अहङ्कारकृतं बन्धं आत्मनोऽर्थविपर्ययम् ।
विद्वान्निर्विद्य संसार चिन्तां तुर्ये स्थितस्त्यजेत् ॥२९॥
जेथ मुहूर्तमात्र वसती घडे । त्या ठायाचा अभिमान चढे ।
ऐसें अभिमानाचें सांकडें । पाहें पां रोकडें कौतुक त्याचें ॥३१॥
बुद्धि अहंकार अळुमाळ । उठतां शुद्धासी करी शबळ ।
तेणें देहयोगें धरिल्या बळ । करी तत्काळ विपरीत ॥३२॥
अहंकार खवळल्या जाण । करी आनंदाचें आच्छादन ।
बुडे परमात्मस्फूर्तीचें स्फुरण । देहाचें मीपण वाढवी ॥३३॥
जेवीं कूर्मीच्या पिलियां । चक्षुरमृतें तृप्ती तयां ।
तेंचि मातेसि चुकलिया । मग भुकेलिया कर्दमू सेवी ॥३४॥
तेवीं खुंटलिया आनंदअभिव्यक्ती । जीवासी वाढे विषयासक्ती ।
कामिनीकामा पंगिस्त होती । चिंता चित्तीं विषयांची ॥३५॥
विसरला आपुलें पूर्णपण । धनालागीं अतिहीन दीन ।
मी देहवंत परिच्छिन्न । ऐसा देहाभिमान दृढ होय ॥३६॥
तेणें कर्माकर्मांचे आघात । नाना नरकयातना होत ।
जन्ममरणादि आवर्त । तेणें दुःखी होत अतिदुःखें ॥३७॥
भोगितां दुःखयातना । त्रासु उपजे ज्याच्या मना ।
न साहवे भववेदना । तेणें देहाभिमाना सांडावें ॥३८॥
अभिमान सांडितां न संडे । हेंचि दुर्घट थोर मांडे ।
यालागीं साधनाचें सांकडें । सोसणें पडे साधकां ॥३९॥
जें जें करावें साधन । साधनीं रिघे साधनाभिमान ।
धांवणें नागवी संपूर्ण । साधनीं विघ्न होय तैसें ॥४४०॥
ऐक साधकांचें साधन । वेदोक्त स्वधर्माचरण ।
साधावें वैराग्य पूर्ण । माझें भजन अतिप्रीतीं ॥४१॥
तत्काळ जावया देहाभिमान । अखंड माझें नामस्मरण ।
गीत नृत्य हरिकीर्तन । सर्वांभूतीं समान मद्भावो ॥४२॥
मद्भावें भूतें समस्त । सर्वदा पाहतां सतत ।
मी तुरीय जो सर्वगत । ते ठायीं चित्त प्रवेशे ॥४३॥
तिहीं अवस्थांमाजीं मी सतत । तिहीं अवस्थांतें मी प्रकाशित ।
तिहीं अवस्थांहूनि अतीत । तो जाण निश्चित मी तुरीयू ॥४४॥
तिहीं गुणांहूनि परता । चौथेपणेंवीण चौथा ।
तो मी तुरीय जाण तत्त्वतां । ते ठायीं चित्ता जो ठेवी ॥४५॥
तेथें ठेवितां चित्ता । जीवू पावे मद्रूपता ।
निमाली सांसारिक चिंता । विषयावस्था बुडाली ॥४६॥
तेव्हां चित्त चिंता चिंतन । विषयवासना अभिमान ।
या अवघियांचें होय शून्य । मी स्वानंदघन स्वयें प्रकटें ॥४७॥
न तुटतां भेदाचें भेदभान । जो म्हणवी मी सज्ञान ।
वृथा धरी ज्ञानाभिमान । तोही अज्ञान तें ऐका ॥४८॥