श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
जय जय सद्गुरु परम । जय जय सद्गुरु पुरुषोत्तम ।
जय जय सद्गुरु परब्रह्म । ब्रह्मा ब्रह्मनाम तुझेनी ॥१॥
जय जय सद्गुरु चिदैक्यस्फूर्ती । जय जय सद्गुरु चिदात्मज्योति ।
जय जय सद्गुरु चिन्मूर्ती । मूर्तामूर्ती चिद्रूप ॥२॥
जय जय सद्गुरु सत्क्षेत्रा । जय जय सद्गुरु सत्पात्रा ।
जय जय सद्गुरु सन्मात्रा । सदैकाक्षरा सद्रूपा ॥३॥
जय जय सद्गुरु स्वानंदमान । जय जय सद्गुरु स्वानंदपूर्ण ।
जय जय सद्गुरु स्वानंदघन । आनंदा गोडपण तुझेनी ॥४॥
जय जय सद्गुरु देवअग्रणी । जय जय देवशिरोमणी ।
सकळ देव लागती चरणीं । देव चूडामणी गुरुराया ॥५॥
जय जय जीवादिजीवा । जय जय शिवादिशिवा ।
जय जय देवादिदेवा । जय जय अभिनवा गुरुराया ॥६॥
जय जय सद्गुरु सुखसंपन्ना । जय जय सद्गुरु सुखनिधाना ।
जय जय सद्गुरु सुखैकघना । सुखा सुखपणा तुझेनि ॥७॥
तुझेनि सुखा निजसुख घडे । तुझेनि बोधा निजबोध आतुडे ।
तूजेनि ब्रह्मा ब्रह्मत्व जोडे । तुजेनि पडिपाडें तूं एकु ॥८॥
ऐसा श्रीगुरु तूं अनंत । तुझ्या स्वरुपासी नाहीं अंत ।
तो तूं होऊनि कृपायुक्त । निजस्वरुप बोधित निजभक्तां ॥९॥
आपुलें निजरुप बोधून । नुरविशी देवभक्तपण ।
त्याहीवरी निजभजन । अद्वयें पूर्ण करविशी ॥१०॥
गंगा मिळोनि सागरीं । मीनली तळपे तयावरी ।
तेवीं भक्त मिळोनि तुजमाझारीं । तुझें भजन करी तुझेनि ॥११॥
अद्वय करितां तुझी भक्ती । तूं संतोषसी यथानिगुती ।
संतोषोनि शिष्याहातीं । निजात्मसंपत्ती अर्पिशी ॥१२॥
अर्पूनि निजात्मभरभार । शिष्य गुरुत्वें करिशी थोर ।
हा अतिलाघवी चमत्कार । अतर्क्य विचार तर्केना ॥१३॥
जें अतर्क्य वेदशास्त्रांसी । ज्यालागीं वेद विवादिती अहर्निशीं ।
तें तूं क्षणार्धें बोधिसी । सच्छिष्यासी निजबोधें ॥१४॥
तुझ्या निजबोधाची हातवटी । पढतां वेदवेदांतकोटी ।
तरी अलक्ष्य लक्षेना दृष्टीं । सर्वार्थीं गोष्टी अगम्य ॥१५॥
बहुत कळलें कळलें म्हणती । नानापरीच्या युक्ति चाळिती ।
परी ते न कळोनि वोसणती । जेवीं शुक बोलती सुभाषितें ॥१६॥
यालागीं तुझी बोधकशक्ती । अगम्य सर्वांशीं सर्वार्थीं ।
तुझी लाधल्या कृपायुक्ती । अगम्य अपवती सुगमत्वें ॥१७॥
जें अगम्य श्रीभागवत । त्याहीमाजीं एकादशार्थ ।
प्राकृत करविला यथार्थ । बाप समर्थ कृपाळू ॥१८॥
दधि मंथूनी समस्त । जेवीं माता काढी नवनीत ।
तें आयितें बाळकाहातीं देत । तैसें केलें येथ जनार्दनें ॥१९॥
वेदशास्त्रांचें निजमथित । व्यासें काढिलं श्रीभागवत ।
त्या भागवताचा मथितार्थ । जाण निश्चित एकादश ॥२०॥
त्या एकादशाचें गोडपण । सर्वथा नेणें मी आपण ।
तें जनार्दनें करुनि मथन । सारांश पूर्ण मज दीधला ॥२१॥
तो स्वभावें घालितां तोंडीं । लागली एकादशाची गोडी ।
त्या गोडपणाच्या आवडीं । टीका चढोवढीं चालिली ॥२२॥
यालागीं एकादशाची टीका । एकला कर्ता नव्हे एका ।
एकीं एक मिळोनि देखा । ग्रंथ नेटका निर्वाळिला ॥२३॥
मागेंपुढें एक एका । हें एकाद्शाचें रुप देखा ।
तेणें एकपणें चालिली टीका । साह्य निजसखा जनार्दन ॥२४॥
जनार्दनें पैं आपुलें । एकीं एकपण दृढ केलें ।
तेचि एकादशाचे अर्था आलें । एकीं मीनलें एकत्व ॥२५॥
जेवीं जेवणीं गोड घांस । तेवीं भागवतीं एकादश ।
त्याहीमाजीं अष्टाविंश । अतिसुरस साजिरा ॥२६॥
सर्वांगीं शिर प्रधान । तैसा अठ्ठाविसावा जाण ।
तेथील जें कां निरुपण । तो स्वानंद जाण सोलींव ॥२७॥
तो हा अठ्ठाविसावा अध्यावो । ब्रह्मसुखचा निजनिर्वाहो ।
उद्धवें न पुसतां पहा हो । स्वयें देवाधिदेवो सांगत ॥२८॥
उद्धवें न करितां प्रश्न । कां सांगताहे श्रीकृष्ण ।
येचि अर्थींचें निरुपण । सावधान परिसावें ॥२९॥
उद्धव कृष्णोक्तीं निजज्ञान । पावोनि झाला ज्ञानसंपन्न ।
तेणें येऊं पाहे ज्ञानाभिमान । जाणपण अनिवार ॥३०॥
जग मूर्ख मी एक ज्ञाता । ऐशी वाढती जे अहंता ।
ते गुणदोषांची कथा । दावील सर्वथा सर्वत्र ॥३१॥
जेथ गुणदोषांचें दर्शन । तेथ निःशेष मावळे ज्ञान ।
येथवरी ज्ञानाभिमान । बाधक जाण साधकां ॥३२॥
अभिमान बाधी सदाशिवा । तोही आणिला जीवभावा ।
तेथ मनुष्याचा कोण केवा । अहंत्वें जीवा मुक्तता कैंची ॥३३॥
गुणदोषांचें दर्शन । जैं ईश्वर देखे आपण ।
तोही नाडूं पाव जाण । इतरांचा कोण पडिपाडु ॥३४॥
यापरी गुणदोषदर्शन । साधकां बाधक होय पूर्ण ।
यालागीं त्याचें निवारण । न करितां प्रश्न हरि सांगे ॥३५॥
बाळक नेणे निजहिता । तेथ साक्षेपें प्रवर्ते माता ।
तेवीं उद्धवाचे निजस्वार्था । श्रीकृष्णनाथा कळवळा ॥३६॥
ज्ञानाभिमानाचें बाधकपण । सर्वथा साधकां न कळे जाण ।
यालागीं न करितांही प्रश्न । त्याचें निराकरण हरि सांगे ॥३७॥
उद्धव जन्मला यादववंशीं । यादव निमती ब्रह्मशापेंसीं ।
तेथ वांचवावया उद्धवासी । संपूर्ण ब्रह्मज्ञानासी हरि सांगे ॥३८॥
जेथ देहातीत आत्मज्ञान । तेथ न बाधी शापबंधन ।
हें जाणोनियां श्रीकृष्ण । पूर्ण ब्रह्मज्ञान उपदेशी ॥३९॥
जेवीं साकरेवरी माशी । तेवीं श्रीकृष्णमूर्तीपाशीं ।
प्रीति जडली उद्धवासी । भाव एकदेशी दृढ झाला ॥४०॥
कृष्णापासूनि दुरी जातां । उद्धव प्राण सांडील तत्त्वतां ।
ते मोडावया एकदेशी अवस्था । ब्रह्मसमता हरि सांगे ॥४१॥
एकदेशी झाला भावो । तो श्रीकृष्ण नावडे पहा हो ।
यालागीं देवाधिदेवो । ब्रह्मसमन्वयो स्वयें सांगे ॥४२॥
उद्धव असतां कृष्णाजवळी । ब्रह्मशापें होईल होळी ।
यालागीं त्यासी वनमाळी । सर्वब्रह्मसुकाळीं घालूं पाहे ॥४३॥
कृष्णावेगळा उद्धव जातां । वियोग बाधीना त्याचिया चित्ता ।
ऐशी पावाया सर्वगतता । उद्धव सर्वथा हरि बोधी ॥४४॥