नदी रुसली, आटून बसली
राग येऊन वाळूत घुसली
वाहत नाही, गात नाही
कुणाकडेही पाहत नाही
नदीचे काठ पाहती वाट
उतरुन येईल कुणी घाट
नदी माझी दिसत नाही
क्षेमकुशल पुसत नाही
कोंडली नदी तळ्यामधी
माणूस स्वार्थी नव्हता आधी
तिचं वाहणं, जिवंत राहणं
तुम्हां-आम्हां जीवन देणं
माझी नदी गेली कुठे
तिच्याविना जीव तुटे
तिचं जीवन हिरावून घेतलं
तिच्यावर नव्हे, आपल्यावर बेतलं
माणसा सुधार चूक आधी
तुडुंब वाहती पाहशील नदी