अभंग २१ ते ३०

संत माणकोजी बोधले महाराजांचे चरित्र भक्ती विजय व बोध लिलावंती ग्रंथात उपलब्ध आहे.


२१

एक दिन तु एक दयाळू ।
दयाळू करितसे सांभाळ रात्रंदिवस ॥१॥
अनंत कोटी तुझ्या उपकाराच्या राशी ।
कोणापाशी तुजविण ॥२॥
मी अंतरीची खूण तूचि एक जाणना ।
सांगो या अनंता कोणापाशी ॥३॥
एक मशक पडिलो तुझे द्वारी ।
लाज सर्वापरी आहे तुज ॥४॥
बोधला म्हणे देवा मी तुझा आखिला ।
दासाचा विकिला जन्मोजन्मी ॥५॥

२२

एव्हडिये दुरुनी आलो तुज कारणे ।
भेटी दे निधाने पांडुरंगे ॥१॥
भेटी मज देसि आहे तुझी दासी ।
म्हणोनी आलो चरणापाशी ॥२॥
तरी बापा तारिशिल मज ।
शरण आलो तुज ॥३॥
राख माजी लाज | येहि काळी ॥४॥
राखसिल लाज शरण आलो तुज ।
येइ चरणिचे रज बोधला म्हणे ॥५॥

२३

ऐका हो भोळे भाविक जन । नित्य करा गुरुस्मरण ।
होईल दोषांचे दहन। गुरुचे स्मरण केलिया ॥१॥
गुरुसेवा घडे ज्यासी । कळिकाळ न बाघे त्यासी ।
त्यांनी साधिले मोक्षासी । गुरुचे स्मरण केलिया ॥२॥
गुरु ज्ञानाचा आगरु । गुरु धैर्याचा मेरु ।
नौका नेईल पारु। गुरुचे स्मरण केलिया ॥३॥
गुरु मायेचे मूळ जीव । गुरु मोक्षपदाचा ठाव ।
साध्य होती सर्व देव । गुरुचे स्मरण केलिया ॥४॥
जय जय गुरु मायबापा । चुकवी चौऱ्यांशीच्या खेपा ।
बोधला ध्यातो निज स्वरुपा । पर ठायी लय लावुनी ॥५॥

२४

ओवाळु आरती पंढरीनाथ देवा सदगुरुनाथा ।
भावे शरण आलो भक्ती शरण आलो चरणी ठेविला माथा ॥१॥
पाहता तुझे रुप दिसे सर्वा ठायी, देवा सर्वा ठायी ।
सर्वाहुन वेगळा आम्हा जवळच पाही ॥२॥
सकळ तीर्थांचे मंडण अवघे तुझे पायी ।
ही खुण दाविली आम्हा जवळच पाही ॥३॥
संत साधुजन अवघे विश्वरुप देवा विश्वरुप ।
पाहु गेलो महिमा महिमा तुझे न कळे स्वरुप ॥४॥
पंच प्राणांची उजळोनी आरती देवा उजळोनी आरती ।
भावे ओवाळिता राही रुक्मिणीचा पती ॥५॥
सत्याची आरती सत्य भावे ओवाळू देवा सत्यभावे ओवाळू ।
बोधला उभा दास तुझा उभा, आपल्या चरणाजवळी ॥६॥

२५

करिती दुःख न धरा चित्ती । सुख मानी ॥१॥
आपलाली कर्मे आपण भोगिती ।
केल्यावीण देती झाडा जणी ॥२॥
तेथे आनंदाचे ।
प्रगट विकार केवि उठे हृदयी प्रगट रामरुप ॥३॥
येथे माझा स्वामी कृपाळू पाही ।
पाप दृष्टी काही न राहे तेथे ॥४॥
जळी बुडलीया तृण आज्ञा केली लागे जाण ।
रामी रतलिया मन पाप केवी राहे ॥५॥
बोधला म्हणे मन रामी विनटले ।
दहन झाले संसाराचे ॥६॥

२६

काय मी करितो कशाने तरतो ।
नाम तुझे घेतो एक भावे ॥१॥
नाम तुझे वाणी बोबडिया बोला ।
न ये मज चाली करु काय ॥२॥
न ये मज गाणे न ये मज नाचणे ।
भावे आलो शरण तुझे पायी ॥३॥
बोधला म्हणे देवा तु मज बोधिले ।
आवडीने ठेविले नाम माझे ॥४॥

२७

कुरंगिणी आपुली बालके सांभाळी ।
तैसा वनमाळी आत्मालागी ॥१॥
बहुत माझे लळे पुरविले सकळ ।
माउली कृपाळ अनाथांची ॥२॥
उपकार सांगता नलगे आत पाहाता ।
सकल माझी चिंता दूर केली ॥३॥
काये गा मी सांगो सांगता गा नये ।
सकाळ बाप माये पांडुरंग ॥४॥
सर्वा परि माझी पुरविली आस ।
चुकविला गर्भवास बोधला म्हणे ॥५॥

२८

कृष्ण सकळा जीवांचा जीव । जाणते जाणती तयाचा भाव ।
इतरां लोकां संदेहो न कळे । महिमान तयाचा ॥१॥
आपण तो बाळ ब्रह्मचारी सकळ ।
जन्मले तयाचे उदरी ब्रह्ममाया न कळत ।
याची थोरवी येर लोक काये जाणती ॥२॥
हा तो सर्वांचा साक्षभूत ।
कोणा न कळे याचा अंत आता सांगेन तयाचा वृतांत ।
सावधान श्रोते हो ॥३॥
कृपा आपणाची नारी आपण वर्त देह परी ।
दोनी दावी जनाचारी आपण यकटचि एक ॥४॥
आपण एकलाची एक सर्व । सोळा सहस्त्र गोपाळ ।
गोपिकांसहित खेळे । तरी न कळे चरित्र ॥५॥
आता सांग न कृष्णाची मूळ कथा ।
आपणचि माता आपणचि पिता ।
आपण जाला चरित्र करिता । कंसारि कान्हया ॥६॥
आपण चौवर्णाचे मूळ । आपण ब्रह्म ते केवळ ।
विश्वी विस्तारला रे सकळ । चहू वेदांची कळ तयापासी ॥७॥
साही शास्त्रे झगडती । आठरा पुराणांची वित्पत्ती ।
परि न कळे तयाची गती । आपण श्रीपती खेळतसे ॥८॥
आपण तो पांडवांचा सोईरा । धावे ब्रह्मी द्रुपदिच्या कैवारा ।
दुष्ट दुर्योधन विरा । साहे नव्हे सर्वथा ॥९॥
पांडवालागी आपण । कृष्ण साहये होये सावधान ।
सत्य तयाचे देखोन । उणे येऊ नेदी सर्वथा ॥१०॥
पाचही पांडव समूळ । आता सांगेन तयाचे मूळ ।
हे तो पंडू चे पुत्र केवळ । कृष्ण साहये होये तयासी ॥११॥
जो च आपला स्वधर्म तोच धर्म रे जाण ।
मग अनुभवाची खुण सांगतो ऐका ॥१२॥
भीम तोची भावबळी ।
या अगाध पाहाहो योगियाचा रावो । तोची एकु ॥१३॥
आर्त तोचि अर्जुन सबुध ते सुभद्रा जाण गुरुपुत्र जाणती हे खुण ।
इतरा न कळे जाण सर्वथा ॥१४॥
अवलोकी तोचि न कुळ । सादृष्ट तो सहदेव ।
पाचाची प्रीत द्रुपदी पहावो । अवलोकिता ठावो सन्निधचि असे ॥१५॥
सत्य तेचि सीता स्वये । आत्माराम लक्ष्मण बंधु सवे  १६॥
राम तोचि रावण दुर्बुध्दी दुर्योधन । असता जवळी जाण म्हणता दुरी ।
बोधला म्हणे जेथिले तेथेच आहे । ज्ञानदृष्टी पाहे परतोनिया ॥१७॥

२९

कृष्ण नाटक नाटक । याने ठकिले बहुत लोक ।
आवघे करुनि दावी एक । कैसा चालक देहिचा ॥१॥
भाविका दावितो कवतुक । बाळ्या भोळ्या भोगवि सुख ।
हारितो त्यांचे जन्म दुःख । सुखसमाधी बैसवी ॥२॥
गोपाळामाजी क्रीडा करी । सवे गोपिका सुंदरी ।
हात टाकुनी खांद्यावरी । कैसा रळिया करितसे ॥२॥
कोणा न कळे याचा पार । भुलवितो नरनारी ।
बळे चुकवी जन्मफेरा । आढळपदी बैसवी ॥४॥
बोधला म्हणे भुलविले कैसे । बळच लाविले आपले पिसे ।
पूर्वपुण्ये ओढे कैसे । थोर भाग्य आमचे ॥५॥

३०

गुज गोप्ये गोष्टी।
हो त्या तुझे पोटी ।
त्या त्वा जगजेठी सांगितल्या ॥१॥
ऐसा तु आम्हासि कृपाळु जालासि ।
जैसा पांडवांसि वेळा आतु ॥२॥
बोधला म्हणे देवा तू दीनांचा दयाळू ।
कोवळा कैवल्ये केले बापा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : August 09, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP