मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥५१॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥५१॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीमदानंदाश्रमस्वामीगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥
जय जय देवा श्रीगुरुनाथा । तूं सर्व जगाची होसी माता । पहाया गेल्या तुजला ताता । न सुचे कांहीं निश्र्चयेंसीं ॥१॥
तुझ्या नामाचें करितां गान । परम शांत होय मन । महिमा अपार करितां वर्णन । न उरे भान कांहीं एक ॥२॥
ऐसी तूं मम माउली देवा । प्रेमाची खाणचि मिळाली सर्वां । मग आम्हां काय उणें तेधवां । पूर्वपुण्य अमित असे ॥३॥
म्हणोनि लाभले जे ऐसे चरण । न विसरावे कधींही जाण । ऐसी कृपा करावी आपण । भक्तवत्सला गुरुराया ॥४॥
असो आतां श्रोते हो सज्जन । परिसा सावध चित्त करोन । श्रीसद्गुरूचे आणिक सद्गुण । प्रेमळ चित्तेंकरोनियां ॥५॥
मागील अध्यायीं केलें कथन । स्वामी आनंदाश्रम दयाघन । यांनीं संपादिलें आत्मज्ञान । कृष्णाचार्यद्वारें पैं ॥६॥
श्रीरामें वसिष्ठाकडोन । 'योगवासिष्ठ' श्रवण करोन । संपादिलें आत्मज्ञान । हेंही जाणा तैसेंचि ॥७॥
आतां ऐका पुढील कथा । कीं स्वामी आपुलिया चित्ता । दिनरजनीं लाविती परमार्था । अखंड धरिती अनुसंधान ॥८॥
करितां अभ्यास वारंवार । 'मी ब्रह्म' हें दृढ होय साचार । मग जीवन्मुक्तदशा थोर । आली लवलाहीं त्यांसी पैं ॥९॥
शांत मूढ आणि घोर । ऐसे वृत्तीचे तीन प्रकार । त्यांत शांत वृत्तीमाजींच थोर । आनंद प्रगटे हैं शास्त्रसिद्ध ॥१०॥
आधींच शांतवृत्ति यांची । म्हणुनी सत्वर ब्रह्मानंदाची । झाली प्राप्ति, मग उणीवता कैंची । समाधानासी हो पाहीं ॥११॥
जेथें असे तृप्त मन । तेथें सहजचि समाधान । ज्यासी होय ब्रह्मज्ञान । त्यासी तृप्ति सर्वदा ॥१२॥
जेथे असे द्वैत - भेद । तेथेंचि होय मनासी खेद । मीचि सर्वांठायीं समृद्ध । तेथ कैंचा भेद उठे ॥१३॥
जगामाजीं हरएक जनां । आपुल्याहुनी वेगळ्या जाणा । वस्तूसाठीं खेद होय मना । न मिळतां ती आपुल्यासी ॥१४॥
आप्तइष्ट नाना भोग । यांतचि गर्क होय जग । त्यांत अणुमात्र होतां वियोग । कष्ट अनिवार होय मना ॥१५॥
आणि आपुलें देह हें पहा । सुखरूप सदा असावें ध्यास हा । अणुमात्र कष्ट येतां, महा - । दुःख होय त्या पाहीं ॥१६॥
इतुकें व्हावया काय कारण । मी व माझें हेंचि जाण । परी ब्रह्मज्ञानियांलागून । सारें ब्रह्मचि, अन्य नसे ॥१७॥
सर्वांमाजीं मीचि असें । मजहुनी अन्य स्थळचि नसे । तेव्हां भेद कैंचा दिसे । मावळुनी जाय तात्काळ तो ॥१८॥
भेदचि नाहीं तेथें कैंची । इच्छा होय विषयांची । म्हणोनि तृप्ति असे त्यांची । सदा सर्वदा निश्चयेंसीं ॥१९॥
जो असे सदा तृप्त । समाधान असे त्याप्रत । इच्छा नसे कवणही किंचित । पैसा अडका इत्यादिकांची ॥२०॥
यावरील कवणही करील प्रश्न । कीं स्वामींसी नसे इच्छा आन । तरी कासया मठाची चिंता जाण । उन्नति व्हावी म्हणोनियां ॥२१॥
तोंबत केशवराव येणें । पैशासाठीं दिधलीं व्याख्यानें । इंग्रजी, म्हणोनि मातृभाषेनें । दिधलें प्रवचन स्वामींनीं ॥२२॥
त्यांत यांनीं कां घ्यावा भाग । यांसी पैसा आणि मठ व्हावा चांग । तरी निरिच्छ कां म्हणसी सांग । श्रीस्वामींसीं तूं पाहीं ॥२३॥
तरी ऐका त्याचें उत्तर । सांगूं आतां सविस्तर । चित्त आपुलें करोनि स्थिर । बैसा सावध होऊनियां ॥२४॥
श्रीसद्गुरुस्वामीनाथा । नसे अणुमात्र कवणही चिंता । केवळ जगदोद्धाकरितां । सकलही कार्ये करिती ते ॥२५॥
अवतारचि जनकल्याणा । म्हणोनि चिंतिती उन्नति जाणा । देवतार्चनादि कर्मागाविना । आत्मोन्नति होत नसे ॥२६॥
वेदोक्त कर्मांनीं कल्याणकारी । शक्ति उद्भवे जगदंतरीं । हें वर्म जाणोनि अभ्यंतरीं । जनोन्नतीस्तव करविती कर्में ॥२७॥
देह झिजविती - रात्रंदिवस । अणुमात्र मनीं न होती उदास । आणि अभिमान नसे त्यांस । 'मीं केलें' असें म्हणोनियां ॥२८॥
याचिकारणें दिधलें व्याख्यान । स्वार्थ नसे यांत अणुप्रमाण । केवळ इच्छिती जनकल्याण । नाहीं अणुमात्र किमपिही ॥२९॥
पहा त्यांसी कासया इतुकें । त्यांत आपुलें घालावें डोकें । केवळ जनहित व्हावें निकें । अन्य हेतु ना येथें ॥३०॥
ते असती बालसंन्यासी । नाहींत आप्त - इष्ट तयांसी । सारें जगचि आप्त परियेसीं । हें सकलांसी विदित असे ॥३१॥
इतुकें असतां करिती कां कष्ट । जनहितार्थ हें दिसे स्पष्ट । न बघतां श्रेष्ठ कनिष्ठ । सकलां समान सांभाळिती ॥३२॥
जरी केला स्थिरता - फंड । न दे जो त्या न करिती दंड । परी उन्नति व्हावी अखंड । मठाची चिरकाल ही इच्छा ॥३३॥
आतां कवणही करील प्रश्न । अवतारिक म्हणतां त्यांलागून । त्यांसी कैंचें असाध्य म्हणोन । पैसा गोळा करावा हो ॥३४॥
तरी परिसा उत्तर तुम्ही । अवतार - पुरुष निश्चयें स्वामी । त्यांस असाध्य नाहीं हें आम्ही । वचन मान्य करूं पहा ॥३५॥
परी स्वामी नव्हे मांत्रिक । अथवा नव्हे जादूगार एक । सिद्धि नाहीं त्यांच्यानजीक । खरे साधु असती ते ॥३६॥
ते न दाविती चमत्कार । न पडे पैसा येऊनि हातावर । त्यांच्या संनिध आत्मविचार । मिळे भरपूर ना तोटा ॥३७॥
असो एवं श्रीस्वामींसी । सिद्धि प्राप्ति नसे त्यांसी । असली जरी तरी ते सिद्धीसी । वश न होती पहा हो ॥३८॥
म्हणोनि स्वामी सद्गुरुनाथ । सिद्धीसी न होती अंकित । खरे जे असती साधुसंत । सिद्धीप्रत ते ढुंकिती ना ॥३९॥
त्यांची महिमा सहजासहज । प्रगट होय पहा तेज । फणस पिकला तेथें रोज । सुवास येई आपैसा ॥४०॥
फणस पिकला हें पहावें नलगे । सुवासेंचि कळों ये वेगें । तैसें साधुसंतांसंगें । सहवास न करितां सहज कळे ॥४१॥
कीं त्यांच्या महिमेवरोनि । हे साधु ऐसें कळे झणीं । जरी भक्तिहीन असला धरणीं । त्यासीही कळे हे साधु ॥४२॥
सुवासें कळे फणस पिकला । महिमा बघतां 'साधु भला'। हें जाणे अभक्तही, त्याला । हें सांगावें नलगे हो ॥४३॥
असो जनांच्या कल्याणास्तव । त्याकडुनीच करविती सर्व । तेवींच स्थिरता - फंड अपूर्व । करावा लागे व्यवहारदृष्टीं ॥४४॥
रामकृष्णादि झाले अवतार । त्यांनीं नाहीं करूनि 'छू मंतर' । मारिलें राक्षसां भूवर । युद्ध-व्यवहारचि केला पैं ॥४५॥
एवं श्री सद्गुरुस्वामी । सतत शांत अंतर्यामीं । झिजविती देह निजभक्तकामीं । परी व्यवहारदृष्टि राखिती ॥४६॥
मराठी इंग्रजी कर्नाटक । तेवीं हिंदी गीर्वाण आणिक । बहुत भाषा शिकले देख । उल्हासें हो ते पाहीं ॥४७॥
जिकडे तिकडे देती प्रवचनें । सकळां कळावें या हेतूनें । मराठी हिंदी कर्नाटक जेणें । कळेल त्यांसि तें बोले ॥४८॥
हे जातीचे सारस्वत । त्यांसीच उपयोग व्हावा येथ । ऐसा दुरभिमान नाहीं असत । चित्तीं त्यांच्या कदापिही ॥४९॥
कवणही जात असो त्यांची । उत्तर देती प्रश्न करितांचि । ऐसी कनवाळू मूर्ति आमुची । काय वानूं हो पाहीं ॥५०॥
नाहीं धनाची अणुमात्र इच्छा । म्हणोनि राजा-रंक हुषार कच्चा । अथवा असो लफंगी - लुच्चा । सर्वही समान त्यांसी पैं ॥५१॥
राग द्वेष कवणावरी । नसे अणुमात्र निजअंतरीं । सर्वांभूतीं समान श्रीहरी । पाहती सर्वदा एकरूप ॥५२॥
निंदक वंदक भक्त अभक्त । सर्वही एकचि बघती निश्चित । गुण दोष कुणाचे नाहीं बघत । शांत राहती सर्वदा ॥५३॥
परम सात्त्विक हृदय त्यांचें । म्हणोनि पावले ब्रह्मज्ञान साचें । त्यापरीच शब्दही वाचे । उठती शांतपणें हो पाहीं ॥५४॥
ज्याचें हृदय असे जैसें । तैसेच शब्द उठती आपैसे । म्हणोनि ब्रह्मज्ञानी परियेसें । शांत अंतरीं समजावें ॥५५॥
यावरी येईल एक प्रश्न । कीं शांत सात्त्विक ज्यांचें मन । त्यांसी होय ब्रह्मज्ञान । तरी संशय एक असे ॥५६॥
कीं पांडुरंगाश्रम स्वामी । कडक होते ऐकिलें आम्हीं । अपराध करितां क्षोभती नेहमीं । तरी ते अज्ञचि कीं काय ॥५७॥
तरी ऐका सावधान । तेही पावले पूर्णज्ञान । हेतु जनांचें करावें कल्याण । म्हणोनि क्षोभत होते ते ॥५८॥
अंतरीं सात्त्विक परम शांत । बाह्यात्कारें क्षोभ दावित । आमुच्यापरी न ढळे चित्त । त्यांचें निश्चयें कदापिही ॥५९॥
प्रारब्धापरी होय वर्तन । एक शांत एक उग्र असोन । ज्ञान त्यांचें एकचि परिपूर्ण । अणुमात्र भिन्न नसती ते ॥६०॥
ज्यासी न होय ब्रह्मज्ञान । तोही कुणीएक शांतता धरोन । जनीं वर्ते प्रेमें करोन । परी अंतरीं त्यास ना शांति ॥६१॥
तळमळ वाटे वारंवार । चतुर न दावी जनांसी बाहेर । परी न होय तो ज्ञानी नर । कदापिही जाणा तो ॥६२॥
चिंता लागली ज्याच्यापाठीं । त्यासी सात्त्विक न म्हणे ज्ञानी ओठीं । अज्ञ म्हणेल स्वार्थासाठीं । सात्त्विक शांत तो म्हणोनि ॥६३॥
एवं ज्ञानी जरी बाह्यात्कारें । क्षोभला तरी अज्ञान नुरे । त्याच्या अंगीं, सांगतों निर्धारें । पूर्ण समाधान असे त्या ॥६४॥
म्हणोनि श्रीपांडुरंगाश्रम । शुद्ध सात्त्विक पूर्ण ब्रह्म । न धरितां अंतरीं अणुमात्र काम । उद्धार केला सकलांचा ॥६५॥
वरिवरी दाविला कोप । मानसीं आशीर्वाद दिधले खूप । सत्पुरुषांचें क्षोभस्वरूप । आशीर्वादचि जाणावे ॥६६॥
“क्रोधोऽपि देवस्य बरेण तुल्यः" ऐसें । पुराणवचन असे खासें । माता बाळावरी कोपतसे । तरी शुद्ध प्रेमचि अंतरीं ॥६७॥
महिमाचि त्यांची असे थोर । त्यांच्यापुढें काय आम्ही अज्ञ नर । सद्गुरूची इच्छा आम्ही पामर । कैसी जाणूं शकों हो ॥६८॥
पांडुरंगाश्रम परम उग्र । आनंदाश्रम शांत समुद्र । ऐसें बोलणें हा अविचार । सत्य सत्य त्रिवाचा ॥६९॥
ज्यांच्या त्यांच्या प्रारब्धापरी । आणि प्रकृतिधर्मानुसारी । वर्तती ज्ञानी जगदंतरीं । कोणीही प्रतिबंध करूं न शके ॥७०॥
एवं सद्गुरुस्वामींचे । दोष पाहूं नये साचे । पांडुरंगाश्रम - आनंदाश्रम यांचें । एकचि अंतःस्वरूप ॥७१॥
त्यांसी यांसी नाहीं भेद । यावरी एक कथा प्रसिद्ध । सांगूं आतां व्हावें सावध । तुम्ही श्रोते सज्जन हो ॥७२॥
धारवाड प्रांत हुबळी-ग्रामीं । शिवकृष्णमंदिर ऐशा नामीं । देउळाजवळी निष्कामी । विधवा वाई होती पैं ॥७३॥
तियेचें नाम अंबाबाई । गुलवाडी हें उपनाम पाहीं । परम भाविक श्रद्धाळू निश्चयी । शांतवृत्ति जियेची ॥७४॥
तीर्थ - क्षेत्र - व्रत - दानें । केलीं नाना उपोषणें । एवं सत्कार्यं परम प्रीतीनें । रात्रंदिन ती करीतसे ॥७५॥
ऐसें असतां एके दिनीं । बाई पहुडली असतां रजनीं । सुंदर स्वप्न देखिलें नयनीं । चमत्कारिक तें ऐका ॥७६॥
श्रीमत्पांडुरंगाश्रमस्वामी । आले परिवारासहित ग्रामीं । त्यांच्या अंगणीं उभे राहिले भूमीं । बोलिले भटजीजवळी ते ॥७७॥
शिवकृष्णमंदिराच्या अंगणीं । आवळीचे झाड उगवलें असोनि । पार बांधावा त्या छान करोनि । शिळा रचोनि सुंदरशा ॥७८॥
ऐसें सांगा अंबाबाईसी । आणि प्रसाद ठेविला तिजसी । देव्हार्‍यामाजीं देवापाशीं । घेईं काढुनी सांगा तिला ॥७९॥
तेव्हां तिनें केलें नमन । आनंदलें तियेचें मन । आंत आली सत्वर धांवोन । तोंच जाहली जागृत ती ॥८०॥
तैं लगबगें उठोनि गेली । देवाजवळी पाहूं लागली । तेथें पुडा देखिला ते वेळीं । विस्मित जाहली निजमानसीं ॥८१॥
मग करोनि सत्वर स्नान । केलें सोवळें वस्त्र परिधान । उघडी पुडा हातीं धरोन । सांजोर्‍या होत्या त्यामाजीं ॥८२॥
विस्मित झाली पाहतांक्षणीं । हरुष जाहला अतितर स्वमनीं । वांटिला सकलांसि प्रेमेंकरोनि । पसरली वार्ता सर्वत्र ॥८३॥
असो ऐसा चमत्कार । ऐका दुसरें आश्चर्य - थोर । पांडुरंगाश्रम-आनंदाश्रम गुरुवर । एकचि ऐसें दावियलें ॥८४॥
जेव्हां दिधल्या सांजोर्‍या येथें । तेचि दिनीं आनंदाश्रमस्वामीतें । मुर्डेश्वर - गांवीं बोलविलें होतें । भिक्षेसी एका - भक्तगृहीं ॥८५॥
तेव्हां तेथें सांजोर्‍या जाण । केल्या होत्या हें कळलें मागून । यावरी समजावें एकचि म्हणोन । गुरु-शिष्य दोघेही ॥८६॥
असो एवं सद्गुरु-महिमान । अपारचि असे, हें आम्हांलागून । वारंवार येई कळून । परी तेथें लक्ष न आमुचें ॥८७॥
आतां आणिक एक ऐका । स्वामींचें सगुण - चरित्र देखा । आमुचें आयुष्य सर्व फुका । गेलें विषयसुख भोगितां ॥८८॥
म्हणोनि ऐकतां त्यांचे सद्गुण । तेथचि रमे आमुचें मन । सत्संगतीनें आत्मज्ञान । होय जनांसी निर्धारें ॥८९॥
परी सर्वही जनालागीं । सत्संगति न लाभे वेगीं । तैशियानें काय करावें जगीं । श्रवण करावें गुरुचरित्र ॥९०॥
ऐसें करितां वारंवार । सद्गुण कळती आम्हां सत्वर । आमुचेंही मन होय तीव्र । परमार्थासी अधिकारी ॥९१॥
असो आतां परिसा सावध । सद्गुरु आनंदाश्रम सुखद । त्यांच्या हृदयीं सदा आनंद । नाहीं दुःख अणुमात्र ॥९२॥
परम औदार्य मानसीं थोर । नम्रपण असे अतितर । कवणाचेंही न दुखविती अंतर । कवण्याकाळीं पहा हो ॥९३॥
प्रवचन करतांही जनांचें मन । न दुखविती अणुमात्र चुकोन । स्वधर्माविरुद्ध न बोलती वचन । युक्तीनें सांगती सूक्ष्म पहा ॥९४॥
खोल विचार केल्यावांचूनि । कवणही कार्य न करिती धरणीं । किती तीव्र बुद्धि म्हणुनी । वर्णवेना आम्हांसी ॥९५॥
जनांसी जैसें केलियानें । बरें होईल तेंचि करणें । जनहितावांचुनी आणिक नेणे । कल्याणचि इच्छीतसे ॥९६॥
भक्तजनांनीं अमुक करावें । ऐसें प्रार्थितां त्या स्वभावें । जेणें हितचि होय बरवें । तेंचि करिती प्रेमानें ॥९७॥
चैत्र शुद्ध पौर्णिमेसी । रथोत्सव होता परियेसीं । तो रहित केला निश्वयेंसीं । काय कारण तें ऐका ॥९८॥
पूर्वीं होता रथोत्सव । लोकही सशक्त होते सर्व । आतां बघतां जगीं अपूर्व । अशक्त झाले जन सारे ॥९९॥
नाना व्याधि उपाधि अनेक । म्हणोनि कार्यासी मन हें उत्सुक । न होय जनांचे निश्चयात्मक । पूर्वींच्यापरी जाणा हो ॥१००॥
त्यामुळें रथोत्सवासी । जातां अनेक कष्ट जनांसी । अन्नोदक न मिळे परियेसीं । योग्य वेळीं त्या समयीं ॥१०१॥
तैसें व्हावया काय कारण । शक्तिहीन झाले जन । झडकरी न होती कामें हातोन । पूर्वींसारखीं नेमस्त ॥१०२॥
म्हणोनि होती कष्ट अनेक । तरीही कष्ट सोखुनी भाविक । येत होते निश्चयात्मक । प्रेमपूर्वक पहा हो ॥१०३॥
परंतु तितके करोनि सायास । परमार्थ न घडे त्यामाजीं खास । कीं तो असे वसंत ऋतूचा मास । पाणी न मिळे उपयोगा ॥१०४॥
उकडुनी अंगीं सुटे घाम । परस्थळामाजीं होती श्रम । तेव्हां कैंचें परमार्थप्रेम । उपजेल सांगा तुम्ही हो ॥१०५॥
जरी झालें कीर्तन प्रवचन । ऐकाया उत्सुक न होय मन । मुलें रडती आक्रंदोन । उकाडा होऊन अनिवार ॥१०६॥
तेवींच जाणोनि भविष्यकाल । अन्नाचें दुर्भिक्ष्य बहु होईल । रेशनिंगचा काल येईल । दुःखद अतितर लोकांसी ॥१०७॥
म्हणोनि रथोत्सव करूनि रहित । ठरविला 'साधन - सप्ताह' त्वरित । कीर्तनप्रवचन - जपादि यांत । होय परमार्थ साधन पैं ॥१०८॥
नाताळीच्या सुटीमाजीं । पुरुषांसीही सवड सहजीं । ठेविला रथोत्सवाच्या ऐवजीं । साधन - सप्ताह उत्तम हा ॥१०९॥
तेणेंकरोनि जनांचे प्रेम । वाढुनी होतील ते निष्काम । मग पावे निजसुखधाम । सहजासहजीं हो जाणा ॥११०॥  
म्हणोनि रथोत्सव रहित करोनि । साधन - सप्ताह आरंभिला झणीं । जनांच्या हितास्तव स्वामींनीं । किती कल्पना योग्य ही ॥१११॥
म्हणोनि येथे संशय कोणीं । घेऊं नये आपुल्या मनीं । कीं रथोत्सव होता तो काढुनी । टाकिलें हें योग्य नव्हे ॥११२॥
जनांनीं योग्य विचार सुचवितां । मान्य होतसे सद्गुरुनाथा । अयोग्य जरी कुणीही सांगतां । न होय मान्य कदापि त्यां ॥११३॥
आमुचे स्वामी सद्गुरुनाथ । काय सांगूं त्यांचें चित्त । प्रेमळ असती अत्यंत । न वर्णवे आमुचेनि ॥११४॥
त्यांचे प्रेम अपार जाण । मी - तूं ऐसा वेगळा भाव न । सर्व वस्तूंमाजीं परिपूर्ण । भरे प्रेम तें अखंडचि ॥११५॥
पिंड-ब्रह्मांड सार्‍या ठिकाणीं । भरलें प्रेम तें चहूंकडोनि । आणि त्यांची तनु-मन-वाणी । प्रेमाची असे त्यामाजीं ॥११६॥
म्हणोनि त्यांच्या मुखांतुनी । जी निघे ती अमृतवाणी । यांत अनुमान न धरावा कोणीं । असत्य नव्हे कदापिही ॥११७॥
आतां दावूं सिद्ध करोनि । कीं सद्गुरुस्वामींची अमृतवाणी । प्रेम भरलें त्यामाजीं म्हणोनि । सत्य वचन आमुचें हें ॥११८॥
ऐका तुम्ही सावधान । कीं स्वामी आनंदाश्रम दयाघन । पावले शुद्ध निजात्मज्ञान । हें कथिलें मागील अध्यायीं ॥११९॥
जे असती ब्रह्मज्ञानी । ते केवळ प्रेमाची खाणी । न होय ज्ञान प्रेमावांचुनी । कदापिही कवणातें ॥१२०॥
नाना वेद मुखोद्गत । शास्त्रें पुराणें सांगती बहुत । परी भक्तिप्रेमावीण निश्चित । न होय प्राप्त ब्रह्मज्ञान ॥१२१॥
प्रेम आपुल्या स्वरूपीं मिळतां । तेथें आनंद मिळे चित्ता । तोचि ब्रह्मानंद तत्त्वतां । एकरूप होत असे ॥१२२॥
सागरापासुनी उपजे लवण । येईल त्यांतील खारटपण । तैसें उठे निजस्वरूपांतून । प्रेम हें जाण निश्चयेंसीं ॥१२३॥
समुद्राचा खारट स्वभाव । लवणामाजीं येई अपूर्व । कीं लवण हें समुद्राचेंचि सर्व । त्यापरीच तेंही असे पहा ॥१२४॥
तैसें असे ब्रह्मस्वरूप जें । त्यांतुनीच प्रेम हें उपजे । प्रेमांत जो आनंद असिजे । तो ब्रह्मस्वरूपाचाचि ॥१२५॥
ब्रह्मस्वरूपीं भरला जो आनंद । तोचि प्रेमांत येई समृद्ध । म्हणोनि प्रेमेंचि ब्रह्मानंद । प्राप्त होय निश्चयेंसीं ॥१२६॥
प्रेमामाजीं नसे कल्पना । मीतूंपणाची नाहीं भावना । केवळ आनंद मात्र जाणा । हें कळे प्रपंचींही सर्वासीं ॥१२७॥
पहा आपुलें प्रेमाचें माणूस । अवचित देखतां होय हरुष । कल्पना न उद्भवे क्षणभरी त्यास । आनंदापुढें कांहींच ॥१२८॥
परी तें आम्हां न कळे कांहीं । भेटीनेंचि आनंद होई । ऐसें म्हणतों आपण सर्वही । परी ना तैसें होय कदा ॥१२९॥
तो आनंद निजस्वरूपाचा । नव्हे भेटीच्या विषयसुखाचा । स्वरूपप्रेमाचाचि साचा । अज्ञानें न कळे आम्हांसी ॥१३०॥
आनंद नाहीं विषयामाजीं । आपुल्यांतचि असे सहजीं । विषय बघतां कल्पना ना दुजी । आनंद उमटे त्या समयीं ॥१३१॥
कल्पनाविरामींच आनंद । होत असे वेदांतसिद्ध । परी हा ठाउका नाहीं बोध । अज्ञजनालागीं पैं ॥१३२॥
“आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति" । हें वर्म गर्जतसे हो श्रुति । पत्नीवरी पत्नीसाठीं न प्रीति । आपणासाठींच प्रिय ती असे ॥१३३॥
तेवींच पतीवरी पत्नी करी प्रीति । ती पतीसाठीं न होय जगतीं । आपणासाठींच प्रिय वाटे पति । सारांश आपणा आपण प्रिय ॥१३४॥
हें जें आत्म्यावरील प्रेम । तें निर्निमित्त असे निःसीम । तें कदापि न बिघडे विषयासम । हा सिद्धांत जाणावा ॥१३५॥
“प्रियही अप्रिय होय घडीघडी । परी कदापि न ये निज नावडी" । आतां जी वाटे विषयाची गोडी । दुसर्‍या घडी ती विटतसे ॥१३६॥
परी आत्म्याची गोडी 'अवीट' । 'शाश्वत' आणि 'सहज' नीट । विषयामाजीं आनंद दिसे जो प्रगट । तो आत्म्याचाचि जाणावा ॥१३७॥
तेव्हां विषयांत आनंद नाहीं । हें सहजचि सिद्ध होई । परी आम्हां अज्ञांसी पाहीं । वाटे विषयांतचि आनंद ॥१३८॥
श्वान मुखीं धरोनि अस्थि । चाखीतसे परम प्रीतीं । तेव्हां रुधिराच्या धारा निघती । दांतांतुनी तयाच्या ॥१३९॥
परी तें समजे हें जें हाड । त्यांतूनी रक्त निघे भडभड । ऐसें समजुनी करी धडपड । खावयालागीं हाडचि पैं ॥१४०॥
आपुलेंचि रक्त हें त्या न कळे । हाडांतचि मजलागीं तें मिळे । ऐसें समजुनी श्वान ते वेळे । न सोडी तें हाड पहा ॥१४१॥
तैसे आम्ही अज्ञजन । आनंद आपुलाचि हें न जाणोन । विषयांमाजीं बुडतों आपण । त्यांतचि सुख मानूनियां ॥१४२॥
विचारें बघतां आपुल्याचि ठायीं । आनंद भरला असे पाहीं । म्हणोनि प्रेमानें जो आनंद होई । तो निजस्वरूपाचा निश्चयें ॥१४३॥
साखर आणि गोडी । कोण याची वेगळीक पाडी । एकचि असे निमिष ना सोडी । गोडी साखरेलागीं पैं ॥१४४॥
तैसें प्रेम आणि आनंद यांची । वेगळीक न होय अणुमात्र साची । दोन्ही असती एकरूपचि । परिपूर्ण ब्रह्म हो जाणा ॥१४५॥
तैसा तो आनंद सार्‍या ब्रह्मांडीं । भरला परिपूर्ण काय वदूं घडीघडी । जो भोगी त्याची गोडी । तो होय तांतडी तें रूप ॥१४६॥
असो एवं ऐसें तें प्रेम । स्वामींच्या अंगीं भरलें निःसीम । तनुमनवाणी यांत अनुपम । भरलें तें प्रेम घनदाट ॥१४७॥
तैशा त्या प्रेमामाझारीं । आनंदचि भरला निर्धारीं । म्हणोनि ती आनंदमूर्ति साजिरी । नामापरीच शोभतसे ॥१४८॥
ऐशा त्या मुखें निघे जें वचन । तें अमृतचि गोड म्हणोन । हेंचि वाक्य सिद्ध करायालागून । इतुका पाल्हाळ कथियेला ॥१४९॥
परी तुम्हीं श्रोतेजनांनीं । क्षमा करावी बालकालागुनी । वेडेवांकुडे शब्द गाउनी । शिणविलें वहुतचि सकलांसी ॥१५०॥
परी सद्गुरुमातेचे सद्गुण । त्यांत गोडी बहुतचि जाण । म्हणोनि सकलांसी आनंद पूर्ण । होईल निश्चयें विश्वास हा ॥१५१॥
असो ऐशा अमृतवाणीतें । दवडूं नये आम्हीं परिसा तें । त्यांचें वचनचि मुख्य आम्हांतें । त्याहुनि श्रेष्ठ ना अन्य ॥१५२॥
गुरुवचनाहुनि श्रेष्ठ । अन्य नसे हें धरावें घट्ट । प्राण गेला तरी हा हट्ट । सोडूं नये कदाकाळीं ॥१५३॥
कवणही असो आपुलें कार्य । गुरुवाक्येंचि सिद्ध होय । प्रपंचीं परमार्थीं उपाय । आज्ञापालन हाचि असे ॥१५४॥  
गुरुभक्ति हीचि एक । भक्तजनांसी मोक्षदायक । त्याहुनी कवणही साधन आणिक । नलगे अन्य गुरुभक्तां ॥१५५॥
जरी ना केली आज्ञा पालन । काय उपयोग भक्ती करोन । येणेंकरोनि गुरूचा अपमान । करितों आम्ही हें सिद्ध ॥१५६॥
सद्गुरूचा होतां अपमान । परमेश्वरासी न होय सहन । सहज लाभे नरक गहन । श्रुति - स्मृति हें सांगतसे ॥१५७॥
म्हणोनि स्वामी जें सांगती वचन । त्यावरी न बोलावें आपण । त्यांची आज्ञा करावी पालन । त्यांतचि कल्याण आमुचें हो ॥१५८॥
आतां आणिक सद्गुण पाहीं । पुढील अध्यायीं बोलूं कांहीं । सादर असावें आपण सर्वही । तुम्ही श्रोते सज्जन हो ॥१५९॥
श्रीसद्गुरु आनंदाश्रम । शिवानंदतीर्थ एकरूप ब्रह्म । यांच्या कृपाप्रसादें एकपंचाशत्तम । अध्याय गुरुदासें संपविला ॥१६०॥
स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां गुरुभक्ति होय दृढतर । एकपंचाशत्तमाध्याय रसाळ हा ॥१६१॥ अध्याय ॥५१॥     
ओंव्या ॥१६१॥     ॐ तत्सत्- श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु    
॥ इति एकपंचाशत्तमोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP