तथापि सङगः परिवर्जनीयो, गुणेषु मायारचितेषु तावत् ।
मद्भक्तियोगेन दृढेन यावद्रजो निरस्येत मनःकषायः ॥२७॥
स्वरवर्णयुक्त संपूर्ण । चहूं वेदीं झाला निपुण ।
तेणें बळें विषयाचरण । करितां दारुण बाधक ॥६१॥
सकळ शास्त्रांचें श्रवण । करतळामलक झाल्या पूर्ण ।
शब्दज्ञानाचें जें मुक्तपण । तेणेंही विषयाचरण बाधक ॥६२॥
प्राणापानांचिया समता । जरी काळवंचना आली हाता ।
तरी विषयांची विषयावस्था । जाण सर्वथा बाधक ॥६३॥
शापानुग्रहसमर्थ नर । आम्ही ज्ञाते मानूनि थोर ।
त्यांसही विषयसंचार । होय अपार बाधक ॥६४॥
आसन उडविती योगबळें । दाविती नाना सिद्धींचे सोहळे ।
त्यांसही विषयांचे भोगलळे । होती निजबळें बाधक ॥६५॥
इतरांची कोण कथा । मंत्रें मंत्रमूर्ति प्रसन्न असतां ।
त्यासीही विषयावस्था । जाण सर्वथा बाधक ॥६६॥
किंचित् झाल्या स्वरुपप्राप्ती । ’मी मुक्त’ हे स्फुरे स्फूर्ती ।
तथापि विषयांची संगती । त्यासीही निश्चितीं बाधक ॥६७॥
अभिमानाचें निर्दळण । स्वयें करुनियां आपण ।
नित्यमुक्त नव्हतां जाण । विषयाचरण बाधक ॥६८॥
जेवीं चकमेकीची आगी । जाळूं न शके नाटेलागीं ।
तेवीं ब्रह्मप्राप्ती प्रथमरंगीं । प्रपंचसंगीं विनाशे ॥६९॥
विषय मिथ्या मायिक । ते भोगीं जंव भासे हरिख ।
तंववरी विषय बाधक । जाण निष्टंक उद्धवा ॥३७०॥
तें त्यागावया विषयसेवन । निर्दाळावा देहाभिमान ।
याचियालागीं माझें भजन । साक्षेपें जाण करावें ॥७१॥
व्रत तप तीर्थ दान । करितां योग याग यजन ।
वेदशास्त्र पुराणश्रवण । तेणें देहाभिमान ढळेना ॥७२॥
भावें करितां माझें भजन । समूळ सुटे देहाभिमान ।
भक्ति उत्तमोत्तम साधन । भक्तीआधीन परब्रह्म ॥७३॥
ज्ञान वैराग्य निवृत्ती । धृति शांति ब्रह्मस्थिती ।
यांची जननी माझी भक्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥७४॥
चहूं मुक्तींहूनि वरती । उल्हासें नांदे माझी भक्ती ।
माझे भक्तीची अनिवार शक्ती । तिसी मी निश्चितीं आकळलों ॥७५॥
माझें स्वरुप अनंत अपार । तो मी भक्तीनें आकळलों साचार ।
यालागीं निजभक्तांचें द्वार । मी निरंतर सेवितसें ॥७६॥
भक्तीनें आकळलों जाण । यालागीं मी भक्ताअधीन ।
माझिये भक्तीचें महिमान । मजही संपूर्ण कळेना ॥७७॥
बहुतीं करुनि माझी भक्ती । मज ते मोक्षचि मागती ।
उपेक्षूनि चारी मुक्ती । करी मद्भक्ती तो धन्य ॥७८॥
ऐशी जेथ माझी भक्ती । तेथ पायां लागती चारी मुक्ती ।
त्यासी सर्वस्वें मी श्रीपती । विकिलों निश्चितीं भावार्थें ॥७९॥
ते भक्तीच मुख्य ज्यास साधन । यालागीं मी त्या भक्ताअधीन ।
त्याचें कदाकाळें वचन । मी अणुप्रमाण नुल्लंघीं ॥३८०॥
ते मज म्हणती होईं सगुण । तैं मी सिंह सूकर होय आपण ।
त्यांलागीं मी विदेही जाण । होय संपूर्ण देहधारी ॥८१॥
एका अंबरीषाकारणें । दहा जन्म म्यां सोसणें ।
अजत्वाचा भंग साहणें । परी भक्तांसी उणें येऊं नेदीं ॥८२॥
द्रौपदी नग्न करितां तांतडी । तिळभरीं हों नेदींच उघडी ।
झालों नेसविता वस्त्रें कोडी। भक्तसांकडीं मी निवारीं ॥८३॥
तो मी भक्तसाहाकारी । अजन्मा त्यांचेनि जन्म धरीं ।
समही वर्तें अरिमित्रीं । भक्तकैवारी होऊनियां ॥८४॥
जो माझिया भक्तां हितकारी । तो मज परम मित्र संसारीं ।
जो माझ्या भक्तांसी वैर करी । तो मी नानापरी निर्दळीं ॥८५॥
ऐसा मी भक्तसाह्य श्रीकृष्ण । त्या माझें निजभजन ।
न करुनियां अभाग्य जन । अधःपतन पावती ॥८६॥
म्हणशी ’पाप असतां शरीरीं । तुझें भजन घडे कैशा परी ’ ।
सकळ पापांची बोहरी । माझें नाम करी निमेषार्धें ॥८७॥
ऐकोनि नामाचा गजर । पळे महापातकांचा संभार ।
नामापाशीं महापापासी थार । अणुमात्र असेना ॥८८॥
माझिया निजनामापुढें । सकळ पाप तत्काळ उडे ।
तें पाप नामस्मरत्याकडे । केवीं बापुडें येऊं शके ॥८९॥
अवचटें सूर्य अंधारीं बुडे । तरी पाप न ये भक्तांकडे ।
भक्तचरणरेणु जेथ पडे । तेथ समूळ उडे पापराशी ॥३९०॥
माझें नाम ब्रह्मास्त्र जगीं । महापाप तें बापुडें मुंगी ।
नामापुढें उरावयालागीं । कस त्याचे अंगीं असेना ॥९१॥
माझे नामाचा प्रताप ऐसा । मा माझे भक्तीची कोण दशा ।
पडलिया मद्भक्तीचा ठसा । तोनागवे सहसा कळिकाळा ॥९२॥
यालागीं माझें भजन । निर्दळी देहाभिमान ।
माजे निजभजनेंवीण जाण । देहाभिमान तुटेना ॥९३॥
जेणें तुटे देहाभिमान । तें कैसें म्हणशी तुझें भजन ।
अभेदभावें भक्ति पूर्ण । तेणें देहाभिमान निर्दळे ॥९४॥
भगवद्भाव सर्वांभूतीं । या नांव गा ’अभेदभक्ती’ ।
हे आकळल्या भजनस्थिती । अहंकृती उरेना ॥९५॥
माझें नाम ज्याचे वदनीं । माझी कीर्ति ज्याचे श्रवणीं ।
माझा भाव ज्याचे मनीं । ज्याचे करादिचरणीं क्रिया माझी ॥९६॥
जो जागृतीमाजीं पाहे मातें । जो स्वप्नीं देखे मज एकातें ।
जो मजवेगळें चित्त रितें । न राखे निश्चितें निजनिष्ठा ॥९७॥
यापरी भजनस्थितीं । त्रिगुण विकार मावळती ।
तेणें अहंकाराची निवृत्ती । विषयासक्ति निर्दळे ॥९८॥
भक्तांसी विषयसेवन । सर्वथा बाधक नव्हे जाण ।
तो विषय करी मदर्पण । तेणें बाधकपण नव्हे त्यासी ॥९९॥
नाना साधनें विषयो त्यागिती । त्यागितां परम दुःखी होती ।
भक्त विषयो भगवंतीं अर्पिती । तेणें होती नित्यमुक्त ॥४००॥
ग्रासोग्रासीं हरिस्मरण । तैं अन्नचि होय परब्रह्म पूर्ण ।
त्यासी नाहीं बाधकपण । ब्रह्मार्पण सहजेंचि ॥१॥
भक्तांची भजनस्थिती । विषयीं मद्रूपता भाविती ।
तेणें मावळे विषयस्फूर्ती । नव्हे ती या रीतीं बाधक ॥२॥
यापरी माझें भजन । करी मनोमळक्षाळण ।
विकारेंसीं तिन्ही गुण । करी निर्दळण देहाभिमान ॥३॥
ऐशी न करितां माझी भक्ती । न निर्दाळितां अहंकृती ।
करणें जे विषयासक्ती । ते जाण निश्चितीं बाधक ॥४॥
नातुडतां अकर्तात्मबोध । आदरुं नये विषयसंबंध ।
विषयांचा विषयउद्बोध । अतिअशुद्ध बाधक ॥५॥;
जरी विषय मिथ्या मायिक । तरी साधकां अतिबाधक ।
येचि अर्थीं यदुनायक । विशदार्थें देख सांगत ॥६॥