माझ्या तांबडया मातीचा लावा कपाळाला टिळा
याच मातीत राबतो, बाप माझा साधाभोळा.
माझ्या तांबडया मातीत घाम गाळते माउली
उरी वात्सल्याचा झरा देते मायेची सावली
तिच्या कृपाकटाक्षात भेटे विठ्ठल सावळा.
याच तांबडया मातीनं आज केलं मला मोठं
तिचे करती स्तवन सदोदित माझे ओठ
रोज हात जोडोनिया धूळ लावतो कपाळा.
काय सांगू मी, माझ्या मातीची थोरवी
माय तान्हुल्या बाळाला घास भाताचा भरवी
तसा घास वात्सल्याचा देते माती ही आगळा.
माझ्या तांबडया मातीला लक्ष तीर्थाचे महत्त्व
याच धुळीतून जागे होते माणसाचे सत्त्व
येतो दाटून उरात अंतरंगी भाव भोळा.