गुणेष्वाविशते चेतो गुणाश्चेतसि च प्रजाः ।
जीवस्य देह उभयं गुणाश्चेतो मदात्मनः ॥२५॥
तुम्हीं ब्रह्मयासी पुसिलें पाहीं । विषय रिघाले चित्ताच्या ठायीं ।
चित्त जें रिघालें विषयीं । तें वेगळें कांहीं निवडेना ॥३६०॥
विषयत्यागेंविण । कदा नव्हे ब्रह्मज्ञान ।
त्याही त्यागाची त्यागिती खूण । ऐक संपूर्ण सांगेन ॥६१॥
चित्त विषय दोनी पाहें । तें जीवाचें निजस्वरूप नव्हे ।
हे उपाधिवशें दोनी देहें । लागलीं पाहें प्रवाहरूपें ॥६२॥
कर्तृत्वभोक्तृत्वरूपें जाण । विषयी जाहलें अंतःकरण ।
तेणें उभय देहांचें कारण । अंहकारू जाण खवळला ॥६३॥
तेणें भुलविलें चित्त विषयांसी । विसरला निजात्मस्वरूपासी ।
तेणें तदात्मता जीवामनांसी । अतिशयेंसी दृढ झाली ॥६४॥
चित्त जीवाचें स्वरूप होतें । तरी विषयीं लोलुप नव्हतें ।
हा उभय उपाधी जीवातें । अभिमानें येथें वाढविला ॥६५॥
जेवीं कां विसरोनि आपणासी । स्वप्नींचिया स्वप्नदेहासी ।
अतिप्रीति वाढे पुरुषासी । तैसी दशा जीवासी येथ झाली ॥६६॥
नित्य शुद्ध मुक्त जाण । जीवाचें स्वरूप चैतन्यघन ।
त्यासी अभिमानें हें जाण । मिथ्या बंधन लाविलें ॥६७॥
यालागीं सांडावा अभिमान । तैं तुटे सकळ बंधन ।
अभिमान निरसावया जाण । माझें भजन करावें ॥६८॥
परी वैराग्येंवीण माझी भक्ती । पोंचट जाण पां निश्चितीं ।
जैं वैराग्ययुक्त उपजे भक्ती । तैं मद्रूपप्राप्ती जीवासी ॥६९॥
हृदयीं विषयांचा अभावो । आणि सर्वांभूतीं भगवद्भावो ।
हे वैराग्ययुक्त भक्ति पहा हो । तैं जीवासी निर्वाहो मद्रूपीं ॥३७०॥
जीव मद्रूपचि तत्त्वतां । त्यासी देहाभिमान जीविता ।
सदा भूतीं मद्भावो पाहतां । सिद्ध मद्रूपता उद्बोधे ॥७१॥
जीवासी जाहल्या मद्रूपता । सहजें त्यागू विषयचित्ता ।
देखें उभयांसी मिथ्यात्वता । न त्यागितां हा त्यागू ॥७२॥
चित्तविषयांचा त्यागू । पुत्र हो तुम्हीं पुशिला चांगू ।
तो म्यां सांगितला अव्यंगू । हा ज्ञानमार्गू अतिशुद्ध ॥७३॥
म्हणाल मिथ्या उभयांचें भान । तरी एवढें जीवासी बंधन ।
लागावया कांहीं कारण । ऐसें कांहीं मन कल्पील जरी ॥७४॥
गगनसुमनांची माळा । कधीं कोणी लेइली गळां ।
तारूं बुडे मृगजळां । हें कोणी तरी डोळां देखतें काय ॥७५॥
सत्यासी बाधक । कदा बाधूं न शके लटिक ।
ऐसें कल्पाल तुम्हीं कल्पक । तोही परिपाक अवधारा ॥७६॥
तरी परिसा सावधान । तें मी सांगेन निरूपण ।
जेणें जीवासी बंधन । लटिकेंचि जाण दृढ झालें ॥७७॥