मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
प्रस्तावना

चित्रापुरगुरुपरंपरा - प्रस्तावना

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


ॐ श्रीगणेशाय नमः । श्रीशांतादुर्गीबिकायै नमः । श्रीमत् परमहंस प. आनंदाश्रमगुरुभ्यो नमः । श्रीमत् परमहंस शिवानंदतीर्थगुरुभ्यो नमः ।

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥१॥
ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति,
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ।
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं,
भावातीतं त्रिगुणरहितं सहुरुं तं नमामि ॥२॥

श्री चित्रापुरगुरुपरंपरा चरित्राची ही पहिली प्रत श्रीसद्गुरुभक्तांच्या हातांत देतांना माझे अंतःकरण आनंदानें उचंबळून येत आहे. हा ग्रंथ लिहून पूर्ण होऊन ९।१० वर्षें होऊन गेलीं आाणि तो अशा प्रकारें छापून प्रसिद्ध होईल अशी मीं स्वप्नांतही कल्पना केली नव्हती. परंतु, ज्या सद्गुरूंच्या कृपाप्रसादानें हा ग्रंथ लिहिला गेला, त्यांच्याच कृपेंकरून, त्यांच्या कांहीं सद्भक्तांना प्रेरणा झाली, व हा ग्रंथ छापण्याचा सुयोग घडून आला. हा प्रासादिक ग्रंथ सद्गुरुप्रेमी वाचकांच्या हातीं देतांना माझें मन माझ्या विश्ववंद्य सद्गुरूंच्या प्रेमानें भरून येतें. श्रीगुरुमहाराजांनीं माझ्याकडून प्रेमानें तयार करून घेतलेली ही सेवामय अल्पकृति सर्व वाचक गोड मानून घेतील अशी मला आशा वाटते. श्रीसद्गुरूंनी माझ्याकरवीं वांटविलेल्या या प्रेमामृताचे मुमुक्षु लोक श्रद्धेनें अंतःकरणपूर्वक आकंठ सेवन करितील अशी मी आशा बाळगतें.

मीं वर सांगितलेंच आहे कीं हा ग्रंथ लिहून ९-१० वर्षे होऊन गेलीं. माझ्या परमपूज्य स्वर्गस्थ मात्यापित्यांची हा ग्रंथ छापल्यावर त्याचें पारायण व सप्ताह करण्याची फार प्रबल इच्छा होती. पण त्यांच्या मृत्यूपर्यंत ही त्यांची मनीषा पूर्ण झाली नाहीं. माझ्या पित्यांच्या मृत्यूनंतर अवघ्या तीन वर्षांत हा ग्रंथ छापून प्रसिद्ध व्हावा व तो वाचण्यास आज ते हयात असूं नयेत हा दैवदुर्विपाक आहे. सांगण्याचें तात्पर्य म्हणजे कीं ९-१० वर्षांपूर्वी हा ग्रंथ तयार झाला असूनही तो एका कोपऱ्यांत अंधारांत पडून होता; माझ्या पित्यांच्या मनांत असूनही तो छापण्याचे कार्य, त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे, तसेंच राहून गेलें होतें; परंतु गेल्या वर्षीं मी मुंबईला गेलें होतें तेव्हां हा ग्रंथ प्रकाशांत आणून त्याला उजाळा देण्याचें कार्य कांहीं सद्भक्तांच्या हातून घडण्याचा सुयोग जमून आला, ही देखील सद्गुरूंची कृपाच होय. ज्या परमपूज्य हरिगुरुभक्तपरायण मंडळींनी या महत्कार्याला हात लावला, त्यांचा येथे उल्लेख केल्यावांचून मला समाधान वाटणार नाहीं.

ही माझी अल्प कृति छापून आज वाचकांच्या हातीं पढण्याचा जो सुयोग जमून आला, त्याचे सारें श्रेय, श्री. ह. गु. भ. प. श्री. रामचंद्र कृष्ण कामत ऊर्फ अण्णा कामत, श्री. ह. गु. भ. प. पांडुरंग शिवराम मरबळी व श्री. ह. गु. भ. प. एच् शंकरराव, यांनाच द्यावें लागेल. श्री. प. पू. अण्णा कामतांनीं आपल्या वृद्धावस्थेतही, अतिशय मेहनत घेऊन, श्री. पांडुरंगरावांच्या साह्यानें या ग्रंथाचें संशोधन केलें, व हस्तलिखित तपासून योग्य त्या दुरुस्त्याही केल्या याबद्दल मी त्यांची सदैव ऋणी राहीन. श्री. अण्णा, श्री. पांडुरंगराव व श्री. शंकरराव यांनीं जर मनावर घेतलें नसतें, तर हा माझा ग्रंथ एकाद्या कोपऱ्यांत धूळ खात पडला असता व शेवटीं मातीमोल ठरला असता. पण सद्गुरूंची महिमा वर्णन करावी तेवढी थोडीच ! त्या वेळेस श्री. अण्णा विलेपार्ल्यास आपल्या मित्रमंडळीकडे राहात होते. श्री. अण्णांच्या उतरत्या वयाचा विचार केल्यावर (वर्षे ८३) संशोधनासारखें जिकीरीचे व ग्रासाचें काम करण्यास त्यांना विनंति तरी कोणत्या तोंडानें करावी, म्हणून माझे मन कचरत होतें. परंतु कोणत्या तरी अनामिक, अबोध व गूढशक्तीनें व श्री. शंकररावांच्या सूचनेनें मला विलेपार्ल्याला त्यांच्याकडे ओढून नेलें-आणि काय सांगावें ! अण्णांनीं तें कार्य मोठ्या आनंदानें हातीं घेतलें. इतकेंच नव्हे, तर आपल्या वृद्धत्वाचा व प्रकृतीचाही विचार न करितां दिवसांतले कमीत कमी ४-५ तास या ग्रंथाच्या संशोधनांत घालविले, व अवघ्या एक वर्षाच्या आंत हें काम पूर्ण होऊन जेव्हां तें छापखान्याकडे रवाना झालें, त्या वेळीं माझें अंतःकरण, त्यांच्याबद्दलच्या आदरानें व पूज्यभावनेनें भरून आलें. माझ्या पित्यासमान असलेल्या श्री. अण्णांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. मानवी शब्द त्याला अपुरेच पडतील. श्री. रा. ह. भ. प. मरबळी यांची तर मी अत्यंत आभारी आहे. संशोधनासारखें किचकट कार्य चालले होतें, त्यावेळीं या सद्गृहस्थांनी स्वयंप्रेरणेनें अण्णांना अतिपरिश्रमपूर्वक मदत केली. नंतर ते साडेतीन महिने याच कार्यासाठीं, अण्णांकडे माशेलला (गोव्यांत) जाऊन राहिले. त्यावेळीं, त्यांनीं स्वत च्या प्रापंचिक अडचणींकडे दुर्लक्ष केलें, आर्थिक अडचणींनाही जुमानलें नाहीं, व शेवटी हा ग्रंथ छापखान्यापर्यंत पोंचविण्याचें कार्य देखील त्यांनी मनावर घेऊन केलें, याबद्दल मी त्यांची फार आभारी आहे.

संशोधनाचे कार्य पूर्ण झालें होतें, व हा ग्रंथ छापून प्रसिद्धीस आणण्याची श्री. मरबळींना व त्यांच्या इतर सहकाऱ्यांना फार उत्सुकता वाटत होती. पण तें शिरावर घेऊन आर्थिक सहाय करणाऱ्याची जरूर होती. त्यावेळी ह. भ. प. एच. शंकरराव पुढें सरसावले व त्यांनी अगदीं प्रेमपूर्वक या कार्यास हातभार लावून तो छापून प्रसिद्धीस आणला त्याबद्दल त्यांचेही मी अत्यंत आभारी आहे. निर्णयसागर छापखान्याचे गुरुप्रेमी व्यवस्थापक व त्यांचे इतर सहकारी यांनी हा ग्रंथ अल्पावधींत शक्य तितका सुबक बनवून तो वाचकांपुढें आणला याबद्दल मी त्यांचेही आभार मानतें.

प्रुफें तपासण्याचे अवघड काम दिलेल्या मुदतींत करून देणारा न मिळाल्यामुळे, तें काम श्री. पांडुरंगराव मरबळी व त्यांच्या पत्नी सौ. रुक्मिणीबाई यांनी स्वतः मेहनत घेऊन केलें आहे. मराठी त्यांची मातृभाषा नसल्यानें कांहीं चुका राहण्याचा संभव आहे. परंतु वाचकवर्ग त्या सुधारून घेतील अशी मी आशा करितें. तद्वत् त्या चुका प्रकाशकांच्या नजरेस आणल्यास पुढील आवृत्तींत दुरुस्ती करण्यास सुलभ पडेल.

श्री. शांताराम नागरकट्टी, श्री. शंकरराव उभयकर इत्यादि गुरुप्रेमी मंडळींनींही या कार्याला उत्तम हातभार लावला याबद्दल या मंडळींचे मी अत्यंत आभार मानतें.

हा ग्रंथ प्रासादिक आहे हें मीं पूर्वी सांगितलेच आहे. नाहींतर मी पामर काय लिहिणार ! सद्गुरूंचें वर्णन करतांना वेद-श्रुतींची वाणीही अडखळते. बृहस्पतींना शब्द सुचत नाहींत, तिकडे माझ्यासारखी अल्पमती पामर काय लिहिणार ! हा ग्रंथ माझ्या हातून लिहिला गेला तो केवळ गुरुप्रेरणेनेंच !

"यांत माझे कांहीं नाहीं । गुरुनाथांचीच प्रेरणा ही ।
ते जैसें वदवितील कांहीं। तैसें तें पाहीं मी वदें ॥१॥"

या ग्रंथांत जें कांहीं लिहिलें आहे तें माझ्या गुरूंचें वाक्य आहे. त्यांचा प्रसाद मीं तुमच्यापुढें ठेविला आहे. हा प्रासादिक ग्रंथ केव्हां व कसा लिहिला त्याचा इतिहास थोडक्यांत देत आहे.

आजपर्यंत सद्गुरुभक्तांनीं आपापल्या इच्छेप्रमाणें आपापल्या गुरूंचीं चरित्र लिहिलीं आहेत. श्रीगाणगापुर निवासी श्रीसद्गुरु श्रीनृसिंहसरस्वतीमहाराज यांचे चरित्र "गुरुचरित्र" या नांवानें प्रसिद्ध आहे, तें आबालवृद्धांच्या परिचयाचे आहे. पण आतापर्यंत आमच्या श्रीचित्रापुरगुरुपरंपरेचें चरित्र कुणीं लिहिलें नव्हतें. परंतु कांहीं वर्षामागें श्रीसद्गुरुप्रेमी चंदावर वेंकटराव (कोबळ्ळी वेंकटराव) यांनीं या परंपरेचें लहानसें गद्य चरित्र कानडी भाषेंत लिहिलें होतें. तें पाहून माझी आई म्हणाली, "हें कानडी कांहीं मला वाचतां येत नाहीं. मराठींत असतें तर मीं तें रोज वाचलें असतें." तें ऐकून माझे बंधु श्री. रा. अण्णाजी मंगेश भट हे म्हणाले, "उमा, तूं कां मराठींत हें चरित्र लिहीत नाहींस ? ओवीबद्ध चरित्र लिहिण्याचा तूं प्रयत्न कर. मग आईला तें वाचतां येईल, व तिच्या मनाला शांति लाभेल. "मीं म्हटलें, "छेः, मला कुठले येणार लिहायला ! मी अशिक्षित, मला इतकें लिहायची कुठली बुद्धि !" आमच्या बंधुराजांनीं 'शुभस्य शीघ्रं' या म्हणीनुसार लगेच कागद शाई लेखणी वगैरे साहित्य आणून दिलें व म्हणाले “श्रीगुरूच तुझ्याकडून लिहून घेतील. तूं लिहायला सुरुवात तरी कर." जणूं सद्गुरूच त्यांच्या जिभेवर बसून हें वदीत होते, आणि त्याच दिवशीं सुवर्णमुहूर्तावर या ग्रंथाचा पहिला अध्याय लिहिण्यास घेतला. तीन दिवसांत हा अध्याय पूर्ण झाला. त्याच वेळीं सुदैवानें श्रीसद्गुरु आनंदाश्रम हे धारवाडला आले होते. त्यांच्या हातीं हा प्रथम अध्याय ठेवला. त्यांनीं तो पाहून प्रसाद म्हणून परत माझ्या हातीं दिला. त्यानंतर वेळोवेळीं माझे सद्गुरु, श्रीपांडुरंगाश्रम, श्रीआनंदाश्रम आणि श्रीशिवानंदतीर्थ, यांनीं मला अंतःस्फूर्ति देऊन माझ्याकरवी हा ग्रंथ पुरा करविला.

पारमार्थिक दृष्ट्या 'स्त्री-पुरुष' हा भेद असूं शकत नाहीं, म्हणून 'गुरुदासें' असा पुल्लिंगी ग्रंथ लिहिला आहे. परंतु व्यवहारांत आपण तो भेद मानतोंच. आपले धर्मगुरु परिपूर्ण ज्ञानी आहेत, परंतु सामाजिक प्रतिबंध त्यांना श्रीसंभाषण वर्ज्य करावयास लावतात. साहजिकच स्त्रियांना वाटतें कीं, आपण गुरुप्रेमास मुकतों आहोंत. आाणि त्या अन्य सत्पुरुषांस शरण जाऊन आपलें पारमार्थिक कल्याण करून घेण्याचा प्रयत्न करितात. वास्तविक पाहतां गुरुप्रेमास आपल्या स्त्रिया मुकल्या नाहींत, आणि कुठेही जाऊन अनुग्रह घेतला तरी आपल्या स्वामींचं कृपाछत्र त्यांच्यावर असतेंच. म्हणून आपले स्वामी आणि सद्गुरु एकरूपच आहेत अशी भावना साहजिकच होते. धर्मगुरूंच्या कृपेनें मोक्षगुरु लाभतो. आपले स्वामी बाह्यात्कारी स्त्रियांशीं बोलत नसले, वरी हृदयांत ते त्यांच्याशीं बोलतात. त्यांचें प्रेमच त्यांना तारतें. आपली भक्ती जर दृढतर असेल तर स्त्रियांना स्वामीमहाराजांकडे न बोलतां सुद्धां त्यांच्याकडून जप घेतल्यानेंच, आत्मज्ञान मिळूं शकतें. दृढतर भक्ति असेल तर स्वामी, आापल्या हृदयांतच प्रगट होऊन, आपल्याला आत्मज्ञानाचा उपदेश करतात, हें अक्षरशः खरें आाहे. आज आपली श्रीआनंदाश्रम माउली म्हणजे केवळ परब्रह्माची, आनंदाची मूर्तीच आाहे. त्यांच्या सांनिध्यांत सुवास भरला आहे.

फुलांच्या सांनिध्यांत सुवास भरलेला आहे. तें फूल ज्याच्या डोक्यांत अगर हातांत आहे त्याला मात्र सुवास देतें, आणि त्याच्याजवळील अन्य लोकांना तें सुवास देत नाहीं काय ? तद्वत् स्वामीमहाराज ज्यांच्याशीं बोलतात त्यांना मात्र स्वस्वरूपाचा आनंद देतात, आाणि अन्यांना तो मिळत नाहीं असें कधींही झालें नाहीं. पण अज्ञानामुळे आम्हांला तसें वाटतें. एके काळीं माझी सुद्धां तशीच समजूत होती. म्हणूनच मींही स्वामींकडे जप घेतला असूनही (१९१९ सालांत) त्यांच्याविषयीं पूज्यबुद्धि गुरुप्रेम असें असूनही वर लिहिल्याप्रमाणें मनाला तळमळ लागली, आणि ३-४ वर्षांपासून श्रीशिवानंदमहाराजांच्या दर्शनाची व उपदेशाची उत्कंठा लागली होती, ती स्वामींकडे जप घेतल्यापासून ६ महिन्यांनींच पूर्ण होऊन शिवानंद‌महाराजांचें दर्शन त्यांच्याच कृपेनें झालें, व अनुग्रह झाला. म्हणूनच स्वामी आणि महाराज हे माझे दोन डोळे असेंच मला वाटतें. दोन्ही एकरूपच आहेत.

या ग्रंथांत जें कांहीं चांगलें आहे तें सर्व श्रीसद्गुरुमहाराजांच्या कृपेचें फळ होय. शेष राहिलेल्याची जबाबदारी माझी, म्हणून 'हंसक्षीर' न्यायानें वाचकांनीं त्याचा फायदा घ्यावा ही नम्र विनंती.
शेवटीं माझ्या पूज्य आईवडिलांच्या चरणीं व सद्गुरूंच्या चरणारविंदीं मस्तक ठेवून, हे आरंभींचे चार शब्द मी पुरे करितें.
उमाबाई आरूर धारवाड, १-२-१९५५

N/A

References : N/A
Last Updated : January 15, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP