शुक्रवारचे अभंग - तूं विटेवरी सखये बाई हो क...

शुक्रवारचे अभंग


शुक्रवारचे अभंग

तूं विटेवरी सखये बाई हो करीं कृपा । माझे मन लागों तुझ्या पायीं हो करीं कृपा ।

तुं सावळे सुंदरी हो करीं कृपा । लावण्य मनोहरी हो करीं कृपा ।

निजभक्तां करुणा करी हो करीं कृपा । पंढरपुरीं राहिली ।

डोळां पाहिली । संतीं देखिली । वरुनि विठाई वरुनि विठाई ॥१॥

सच्चिदानंद अंबाबाई हो करीं कृपा । उजळ कुळदीपा ।

बोध करीं सोपा । येऊनी लवलाही येऊनी लवलाही ॥२॥

तुझा देव्हारा मांडिला हो करीं कृपा । चौक आसनीं कळस ठेविला हो करीं कृपा ।

प्रेमचांदवा वर दिधला हो करीं कृपा । ज्ञानगादी दिली बैसावया हो करीं कृपा ।

वरी बैसविली आदिमाया हो करीं कृपा । काम क्रोध मद मत्सर । दंभ अहंकार ।

त्यांचें बळ फार । सर्व सुख देई सर्व सुख देई ॥३॥

शुक सनकादिक गोंधळी हो करीं कृपा । नाचताती प्रेमकल्लोळीं हो करीं कृपा ।

उदो उदो शब्द आरोळी हो करीं कृपा । पुढे पुंडलिक दिवटा हो करीं कृपा ।

त्याने मार्ग दाविला निटे हो करीं कृपा । आई दाविली मूळपीठा हो करीं कृपा ।

बापरखमादेविवरु । सुखसागरु । त्याला नमस्कारू । सर्व सुख देई ॥४॥

*

पति जन्मला माझे उदरीं । मी झालें तयाची नोंवरी ॥१॥

पतिव्रता धर्म पाहा हो माझा । सर्वापरी पति भोगिजे वोजा ॥२॥

निर्गुण पति आवडे मज । आधीं माय पाठीं झालिये भाज ॥३॥

मी मायराणी पतिव्रता शिरोमणी । ज्ञानदेवो निरंजनीं क्रिडा करी॥४॥

*

निर्गुण निराकार दादा माहूर माझें गांव । शंकुन सांगावया आले यमाई माझें नाव ।

तये नगरीं वस्ती केली मी तरी आलें एकभावें । ऐसा माझा शकुन दादा चित्त देऊन ऐकावें॥१॥

कैकाय कैकाय बाबा दुरील माझा देश । शकुन सांगावया मी आलें कलियुगास ।

ब्रह्याविष्णु महेश पुसती शकुन आम्हांस । ऐसें निदान आम्हीं सांगितलें त्यास ॥२॥

धरित्री आकाश मज देखतां उप्तत्ती । चंद्र सुर्य दादा मज देखतां होतीं ।

ब्रह्याविष्णुमहेश मज देखतां उपजती। जेथें आहे शिव तेथें आदि शक्ती ॥३॥

दाही अवतार मज देखतां झाले । अकराही रुद्र दादा होऊनियां गेले ।

अठ्ठयाशीं सहस्त्र ऋषी मज देखतां जन्मले । ब्रह्मादि तेहतीस कोटी खेळविले ॥४॥

अठ्ठावीस युगें झाली चक्रवर्ती । कौरव पांडव गेले दादा नेणों किती ।

छ्प्पन्न कोटी यादव गेले दादा कोणी पंथीं । आम्ही तुम्ही जाऊं मागें कोणी न राहाती ॥५॥

पृथ्वीमध्यें दादा एका विपरीत होईल । बहीण भावां दोघाजणांचा विवाह लागेल ।

पांचा वरुषांची बाळा भ्रतार मागेल । सहा वरुषांची नारी गर्भिण होईल॥६॥

आणिक एक दादा माझा ऐकावा बोल। पृथ्वीवरती वारा थोर झुंजाट सुटेल ।

थोर थोर दादा पर्वत उडोनि जातील । अठराही जाती एके ठिकाणीं जेवतील ॥७॥

कलियुगाची दादा ऐकावी थोर । पुत्र तो होईल पित्याचा वैरी ।

भ्रतारा सोडोनी घरोघरीं फिरतील नारी। ऐसा माझा शकुन दादा ऐका निर्धारी ॥८॥

आणिक एक दादा माझे ऐका उत्तर । आकार जाईल अवघा होईल निराकार ।

जाती चंद्र सूर्य मग पडेल अंध:कार । धरित्री आकाश जाईल मग कैंचा दिनकर ॥९॥

आणिक एक शकुन माझा ऐकावा संतीं । तुम्ही मूळ पिठीं राहणें नाव माझें आदिशक्ती ।

अबेंचा व्यवहार त्राहे त्राहे आदिमूर्ति । एका जनार्दनीं प्रसन्न झाली आदिशक्ती ॥१०॥

*

सुवेळ सुदिन तुझा गोंधळ मांडिला वो । ज्ञानवैराग्याचा वरती फुलवरा बांधिला वो ।

चंद्र सूर्य दोन्ही यांचा पोत जळिला वो । घालुनि सिंहासन वरुते घट स्थापियेला वो॥१॥

उदो बोला उदो सदगुरु माऊलीचा वो ॥धृ॥

प्रवृत्तीचें आणि निवृत्तीचें घालुनि शुध्द आसन वो । ध्येय ध्याता ध्यान प्रक्षाळिलें चरण वो । कायावाचामनें एकाविध केलें अर्चन वो। व्दैतअव्दैतभावें दिलें आचमन वो ॥२॥

भक्ति वैराग्य ज्ञान यांहीं पूजियेली अंबा वो सद्रूप चिद्रूप पाहूनी प्रसन्न जगदंबा वो ।

एका जनार्दनी शरण मूळकदंबा वो। त्राहे त्राहे अंबे तुझा दास आहे उभा वो ॥३॥

*

सुदिन सुवेळ तुझा मांडिला गोंधळ वो । पंचप्राण दिवटे दोन्ही नेत्रांचे हिल्लाळ वो ॥१॥

पंढरपुरनिवासे तुझे रंगी नाचत असे वो । नवस पुरवी माझ्या मनींची जाणोनियां इच्छा वो ॥२॥

मांडिला देव्हारा तुझा त्रिभुवनामाझारी वो । चौक साधियेला नाभिकळस ठेविला वरी वो ॥३॥

बैसली देवता पुढें वैष्णवांचे गाणें वो । उद्गारें गर्जती कंठीं तुळशीचीं भूषणें वो ॥४॥

स्वानंदाचे ताटीं धूप दीप पंचारती वो । ओवाळली माता विठोबाई पंचभूतीं वो ॥५॥

तुझें तुज पावलें आतां नवस पुरवीं माझा वो । तुका म्हणे राखे आपुलिया शरणागता वो ॥६॥

*

सुंदर मुख साजिरें कुंडलें मनोहर गोमटीं वो । नागर नागखोपा केशर कस्तुरी मळवटीं वो ।

विशाळ व्यंकटनेत्र वैजयंती तळपे कंठीं वो । कांस पीतांबराची चंदन सुगंध साजे उटी वो ॥१॥

अति वरवंटा बाळा आली सुलक्षणा गोंधळा वो । राजस तेजोराशी मिरवे शिरोमणी वेल्हाळा वो ।

कोटी रविशशीप्रभा तेजें लोपल्या सकळा वो । नकळे ब्रम्हादिकां अनुपम्य हिची लीला वो ॥२॥

सांवळी सकुमार गोरी भुजा शोभती चारी वो । सखोल वक्षस्थळ सुढाळ पदक झळके वरी वो ।

कटीं क्षुद्र घंटिका शध्द करिताती माधुरी वो । गर्जती चरणीं वाकी अभिनव संगीत नृत्य करी वो ॥३॥

अष्टांगीं मंडित काय वर्णावी रुप ठेवणी वो । सोलीव शुद्ध रसाची ओतील लावाण्याची खाणी वो। सर्वकाळसंपन्न मंजुळ बोले हास्यवदनी वो । बहु रूपें नटली आदिशक्ति नारायणी वो ॥४॥

घटस्थापना गेली पंढरपुर महानगरीं वो । अस्मानी मंडप दिला तिन्ही तळांवरी वो ।

आंरभिला गोंधळ हिनें चंद्रभागेतीरीं वो । आली भक्तीकाजा कृष्णाबाई योगेश्वरी वो॥५॥

तेहतीस कोटी देव चांमुडा अष्ट कोटी भैरव वो । आरत्या कुरवंड्या करिती पुष्पांचा वरुषाव वो ।

नारद तुंबर गायन ब्रम्हानंदें करिती गंधर्व वो । वंदी चरणरज तेथें तुकयाचा बांधव वो॥६॥

*

फुगडी फूगे बाई फू । निजब्रम्ह तूं गे बाई परब्रम्ह तूं गे ॥धृ॥

मनचित्त धू । विषयावरी थू ॥१॥

एक नाम मांडी । दुजाभाव सांडी ॥२॥

हरि आला रंगीं । सज्जनांचे संगीं ॥३॥

सकळ पाहे हरि । तोचि चित्तीं धरीं ॥४॥

नमन लल्लाटीं । संसारेसी साटी ॥५॥

वाम-दक्षिण । चहूं भुजीं आलिंगन ॥६॥

ज्ञानदेवे गोडी । गेली संसारा फुगडी॥७॥

*

पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा । सांपडला ते साधा आजि मुहूर्त बरा।

गर्जा जयजयकार हरि ह्रदयीं धरा । आळस नका करुं सांगतों लहाना थोरां ॥१॥

याहो याहो बाईयांनो निघाले हरी । सिलंगणा वेगीं घेउनी आरत्या करी ।

ओवाळूं श्रीमुख वंदूं पाउलें शिरीं । आम्हां दैव आलें येथें घरींच्या घरीं ॥२॥

अक्षय मुहूर्त औटामध्यें साधतें । मग येरी गर्जे जैसें तैसें होत जाते ।

म्हणोनि मागें पुढें कोणी न पाहावें येथें । सांडा परते काम जाऊं हरी सांगातें ॥३॥

बहुतां बहुतां रीतीं चित्तीं धरा हें मनीं । नका गई करुं आईकाल ज्या कानीं ।

मग हें सुख तुम्ही कधी न देखाल स्वप्नीं । उरेल हाय हाय मागें होईल कहाणी ॥४॥

ऐसियास वंचता त्याच्या अभाग्या पार । नाहीं नाहीं नाहीं सत्य जाणा निर्धार ।

मग ही वेळ घटिका न ये अजरामर । कळलें असो द्या मग पडतील विचार ॥५॥

जयासाठीं ब्रम्हादिक झाले ते पिसे । उच्छिष्टाकारणें देव जळीं झाले मासे ।

अर्धांगीं विश्वमाता लक्ष्मी वसे । तो हा तुकयाबंधु म्हणे आलें अनायासे॥६॥

Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2012-01-16T20:49:16.2800000