अभंग ७१ ते ८०
संत माणकोजी बोधले महाराजांचे चरित्र भक्ती विजय व बोध लिलावंती ग्रंथात उपलब्ध आहे.
७१
भक्ताच्या धावया धावसि तु वेगी ।
विठोबा तुज मागे रखुमा देवी ॥१॥
यादवांसहित कैसा तू धावसी ।
स्वामी हृषिकेशी पांडुरंगा ॥२॥
बोधला म्हणे हरि ब्रिदे साच करी ।
भक्त भाव मुरारी साज तुज ॥३॥
७२
भक्ति आनंद । मज करी गा नारायणा ।
हेचि माझ्या मना आवडी मोठी ॥१॥
देवा आवडी मनाची । तुझिये भेटीची ।
आणिक कोणाची । नाही चाड ॥२॥
जनक जननी । तु आमचा धणी ।
ठाव मज चरणी । देई बापा ॥३॥
बोधला म्हणे मज । आणिक नाही काज ।
तुझीया चरणीचा रज । होईन बापा ॥४॥
७३
भक्ती भावा ठाव नाही ।
कवित्व करी उभे घाई ॥१॥
लोकाप्रती वाचितो पोथी पुराण ।
आपण भरले आडराने ॥२॥
देखत देखत ठाकिती लोका ।
आपण घेती लोकांचा थुका ॥३॥
हाती घेऊनी फिरवितो माळा ।
पन्नास घालुनी कापी गळा ॥४॥
त्या चांडाळा मोक्ष नाही ।
ते पडती नर्कवाही ॥५॥
अंतरी भेदाचे परी ।
जीव मारुनी पैसे वरी ॥६॥
७४
भावाचा भुकेला प्रीतीचा येलाइतू ।
हेचि तुझी भक्ती आणिक न लगे काही ॥१॥
ऐसा तु कृपाळू पाहे दीनालागी ।
भक्ती ज्याचे आंगी ते कृपा तुझी ॥२॥
आता तु उदार दीन उध्दरावया ।
धने पंढरीराया कृपाळू वा ॥३॥
बोधला म्हणे देवा धन्य तुझा महिमा ।
स्वामी पुरुषोत्तमा पांडुरंगा ॥४॥
७५
भावाचा भोक्ता भक्तासी आंगिकार ।
आरे तु काज कैवारी अनाथाचा ॥१॥
दिनाच्या धावया कैसा तु धावसी ।
काहि न पाहसी दोष आमचे ॥२॥
आम्ही तव अपराधी । आहा अनंत कोटी ।
परि तु धुरजेठी आंगिकारिल ॥३॥
बोधला म्हणे जन्मोजन्मी तुझा आखिला ।
हा देहे ठेविला तुझे पायी ॥४॥
७६
महा दोष होत अगणित ।
नामे पावत वैकुंठ ॥१॥
चला हात धरुनी जाऊ ।
माझ्या विठोबाला पाहु ॥२॥
भिमा भरली दोनी थड्या ।
चला टाकु आत उड्या ॥३॥
बांधु नामाची सांगडी ।
तेणे उतर पैल थडी ॥४॥
विठोबाची झाली भेटी ।
दोष निघाले कपाटी ॥५॥
बोधला म्हणे करा निर्धार ।
हा तो उतरिल पैल पार ॥६॥
७७
मागिल्या जन्माचा सांगितला विचार ।
दाविली साचार साक्ष मज ॥१॥
तेंव्हा माझे मन जाले समाधान ।
एरवी अनुमान होता मज ॥२॥
साक्षतेची पहावा साक्षतेची घ्यावा ।
मग समाधान जीवा वाटे थोर ॥३॥
बोधला म्हणे नव्हे हे बोधाची कहाणी ।
आपले नयनी देखियले ॥४॥
७८
मी कर्ता म्हणती तया पडली भ्रांती ।
व्यापक श्रीपती नेणवेचि ॥१॥
बालक उपजोनि लावियेले स्तनी ।
सिकविले कोण्ही तयालागी ॥२॥
सिकविता ऐक पंढरीनायेक ।
त्यावेगळा आणिक नाही कोण्ही ॥३॥
बोधला म्हणे देव तया जैसा भाव ।
त्या तैसा उपाव करितसे ॥४॥
७९
मेरु तळवटी पाच पिंपळ ।
खाले वरोडा सेंडा वरी मूळ रे ॥१॥
पाचाहि पिंपळा एकचि फळ ।
त्याणे पक्षि गिळिला समुळ रे ॥२॥
ऐक मी सांगेन पक्षियाची सोये ।
बाप नाही त्यासा भाये रे ॥३॥
हात नाही त्यासी पाय रे ।
तो पक्षीविण उडोनिया ये रे ॥४॥
त्याने त्रिभुवन गिळिले पाहे रे ।
तो विश्वची खेळत आहे रे ।
बोधला धरी त्याचे पाय रे ॥५॥
८०
ये माझ्या मंदिरा विठोबा उदारा ।
तोडुनिया थारा अविद्येचा ॥१॥
कुवासना कुबुध्दी मुळी हीन छेदी ।
अहंकारासी बंदी घालुनिया ॥२॥
घालुनी सिंहासन वरी बैसे आपण ।
स्वामी हे गुणरत्न पंढरीचे ॥३॥
बोधला म्हणे हरि किंकर तुझे द्वारी ।
नामक्रीडा करी अखंडित ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : August 09, 2026

TOP