वंदोनियां स्थिर - चराऽत्मक - वासुदेवा
ध्यानीं फणींद्रशयनी जगदात्मदेवा
श्री - कर्म - तत्व जनसत्व - विशुद्धकारी
दिव्य प्रबंध रचितो भब - बंध - हारी ॥१॥
ज्याचें मुख द्विज असें पुरुषाख्यसूक्तीं
त्याचेंच कीं वदन वामन हे तदुक्ती
विश्वात्मते करुनि तों दुसरें असेना
ग्रंथासि यासि करणार दुजा दिसेना ॥२॥
जो सर्व - बुद्धि - गन चित्प्रतिबिंबरुपें
तो भक्त - त्दृद्गत अनंत निजरचरुपें
त्याच्या मुखेंचि उपदेशनि आत्मविद्या
जीवांचिया हरि मुकुंद अनाद्यविद्या ॥३॥
जो श्री - गुरु प्रगटला मलयाऽद्रि देशीं
केलें कृतार्थ करुणाऽर्द्र - कटाक्ष - लेशीं
दाऊनि पादकमळें त्दृदयाऽभिरामें
सतचित्सुरवात्मक शरीर तयाचि नामें ॥४॥
ध्यानीं दिसे परम - हंस मुनींद्रवेषें
चित्तीं स्फुरे जड - विशेष - निषेध - शेषें
तो ग्रंथ हे सकळही रचितो मुरारी
हे वामनाऽकृति उगीच निमित्त - धारी ॥५॥
मारुनि दाउनि मुखीं कुरु - दुर्जनातें
युद्धीं निमित्त करि मागुति अर्जुनातें
हें कर्म - तत्वहि तसें रचिलें मुकुंदें
दाऊनि वामन - मनीं चरणाऽरविंदें ॥६॥
कर्मे मृषा सकळही परि भोग देती
देखोनिसर्प लटिका भय कंप होती
दृग्भ्रांति जाउनि दिसे जरि रज्जु दृष्टी
हे होय सर्वहि मृथा मग कर्म - सृष्टी ॥७॥
ब्रम्हात्मता नकळतां कृत कर्म साचें
याकारणें त्रिविध रुप असे तयाचें
जें कर्म आणिक अकर्म - विकर्म - रुपें
जीवांसि बद्ध करि होउनि पुण्य पापें ॥८॥
तें कर्म जें स्व - विहितें करणें स्वधर्मे
जीं पातके अकरणी तितुकीं अकर्मे
होती विकर्म निगमीं जितुकी निषिद्धें
हीं बाधती त्रिविधही सुख - दुःख - बद्धें ॥९॥
सत्कर्म पुण्य परि बद्धकता न सोडी
लोखंड पाप तरि पुण्य सुवर्ण - बेडी
पुण्यांत पातक सुखांतहि दुःख अंतीं
दोनी अहो त्यजिलिं याकरितांचि संतीं ॥१०॥
कर्मे करी भगवदर्पणरुप - धर्मे
कर्मात तो कुशळ देखतसे अकर्मे
कर्मेच तीं नव्हति बद्धकता न जेव्हां
नेदीच मृत्यु विष तें म्हणवे न तेव्हां ॥११॥
वेदोक्त कर्म नकरुनि अकर्म जोडी
तें तों अकर्म करि पातक - रुप वेडी
कर्मी अकर्मपण कर्मकता अकर्मीं
जाणूनि वर्तति अभिज्ञ मुकुंद - धर्मी ॥१२॥
गीतेमधें प्रतिपदीं जगदात्मदेवें
केला असा विशद निर्णय वासुदेवें
कृष्णार्पणें करि अकर्म मुकुंद - धर्मे
त्यावेगळीं सकळ बंधन - रुप कर्मे ॥१३॥
नित्यासही फळ असे पितृ - लोक - वेदीं
स्वर्गादि काम्य - फल - बंध अनेक भेदीं
निष्काम आणिक सकाम समान बेडी
वस्तु स्वयें स्वगुण तो सहसा नसोडी ॥१४॥
भक्षूनियां विष जसा मरणा न इच्छी
कर्मे करुनि फळ कर्मठहीन वांछी
याकारणें नव्हति बद्धक तींच कर्मे
जी ईश्वरार्पण अकाम करी स्वधर्मे ॥१५॥
वैद्याचिया करिं दिल्ह्या बचनाग होतो
प्राणाऽपहार - गुण टांकुनि दिव्य होतो
कर्मे स्वयें सहज जीं भव - बंध - रुपें
कृष्णार्पणें फळति मोक्ष - फळ - स्वरुपें ॥१६॥
मातीमधें घट दिसोन नसे विचारें
ब्रम्हीं दिसें सकळ कर्म अशाप्रकारें
मातीमधें सहज अर्पित कुंभ जैसा
ब्रम्ही अशेष - जन - कर्म - कलाप तैसा ॥१७॥
घे मृत्तिका घट - मिषें दधि दुग्ध पाणी
बुद्धींद्रियेंकरुनि कर्महि चक्रपाणी
हें सर्व अर्पित अनर्पित तो न कांहीं
ऐसें तथापिहि तदर्पणसिद्धि नाहीं ॥१८॥
सर्वस्व ने नृप तरी फळ - त्यास नेदी
तोचि प्रसन्न जरि अर्पुनि तेंचि वंदी
याकारणें वदतसे स्मृति याच रीती
कर्मे अशीं न करितां भव - बंध होती ॥१९॥
कृष्णार्पणेंचि करणें म्हणऊनि यस्य
स्मृत्या असी स्मृति करी त्रिजगांत लास्य
कर्म स्मृतीकरुनियां जरि सांग होतें
वंदोनियां तरि समर्पिति कर्म त्यातें ॥२०॥
ज्याच्या स्मृतीकरुनि आणिक नाम घेतां
दान - क्रिया - तप - मरवादिकही करीतां
जें न्यून तें सकळही परिपूर्ण होते
वंदा म्हणे स्मृति समर्पुनिकर्म त्यातें ॥२१॥
याकारणें सकळ कर्म करोनि अंतीं
श्लोकद्वयें विनविला हरि सर्व - संतीं
हे श्लोक दोन सकळांसहि पाठ लोकीं
जेणें अलिप्तजन यद्यपि कर्म - पंकीं ॥२२॥
यस्यस्मृत्याचनामोत्क्यातपःपूजाक्रियादिषु
न्यूनसंपूर्णतांयातीसद्योवंदेमच्युतं
मंत्रहीनंक्रियाहीनभक्तिहीनंसुरेश्वर
यतपूजितंमयादेवपरिपूर्णतदस्तुमें
ज्याच्या स्मृतीकरुनि आणि तसेंच नामें
जें न्यून तेंचि परिपूर्णपणासि नेमें
यावे तया करिन वंदन अच्युतातें
ऐसें रहस्य पहिल्यांत निरुपिजेतें ॥२३॥
हैं सद्य वंदन करोनि तया अनंता
तत्प्रार्थना दुसरिया स्मृतिमाजि आतां
कीं अंगही नहि जनार्दन देवदेवा
मत्कर्म तें सकळ हो तव - पाद - सेवा ॥२४॥
जें मंत्र - हीन हरि हीनहि जें क्रियेनें
त्वद्भक्ति मुक्तिपथ केवळ तद्विहीनें
म्यांजें असोरिति असांगहि कर्म केलें
तें पूर्ण हो म्हणउनी तुज अर्पियेलें ॥२५॥
स्मृत्यर्थ हा श्रुतिहि बोलति याचि उक्ती
यज्ञेन यज्ञमयजंत म्हणोन सूक्तीं
यज्ञें करोनि यजिला हरि यज्ञमूर्ती
तो मुख्य धर्म वदति श्रुति विष्णुकीर्ती ॥२६॥
गीतेंत तो विशद हेंचि वदे मुरारी
श्रीव्यास हेचि इतिहास - पुराण - कारी
कृष्णार्पणाविण कदापिहि मोक्ष नाहीं
तें निर्गुणार्पण नव्हे सगुणीच तेंही ॥२७॥
नाशील रज्जुहि कसा लटिक्या भुजंगा
सांगा कसा अगुण नाशिल कर्म - संगा
विद्ये करोनिच मरेल अहो अविद्या
तें ब्रम्हकर्म हरि जेथ असेल विद्या ॥२८॥
ब्रम्हार्पण स्मृति वदे सगुणींच तेंही
ब्रम्ह द्विधा सगुण निर्गुण भेद नाहीं
कर्मास नाश सगुणाविण होय जेव्हां
हें निर्गुणार्पण अबाधित होय तेव्हां ॥२९॥
ऐसे न निर्गुण न देवगणांत कोणी
कर्मास पात्र हरि एक रथांगपाणी
त्यालागिंही त्यजुनि काम भजेल जेव्हां
हे कर्म - बंध तुटती मग सर्व तेव्हां ॥३०॥
साधारणासि विधि हा जरि तीव्र भक्ति
प्रेमें भजोनि करि काम तथापि मुकी
नासोनि रोग - भव वैद्य अपथ्य देतो
अज्ञान नासुनि फलप्रद विष्णु होतो ॥३१॥
उत्तानपाद - सुत राज्य - पदा - निमित्तें
सप्रेम तीव्र भजतां दृढ एकचितें
अज्ञान नासुनि पद ध्रुव देउनी ही
नेला क्षितीहुनि पदाप्रति याचि देहीं ॥३२॥
कामें करुनि तरल्या व्रज - गोप - नारी
तीव्र - स्मृती करुनि दानव दैत्य वैरी
भक्तांस हस्त - गत मुक्तिहि आवडेना
दास्याविणें इतर रीति तया घडेना ॥३३॥
देवोनि योग मग भोगहि दे स्व - भक्तां
ऐसें तथापि न लगे फळ हें विरक्तां
सामान्य जे जन तयांस न तीव्र भक्ती
ते काम्य इच्छिति तई न घडेल मुक्ती ॥३४॥
साधारणें त्यजुनि काम सदा मुकुंदीं
कर्मार्पणें करुनियां चरणाऽरविंदीं
संपादणें परम दुर्लभ दास्य त्याचें
यावेगळें स्वहित आणिक त्यांसि कैंचें ॥३५॥
झाला जरी जितचि मुक्त न दास्य सोडी
मुक्तीहुनी अधिक हे हरिदास्य - गोडी
आम्हींचि विष्णु भजणें कवणासि आतां
हा ज्ञान - गर्व उपजे न कदापि संतां ॥३६॥
संत स्व - बुद्धि - मन - इंद्रिय - कर्म - धंदा
निर्व्याज सेविति समर्पुनियां मुकुंदा
मुक्तांसही अधिक हे हरि - दास्य - गोडी
दास्यें करोनिच तुटे गुणकर्मबेडी ॥३७॥
नेणोनिही जरि समर्पिल सर्व कर्मे
जाणेल तत्व परमेश्वर - दास्य - धर्मे
तो दासजो सकळ अर्पितसे मुकुंदा
देहेंद्रियादिकृत नित्य निमित्त धंदा ॥३८॥
जो स्वामि - कार्यचि सदा करितोचि भृत्य
स्वामीस तों किमपिहीन दिसे अगत्य
याकारणें स्वकृत अर्पिल सर्व त्याला
नि कामनें करुनि तो हरिदास बोला ॥३९॥
वेदोक्त आचरण जें परमेश्वराऽज्ञा
तेही समर्पुनि समस्तहि देह - यात्रा
दास्यार्थ अर्पिति भले शनपत्रनेत्रा ॥४०॥
वेदोक्त अर्पुनि न अर्पिल देह - धंदा
तो तों नव्हे परम आवडता मुकुंदा
कांही स्व - कार्यहि करी प्रभु - कार्य कांहीं
स्वामीस तों अतिशयें प्रिय होत नाहीं ॥४१॥
जो स्वामि - कार्य - पर तो स्व - शरीर - रक्षा
त्या कारणेंचि करितोच तया अपेक्षा
याकारणें विहित आणिक देह - यात्रा
दास्यार्थ अर्पिति भले अरविंद - नेत्रा ॥४२॥
वेदोक्त कर्म निज आणिक ही स्वधंदा
अर्पील धन्य जइंपासुनियां मुकुंदा
होवोनि शुद्ध तइंपासुनि मोक्ष मार्गा
लागे कृतार्थ न मनी स्व - मनीं त्रिवर्गा ॥४३॥
जो ईश्वरार्पण करी निज - सर्व - कर्मे
संतुष्ट होय हरि त्यावरि दास्य - धर्मे
होऊनियां प्रगट त्यासि गुरु स्वरुपें
ज्ञानाऽनळें सकळ जाळिल पुण्यपापें ॥४४॥
ज्ञाना नळें करुनि संचित दग्ध होतें
तेव्हां अकर्तृपण तें क्रियमाण होतें
प्रारब्धमात्र उरतें सरतें स्वभोगें
तें नासल्या उपरि मुक्तिच भक्ति योगें ॥४५॥
आत्मा कळे तरि कळे प्रियता मुकुंदीं
श्री - वासदेव - मय विश्व समस्त बंदी
निर्व्याज भक्ति समजोनि अनन्ययोगें
प्रारब्ध सारित असे सुख - दुःख - भोगें ॥४६॥
जो वास नाराहित पूर्विल कर्म भोगी
तो भक्त तो जितचि मुक्त परात्मयोगी
दग्धांबरीं दिसति तंतु जळोनि जैसे
भोगार्थ हे त्रिगुण लिंगतनूत तैसे ॥४७॥
भोगासि योग्य परि मोड न तंडुलातें
ऐसेंचि मुक्त - जन - लिंग - शरीर होतें
जो वासना त्यजुनि वर्तवि इंद्रियांसी
प्रारब्ध भोगुनि नव्हे क्रियमाण त्यासी ॥४८॥
काया - मनें करुनि आणिक इंद्रियेंही
कर्मे करी पुरुष तीं क्रियमाण देहीं
तो देह जींवरि पडे क्रियमाण तों तें
त्यानंतरें वदति संचित कर्म त्यातें ॥४९॥
ज्या देहिंचें सुकृत दुष्कृत त्याचि देहीं
नासे परस्पर बळें मग नाश नाहीं
या कारणें म्हणति संचित कर्म त्याला
ज्ञानानळाविण न नाश कधीं जयाला ॥५०॥
त्या संचितांतुनिहि कर्म फळ - प्रदाता
प्रारब्धभोग निवडोनि करी विधाता
तो भोगही समयिंच्या समयींच होतो
त्या त्या स्थलाप्रतिहि ओढुनि तोचि नेतो ॥५१॥
यत्नेंविणें सहज जें सुख होय त्यासी
आयुष्य वेचुनि बुडे जन हा प्रयासीं
या कारणें भगवदर्पण सर्व कर्मे
जाणोनि सुज करिती हरि - दास्य - धर्मे ॥५२॥
दुःखें जसीं सुख तसें निज - पूर्व - कर्मे
त्यालागिं यत्न करिती नकळोनि धर्मे
वेदांत - सिंधु - जठरी परमार्थ रत्नें
यत्नेचि लभ्य करिती न तयासि यत्नें ॥५३॥
हें उत्तर - प्रकरणीं जगदात्म बंधु
बोलेल वामन - मुखें करुणेक सिंधु
तें यत्न - तत्त्व कळल्यावरि बाह्य धंदा
सांडोनि सेविति मुकुंद - पदाऽरविंदा ॥५४॥
अध्याय हा प्रथम जो फळ - तत्त्व - नामा
कामात्मकासि फळ - बंध तसा अकामा
या कारणें स्वनिगमोदित आणि धंदा
अर्पूनि वामन मनें भजतो मुकुंदा ॥५५॥