अभंग ४१ ते ५०

संत माणकोजी बोधले महाराजांचे चरित्र भक्ती विजय व बोध लिलावंती ग्रंथात उपलब्ध आहे.


४१

जयदेव जयदेव जय विश्वंभरा । दर्शन व्यापक तुजविण नाही दुसरा ।
तारक मारक हरि तू भक्तांचा सोयरा । आरती ओवाळू तुज परात्परा ॥१॥
विश्व व्यापक तो हा विश्वाचे ठायी । प्रकृतीवेगळा अससी विदेही ।
देहीचा चालक तू खेळविता पाही । तुजवाचुनी आणिक कोणीही नाही ॥२॥
नावरुप तुज याती नाकुळ । ब्रह्मांडनायक तू व्यापक सकळ ।
कीडा कीटक मुंगी सर्वांचे मूळ । अभक्तासी काय भक्त गोपाळ ॥३॥
साधु संत जन ज ध्याती सकळ । जया जैसा भाव त्या तैसा गोपाळ ।
जाणिव कृपाळू संचिताचे मूळ । संचितावेगळे कैचे ते फळ ॥४॥
माता पिता बंधु तूची सकळ । कन्यापुत्र अखंड तूची केवळ ।
भक्त भाविक जन तुज ध्यानी सकळ । इतरांसी न कळे बा भ्रांतीचे मुळ ॥५॥
बोधला म्हणे शरण मी आता । अखंड निजाध्यास हरिगुण गाता।
हृदयी प्रकाश तुझा समयी । तुज वाचोनी आण नेणे सर्वथा ॥६॥

४२

जवळी असता राम अंतरला दुरी ।
माया मोहो जाळे कैसा वाहोली दुरी ॥१॥
देहेक सृजा भोगुनी जोडियेली जोडी ।
अंतकाळे जाता नये फुटकी कवडी ॥२॥
जंवरि देह बळ तंववरी जिंकावा हा काळ ।
आठवा रघुवीरा हेची सोडवण करा ॥३॥
बोधला म्हणे का रे भुललेसी ।
सोडुनीया भ्रांती शरणे जावे विठ्ठलासी ॥४॥

४३

जागा जागारे आपले मनी । भाव ठेउनी गुरुचरणी ॥
मन राखेल जनी वनी गा रामा । कृष्णा बा हरि ॥धृ॥
भले भले रे पूर्वदत्ता । केले फळ ते आले हाता ।
मग भेटी जाली भगवंता ॥१॥
वासनेचा वास हा मोडी । आशा मनसा घाली दवडि ।
कुबुध्दीची कुलपे मोडी । काही करावे आपुले हित ।
दया धर्मी द्या बा चित्त । नामी न करा दुश्चित ।
गा बोधला म्हणे बोधली मी पणासी आचवला ।
हरिचरणी जाउनी विनटलो ॥२॥

४४

जै तुज मज झाली भेटी ।
तुझे पायी पडली माझी मिठी ।
पंढरीराया आता तु कैसा जासी ।
तुज ओढुनी बांधेन गळियासी ॥धृ॥
जये देखियेले तुझे मुख ।
गेली गेली माझी तान भुक। पंढरीराया ॥१॥
कानी देखियेली कुंडले ।
देखोनि मन माझे निवाले। पंढरीनाथा ॥२॥
गळा देखिली वैजयंती माळा ।
माझ्या डोळियासी सुकाळ जाला ॥३॥
कंठी देखियेले कौस्तुभ ।
देखोनि सुख जाले अमाप ॥४॥
कटि देखियेले दोन्ही कर।
देखोनी हारुषे जालो निर्भर ॥५॥
इटे देखियेले दोन्ही पाये ।
देखोनी मन स्थिर राहे ॥६॥
आम्हा पडता जडजुड ।
आपण उगवितो आमचे कोडे ॥ ७॥
आम्ही हिंडता रानीवनी ।
सवे विठ्ठल आमुचा धनी ॥८॥
आम्ही हिंडतो जिकडे तिकडे ।
आपण झाडितो काटे खडे ॥९॥
जेवु बैसवितो आपणा सांगती ।
ग्रास घालितो आपुल्या हाते ॥१०॥
दोघा निजता सुख शेजार ।
काये सांगो त्या सुखाची थोरी ॥११॥
लोक हसोन करिती काये ।
आम्हा जोडले जोडले तुज पाये ॥१२॥
बोधला म्हणे बोध जाला ।
तै हा देहेच तुज वाहिला ॥१३॥

४५

झाली आत्मपूजा देव शेजे पहुडला ।
म्हणोनिया थोर थोर आनंद झाला ॥१॥
वैकुंठीचा देव कैसा पंढरिसा आला ।
पुंडलिकाचा भाव देखोनि तन्मय झाला ॥२॥
धामणगावी भक्त एक थोर ऐकीला ।
गरुडावर बैसोनी कैसा धावत आला ॥३॥
बोधला म्हणे थोर आनंदु झाला ।
हृदयी प्रगटे बोधला निज निजेला ॥४॥

४६

तरुणपण भर देही । पुढे नाठवे काही ।
भ्रांती हे येत डोळा । तेणे पडिलो वाही।
माझे माझे म्हणता रे अंती न चले काही ।
गुरुवचन भावबळे । विश्वासे राही ॥१॥
रामकृष्ण वासुदेवा। घरी संतसंग सेवा ।
त्याणेची हीत होईल । मग पावसील देवा ।
वाया तु नवजासी करी गुरुची सेवा ।
आता तरी सावध होई का भुललासी मुढा ।
व्यर्थ तु पडु नको पाहे मायेच्या खोडा ॥२॥
प्रपंच महाझट त्याने लागिले वेढा ।
स्वहित नव्हेची काही घट मुष्टीच्या हुंडा ॥३॥
सहज विचारीता हीत आपणासी ।
सदगुरु शरण जावे तनमन धनेसी ।
जैसे तु जाणोनिया का मुढ बा होसी ।
न परतोनी पाहे बापा मग सुख पावसी ॥४॥
पैल तो जीव पाहे कैसी उडते मासी ।
मोहळ रचियले बहुता सायासी ।
आणिके झाडीपले काही नव्हे बा तिसी ।
तैसा तु गुंतु नको व्यर्थ या मायसी ॥५॥
माझी मज होईल म्हणोनी केली खटपट ।
वृध्दपण पातलिया अवघ्या येईल वीट ।
म्हणऊन दृढ धरी गुरुचरण निकट ॥६॥
माया हेलाव पाही कैसी लागली पाठी ।
म्हणऊनी शरण आलो पायी घातली मिठी ।
कृपाळु हरि माझी केली वासनेची तुटी ।
बोधला म्हणे आता कृपाळु जगजेठी ॥७॥

४७

त्रिभुवनामाजी पंढरी थोर ।
तेथील सेठ्या पुंडलिक भला रे ॥१॥
पतित पावन जडमूढ भारी ।
तयास कौल दिल्हा रे ॥२॥
निंदक दुर्जन कंटक भारी ।
कौल नाही तयाला रे ॥३॥
अनंत कोटी पुण्य जयांचे ।
तोचिये पेठेसी आले रे ॥४॥
नामाचे भरित भरितो भला ।
अभागी चुकला करंटा रे ॥५॥
बोधला म्हणे कैवल्य आले ।
दुकान तेथे बोधला रे ॥६॥

४८

तुझीया सत्तेने हाले तुझीया सत्तेने बोले ।
सांग विठ्ठल माये माझे ॥१॥
साच की लटके विचारी मनासी ।
हा बोला कोणासी ठेवसील ॥२॥
हे मृतिकेचे भांडे भुसी वोतीयेले ।
वोंकारे फोडिला टाहो तेथे ॥३॥
सकळ देहीचा चाळकु बुधी खेळवणा ।
तुची एकु, नाही बा आणिक दुजा तेथे ॥४॥
सकळ मंडण चालविता तुझी करणी गा अनंता ।
दुजा हा सर्वथा नाही कोणी ॥५॥
बोधला म्हणे हे वचन निर्धारी ।
अवघा तूची सुत्रधारी तु आमचा कैवारी पांडुरंगा ॥६॥

४९

तुझीया भेटीला जीव माझा तळमळी ।
केधवा वनमाळी येईल घरा ॥१॥
येई गा बा हरि माझ्या प्राणनाथा ।
जीव जाईल आता करु काय ॥२॥
माझिया देहीचा बैसकार केला ।
का रे नाही आला विठोबा माझा ॥३॥
येई गा कृपानिधी बैस माझ्या घरि ।
तुज आता नाही उरी संसाराची ॥४॥
हळुच तुज बुध्दी बैसविन घरि ।
तुज म्हणे अवतारी जाऊ नेदी ॥५॥
बोधला म्हणे देवा कोण माझा केवा ।
आता येऊन द्यावा प्रेमपान्हा ॥६॥

५०

तुझिये चरणी जाण स्थिरावले मन ।
आणिक मज ज्ञान न लगे काही ॥१॥
मुक्तिदासी आहेता तुजपासी ।
त्या नलगता आम्हासी पांडुरंगा ॥२॥
वैकुंठ कैलास न लगती आम्हास ।
आवडी बोधल्यास तुझे पायी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : August 09, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP