु प्रेमळ । ती कथा समूळ ऐकाया ॥४५॥
तरी आतां झणींच कथन । करितों ऐका सावधान । तेचि वदविती मजकडोन । निश्र्चयें जाणा तुम्ही हो ॥४६॥
मागील अध्यायीं कथानिरूपण । कृष्णाश्रमस्वामींनीं आपण । दुकानदारांचा अपराध असोन । क्षमा करोनि सांभाळिलें ॥४७॥
आणिक सांगुनी उत्तम बोध । क्रमिला मार्ग आपण सुखद । अधिकारी केले स्वामी प्रसिद्ध । पांडुरंगाश्रम स्वधर्मराज्या ॥४८॥
आतां श्रीपांडुरंगाश्रम । स्वामी आमुचे मठाचे अष्टम । यांची कथा गोड परम । सांगूं उत्तम श्रोत्यांसी ॥४९॥
मंगळूरग्रामामाजीं एक । सारस्वत ब्राह्मण भाविक । त्याचें नांव 'सांतप्पय्या' देख । 'नगर' हें असे उपनांव ॥५०॥
त्याची भार्या पतिव्रता। नाम तियेचें 'लक्ष्मी' तत्त्वतां । दुर्गुण नसे अंगीं सर्वथा । परम सद्गुणी आणि गुरुभक्त ॥५१॥
तियेच्या उदरीं पुण्यपुरुष । अवतार घेई जगन्निवास । श्रीदत्तात्रेय हाचि खास । काय पुण्य त्या साध्वीचे ॥५२॥
अनेक सुकृतें असतां गांठीं । होय अवतार ऐशिया पोटीं । उद्धरती त्यांचीं कुळें कोटी । कितीही वर्णितां पुरवेना ॥५३॥
अहा अहा धन्य ती माई । काय सांगूं तुम्हां पाहीं । धन्य ते पितादिक सर्वही । न वर्णवे आमुचेनि ॥५४॥
ऐसें तें जोडपें करितां संसार । झाली लक्ष्मी गरोदर । तिचे डोहाळे परम सुंदर । ऐका आतां भाविक हो ॥५५॥
परम अद्भुत वृत्ति सात्त्विक । इच्छा उपजली प्रेमळ सुरेख । कीर्तन पुराण श्रवण निश्चयात्मक । ऐकावें वाटे तिजला पैं ॥५६॥
आणि सत्कर्मांची बहु हौस । मन तें शांत बहुवस । ऐसें असतां भरले मास । नऊ ते पूर्ण तिजलागीं ॥५७॥
शके सत्राशें एकुणसत्तर । प्लवंग नाम संवत्सर । ज्येष्ठ शुद्ध षष्ठीसी परिकर । प्रसवली ती पुण्यवती ॥५८॥
पुत्ररत्न झालें सुरेख । गौरवर्ण त्याचा देख । बघाया जनांचे मन उत्सुक । झालें तेव्हां अनिवार ॥५९॥
 ब्रह्मतेज तें मुखावरी । विलसे त्याच्या सुंदर भारी । नाहीं कळलें कवणा अंतरीं । अवतारी पुरुष हा असे ॥६०॥
मग बारशाच्या दिवशीं । लागेल दृष्टी म्हणोनि त्यासी । घातलें नाम 'काळप्पा' परियेसीं । मायबापांनीं प्रेमानें ॥६१॥
अहा काय तें मूल सुकुमार । घेती सर्वही नारीनर । म्हणती रतिमदनाहुनि सुंदर । काय लावण्य तव बाळा ॥६२॥
ऐसें असतां बाळ तें सहज । वाहूं लागलें सारिखें रोज । आनंद झाला म्हणती आज । धन्य मानसीं मायबाप ॥६३॥
झालें परम तीव्र चतुर । बोलतां वाटे बृहस्पति थोर । शांत सद्गुण असती अपार । वर्णूं न शकें मी मंदमति ॥६४॥
अष्टम वर्षीं मौजीबंधन । केलें काळप्पयाचें जाण । मुलांमाजीं ज्येष्ठ असून । बुद्धिही तैसीच श्रेष्ठ बहु ॥६५॥
असो ऐसें असतां पाहीं । विद्याभ्यास करिती लवलाहीं । स्वधर्मा न चुके अणुभरही । बहु प्रेम त्यामाजीं ॥६६॥
नाहीं अंगीं आळस अणुमात्र । असे आचार परम पवित्र । ईश्वरभक्ति अहोरात्र । करिती प्रेमळ चित्तानें ॥६७॥
बालपणींच ऐसी भक्ति । बघुनी जन विस्मय पावती । साधु होईल पुढती निश्र्चितीं । ऐसें बोलती नरनारी ॥६८॥
परम तीव्र बुद्धि चतुर । हरएक कार्या सूक्ष्म विचार । वडील जनांसी सन्मान थोर । देई साचार निश्चयेंसीं ॥६९॥
काय तें रूप गुण अमित । मुख पाहतां आनंद होत । चिंतादिक जाऊनि चित्त । होय शांत सकलांचे ॥७०॥
बहुत कासया बोलावें आतां । मेदिनी न पुरे सद्गुण लिहितां । असो मग ऐसें असतां । दहा वर्षें झालीं तया ॥७१॥
तेव्हां तेथें स्वामी कृष्णाश्रम । सद्गुरु जे सप्तम आश्रम । आले तेव्हां ते सुखधाम । मंगळूरग्रामीं हो पाहीं ॥७२॥
त्यांनी बघोनि ऐशी मूर्ति । निवडिली शिष्यस्वीकारार्थीं । मागितला पुत्र सांतप्पय्यांप्रति । उत्कृष्ट बुद्धि देखोनियां ॥७३॥
आणिक केला शिष्य स्वीकार । ही कथा मागील अध्यायीं सविस्तर । सांगितली कृष्णाश्रम गुरुवर । यांच्या चरित्रीं हो पाहीं ॥७४॥
तेवींच कांहीं गोष्टी सुंदर । त्याही वर्णिल्या तेथेंचि समग्र । आतां आणिक अणुमात्र । सांगूं येथें लवलाहीं ॥७५॥
अकराव्या वर्षी संन्यासग्रहण । तेव्हां त्यांचें बालपण । जरी असती अवतारी दयाघन । प्रकृतिधर्म न चुके तयां ॥७६॥
श्रीकृष्ण असतां बाळ । नानापरी खेळे खेळ । कासया केल्या ते वेळ । खोड्या अमित सांगा हो ॥७७॥
ज्या ज्या त्यानें केल्या खोड्या । त्या कीं नव्हे वेड्यावांकुड्या । जेणें हित होय त्या बापुड्या । बाळगोपाळांलागीं पैं ॥७८॥
दहीं लोणी चोरिलें त्यानें । निज गोपाळांकारणें । दहीं दूध नसतां तेणें । रोडले संवगडी म्हणोनि ॥७९॥
गौळणी विकिती लोणी दहीं । मुलांसी खाया ना देती कांहीं । म्हणोनि श्रीकृष्ण लवलाहीं । चोरुनी देत गोपाळां ॥८०॥
हा नव्हे त्याचा दुर्गुण । तो जें करी तेंचि कल्याण । नाहीं त्यासी स्वार्थ जाण । अणुमात्र आपुला त्यामाजीं ॥८१॥
तो न करी कदापि खोडी । गोळणींच्या खोड्या मोडुनि काढी । ज्यासी त्याच्या प्रेमाची गोडी । तोचि जाणेल हें मर्म ॥८२॥
अतो यापरी सद्गुरुमाय । पांडुरंगाश्रम - स्वामिराय । बालपणांत प्रेमळ सदय । काय करिती तें ऐका ॥८३॥
मठाच्या अंगणीं जाउनी सुगुण । कांहीं वेळ खेळे जाण । परी बाहतां सद्गुरु आपण । जाय शीघ्र लगबगेंसीं ॥८४॥
आणि करिती शास्त्राध्ययन । गुरु-आज्ञेपरी करिती वर्तन । किंचित् वेळ मिळतां तेथून । जाती पुनरपि खेळाया ॥८५॥
परी खेळ नव्हे वाईट । धरोनि अंतरी सद्गुरु श्रेष्ठ । पालखी आणि सुंदर मठ । भवानीशंकर हाचि मनीं ॥८३॥
तोचि खेळ खेळ जाऊनि । मानसपूजा करी बैसोनि । आणिक विचार नाहीं स्वमनीं । 'सत्य कोणते' हाचि पैं ॥८७॥
जनां वाटे खेळाया आले । परी यांच्या मनीं असे वेगळें । परमार्थ - विचार निजबळें । करिती अहर्निशीं प्रेमानें ॥८८॥
करोनि हट्ट सद्गुरूपाशीं । रथोत्सव केला परियेसीं । ही कथा मागें कथिली ऐसी । सकलांसी ती आठवेल ॥८९॥
तेंही केलें जनहितार्थ । आपुल्यासाठीं नव्हे किंचित । हेंही कथिलें असे तेथ । मागील अध्यायीं सकलही ॥९०॥
असो यापरी बालपणींचा । काल गेला सुखानें त्यांचा । तेवढ्या वयांतचि साचा । गुरुभाव दाविला जनांसी ॥९१॥
जैसें सांगती सद्गुरुराय । तैसेंचि करी धरोनि निश्चय । दत्तावतार यांत नाहीं संशय । पहा कैसें तें श्रोते हो ॥९२॥
चपल बुद्धि ग्रहणशक्ति । बघुनी सद्गुरु संतोषती । आणिक करिती परम प्रीति । शिष्यावरी हर्षभरें ॥९३॥
योगाभ्यासादि शिक्षण । उपनिषदादि वेदांत - श्रवण । गुरुमुखेंचि झालें अनुदिन । बहुत प्रकारें तयांसी ॥९४॥
झालें पूर्ण ब्रह्मज्ञान । मुखावरीच झळके उठोन । बघतांचि योग्यता यांची पूर्ण । समजोनि चुके जनांसी ॥९५॥
मग होतां सद्गुरु मुक्त । गादीवरी बैसविती यांप्रत । पांडुरंगाश्रम नाम विख्यात । झालें जगतीं हो पाहीं ॥९६॥
मग काश्मीर देशाहुनी । सारस्वत एक पंडित सद्गुणी । रघुनाथशास्त्री म्हणती त्यांलागुनी । बोलाविलें त्यांसी मठांत ॥९७॥
त्यांच्याजवळी संस्कृत व्याकरण । तर्कशास्त्र वेदाध्ययन । वेदान्तादि सारें शिकोन । झाले प्रवीण त्यामाजीं ॥९८॥
तेवींच ज्योतिषशास्त्र सकल । शिकले त्यांतही परम चपल । ऐशी मूर्ति सुंदर प्रेमळ । दैदीप्यमान ती पाहीं ॥९९॥
ते सत्यपूत वदती वदनीं । असत्य न होय त्यांची वाणी । असे अत्यंत अद्भुत करणी । पुढें वानूं ती पाहीं ॥१००॥
पुढील अध्यायीं हेंचि निरूपण । श्रीपांडुरंगाश्रम चिद्धन । केवळ जगदोद्धाराकारण । नाना प्रयत्न करिती ते ॥१०१॥
आनंदाश्रमपरमहंस । शिवानंदतीर्थ पुण्यपुरुष । यांच्या कृपाप्रसादें त्रिंश । अध्याय गुरुदासें संपविला ॥१०२॥
स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां होय भ्रम दूर । त्रिंशत्तमाध्याय रसाळ हा ॥१०३॥
अध्याय ३०॥
ओंव्या १०३॥
‍ॐ तत्सत्-श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥
इति त्रिंशत्तमाऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP