मराठी मुख्य सूची|विधी|पूजा विधी|
श्रीअष्टपुत्रा महालक्ष्मी पाठ

श्रीअष्टपुत्रा महालक्ष्मी पाठ

पूजा व कथा
Hindu Pooja Vidhis. The rituals that can be performed during worship of Hindu Gods, Godesses. This collection might contain some of the day specific rituals.


॥ श्री ॥

श्रीगणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: । श्रीलक्ष्मीकांताय नम: । श्रीउमारमणाय नम: ।

श्रीगुरुदत्तात्रेय नम: । श्रीकुलदैवताय नम: । श्रीगुरुम्यो नम: । श्रीसाईरायाय नम: । श्रीनित्यानंदाय नम: ।

आता नमुं शारदा माउली । माते तुझ्या कृपेची साउली ॥ जया भक्तांसी पुर्ण लाभली । वाचस्पती तो होईल जाणा ॥१॥

नवल तुझ्या कृपेची थोरी । मुका बोलेल आपुले वैखरी ॥ पंडीता ऎसा खरोखरी । वाद विवाद करील जाण ॥२॥

पाहोनी तंव प्रसन्न मूर्ती । समूळ निमाली आमुची भ्रातीं । संसाराची न वाटे क्षिती । घडोघडी सुख वाढतसे ॥३॥

तंव हातीचा वीणा झंकार । पाहतां जाहला श्रम परिहार ॥ समूळ निमाला दु:ख भार । समाधान चित्ती लाभलेसे ॥४॥

माते परिसा माझी विनंती । बैसोनी माझ्या जिव्हेवरती ॥ ग्रंथ न्यावया सिद्धी । कृपा करी शारदा माई ॥५॥

तुझी होती कृपा जाण । क्षणांत होईल ग्रंथ संपूर्ण ॥ शुद्ध करोनी माझे मन । सुविचार देई मजलागी ॥६॥

जोडूनिया दोन्ही कर । शिर ठेविले चरणांवर ॥ कृपा करीं तूं मातें सत्वर । देई शक्ति कवित्वालागी ॥७॥

प्रसन्न झाली शारदा माउली । कर ठेविला माझे मौळी ॥ आठवूं लागल्या ओळीच्या ओळी । कृपा प्रसादे शारदेच्या ॥८॥

भुकेला पाहुनि आपुला तान्हा । मातेसी दाटला प्रेम पान्हा । कीं उभा देखोनि कान्हा । कुरवाळे यशोदा सती जैसी ॥९॥

की वत्स झोंबता कासेलागी । दुणावे पान्हा घेनुलागीं ॥ तैसे झाले मजलागी । हृदय माझे दाटलेसे ॥१०॥

ऎका ऎका श्रोते जन । पूर्ण पावलो समाधान ॥ अमृत धारा स्त्रवती जाण । तुम्हा लागी सुखवावया ॥११॥

ऎका ऎका सकळ जन । निर्मळ करा आपुले मन । मनाचे करोनी कान । परिसा कथा अमृता एसी ॥१२॥

चित्ती असेल तुमच्या मळ । तो झाडोनी टाका समूळ ॥ मन झालीया गढूळ । कार्य सिद्धी कैसी होय ॥१३॥

जय जयावो जगन्माता । तंव चरणी ठेविला माथा ॥ कृपा करोनी निज भक्ता । वर प्रसाद देई मज ॥१४॥

जय जयाजी अंबे भवानी । तूं सकल जनांची जननी ॥ तुझ्या रहिवास त्रिभुवनी । अणु रेणु रिता असेना ॥१५॥

ब्रह्म केवल निराकार । तुजलागी जाहले साकार ॥ व्यापुनि भरले चराचर । आई तुझ्या मायेनें गे ॥१६॥

तुझ्या मायेचा न लगे अंत । ब्रह्मा पासोनी मशका पर्यंत ॥ व्यापुनी ठेले समस्त ।

तुझ्या मायेने अंबे वो ॥१७॥

आदि माया मूळ भवानी । गजाननाची तूं जननी । तूंच जानकी तुंच रुक्मिणी । सकल रुपे तुझीच माते ॥१८॥

आतां आरंभितो तुझे ध्यान । एकाग्र करीवो माझे मन । मना ऎसे दुष्ट जाण । त्रिभुवनी जाण असेना ॥१९॥ काळ स्वसत्ता सर्वनाशी । सकळ जन भिते काळासी ॥

त्या काळाचे न चले मनापाशी । बलीष्ठ असे मन जाण ॥२०॥

या मनाची एक थोरी । यासी आवडला परमार्थ जरी ॥ तेथोनी न निघे बाहेरी । सत्यपूर्ण हे जाणा ॥२१॥

म्हणोनी प्रसन्न करावया मन । नित्य गावे हरिचे गुण ॥ त्यासे लागल्या प्रभुचे ध्यान । न चळे मग सहसाही ॥२२॥

म्हणोनी अंबे तुझे ध्यान । वर्णावया लागी जाण । प्रसन्न केले आधी मन । सकळ मळ झाडोनिया ॥२३॥

तुझ्या स्वरुपाचे वर्णन । शेषाही न करवे जाण । तोही धरुन ठेला मौन । स्तब्ध चित्ती झालासे ॥२४॥

तेथे माझी अल्प मति । वर्णन करु कैशा रीती । परी पाठी उभी तू भगवती । माझे मुखेनी वदवावया ॥२५॥

आतां वंदू पदकमल । ठेवु चरणावरी भाल । मन करोनी निर्मळ । स्वरुप वर्णु अंबेचे ॥२६॥

काम क्रोध मद मत्सस । हे दैत्य मातले फार करुनि तयांचा संहार । रगडीले पाया तळीं ॥२७॥

ऎसी तुझ्या पदाची महती । वर्णाक्य न चले शक्ति । परी वदवितसे तुझी स्फूंर्ती । कृपा निघे अंबाबाई ॥२८॥

अंबे तुझ्या रुपाचा वर्ण । जैसे गाळोनी काढिले सुवर्ण । दैदिप्यमान तेज:पूर्ण । मनोहर शोभतसे ॥२९॥

त्रिभुवनीचे सुंदर पण । तुजठाई मिळाले जाण । सौदर्यासी सुंदर पण । तुझे नि माये आले असे ॥३०॥

षोडशवर्षा धरिले रुप । भक्तांचे फिडिसीं महात्पाप । दु:खे पळाली आपोआप । दाही दिशा अंबाबाई ॥३१॥

अंबे तुझे पाहोनी रुप । सरली नेत्रांची उघडझाप । सरले मनांचे इतर व्याप । चित्ता शांती लाभलीसें ॥३२॥

काय तुज कैसे जाणू मी गे आई । तुझ्या स्वरुपालागी पार नाहीं । बधीर झाली इंद्रिये दाही । मनोव्यापार खुंटलासे ॥३३॥

विसरलो दु:ख विसरलो सुख,। विसरलो अमृत, विसरलो विख । नाठवेची काहीं एक । अंबा माऊलीये ॥३४॥

नाठवेची संसार । नाठवेची व्यापार । नाटवेची घरभार । चित्त स्वरुपी जडले असे ॥३५॥

नाठवेची धनदारा । नाठवेची पुत्र पसारा । लोपोनी गेला सारा । आई तुझ्या स्वरुपापुढें ॥३६॥

ब्रह्मानंदी माझे मन । अंबे झाले गे तल्लीन । नको काढु गे येथुन । दु:ख ऎहिकिचे भोगावया ॥३७॥

ऎसा तुझ्या स्वरुपाचा सोहळा । वर्णुं किती वेळो वेळो । परि भोगणे आहे जे कपाळा । ते न चुके ब्रह्मादिका ॥३८॥

सरले माझे सुकृत । पदरी होते जे समस्त । तुझ्या रुपाचे सेविता अमृत । पुन्हा आले मन मायाजाळी ॥३९॥

पुन्हा झालो सावधान । पाहता झालो तुझे ध्यान । हारपले निर्गुणाचे भान । सगुण रुपा पाहता झालो ॥४०॥

हिरवे षातळ हिरवी चोळी । हळदी कुंकवाचा मळवट भाली । रत्‍नखचीत मुकुट मौळी । काय थाट वर्णूं अंबे ॥४१॥

लखलखती करीं कंकणें । तैशी शोभती बाहु भूषणें । कंठीं लेईली अपार लेणे । कोण गणती करी तयांची ॥४२॥

आई तुवां देवोनी द्दष्टांत । मज रुप दाविले स्वन्पांत । ते वर्णीन आता येथ । अंबामाई जगन्माते ॥४३॥

मज द्दष्टांताची कथा सुंदर । पुढती वर्णीन मी सादर । फक्त स्वरुपाचा विस्तार । वर्णन करुं याची ठाया ॥४४॥

अष्टा हाती आठ बाळे । जैसे कांते मदनाचे पुतळे । सहज खेळवी अंबा लीले । कुरवाळोनी बालकांसी ॥४५॥

ब्रह्मा,विष्णु उमापति । तीन बालके तीन्ही हाती । सत्वगुणाची अगाध कीर्ती । चौथे हाती दत्तात्रेय ॥४६॥

सव्य बाजुला बाळे । अंबा खेळवी सहज लीळे । नवल तयाचे तेज आगळे । काय महिमा वर्णु त्यांचा ॥४७॥

सुयश श्री आणि धैर्य । चौथे बालक ते औदार्य । भक्तासी द्यावया स्थैर्य वाम-हस्ती धारणा केली ॥४८॥

भक्त पडतां संकटी । समूळ तयांची दु:खे निवटी । त्यावरी करोनी कृपा द्दष्टी । संकटे तयांची वारीतसे ॥४९॥

ऎसा आईचा कर महिमा । काय द्यावी उपमा । झाली बोलण्याची सीमा । शब्द राहिला निवांत ॥५०॥

चंद्र सुर्य मिळले दोन्ही येऊनी राहिले तव नयनी । भक्तांसी कृपा द्दष्टी करोनी । संकटे वारिसी तयांची ॥५१॥

अंबे तूं कमल नयन । अंबे तु कमल वदन । तुझी उप्तत्ती कमलांतून । कमलादेवी तुजला म्हणती ॥५२॥

ऎसा तुझ्या रुपाचा महिमा । काय देऊं यासी उपमा । बोलण्याची झाली सीमा । शब्द उगा राहिलासे ॥५३॥

शब्द राहिला निवांत । वाचा झालिसे कुंठीत । परी ग्रंथ कैसा समात्प । आताची जाण होईल ॥५४॥

धेनु चरे वनांत । आठवला वत्स मनांत । पान्हा दाटला स्तनांत । हंबरत घांवे बाळांकडे ॥५५॥

तैशी झाली माझी गती । शब्द आठवेना चित्तीं । नमियेली भगवती । कृपा द्दष्टी करावया ॥५६॥

भुकेल्या बाळाचे मनोगत । जाणे एक माता फक्त ॥ घास घालोनी मुखांत । सहज भरवी कौतुके ॥५७॥

दाबुनी बागुलाच्या गोष्टी । घांस ठेविला नेऊनी ओठी । तो जाईल कैसा पोटी । हीच चिंता तिजला असे ॥५८॥

तैसे झाले माझे जीव । म्हणोनी केली तुझा धावा ॥ अंबे तुझा प्रसाद व्हावा । धांव वेगी लवलाही ॥५८॥

आदी मायामूळ भवानी । चित्त चालक नारायणी ॥ भाव माझा मनी आणोनी । धांव वेगी लवलाही ॥६०॥

जय जयाची दुर्गे भवानी । अंबामाई करवीर वासिनी ॥ जय जयवो तुळजापुर वासिनी । धांव वेगी लवलाही ॥६१॥

जय जय दुर्गे अंबाबाई । जय जगदंबे भवानी आई ॥ तुझ्या स्वरुपा पार नाहीं । काय वर्णन करावे आतां ॥६२॥

मी तुझे पाडस तूं माझी हरिणी । मी तुझे अंडज तुं माझी षक्षिणी ॥ मी तुझ्या वत्स तुं माझी नंदिनी । मी तुझ्या बालक तुं माझी आई ॥६३॥

ऎशी स्तविता अंबाबाई । येऊनि राहिली माझे ह्रदयी ॥ इच्छीला ग्रंथ शेवटास नेई । चाल बाळपुढे आतां ॥६४॥

पाहोनी अंबेची कृपा । पिढील मार्ग झाला सोपा ॥ काव्यगंगा फेडीत पापा । स्वच्छंदे ती वाहु लागली ॥६५॥

पुन्हा जोडिले दोन्ही कर । आईसी केला नमस्कार ॥ पुढें चालली कथा सुंदर । परिसा सकळ श्रोते हो ॥६६॥

जयजयाजी महिषासुमर्दिनी । जरी मारिले दैत्य रगडोनी । परी भक्तांसी तु वरदायिनी । पालन तयांचेस झणी करीसी ॥६७॥

महिषासुर मर्दिनी म्हणती तुजला । षड दैत्यांचा नि:पात केला । परि भक्तासी तुझा अपार लळा । सर्वाहुनी । अधिक जाणा ॥६८॥

जय जय अंबे भुवनेश्र्वरी । सकळ ब्रह्माडं तुझे उदरीं । ब्रह्मा विष्णु त्रिपुरारी । तुझे मायेने नटलेसे ॥६९॥

मूळ प्रकृती प्रणव रुपिनी । आदि माया षडास्य जननी । तुच पार्वती हिमालय वासिनी । जय जय चंडिके वो अंबे ॥७०॥

सत्प पाताळ आणि त्रिभुवन । तुझे मायेने टाकिले व्यापुन । अणु रेणु रिता जाण । तुज वांचोनी नसे माये ॥७१॥

जय जय आंबे माझे आई । मजलागी तूं धावंत येई । धांवत येउनी दर्शन देई । करी कृपावो जगदंबे ॥७२॥

ऎशी स्तविता अंबामाई । येउनी राहिली माझे ह्रदयीं । भाव देखोनी माझा पाही । कृपा प्रसाद देती झाली ॥७३॥

ऎशी स्तवितां अंबा माता । प्रसन्न झाली आपुले चित्ता ॥ पुर्ण करावया भक्त मनोरथा । सत्वर कृपाद्दष्टी ओळलीसे ॥७४॥

ऎसे अंबेचे स्तवन । केले भजन आणि पुजन ॥ वर्षे झाली वीस पूर्ण । तपश्र्चर्या फळा आली ॥७५॥

तुम्ही श्रोते अति चतुर । चित्त करा हो स्थिर । कथा घडली जी सविस्तर । वर्णीन आता आंनदे ॥७६॥

वर्षे तीन पुरी जाली । कथा जणु ती आज घडली जगदंबा मज प्रसन्न झाली । काय उष्टांत तिने दिधला ॥७७॥

नवल एका चमत्कार । कैसा झाला साक्षात्कार । होता त्या दिनी मंगळवार । स्मरणमजला पूर्ण असे ॥७८॥

पहाटेचा समय झाला । अंबाबाईचा पाठ आठविला । गाता गाता डोळा लागला । रुप वर्णिता अंबेचे ॥७९॥

नुकताच उगवता दिनकर । प्रकाश प्रभा पृथ्वीवार । त्या सम प्रकाश मनोहर । मनोरम दाटलासे ॥८०॥

झुळ झुळ वाहे निर्मळ पाणी । आणिक गाती पक्षी गाणी । कमल पुष्प ते सरिते मधुनी । सहज वरती आले असे ॥८१॥

पुष्पा मधुनी प्रगट झाली । जगन्माता अंबा माउली । रुप पाहतां भ्रांती निमाली । ऎका सकळ श्रोते हो ॥८२॥

सकळ ब्रह्माडांची दीप्ती । येऊनि भिडली अंबेप्रती । पाहता ती शांत मूर्ती । मस्त्क लवले आपोआप ॥८३॥

पुष्पी विराजे ती कमालिनी । सुहास्यवदन आकर्णनयनी । दैदीप्यमान तेजस्विनी । जगदंबा भासतसे ॥८४॥

हिरवे पातळ जरतारी । हिरवी चोळी शोभली बरी । हिरवी कंकणे आईच्या करीं अपार शोभा देतसे ॥८५॥

बाहु वरती बाहुभूषणे । कंठी लेईली अगणीत लेणे । कर्णी शोभली कर्णभूषणे । शोभायमान अंबा दिसे ॥८६॥

आठ बाळे आईचे हाती । अष्टपुत्रा म्हणुनी म्हणती । भक्त काज करावया पुर्ती । धारण केले अंबेनें ॥८७॥

ब्रह्मा-विष्णु - महेशमूर्ती । तीन बालके तिन्ही हाती । सत्व गुणची अगाध कीर्ती । चौथे हाती शोभतसे ॥८८॥

सुयश श्री आणि धैर्य । चौथे हाती ते औदार्य । मुक्तांशी द्यावया स्थैर्य । वाम हस्तें धारण केली ॥८९॥

रत्‍नजडीत मुकुट शिरीं । मुक्त केश पाठीवरी । भक्त संकट जणू निवारी । केशभार अंबेचा ॥९०॥

ऎसे अंबेचे रुप पाहून । चित्त झालेसे तल्लीन ॥ विसरलो देहमान । चित्ता कांहीं नाठवेची ॥९१॥

तोंचि झाला कडकडाट । जणु पृथ्वीचा होय शेवट । ओढवला प्रलय स्पष्ट । ऎसे मजला भासतसे ॥९२॥

मूर्च्छंना दाटली अपार । निर्जीव झाले अवघे शरीर । धावुनी आली अंबा सत्वर । सावध केले कृपाद्दष्टी ॥९३॥

मज करोनी सावध । मनुष्य वाणी अंबा बोलत ॥ भिऊ नको राहे स्वस्थ । चित्त देऊति ऎक बा ॥९४॥

बाळा भिऊ नको स्थिर राहो । मम स्वरुप निजद्द्ष्टी पाही । मज स्वरुपाचे वर्णन लवलाही । करुनी जगता सांग बाळा ॥९५॥

माझ्या स्वरुपांचे मेहती । वर्णावया देते शक्ति । करावे कवित्व यथानुगती । जगालागी उपदेशावे ॥९६॥

अष्ट बाळे माझे होती । अष्टपुत्रा मजला म्हणती । माझा षाठ नित्य जे गाती । पुरवीन तयांचे मनोरथ ॥९७॥

मुळी नसेल ज्यासी संतान। तेणे करावे पाठाचे पुजन । भक्ति भावे करिता श्रवण । सत्वर त्यासी फल प्रात्पी ॥९८॥

संतान होवोनी न वाचंती । निराश जे झाले असती । तेणे सांडोनी सकळ भ्राती । भावे पाठ श्रवण करावा ॥९९॥

संतती आहे आरोग्य नाहीं । सदा दु:ख त्यांचे देही । ते निरसावया समूळ पाही । श्रवण पाठीचे नित्य करा ॥१००॥

सुखी राहावी आपुली संतती । आरोग्य लाभावे उत्तम रिती । ऎसे वाटतसे ज्याचे चित्तीं । तेणे पाठ पठण करावा ॥१०१॥

इच्छिले कार्य सफळ व्हावे । पूर्ण यश त्यांत लाभावे । विद्यावंत जगीं व्हावें । इच्छितसे ज्यांचे मन ॥१०२॥

तेणे करावा पाठ जतन । मनोभावे पूजा करुन । जय जगदंबे ऎसे गर्जुन आपुल्या कार्या प्रवर्तावे ॥१०३॥

माझ्या पाठाचे करील जो पूजन । आणिक करील श्रवण-पठण । निशी देनी सौख्य जाण । गृही त्याचे वाढेल की ॥१०४॥

संतती संपत्ती आणि यश । ज्याचा जैसा भाव विशेष । त्या लागी यथावकाश । प्राप्त तसेची होईल की ॥१०५॥

वत्सा तुझी पाहोनी भक्ति । प्रसन्न झाले तुजप्रती । सुंदर पुत्राची प्रात्पी । सत्वर तुज होईल की ॥१०६॥

याची येईल आता प्रचिती । माझे स्मरण असुदे चित्ती । माझा पाठ सांगावा जगती । विसर न पडावा या कार्या ॥१०७॥

हळुच उचलीला उजवा कर । ठेविला माझे मस्तकावर । तथास्तु शब्द मनोहर । जगदंबे उच्चरीला ॥१०८॥

ऎसे बोलुन गुप्त झाली । अंबा अंतर्धान पावली । समाधी माझी मग संपली । चित्त झाले सावधान ॥१०९॥

देहिचे स्वप्न हारपले । चित्त समाधान पावले ॥ मन माझे तल्लीन झाले । अंबाबाईच्या स्वरुपा लागी ॥११०॥

जाहला जो चमत्कार । अंबेचा जो साक्षात्कार । चित्ती नवल वारंवार । वाटतसे माझ्या कीं ॥१११॥

जय जय दुर्गे अंबाबाई । कौतुक तुझे वर्णु कायी । तुझ्या मायेला पार नाहीं । अपार महिमा जगदंबे ॥११२॥

ऎसे अंबेचे स्वरुप वर्णिता । पुन्हा लागला डोळा मागुता । माया आईची कळे तत्वता । वेदही शिणला असे जाण ॥११३॥

मंगलमय त्या प्रभत काली । प्रसन्न झाली अंबा माउली । निज कृपेची करोनी साउली । चमत्कार कैसा दाखविला ॥११४॥

पुढील स्वप्न पडले सुंदर । मम चित्तासी आला बहर । चित्त करोनी एकाग्र । ऎका सकळ श्रोते हो ॥११५॥

हिमालया ऎसा सुंदर पर्वत । तेथे एक कामधेनू चरत । धवल वर्ण तेज:पुंज दिसत । शोभायमान धेनू ती ॥११६॥

तेथोनी थोड्या अंतरावर । बैसलो मी एका पाषाणावर । तोंच काय झाला चमत्कार । ऎका सकळ श्रोते हो ॥११७॥

स्वच्छंदे चरतसे ती गोमाता । तिजकडे मी पहात असतां । तो प्रसुती समय तिचा तत्त्वता । जवळी आला दिसतसे ॥११८॥

पांढरा शुभ्र वत्स सुंदर । उदरांतुन येतसे बाहेर । तोच आठवली सत्वर । मज कथा पुराणांतरीची ॥११९॥

गोमाता प्रसूत होत असतां । तीन प्रदक्षणा तिज घालतां । पृथ्वी प्रदक्षणेचे पुण्य तत्त्वतां । तक्ताळची लाभते कीं ॥१२०॥

ऎसे आठवले माझे मनी । तत्काळ उठलो तो क्षणीं । तीनं प्रदक्षणा धेनु लागोनी । घातल्या मी मनोभावे ॥१२१॥

मनोभावे वंदीली नंदीनी । सकल देवतांस नमस्कारोनी । बैसलो मी जाऊनी । जेथीचा तेथ ॥१२२॥

तो वत्स दिसे मनोहर । हळुच उठला सत्वर । पाहता पाहता ते कोमल शरीर । गुप्त सत्वर झालेसे ॥१२३॥

आगाध मायेची करणी । नये वर्णिता वाणी । सहस्त्र जिव्हेचा शेषफणी । तोही जाण थकलासे ॥१२४॥

वत्स झालासे गुप्त । तो तेथे एक बाळ झाले प्रात्प । मज जवळी येऊनी त्वरीत । बाळ उभे राहिलेसे ॥१२५॥

गौरवर्ण कोमल काया । मज दाटली अपार माया । जवळी येऊनि त्या बाळ राया । कुरवाळी मी आंनदे ॥१२६॥

तेथीची वनश्री पहात असतां । लोपला सर्व प्रकार तत्वतां । बाळासहीत ती गोमाता । गुप्त झाली क्षणमात्रे ॥१२७॥

नवल वाटले प्रसंगाचे । आठवले गुण मायेचे । जगदंबे कार्य सर्व तुझे । समजले पूर्ण मजलागी ॥१२८॥

प्रसंग घडला ज्यावेळीं । मम कांता गरोदर त्या वेळीं । तीन मास त्याकाळीं । भरली असती जाण पां ॥१२९॥

तेथोनी पुढचा सर्व काळ । सौख्यदायक गेला वेळ । जगदंबेचा सर्व खेळ । मम चित्तीं पूर्ण ठसले ॥१३०॥

षण्मास गेले ऎसे दिवस । पूर्ण झाले नवमास । अति सुंदर बालकासं । मम कांतेनें जन्म दिला ॥१३१॥

स्वप्नी पाहिले ज्या पाडसा । तेच रुप तीच वयसां । द्दष्टांतासम जैसा जैसा । तैसे बालक आज दिसे ॥१३२॥

आज त्याचा वाढदिवस । तीन वर्ष झाली त्यांस । अंबा वचनाचा निजध्यास रात्रंदिन चित्तीं असे ॥१३३॥

आठवले अंबेचे वचन । माझा पाठ काढ लिहून सर्व सांग जना लागून । पठण पाठाचे करावया ॥१३४॥

मग केली सर्व सिद्धता । मनोभावे पुजिल्या देवतां । वंदन करोनी त्यांसी तत्त्वतां । पाठ लिहावया घेतलासे ॥१३५॥

आधि वंदिले गजानन । अंबाबाईस केले नमन । सकल दैवतांते वंदून । प्रारंभ लिहावया केलासे ॥१३६॥

अथपासुन इतिपर्यंत । जगदंबेचा वरदहस्त । शिरीं होता म्हणून त्वरीत । पाठ पूर्ण झाला असे ॥१३७॥

अति मूढ मी ज्ञान नाहीं । पापीं अमंगळ तैसा पाही । परी अंबेने धरले हृदयी पाठ लिहून घेतला असे ॥१३८॥

मंगळवारी आरंभ केला । मंगळावारीच संपविला । आईचा प्रसाद मज लाभला । म्हणोनी गेला पूर्णत्वाते ॥१३९॥

जगदंबेची कृपा होता । स्वर्गही लाभे आपुले हाता । इतरांची काय कथा । सर्व सिद्धि सहज षावती ॥१४०॥

अंबा पाहिल सहज जिकडे । चिंतामणीचे पडतील सडे । कल्पवृक्षांची अपार झाडे । ठायीं ठायीं उगवतील कीं ॥१४१॥

अष्टपुत्रा देविचा पाठ । पाठ नव्हे हा स्वर्गींचा थाट । इच्छिल्या कार्याचा शेवट । पठणे याचे होईल कीं ॥१४२॥

जे जे इच्छिल तुमचे मन । ते ते प्रात्प होइल जाण । या पाठाचे करितां श्रवण । इच्छिले कार्य पूर्ण होईल ॥१४३॥

नित्य पाठाचे करावे पुजन । तसेच करावे श्रवण पठण । मग जे जे इच्छिल तुमचे मन । सहज प्रात्प होईल की ॥१४४॥

करोनी अंबेसी नमस्कार । भावे करावा मंगळवार । पाठ पुजावा सत्वर । वर्णीत गुण अंबेचे ॥१४५॥

सूर्यवीण जैसे गगन । बाळवीण तैसे सदन । द्दष्टी नाहीं सुंदर वदन । काय करावे जाण पां ॥१४६॥

गृही नांदावा आपल्या बाळ । गृह व्हावे जैसे गोकूळ । ऎसे आपले मनोरथ सकळ । पूर्ण करील पाठ हा ॥१४७॥

भावे स्मरावे अंबाचरण । नित्य करावा पाठ श्रवण । तेणे यश श्री आणि समाधान । गृही तुमच्या नांदेल की ॥१४८॥

किती बोलु बोल हे वाचे । भावावीण सारे फुकाचे । अविश्र्वासी प्राण्याचे । कार्य सिद्ध कैसे होईल ॥१४९॥

ग्रंथी ठेवावा विश्र्वास । पाठाचा लागावा निजध्यास । आठवावे अंबेच्या स्वरुषास । मनोभावे करोनिया ॥१५०॥

संशयाची न व्हावी बाधा । चित्ताची करावी एकाग्रता । सिद्धी पावेल तरीच तत्त्वता । सकल कार्य आपुले की ॥१५१॥

भावे भजा अंबा चरण । आणि करा पाठ श्रवण । तीन मास भरतां पूर्ण । प्रचिती पाठाची येऊं लागेल ॥१५२॥

नवमास भरता पूर्ण । अंबा स्वप्नी होईल अवतीर्ण ॥ देऊनि तुम्हा दर्शन जाण । सकल मनोरथ पूर्ण करील ॥१५३॥

जय जगदंबे माझे आई । कृप करी हो अंबाबाई ॥ चित्त लागू दे तुझे पायी । हेच मागतो दुर्गादास ॥१५४॥

नमन माझे सकल जना । निर्मळ करा आपुले मना ॥ अंबाचरण आणूनी ध्याना । भक्ति करा तियेची ॥१५५॥

संपले आतां माझे कार्य ॥ षाठरुपे दिधले धैर्य ॥ तुमच्या भावनेचे औदार्य । दाखवा आता श्रोतेहो ॥१५६॥

जैसी जैसी कराल भक्ति । तैसी वाढेल यश आणि कीर्ति । पदरी पडेल फल निश्र्चिती । संशय चित्ती धरुं नका ॥१५७॥

भुकेल्यासी द्यावे अन्न । तेणे होय प्रभु प्रसन्न । पूर्ण पावोनी समाधान । कार्य सिद्धी करील तुमची ॥१५८॥

जैसा असेल जयाचा भाव । कृपा करील तैसा देव । मी तो केली उठाठेव । तुमचे कल्यान चिंतावया ॥१५९॥

दुर्गादास करी विनंती । अंबाचरण आठवा चित्ती । मूळ माया अंबा भगवती । कार्य सिद्धीस नेईल तुमचे ॥१६०॥

ऒव्या रचिल्या एकशेसाठ । वर्णन केली अंबेचा थाट । अष्टपुत्रा दैवीचा हा पाठ । भाग्यवंतासीच प्राप्त होय ॥१६१॥

॥ श्रीजगदंबार्पमस्तु ॥

॥ श्रीकृष्णार्पमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP