भोग - प्रतीति - समयांत कसा अभोक्ता
बोलेल हें हरिच आपण वेद - वक्ता
भोगीं असोनिही अभोक्तृपण - प्रतीती
भोक्ता नव्हे म्हणुनि वर्णिल तत्त्वरीती ॥१॥
चैतन्य सर्वगत केवळ बिंब जैसें
देही कमात्र भरलें प्रतिबिंब तैसें
दोहींस सत्वगुण - योग तरी प्रतीती
हेतों सुषुप्ति सरतां खुण सर्व चित्तीं ॥२॥
नाहीं सुषुप्ति - समयीं स्व - पर - प्रतीती
आत्मा तथापि निज हाचि विचारचित्तीं
भोगीं अभोक्तृपण यद्यपिही स्फुरेना
बिंबात्मता निज तथापिहि अंतरेना ॥३॥
भोगांत जेसमयिं भोक्तृपणप्रतीती
आत्मा जरी स्फुरतसे प्रतिबिंब चित्तीं
आत्मा नव्हे नम्हणवे प्रतिबिंब जेव्हां
भोक्तृत्वही स्फुरतसे त्दृदयासि तेव्हां ॥४॥
सत्वोदकांत तम - कर्दम मिश्र जेव्हां
तें बिंब जें नम्हणवे प्रतिबिंब तेव्हां
सत्वांत जागरिं तया प्रतिबिंब चित्ती
बिंबींच त्यासहि निजात्मपणप्रतीती ॥५॥
निद्गेंत जो बहुसुखें स्व - सुखें निजेलों
तो प्रत्ययासहित जागृत मीच झालों
हा प्रत्यय प्रतिमुखात्मपणें तथापी
आत्मत्व आठवि सुषुप्ति - गत - स्वरुपी ॥६॥
जैसें सुषुप्ति - समयीं प्रतिबिंब - बिंबीं
एकच येरिति समाधि - सुखाऽवलंबीं
जागा सुषुप्ति - सुख आठवि याचरीती
भोगोनि भोगहि अभोक्तृपण - प्रतीती ॥७॥
बिबैक्यही सम समाधि - सुषुप्ति - काळी
भोगामधें त्रिगुण हे प्रतिबिंब पाळी
त्यालाचि यद्यपिहि भोक्तृपण - प्रतीती
आहेचि बिंबहि अभोक्तृपणें स्वचितीं ॥८॥
आधार सत्व - सलिला क्षिति बिंब जेव्हां
चिद्रूप त्यांत दरडी दिसतात तेव्हां
बिंबात्मतेकरुनि सत्व - जळ प्रकाशे
तेव्हां तयाउदकिं चित्प्रतिबिंब भासे ॥९॥
चिद्विंब जें लय - समाधि - सुषुप्ति माजी
आत्मा न तो म्हणउनी म्हणवे कसा जी
भोगासि जेसमधिं तत्प्रतिबिंब भोगी
बिंबीं अभोक्तृपण देखति आत्मयोगी ॥१०॥
बिंबीं कदापि न गुण - त्रय - रुप वृत्ती
यालागिं तेथ नवसे किमपि प्रवृत्ती
भोगीं प्रतीति उपजे प्रतिबिंबरुपीं
सत्वें समाधि - गत बिंब सुखस्वरुपीं ॥११॥
तेथें प्रतीति नदिसे पडतां सुषुप्ती
सत्वास जेसमयिं तामस मूढ वृत्ती
सर्वत्र तें वळखिलें निज सर्व संतीं
सत्वें तथां तहि समाधि - सुख - प्रतीती ॥१२॥
साक्षी सुषुप्ति - समयीं म्हणती तयातें
निर्धर्मकत्व बरवें नकळे जयातें
साक्षित्व ईश्वर - उपाधिकरुनि जेव्हां
जीवात्मयासि निरुपाधि चिदैक्य तेव्हां ॥१३॥
साक्षित्व केवळ घडे अगुणीचं जेव्हां
सापाधिधर्म निरुपाधिपणींच तेव्हां
साक्षित्व यास्तव न केवळ निर्गुणत्वीं
तेथे चिदैक्य तमज्यासमयांत सत्वीं ॥१४॥
सत्वोंदकांत मिसळे तम पंक जेव्हां
बिंबामधे प्रतिमुखासि चिदैक्य तेव्हां
साक्षित्व ईश्वरउपाधिस कां असेना
याला प्रतीति निरुपाधिपणें दिसेना ॥१५॥
स्व - प्रत्ययाविण उपाधि असोनि नाहीं
साक्षित्व तेथ वदधे न तयासि कांहीं
जीवात्मयासि न असे प्रळयीं प्रतीती
तैसी असोनिहि उपाधि पडे सुषुप्तीं ॥१६॥
अंधासि भास्कर दिसे न अशाच रीती
झांकील नेत्रहि तई न रवि - प्रतीती
एवं प्रतीति न असे प्रळ्यांत जैसी
नाहीं सुषुप्ति समयांतहि यासि तैसी ॥१७॥
साक्षित्व यासि नघडे मतिमूढ जेव्हां
बिबैक्य पावत असे प्रतिबिंब तेव्हां
सत्वांत जागरिं जरी प्रतिबिंब होते
आत्मत्व शाश्वत अखंडहि तेंचि यातें ॥१८॥
तें नातळे रजतमा सुख दुःख भोगी
तेथें अभोक्तृपण देखति आत्मयोगी
सत्वांत जागरिं जरी प्रतिबिंब जेव्हां
पाहे सुषुप्ति - सुख आपण तोंचि तेव्हां ॥१९॥
आत्मप्रतीति सकळां प्रतिबिंबरुपें
ज्ञात्यास केवळ सुषुप्ति - गत - स्वरुपें
होऊनि भोगित असे प्रतिबिंब देहीं
बिंबासि भोक्तृपण तो नदिसेचि कांहीं ॥२०॥
बिंबीं अभोक्तृपण सिद्ध परि प्रतीती
बिंबासि तो दिसतसे न असेच रीती
त्याला अभोक्तृपण मानियलें तथापी
नेणें अभोक्तृपण तें स्व - सुख - स्वरुपीं ॥२१॥
भोक्तृत्व जेसमयिं या प्रतिबिंबरुपीं
तेव्हां अभोक्तृपण तें न गमे स्वरुपीं
यालागि भोगुनि अभोक्तृपण - प्रतीती
कैसी म्हणाल परिसा तरि येथ रीती ॥२२॥
चैतन्य हें त्रिविध वेद - पुराण - संती
मानूनियां उरविलें निज एक अंतीं
बिंबार्क ईश दुसरें प्रतिबिंब नीरीं
जो जीव त्यांतुनिहि तत्प्रतिभा शरीरीं ॥२३॥
चिद्विंब तो प्रतिफळे रवि कांस्य - पात्रीं
जीवत्व तें सकळ - जीव - उपाधि - मात्रीं
भिंतीवरी प्रतिमुखांतिल तेज जैसें
स्थूळासि चेतवितसे प्रतिबिंब तैसें ॥२४॥
ऐशातिहींवरि फिरे जन - सत्व - वृत्ती
सत्वेंकरोनिच तदन्यगुणप्रवृत्ती
चिच्छक्ति सत्वगुण त्या करितां प्रतीती
सत्वैक मात्र न उरे पडतां सुषुप्ती ॥२५॥
तें सत्व शुभ्र अति निर्मळ नीर जैसें
काळें तथांत तम कर्दम - रुप तैसें
तें क्षोभतां उदक सत्व गढूळ जेव्हां
मोडे प्रतीति किमपि स्फुरते न तेव्हां ॥२६॥
सत्वांत जागरिं घडे प्रथम प्रतीती
तत्वत्ययें मग रजस्तमरुप वृत्ती
चैतन्य तो त्रिविध एकचि त्यांत जेथें
सत्वें प्रतीति गमते तितुकीच तेथें ॥२७॥
सूर्य प्रभांतर तयांतहि दृष्टि जेथें
पावे प्रकाश गमतो तितुकाचि तेथें
दृष्टीस चंचल दिसे प्रतिबिंब जेव्हां
बिंबार्क चंचळ नसे नदिसोनि तेव्हां ॥२८॥
भोगांत हा डळमळी रवि जेविं नीरीं
चिद्विंब सूर्य नदिसोनि नसे विकारीं
बिंबात्मतेकरुनि चंचळता नमानी
भोगोनि भोग नमनी तरि काय हानी ॥२९॥
भोगांतही जरि अभोक्तृपणासि पाहे
बिंबात्मतास्मृति अखंड तयासि राहे
भोगी सुखाऽसुख तरी प्रतिबिंब त्याचें
आत्मत्व बिंबगत शाश्वत जासि साचें ॥३०॥
भोक्तृत्व आणिक अभोक्तृपण - प्रतीती
सत्तेसि तों नसति दोनिहि बुद्धी - वृत्ती
बुद्धींन भोगित असे प्रतिबिंब जेव्हां
बिंबीं अभोक्तृपण आठवि बुद्धि तेव्हां ॥३१॥
बिंबीं अभोक्तृपण सत्य जरी कळेना
हें ज्ञान - हीन - जन बुद्धिस आकळेना
नेणें अभोक्तृपण बिंब जरी तथापी
आत्मत्व होउनि न भोग तथा स्वरुपीं ॥३२॥
आत्माचि तो कसि तयासि नसे प्रतीती
ऐसें म्हणाल तरि कां न पहा सुषुप्ती
आत्मा प्रतीतिमय जो इतुकाचि जेव्हां
नाहीं सुषुप्ति समयीं तरि काय तेव्हां ॥३३॥
आत्मा सुषुप्तिंत असे तरि याप्रतीतीं
त्याचें स्वरुप नव्हती गुण - बुद्धि - वृत्ती
शंकानिवृत्ति इतुकी निज - वैदिकांची
शंके तथापिहि अवैदिक - बुद्धि कांची ॥३४॥
लोकीं द्विधा द्विविध निंदक लोक - वेदीं
बौद्ध प्रसिद्ध कपटें करि भेद - वादी
यौद्धां प्रमाणचि न केवळ वेद जैसे
पारवांडियासी अवघे निगमार्थ तैसे ॥३५॥
त्यामाजि बौद्ध म्हणती पडतां सुषुप्ती
आत्मत्व शून्य उरतें नसतां प्रतीती
येथेंच यावरि नवेचुनि वेदवाणी
संदेह हा अनुभवें हरि चक्रपाणी ॥३६॥
जें शून्य ते सुख असें सहसा घडेना
तेव्हां सुषुप्ति समयीं सुख सांपडेना
होतांचि जागृति सुख स्मरतो किमर्थ
स्वमांत जागरिं न जें सुख तें समर्थ ॥३७॥
चैतन्य तेंचि सुख जागरिंही प्रयासीं
आत्म - स्वरुप गमतें सुख जे जयासी
जाणे सुखाऽसुख तयाविण अन्य जेव्हां
याला सुषुप्तिसुखही नघडेचि तेव्हां ॥३८॥
जाणे सुखासि सुख यासि जई कळेना
नाहींच हा जरि सुषुप्तिस आढळेना
ऐसें म्हणा जरि म्हणाल तरी घडेना
तें सौख्य यासि मग जागरिं सांपडेना ॥३९॥
होतों सुखें किमपि जेथ म्हणे कळेना
तें यासि तेथ नसतां सुख आकळेना
आहे म्हणाल तरि तरी तो सुख - भोग याला
झाला कसा किमपिही नकळोनि बोला ॥४०॥
आतां म्हणाल सुख तेथ तया स्फुरेना
जों यासि जागृति न तोंवरि तें रमरेना
तेव्हां तनूसि निजल्यावरि गंध लागे
तैं सत्य जागरिं कळे सुख तेंचि सांगे ॥४१॥
तेव्हां सुषुप्ति - समयीं सुख - लेश नाहीं
स्रकूचंदनादि सुख - लेश कळे न कांहीं
होतों सुखें किमपि जेथ कळे न तेथें
या प्रत्ययासि तरि उत्तर हें न येथें ॥४२॥
स्रकूचंदनादि घडले मज भोग देहीं
निद्रेंत हें सुख मला कळलें न कांहीं
ऐसें म्हणे परि सुषुप्ति सुखासि ऐसें
निद्रेंत सौख्य नव्हतें म्हणवेल कैसें ॥४३॥
तेथें प्रतीति नसतां सुख सिद्ध जेव्हां
भोगेंकरोनि सुखभोग न तेथ तेव्हां
जों भोग्य भोक्तृपण भोगज सौख्य ऐसा
नाहीं विवेक सुख - भोग वदाल कैसा ॥४४॥
एवं असोनि नकळे सुख तेथ जेव्हां
तें भोगजन्य सुख तों म्हणवे न तेव्हां
जीकां सुषुप्ति समयीं सुखरुप तेथें
तो बुद्धिने स्मरतसे सुख तेंचि येथें ॥४५॥
चैतन्य आणि सुख यास्तव एक दोन्ही
आतां म्हणाल जरि चेतनतेसि हानी
चैतन्य कोठुनि वदा उपजे प्रबोधीं
बुद्धी स्मरे निज - अचेतनते समाधीं ॥४६॥
काहींच जेथ नकळे सुख तेथ आहे
या प्रत्ययें निज - जडत्वचि बुद्धि पाहे
तेथील जें सुख तयासिच आत्मता हे
चैतन्य - हानि म्हणणें न तयासि साहे ॥४७॥
बुद्धीस यास्तव कळे परि भोग नाहीं
ज्यालागि भोग जड तें म्हणवेन कांहीं
त्या चित्सुखेंकरुनि हे दिसती प्रतीती
बुद्धि - प्रतीति न उरे पडतां सुषुप्ती ॥४८॥
कांहींच जें न कळणें जडरुपता हे
आनंद - मात्र - मतिवांचुनि हाचि राहे
भोक्ता तयाविण दुजा तरि सांपडेना
बुद्धीस भोक्तृपण तों सहसा घडेना ॥४९॥
आत्मत्व केवळ सुषुप्तिपुढें ढळेना
अन्यत्र भोक्तृपण त्याविण आढळेना
हें वृत्तिरुप कळणेंहि तया घडेना
वृत्ती सचेतन सुषुप्ति तई पडेना ॥५०॥
बाहेरही पसरती बहु दूर वृत्ती
देहाचि आत्म - गत भोग तथापि होती
ज्याला न भोग जडता स्फुट सिद्ध त्याला
चैतन्य - सिद्धि - सुखमात्र न केविं बोला ॥५१॥
आतां म्हणाल तरि कां न तया प्रतीती
हे आइका अनुभवेंचि करुनि रीती
आत्मा वदे परि जिभेविण बोलवेना
चाले स्वयें परि पदाविण चालवेना ॥५२॥
सत्तेकरोनिच उठे स्वपर - प्रतीती
एवं तथापिहि अपेक्षित तेथ वृत्ती
आत्मा असे नरव - शिरवाऽग्र समग्र - देहीं
वृत्तीविणें स्फुर तसे न तयासि तोही ॥५३॥
आत्मा तनूंत भरला परि वृत्ति जेथें
पावेल अंग तितुकेंचि गमेल तेथें
पादादिकां अवयवां मनि जों रमरेना
व्यापोनि तेस्थळिं असोनिहि तें स्फुरेना ॥५४॥
येणेंरितीं स्व - पर - रुपहि याप्रतीती
होती प्रकाशति जई निज - चित्त - वृत्ती
वृत्ती प्रकाशति म्हणाल तुम्हीं जडाला
तेव्हां सुषुप्ति - सुख वृत्तिवरीच बोला ॥५५॥
अंगीकराल तरि तेथ नसे प्रतीती
आतां प्रकाशक कशा जड - रुप - वृत्ती
मानाल वृत्तिकरितां जरि या प्रतीती
होती सुषुप्ति - समयीं जडमूढ वृत्ती ॥५६॥
ज्याला सुषुप्ति - सुख घेउनि तोचि वृत्ती
वृत्तिप्रकाशक तयास करी प्रतीती
वृत्ती नसोनिहि सुषुप्तिंत सौख्य जेव्हां
जों वृत्तिहीन सुख केवळ तोंचि तेव्हां ॥५७॥
एवं प्रतीति करणार जडा तयातें
सांगा सुषुप्ति - सुख केविं जडासि होतें
ज्याला सुषुप्तिसुख जागर - भोग त्याला
तो स्वप्रकाश सुखरुप न केविं बोला ॥५८॥
ज्याला सुषुप्ति - ममयीं न दिसे प्रतीती
तोचि स्मरे स्वसुख तें उठतांचि वृत्ती
वृत्ति - प्रकाशपण त्यासि किमर्थ तेथें
नाहीं निजोनि उरतो सुखमात्र जेथें ॥४९॥
ऐसें म्हणाल तरि झांकति नेत्र जेव्हां
दीप प्रकाशित नसे नयनासि तेव्हां
दीपें प्रकाशित घटादिक सर्व गेहीं
आत्मा प्रकाशित समस्त असेंचि देहीं ॥६०॥
निद्रा - मतींत मिसळे तम - पंक जेव्हां
दृष्टींस जेविं पटलें तम तीस तेव्हां
दीपें प्रकाशित घरांत घटादि - सृष्टी
तैसीच ते पटळ - युक्तहि अंध - दृष्टी ॥६१॥
एवं तथापिहि दिसे नयनीं न कांहीं
ऐसी सुषुप्ति - समयांतहि बुद्धि देहीं
दीप - प्रकाश गृहिं आणि घटादि - सृष्टी
दीपेंच हे सकळ देखति जेविं दृष्टीं ॥६२॥
आत्म - प्रतीति - सहिता सकळां प्रतीती
आत्म - प्रभेकरुनि जाणति बुद्धि - वृत्ती
हें श्रोत - शुद्ध - मत यासि न बाध कांहीं
ऐसें अवाधित मतांतर मात्र नाहीं ॥६३॥
क्रांते मतें सकळ - आत्मपणासि जेथें
नेणोनि बोलति समस्त अयुक्त तेथें
तो भ्रांत जो द्विज निज - द्विजता न जाणे
तैसाचि लोक निज - आत्मपणासि नेणे ॥६४॥
ऐसें असोनि करिती कुमतें तथापी
अंधासि अंध - पथिं घालिति अंध - कूपीं
जैसीं अवैदिक - मतें अति - वेद - बाह्यें
वेदाश्रितें तसिंच जीं कुमतें असात्द्यें ॥६५॥
तीं उत्तर - प्रकरणीं अवघीं मुरारी
दूषील आत्मपण बाधित ज्या विचारीं
वृत्ति - प्रकाशक न वृत्तिमय प्रतीती
आत्मस्वरुप म्हणवोनि सुषुप्तिरीती ॥६६॥
सर्वाऽनुभूत मत वैदिक सिद्ध होतां
आत्मा अवाधित कसा इतराति आतां
जे कां अवैदिकहि वैदिक - वेष - धारी
ते ये स्थळीं करिति तर्क कुतर्क भारी ॥६७॥
नाहीं सुषुप्ति - समयीं म्हणतां प्रतीती
अंगीकरा म्हणति नास्तिक - शून्य - रीती
त्यांचा कुतर्क - मत - भंग करावयाला
गूटार्थ हा अनुभवें हरि बोलियेला ॥६८॥
नाहींतरी श्रुतिविरुद्ध मतें प्रसिद्धें
केलीं बृहस्पतिमुखें सहजें विरुद्धें
जे बात्द्य वैदिक दिसोनिहि गुप्त - बोध
श्रुत्यर्थ मोडिति न जाणति तत्व शुद्ध ॥६९॥
आत्मत्व - खंडन तथा मतिचें मुरारी
आतां करील निगमाऽनुभवें विचारीं
आत्मत्व - खंडन करील रथागपाणी
त्याचें न जैं अनुभवी निगमीं पुराणीं ॥७०॥
तें उत्तर प्रकरणीं सुजनीं पहावें
आत्मत्व येथ कथिलें हरिनें स्वभावें
हा आत्मतत्व म्हणऊनि यथार्थ नामें
अध्याय हा रचियला जगदेक - धामें ॥७१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 27, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP