रविवारचे अभंग
खेळ मंडियेला वाळवंटीं घाई । नाचती वैष्णव भाई रे ।
क्रोध अभिमान केला पावटणी । एकएकां लागती पायीं रे ॥१॥
नाचती आनंदकल्लोळीं । पवित्र गाणे नामावळी रे ।
कळिकाळावरी घातली कास । एक एकाहून बळी रे ॥२॥
गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा । हार मिरवती गळां रे।
टाळा मृदंग घाई पुष्पाचा वरुषाव । अनुपम्य सुखसोहळा रे ॥३॥
लुब्धलीं नादीं लागली समाधी। मूढ जन नर नारी लोकां रे ।
पंडित ज्ञानी योगी महानुभाव । एकचि सिध्दसाधकां रे॥४॥
वर्णाभिमान विसरली याती । एकएकां लोटांगणीं जाती रे।
निर्मळ चित्तें झालीं नवनीतें। पाषाणा पाझर सुटती रे ॥५॥
होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले वैष्णववीर रे ।
तुका म्हणे सोपी केली पायवाट । तरावया भवसागर रे॥६॥
*
भीमातीरीं एक वसविलें नगर। त्याचें नांव पंढरपूर रे ।
तेथील मोकाशी चार भुजा त्यासीं । बाईला सोळा हजार रे॥१॥
नाचत जाऊं त्याच्या गांवा रे खेळिया । सुख देईल विसांवा रे।
पुढें गेले ते निधाई झाले । वानितील त्यांची सीमा रे ॥२॥
बळियां आगळा पाळी लोकपाळा। रिघ नाहीं कळिकाळा रे।
पुंडलीक पाटील केली कुळवाडी । तो झाला भवदु:खवेगळा रे॥३॥
संत सज्जनीं मांडलीं दुकानें । जें जया पाहिजे तें आहे रे।
भुक्ति मुक्ति फुकाचसाठीं । कोणी तयाकडे न पाहे रे ॥४॥
दोन्हीच हाट भरले घनदाट । अपार मिळाले वारकरी रे।
नवजों म्हणती आम्ही वैकुंठा। जिहीं देखिली पंढरी रे ॥५॥
बहुत दीवस होती मज आस । आजीं घडलें सायासीं रे ।
तुका म्हणे होय तुमचेनी पुण्य । भेटी तया पायांसी रे ॥६॥
*
नव्हे तेंचि कैसें झालें रे खेळिया । नाही तेंचि दिसूं लागलें रे ।
अरूप होतें तें रूपासी आलें । जीव शिव नाम पावलें रे ॥१॥
आपुलीच आवडी धरूनि खेळिया । आप आपणातें व्यालें रे ।
जोपनाकारणें केली बायको । तिनें एवढें वाढविलें रे ॥२॥
ऐक खेळिया तुज सांगितलें । ऐसें जाणुनि खेळ खेळे रे ॥धृ॥
ब्राम्हणाचें पोर एक खेळासी भ्यालें । तें बारा वर्षे लपालें रे ।
कांपत कांपत बाहेर आलें । तें नागवेंचि पळून गेलें रे ॥३॥
सहातोंड्या एक संभूचें बाळ । त्यानें बहुतचि बळ आथियेलें रे ।
खेळ खेळतां दगदगी व्यालें । तें कपाट फोडुनि गेलें रे ॥४॥
चहुंतोड्याचा पोर एक नार्याही जाण । तो खेळियांमाजी आगळा रे ।
कुचाळी करूनि पोरें भांडवी । आपण राहे वेगळा रे ॥५॥
गंगा गौरी दोघी भांडवी । संभ्यासी धाडिलें वना रे ।
खेळ खेळे परि डायीं न सांपडे । तो एक खेळिया शहाणा रे ॥६॥
खेळियामाजी हनुम्या शहाणा । न पडे कामव्यसनीं रे ।
कामचि नाहीं तेथें क्रोधचि कैंचा । तेथें कैंचें भांडण रे । रामा गड्याची आवडी मोठी।
म्हणूनि लंके पेणें रे॥७॥
यादवांचा पोर एक गोप्या भला। तो बहुतचि खेळ खेळला रे ।
लहान थोर अवघीं मारिलीं । खेळचि मोडुनि गेला रे ॥८॥
ऐसे खेळिया कोट्यानुकोटी । गणीत नाहीं त्याला रे ।
विष्णुदास नामा म्हणे वडील हो । पाहा देहीं शोधूनि रे ॥९॥
*
एके घाई खेळतां न पडसी डाई । दुचाळ्यानें ठकसील भाई रे ।
त्रिगुणांचे फेरीं थोर कष्टी होसी। या चौघांची तरी धरी सोई रे ॥१॥
खेळ खेळोनियां निराळाची राही । सांडी या विषयाची घाई रे ।
येणेंचि खेळें बसवंत होसी । ऐसें सत्य जाण माझ्या भाई रे ॥२॥
शिंपियाचा पोर एक खेळिया नामा । तेणें विठ्ठल बसवंत केला रे ।
आपुल्या सवंगडियां शिकवूनी घाई । तेणें सतत फड जागविला रे।
एके घाई खेळतां न चुकेचि कोठें । तया संतजन मानवले रे ॥३॥
ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांगा । सोपान आनंदें खेळती रे ।
कान्हो गोवारी त्यांनीं बसवंत केला। आपण भोंवतीं नाचती रे ।
सकळिकां मिळोनि एकचि घाई । त्याच्या ब्रम्हादिक लागती पायीं रे ॥४॥
रामा बसवंत कबीर खेळिया । जोडा बरवा मिळाला रे । पाचां संवगडियां एकचि घाई।
तेथें नाद बरवा उमटला रे। ब्रम्हादिक सुरवर मिळोनियां त्यानीं ।
तोहि खेळिया निवडिला रे ॥५॥
ब्राम्हणाचा पोर खेळिया एका भला । तेणें जन खेळकर केला रे।
जनार्दन बसवंत करुनियां तेणें । वैष्णवांचा मेळ मिळविला रे ।
एकचि घाई खेळतां खेळतां । आपणचि बसवंत झाला रे ॥६॥
आणिक खेळिये होऊनियां गेले । वर्णावया वाचा मज नाहीं रे ।
तुका म्हणे गडे हो हुशारूनी खेळा। पुढीलांची धरूनियां सोई रे ।
एकचि घाई खेळता जो चुकला । तो पडे संसार डाई रे ॥७॥
*
बाराहि सोळा गडियांचा मेळा । सतरावा बसवंत खेळिया रे ।
जतिस्पद राखो जाणें टिपरिया घाई । अनुहत वाय मांदळा रे ॥१॥
नाचत पंढरिये जाऊं रे खेळिया । विठ्ठल रखुमाई पाहुं रे ॥२॥
सा चहुं वेगळा अठरा निराळा । गाऊं वाजवूं एक चाळा रे।
विसरती पक्षी चारा नेघे पाणी । तारुण्य देहभाव बाळा रे ॥३॥
आनंद तेथींचा मुकियासी वाचा । बहिरे ऐकती कानीं रे।
आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय। तुका म्हणे वृध्द होती तरणे रे ॥४॥
*
अहंवाघा सोहंव्राघा प्रेमनगरा वारी ।
सावध होऊनि भजनीं लागा देव करा कैवारी ॥१॥
मल्हारीची वारी । माझ्या मल्हारीची वारी ॥२॥
इच्छा मुरळीस पाहूं नका पडाल नर्कव्दारीं ।
बोधबुधली ज्ञानदिवटी उजळा महाद्वारी॥३॥
आत्मनिवेदन भरित रोडगा निवतिल हारोहारीं ।
एक जनार्दनीं धन्य खंडेराव त्यावरी कुंचा वारी॥४॥
*
अनंत जुगाचा देव्हारा । निजबोधाचा घुमारा ।
अवचित भरला वारा । या मल्हारी देवाचा ॥१॥
शुद्ध सत्वाचा कवडा मोठा । बोध बिरडे बांधला गांठा ।
गळा वैराग्याचा पट्टा। वाटा दाऊं भत्कीच्या॥२॥
ह्रदय कोटंबा सागातें । घोळ वाजवूं अनुहातें ।
ज्ञानभांडाराचें पोतें । रितें नव्हे कल्पातीं ॥३॥
लक्ष चौर्यांशी घरें चारी । या जन्माची केली वारी ।
प्रसन्न झाला देव मल्हारी । सोहंभावीं राहिलों॥४॥
या देवाचें भरतां वारे । अंगीं प्रेमाचें फेपरें ।
गुरु गुरु करी वेडेचारें । पाहा तुके भुंकविलें॥५॥
*
पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा। डौर फिरवितो डुगडुग ऎका ॥धृ॥
वरल्या आळीला तुम्ही सावद राहावे । पाटीलबुवाला मग लावून सवें ।
चिठी येईल बा मग पडेल ठावे ॥१॥
मधल्या आळीला एक बायको फीरे। तिजला तुम्ही साधा मग पडेल पुरे ।
नाहीं तरी पाटलोबा तिची पळतील गुरें ॥२॥
आणिक एक बारे सुटेल तांतडी । पाटीलबुवाची मग पडेल माडी ।
तिचीं पांच पोरें लागतील देशोधडी ॥३॥
आणिक एक ऐका कैंचे नवल झालें । गांवच्या पांड्यांनीं पाटलास नागविलें ।
सार्या कागदाचें सून्य एकचि केलें ॥४॥
हिंडतां फिरतांना एक शकुन सांगे। त्याच्या सत्तेनें ह्या आळीस वागे ।
संतांघरचा बा एक तुकडा मागे ॥५॥
हें जरी न ऐकाल तरी दुसरा येईल । सरते शेवटीं बा काळ बांधून नेईल ।
एका जनार्दनीं बा आमुचें काय जाईल ॥६॥
*
वारी वो वारी । देई कां गा मल्हारी । त्रिपुरारी हरी । तुझे वारीचा मी भिकारी ॥१॥
वाहन तुझें घोड्यावरी । वरी बैसली म्हाळसा सुंदरी । वाघ्या मुरळी नाचती परोपरी ।
आवडी एसी पाहीन जेजुरी ॥२॥
ज्ञान कोटंबा घेऊनी आलों व्दारी । बोध भंडार लाविन परोपरी ।
एका जनार्दनीं विनवी श्रीहरी ।
वारी देऊनी प्रसन्न मल्हारी ॥३॥
*
वडाच्या पानीं एक उभविलें देऊळ आधीं कळसु मग पाया हो ।
देव पुजू गेलो तंव देऊळ उडालें पान नाहीं तेथें वडु रे ॥१॥
चेत जाणा तुम्ही चेत जाणा । टिपरी वडाच्या साई हो ॥२॥
पाषाणाचा देवो पाषाणाचा भत्कु पोहती मृगजळ डोहीं हो ।
वांझेचा पुत्र एक पोहों लागला तो तारी देव भत्का हो ॥३॥
भवाब्धिसागर नुतरवे ते पडिले रोहिणी डोहीं हो ।
न सापडे आत्मा बुडाले संदेहीं ते गुंतले मायाजळीं हो ॥४॥
विरुळा जाणें पोहते खुणें केला मायेसी उपावो हो ।
बापरखुमादेविवरु विठ्ठल विसावा तेणें नेलें पैल थडी वो ॥५॥