अभंग १ ते १०
संत माणकोजी बोधले महाराजांचे चरित्र भक्ती विजय व बोध लिलावंती ग्रंथात उपलब्ध आहे.
संत माणकोजी बोधले अभंग – १
आगा पंढरीनाथा तू आमचे माहेर ।
पाहे निरंतर वाट तुझी ॥१॥
तुझीये भेटीचे आर्त माझे चित्ती ।
रखुमाईचा पती पांडुरंग ॥२॥
तुच आमचे वित्त तूच आमचे गोत।
तू सर्व संपत्ती जोडी माझी ॥३॥
बोधला म्हणे तुजवीण अनु नेणे काही।
प्रीती तुझी पायी बसो माझी ॥४॥
संत माणकोजी बोधले अभंग – २
अरे कान्हा अरे कृष्णा कमलावल्लभा ।
काय मी वर्णू तुझ्या रुपाची शोभा ॥१॥
पाहता तुझे रुप दिसे सर्वां ठायी ।
भावे भक्ती करोनी शरण आलो पायी ॥२॥
आकळे तुझा महिमा न ब्रह्मादिका ।
साधु आणि संता नामे सापडसी एका ॥३॥
सकळ तीर्थांचे मंडण अवघे तुझे पायी ।
अनंत तीर्थे घडली राया तुझे ठायी ॥४॥
बोधला म्हणे चित्त राहो तुझे पायी ।
तुजविण सखा मज आणिक नाही ॥५॥
संत माणकोजी बोधले अभंग – ३
आजि वो हरि गावांसि आले।
गोपिका सहित आम्ही नयनी देखिले ॥१॥ धृ ॥
एकीकडे कौरव येकीकडे पांडव ।
मधे उभे यादवराव ॥२॥
दोही भागी गोपिका । करी घेऊनी टाळ।
मध्ये उभे यादवराव । नृत्य करिती ॥ ३॥
बोधला म्हणे मी नयनी देखिले ।
देखोनी आळंगिले हृदयामाजी ॥४॥
संत माणकोजी बोधले अभंग – ४
आज मी राहिलो डोंगरी।
आनंद होतो ब्रह्मगिरी ॥१॥
पांचा तत्वाची दिवटी ।
निवद भरियेला ताटी ॥२॥
आनंदे घातला गोंधळ ।
होतो प्रेमाचा कल्लोळ ॥ ३॥
उदो बोला हा आनंद ।
काळ हरियेल छंद ॥४॥
बोधला म्हणे आनंद झाला ।
कळिकाळ हा जिंकीला ॥५॥
संत माणकोजी बोधले अभंग – ५
तुकाराम महाराज अभंग
आजि सुचिन्हे दिसती स्फुरति बाहे वो ।
आजी भेटिला येईल कृष्ण माये वो ॥१॥
यालागि हारुष वाटतो माझे मनि वो ।
आजि भेटिला येईल आमचा धणि वो ॥२॥
बैसोनि सांगन गुज गोष्टी वो।
उठोन आवडिने गळा घालिन मिठी वो ॥३॥
प्रीती लोळणी घालिन पाया वरी वो।
लोक म्हणती निलाज जाली पोरे वो ॥४॥
या लागि वर्ते मी लोकाचारी वो ।
तुजी पाउले धरिन अंतरी वो ॥५॥
बोधला म्हणे धन्य आम्ही सुखि जालो वो ।
विठ्ठल चरणी येवुनी विनटले वो ॥६॥
संत माणकोजी बोधले अभंग – ६
आता पूर्वीची भाक सांभाळी ।
आम्ही पोरे बहु आनुवळी ।
तुजसी खेळो बारळी ।
बहुत तुजसी खेळलों ढवाळी रे कान्होबा ॥छ।
तुम्हा आम्हासी पडिला गडी ।
तोडी वासना कल्पना झोडी ।
आता पाये तुझे मी न सोडी ॥१॥
पैल भीवरे तिरी चारूं गाई आमची सिदोरी अवघीच खाई ।
आम्हा वाकुल्या दावितो पाहीरे ॥२॥
पैल यमुनेतिरी केला काला ।
आपण खाये चालवि आम्हाला।
ऐसा संगतीचा ठक कैसा भला रे ॥३॥
पैल कळंबा डाळी खेळो सुर।
डाई खाले काढिला बुर ।
सुर भीरकविसी दुरिच्या दूर ।
असा बहुत खेळलाखेळ ब्रह्मादिकासी न कळे कळ।
गाई राखे न जाला गोपाळ रे ॥४॥
आपण बैसोन घरिच्या घरीं।
आम्हासि करितो चोरी।
लोणी खासिल वरिच्या वरि ॥६॥
बोधला म्हणे जागलों।
जिवे प्राणेसि हा बांधला।
आतां सोडिता नव्हेसि भला।
रे कान्होबा पूर्वीची भाक संभाळी ॥७॥
संत माणकोजी बोधले अभंग – ७
अनंत कोटी आमचे अपराध साहिले ।
तु आमची माउली पांडुरंगा ॥१॥
तुज परत जिवलग नाही त्रिभुवनी ।
तु आमची जननी पांडुरंगा ॥२॥
अनंत कोटी तुझ्या उपकाराच्या रासी ।
बापा हृषीकेसी पांडुरंगा ॥३॥
बोधला म्हणे तुज काये होऊ उतराई।
तू आमचा मायबाप तू पांडुरंगा ॥४॥
संत माणकोजी बोधले अभंग – ८
अनंत जन्म घेतले याच देही ।
माझे स्वहित नव्हे कोठे काही ॥१॥
वेगी पावे पावे कृपानिधी ।
भवकर्म छेदी बा माझी आता ॥२॥
संसारकर्मे बहुत भुललो ।
तुझे भजनी सावध नाही जालो ॥३॥
माया संसाराचा करिता भरोभरी ।
तुझा आठव नाही क्षणभरी ॥४॥
बोधला म्हणे तुज विनवितो देवा ।
काही घडो दे देही संतसेवा ॥५॥
संत माणकोजी बोधले अभंग – ९
अनंत जन्माचे फेडिले सांकडे ।
चुकविले कोडे चौऱ्यांशिचे ॥१॥
चौऱ्यांशिचा फेरा सोशी येरझारा ।
चुकवी दातारा पांडुरंगा ॥२॥
बोधला म्हणे एक बरे केले ।
खत हे फाडिले जन्मांतरीचे ॥३॥
संत माणकोजी बोधले अभंग – १०
अबदुलखानाची भोवली ताहार।
महापाषाण फोडिले खेचर ।
भक्त डळमळिल थोर थोर।
रामकृष्ण बाहारी।
तुझी वासना तुजचि वरी ।
अभक्तासी कष्टि करी ।
भक्त रक्षुनी नानापरी गा ॥१॥
भक्तीभाव जयाचा निर्धार ।
जिवे प्राणासी जे उदार।
तेच उरती पैल पार गा ॥२॥
सुद्ध भाव जयाचा मनी ।
त्यासी मारिता नाही बा कोन्ही ।
बळकट आहे तयाचा धणी गा ॥३॥
लोक म्हणती अबदुलखान ।
परि करिता नारायेण ।
कोण्हा न कळे तयाची खुण ॥४॥
ऐसे बहुत भेडसाविती नेणो पळाले हे किती ।
परि लिहिले न चुके अंती गा ॥५॥
असं भैतृत्र? (भैतृत्व) बहुत बोले जन ।
बोधल्याचे दृढ मन त्यांने उंची लाविले निशान गा ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : August 09, 2026

TOP