श्रीकल्हळिवेंकटेश देवचरित्र - अध्याय ९

श्रीकल्हळिवेंकटेश


॥ श्रीगणेशाय नम: ॥
॥ श्रीसांबसदाशिवाय नम: ॥
॥ श्रीदत्तात्रेयाय नम: ॥

॥ श्री लक्ष्मीपती विश्वंभरा ॥ गौरीवरा त्रिपुरहरा ॥ गिरिधारि गंगाधरा ॥ उभय हरिहरां नमन माझें ॥१॥
जयजय पितांबर दिगंबर ॥ दामोदर महेश्वर ॥ इंदिरावल्लभ भवानीवर ॥ भक्तभवभयहर दोघेही ॥२॥
विष्णु हृदयीं ईश्वर ॥ शंकरहृदीं कमलावर ॥ वास करती निरंतर ॥ पूजती परस्पर एकमेकां ॥३॥
दोघेहि एकरुप जाण ॥ भक्तालागीं दिसती भिन्न ॥ भक्तांचि भक्ति पाहोन ॥ भक्तेच्छा सुपूर्ण करताती ॥४॥
भक्त आपुले पंचप्राण ॥ बहिश्वर मानती दोघेजण ॥ सिध्दा नामरुपें धरोन ॥ असती भक्तावन करावया ॥५॥
मच्छ कच्छ शूकर ॥ सिंहमुख मनुजशरीर ॥ ऐसे नाना अवतार । शिवहृदयाब्जभ्रमर घेतसे ॥६॥
घन:शाम जगजेठी ॥ भक्ताचिया काजासाठीं धांवोनि गेला उठाउठी ॥ होवोनि चाटी वस्त्रांचा ॥७॥
भक्तिरुप कादंबरी ॥ प्राशन करितां बहुपरी ॥ भुलोन गेला श्रीहरी ॥ झाला अस्तुरी भलत्याची ॥८॥
खिसमतदार मोतहार ॥ दळणकांडण करणार ॥ झाला शेला विणणार ॥ प्रभुराय महारही भक्तीस्तव ॥९॥
जेणें गोवर्धन उचलिला ॥ लीलें नखावर धरिला ॥ व्रजनारींनीं तयाला ॥ कुचाग्रीं खेळविला भक्तीनें ॥१०॥
जेणें कंसचाणूर मर्दिले ॥ बळें काळियातें तुडविलें ॥ तया भक्तीनें कवळिलें ॥ न हालों दिलें गोपींनीं ॥११॥
ब्रह्मांडें ज्याचे आज्ञेवरोन ॥ घडती मोडती मागोन ॥ त्यातें होण्या मोठेंलहान ॥ भक्तीनें लावी जाण राधिका ॥१२॥
द्वादश गांवें शुचिप्राशन ॥ केला परी न भरला उदराचा कोन ॥ ज्याचा तो शाकापर्ण भक्षोन ॥ तृप्त झाला जाण भक्तीनें ॥१३॥
ज्याची व्हावया कृपादृष्टी ॥ वंदिती सुरासुर परमेष्ठी ॥ तो मानोनि पियूषवृष्टी ॥ काढितसे उष्टीं भक्तगृहीं ॥१४॥
जो त्रिजगाचा धनी ॥ उत्पत्तिस्थिति ज्यापासोनी ॥ तो पाणक्या होवोनी ॥ वाहे पाणी कावडिनें ॥१५॥
किती वदूं भक्तीची कहाणी ॥ भक्तवत्सल देव शिखामणी ॥ भक्तीतें वश होवोनी ॥ करी वेणीफणी गोपींची ॥१६॥
पहा भक्तीचें महिमान ॥ भक्तचरण रज:कण ॥ वंदोनी कमलासन ॥ शिरीं धरितसे जाण प्रेमानें ॥१७॥
यास्तव भक्तीच थोर सत्य ॥ भक्तीस कारण नसे वित्त ॥ मुख्य ठेवावे सादर चित्त ॥ दिनरात श्रीशचरणीं ॥१८॥
योगयागतपानुष्ठान ॥ घटमठादि खटपट जाण ॥ व्यर्थ मिळवावया रमारमण ॥ एका भक्तीवांचोन वश नोहे ॥१९॥
पुढील कथेचें निरुपण ॥ भक्तवत्सल भगवान ॥ वदवतील तैसेंच वदेन ॥ परिसा श्रोतेजन सादरें ॥२०॥
पांडुरंगभट नामें करोन ॥ कोणी एक वैदिक ब्राह्मण ॥ उपनाम जयाचें साबडे जाण ॥ वसतिस्थान जमखंडी ॥२१॥
जो कौंडिण्यगोत्री शुचिर्भूत ॥ षट्‍कर्मीं असे सदा रत ॥ सत्वगुणी सत्यवंत ॥ भिक्षुकी करीत रहातसे ॥२२॥
अल्पसंतोषी सत्यवचनी ॥ मिळेल त्यांत आनंद मानुनी ॥ वसतसे रात्रंदिनीं ॥ मन हरिचरणीं ठेवोनियां ॥२३॥
तया षोडश वर्षांचा सुत ॥ वेंकणभट नामें गुणवंत ॥ परी जन्मापासोनि रोगग्रस्त ॥ तेणें अस्वस्थ चित्त भटजी तो ॥२४॥
लक्ष्मणाचारि बापुशास्त्री ॥ वैदयक्रियेंत ज्यांची ख्याती ॥ ते औषध देती दिनराती ॥ परी रोगस्थिति हटेना ॥२५॥
कैक निर्जर नवसिले ॥ परी कोणीच नाहीं फळलें ॥ ओषधियंत्रमंत्र थकले ॥ सर्वही हरले उपाय ॥२६॥
भटजीस बोलावोनि एकांतीं ॥ ते भेषज वदती जयाप्रती ॥ हा रोग असाध्य निश्चिती ॥ ऐसी आमुची मती सांगतसे ॥२७॥
ईश्वराची कृपा होतां ॥ रोग जाईल तत्वतां ॥ त्यावांचोनी अम्हां आतां ॥ दुसरा रस्ता दिसेना ॥२८॥
ऐसें हृदयविदारक वचन ॥ ऐकोन दुभंगलें तयाचें मन ॥ चिंतानदींत जाहला मग्न ॥ वेडावलें अंत:करण जयाचें ॥२९॥
आतां म्हणे कोठें जावें ॥ कवणालागीं पुसावें ॥ कोणाचे पाय धरावे ॥ काय करावें सुचेना ॥३०॥
ऐसा करीत विचार ॥ बसला होवोनी चिंतातुर ॥ तों कृष्णराव नाना सुभेदार ॥ घ्यावया समाचार पातले ॥३१॥
गतध्यायीं कथिला गणेश कृष्ण ॥ तयाचा हा प्रपौत्र जाण ॥ हाही श्रीवेंकटेशचरण ॥ निशिदिन ध्यातसे ॥३२॥
तेणें पुशिलें भटजीप्रत ॥ कशी आहे मुलाची प्रकृत ॥ त्याही चिकित्सकरांची मात ॥ सादयंत निवेदिली ॥३३॥
आतां काय करुं नाना ॥ मज तों कांहीं सुचेना ॥ कोणास येईल बरें करुणा ॥ रोगहनना मुलाचिया ॥३४॥
ऐसें ऐकोन दीन वचन ॥ कळवळलें नानाचें मन ॥ सांगती तया उपाय जाण ॥ जेणें कल्याण निश्चयें ॥३५॥
जें आदिब्रह्म निर्गुण ॥ भक्तांलागीं होवोन सगुण ॥ शेषाद्रिवरी अवतरले जाण ॥ भक्तावन कराया ॥३६॥
जें जगताचें आदिकारण ॥ सनकादिकांचें देवतार्चन ॥ ब्रह्मादि सुरऋषि जाण ॥ सदा करती ध्यान जयाचें ॥३७॥
तें निजभक्तां दयावया दर्शन ॥ तेथोनियां आलें धांवोन ॥ राहिलें वेदाद्रिवरी जाण ॥ भक्तसंरक्षण करावया ॥३८॥
ती सगुणमूर्ति सुंदर ॥ शंखचक्रपितांबरधर ॥ कैक भक्तेच्छा परिकर ॥ पुरविल्या आजवर तियेनें ॥३९॥
माझे पूर्वज गणेशकृष्ण ॥ होते दरिद्रपूर्ण ॥ तेही सेवा करोन तूर्ण ॥ श्रीकृपें संपन्न जाहले ॥४०॥
तेंची माझें दैवत ॥ सदा भजतों दिनरात ॥ श्रीचें वर्णावया चरित ॥ मज सामर्थ्य कोठचें ॥४१॥
यास्तव भटजी त्वरित ॥ जावें कल्हळिगिरीवरत ॥ संगें नेवोनी सुपुत्र ॥ वेंकटेशसेवार्थ ठेवावा ॥४२॥
तो आहे सद्गुणि सुमति ॥ सेवा करील दृढभक्ती ॥ तेणें संतोषे रोगनिवृत्ति ॥ निश्चयें लक्ष्मीपती करतील ॥४३॥
तेथें असती अन्यसेवेकरी ॥ त्यांसचि द्यावी चिरिमिरी ॥ ते तव पुत्राची उस्तवारी ॥ तुमच्यापरी करतील कीं ॥४४॥
तुम्ही तेथें राहिलां ॥ तरी गुंतोनियां प्रेमाला ॥ व्यत्यय येईल सेवेला ॥ ऐसें सत्य मजला वाटतें ॥४५॥
यापरिचें सुधेसम भाषण ॥ कर्णपात्रें करितां प्राशन ॥ सपुत्र गेले धांवोन ॥ गिरिवरी जाण भटजी ते ॥४६॥
सन्मुख पहातां रमारमण ॥ साष्टांगें करोनि वंदन ॥ उभा राहे हस्त जोडोन ॥ भावें स्तवन करितसे ॥४७॥
देवा पतितपावना नारायणा ॥ भवभयहरणा त्रितापशमना ॥ निजभक्तमानस
रंजना ॥ राधारमणा तुज नमो ॥४८॥
प्रभो देवादिदेवा ॥ श्रीहरिगोविंदा माधवा ॥ तव चरणीं करावया सेवा ॥ हा दीनपुत्र केशवा ठेविला म्यां ॥४९॥
यातें कराया रोगमुक्त ॥ दयासागर दिनानाथ ॥ तूंचि बापा एक समर्थ ॥ दुसरा अन्यत्र दिसेना ॥५०॥
ऐसें विनयें विनवोनी ॥ पुत्र श्रीसेवेस ठेवोनी ॥ भटजी गृहा आले परतोनी ॥ ज्याचे ध्यानीं मनीं वेंकटेश ॥५१॥
इकडे मुलगा वेंकणभट ॥ अति अशक्त परि सोसून कष्ट ॥ सेवा करितसे चोखट ॥ श्रीचरणीं दृष्ट ठेवोनियां ॥५२॥
काठी टेंकीत श्रमें करोन ॥ त्रिकाळ हळुहळु जावोन ॥ प्रभूचें घेई दर्शन ॥ प्रेमें करोन निश्चयें ॥५३॥
एकग्रासहि जात नसे अन्न ॥ हातपाय झाले काडयांसमान ॥ उदरानें मात्र आपण ॥ घेतलें मोठेपण सर्वस्वी ॥५४॥
झाली असे स्थिति यापरी ॥ तरी दु:ख न मानोनि सेवा करी ॥ श्रीदेवाचा पुजारी ॥ तीर्थ नित्य दोनप्रहरीं देतसे ॥५५॥
पुढती कांहीं दिवसांवर ॥ पहा कैसा झाला चमत्कार ॥ तेंच तीर्थ अनिवार ॥ शस्त्र रोगावर जहालें ॥५६॥
तेणें अपानांतुनी ॥ गेलीं जळंबटें वाहोनि ॥ पुढती स्वल्प दिवसांनीं ॥ रोग समूळ खणोनि काढिला ॥५७॥
साफ झालें उदर ॥ तेज आलें मुखावर ॥ सर्वेंद्रियें जोरदार ॥ झालीं सत्वर परियेसा ॥५८॥
वेंकणभटाची विमलमति ॥ तैसीच तयाची अनन्यभक्ति ॥ पाहोनियां श्रीवेंकटेशपति ॥ पावले शीघ्रगती आनंदें ॥५९॥
यापरीनें रोगपरिहार ॥ करिते झाले दामोदर ॥ सूत्रधारी सर्वेश्वर ॥ महिमा अपार जयाचा ॥६०॥
हें ऐकोनि वर्तमान ॥ वेंकणभट पिता ये धांवोन ॥ रोगमुक्त पुत्रातें पाहोन ॥ आनंदाब्धीं मग्न जाहला ॥६१॥
विनयें वदे वेंकटपति ॥ व्याधिमुक्त केलें पुत्राप्रति ॥ काय वानूं प्रभूची सुकीर्ति ॥ मी तों मूढमती अज्ञान ॥६२॥
मग षोडशोपचारें पूजन ॥ यथाशक्त्या ब्राह्मणभोजन ॥ करविलें तयानें जाण ॥ प्रेमें करोन प्रमोदें ॥६३॥
वदे हृदयीं धरोनि पुत्राशीं ॥ जाऊं चल आतां गृहाशीं ॥ भक्तवत्सल हृषीकेशी ॥ वेंकटेशासि वंदोनियां ॥६४॥
पुत्र वदे मधुरवाणी ॥ हा देह अर्पिला श्रीशचरणीं ॥ तयाचे सेवेवांचोनि ॥ दुजें मजलागोनी नावडे ॥६५॥
आतां येईन घरास ॥ परि रहात जाईन थोडे दिवस ॥ पुनश्च येईन या स्थळास ॥ वेंकटेशास नमावया ॥६६॥
ऐकोनि सुपुत्राचें भाषण ॥ संतोषलें पित्याचें अंत:करण ॥ म्हणे परेशचरणीं लीन ॥ झालें मन सुताचें ॥६७॥
तेथेंच राहोनि वेदाध्ययन ॥ तैसें स्तोत्रादि अन्यग्रंथ जाण ॥ शिकले पूर्ण लक्ष देवोन ॥ वेंकणभटजी जाण निर्धारें ॥६८॥
नित्य करोनि प्रात:स्नान ॥ श्रीचें करती विध्युक्त पूजन ॥ एक एकादष्णी सारोन ॥ पवमानपठन त्यावरी ॥६९॥
बैसोनियां एकांतांत ॥ करोनि एकाग्र चित्त ॥ श्रीचा जपती महामंत्र ॥ सद्गुरुनाथ तोषावया ॥७०॥
वेंकटेश, विष्णुसहस्त्रनाम ॥ वेंकटेशकवच पावन परम ॥ पठण करी धरोनियां प्रेम ॥ ऐसा नित्य क्रम भटजीचा ॥७१॥
सदा राहोनि शुचिर्भूत ॥ बाकी राहिलेल्या वेळांत ॥ घेती श्रीनाम पवित्र ॥ दिनरात न विसंबतां ॥७२॥
ऐसें जातां कांहीं दिन ॥ सोडिलें परान्न मिष्टान्न ॥ स्वयंपाक करोन ॥ एकभुक्त जाण राहिले ॥७३॥
वेंकटेशसेवेवांचोन ॥ दुसरें नसे तयास ध्यान ॥ जेणें आपुलें तनुमनधन ॥ केलें अर्पण श्रीहरीतें ॥७४॥
ऐसी पाहोनि निष्कामभक्ती ॥ मनीं आनंदले कमलापति ॥ तेथील भक्तांत हा निश्चिति ॥ वरभक्त मानिती आपुला ॥७५॥
कवण्या भक्तास दृष्टांतीं ॥ सांगणें झाल्यास यदुपति ॥ याचेच मुखें बोलविती ॥ तया स्वप्नांतीं सांगोनियां ॥७६॥
हाही सर्व प्रकार ॥ ठाईं ठाईं कथिला सविस्तर ॥ यापरि हा भक्तवर ॥ झाला प्रियकर श्रीपतीचा ॥७७॥
तेथेंच एका गुहेंत ॥ कोणी बावा होता सेवा करीत ॥ त्याची कांहीं दिवस सुसंगत ॥ भटजीप्रत लाभली ॥७८॥
जो असे सत्यवादि सत्पुरुष ॥ जाणोनि तयाचें मानस ॥ केलासे सदुपदेह ॥ तेणें उल्हास भटजीतें ॥७९॥
यापरि वर्षें चोपन्न ॥ प्रभुसेवा करितां जाण ॥ सुविचारांत तयाचें मन ॥ अत्यंग निमग्न जाहलें ॥८०॥
म्हणे आतां पुरे व्यर्थ खटपट ॥ तिचा आला मना वीट ॥ करोनियां धारिष्ट नीट ॥ वैकुंठवाट धरावी ॥८१॥
सर्वसंग त्यागोन ॥ पूर्णनि:संग होवोन ॥ करावा संन्यासग्रहण ॥ हेंचि योग्य साधन मज वाटे ॥८२॥
ऐशा गूढ विचारांत ॥ गुंगोनि राहिलें तयाचें चित्त ॥ हेंचि सर्व दिनरात ॥ मनीं घोळत राहिलें ॥८३॥
वासुदेवानंदसरस्वती ॥ टेंबे स्वामी जयासी वदती ॥ ऐकोनि तयांची सुकीर्ती ॥ गेले तयांप्रति भेटावया ॥८४॥
विनयें करोनि वंदन ॥ केली आपुली इच्छा निवेदन ॥ टेंबेस्वामी सुहास्यवदन ॥ बोलती वचन भटजीतें ॥८५॥
तुम्हावरी वेंकटेशकृपा पूर्ण ॥ आहे हें मी पूर्ण जाणोन ॥ तयांचे आज्ञेवांचोन ॥ संन्यासग्रहण योग्य नसे ॥८६॥
दोन वर्षें होतां पुरीं ॥ श्रीगोविंद गोवर्धनधारी ॥ आज्ञा देतील सत्वरी ॥ ऐसें ममांतरीं वाटतसे ॥८७॥
यापरि वदोन ॥ सांगती संन्यासविधिआचरण ॥ तेणें भटजीचें अंत:करण ॥ आनंदलें पूर्ण जाणपां ॥८८॥
स्वामीआज्ञा घेवोनि त्वरित ॥ आले कल्हळीवरती परत ॥ सुखें राहिले सेवा करीत ॥ वाट पहात आज्ञेची ॥८९॥
एके दिनीं रात्रौ देवा ॥ विनविती हस्त जोडोनि केशवा ॥ नि:संग होवोनियां माधवा ॥ संन्यास घ्यावा मज वाटतें ॥९०॥
होवोनियां यती ॥ तुज सेवावें ज्ञानमूर्ति ॥ न व्हावया पुनरावृत्ती ॥ ही इच्छा करावी पूर्ती स्वामिया ॥९१॥
ऐकोनि शुचिमानसस्तवन ॥ संतोषलें प्रभुरायाचें मन ॥ तेचि रजनीं येवोन ॥ निजभक्तालागोन बोलती ॥९२॥
ममाज्ञें करोनि जाण ॥ सुखें करावें संन्यासग्रहण ॥ विधिपूर्वक करतां आचरण ॥ मुक्तीतें जाण पावशी ॥९३॥
नच ये तुज पुनर्जनन ॥ स्वस्थ रहावें सुखें करोन ॥ ऐसें देवोनियां आशिर्वचन ॥ सवें अंतर्धान पावले ॥९४॥
भटजी होवोनियां जागृत ॥ प्रभूसि स्तविती जोडोन हस्त ॥ पावन केलें मज यथार्थ ॥ वैकुंठनाथ वेंकटपति ॥९५॥
श्रीशाआज्ञा धरोनि शिरीं ॥ आले जमखंडी माझारीं ॥ पुढील कृत्याची उस्तवारी ॥ करविती सत्वरी आनंदें ॥९६॥
कृष्णानंद सरस्वती यती ॥ जयाची तेरदाळ गांवीं वसती ॥ ते भटजी करवीं निश्चिती ॥ संतोषें करविती प्रेषोच्चार ॥९७॥
शके अठराशें चवतीस ॥ ज्येष्ठ वदय त्रयोदशीस ॥ घेते जाले चतुर्थाश्रमास ॥ सर्व आशापाश तोडोनियां ॥९८॥
नरसिंहसरस्वती जाण ॥ गुरु ठेविती नामाभिधान ॥ तंव ते तत्काळ उठोन ॥ वंदती चरण सद्गुरुचे ॥९९॥
जमखंडी पूर्वदिशेस जाण ॥ सदानंद नामें देवस्थान ॥ जेथें नाहीं लोकांचें दळणवळण ॥ म्हणोन तेथें जावोन राहिले ॥१००॥
वया वर्षें अठयाहत्तर ॥ परी पूर्ववत् दिसे शरीर ॥ तेज एक प्रकारचें मुखावर ॥ हा सर्व प्रकार भक्तीचा ॥१०१॥
कृष्णवर्ण प्रस्तराची ॥ सुंदरमूर्ति वेंकटेशाची ॥ उभी असे सदा साची ॥ इच्छा सुभक्तांची पुरवावया ॥१०२॥
तिणें स्वप्रत्यक्षतेचा चमत्कार ॥ दाविला तो प्रकार ॥ कथितसें सविस्तर ॥ श्रोते सादर परिसावा ॥१०३॥
मर्दुनी सुवासिक अभ्यंजन ॥ प्रभुरायातें मंगलस्नान ॥ जंबुग्रामाधिपतिकडोन ॥ प्रती भृगुवारीं जाण घालती ॥१०४॥
अधणाचें आणी शीतळ जीवन ॥ श्रीसन्निध ठेविती आणोन ॥ तयांचें योग्य करोनी मिश्रण ॥ जगज्जीवन न्हाणती ॥१०५॥
ऐसें असतां एके दिनीं ॥ कोण्या ब्राह्मणानें चुकोनी ॥ तांब्याभर अधणाचें पाणी ॥ श्रीशमूर्धनीं ओतलें ॥१०६॥
तेणें श्रीतनू पोळली ॥ तीनठाईं आरक्त जाहली ॥ परी ती कोणींही नच पाहिली ॥ मूर्ति पूजयली नित्यापरी ॥१०७॥
तेथोनी चार कोसांवरत ॥ सावळगी नामें गांवांत ॥ श्रीवेंकटेशाचा एक भक्त ॥ जंबुपती चाकरींत रहातसे ॥१०८॥
ज्याचें काम कोन्हर कृष्ण ॥ जोशी उपनाम जाण ॥ आबासुभेदार ऐसेही जन ॥ तयालागोन बोलती ॥१०९॥
तेणें तेच दिनीं जाण ॥ स्वप्नीं देखिला ब्राह्मण ॥ जयाचा नवमेघासमानवर्ण ॥ आकर्ण नयन शोभती ॥११०॥
शुभ्रवस्त्र परिधान ॥ केलें असें त्रिपुंड्रधारण ॥ माथां उष्णीष शोभायमान ॥ परी मुख म्लान दिसतसे ॥१११॥
तो वदे भक्तराय ॥ उठीं सत्वर निजलास काय ॥ पहा पोळलें माझें काय ॥ यातें सत्वर उपाय करीं बा ॥११२॥
ऐसें सांगोन भक्ताप्रत ॥ सवें झाला भूदेव गुप्त ॥ तो पाहे होवोन जागृत ॥ द्विजराज तेथ दिसेना ॥११३॥
आबा विचार करोनी मनाशीं ॥ म्हणे हा विप्र नव्हे निश्चयेशीं ॥ वाटतें आले हृषीकेशी ॥ दयावया दर्शनाशीं मजलागीं ॥११४॥
मग माझें पोळलें शरीर ॥ ऐसें कां वदले सर्वेश्वर ॥ यावरोनी कांहीं विलक्षण प्रकार ॥ घडला कल्हळिवर वाटतें ॥११५॥
ऐसें आणोनियां मनांत ॥ गेला धांवत गिरिवरत ॥ तेथील पुजार्‍यादि भक्तांप्रत ॥ विनयें वृत्तांत पुसतसे ॥११६॥
ते वदती यथास्थित ॥ चाललें आहे समस्त ॥ ऐकोनियां आनंदयुक्त ॥ श्रीदर्शनार्थ चालला ॥११७॥
प्रभूशीं करोनियां वंदन ॥ सन्मुख राहे हस्त जोडोन ॥ तों दक्षिण कपोलीं जाण ॥ अकस्मात् आरक्त चिन्ह पाहिलें ॥११८॥
हें काय झालें गालावरी ॥ आणखी आहे कोठें शरीरीं ॥ पूजारी म्हणे त्या अवसरीं ॥ म्यां अदयापवरी न पाहिलें ॥११९॥
परदिनीं श्रीस घालतां स्नान ॥ उरु आणि हृदयावर जाण ॥ तैशींच पाहिलीं चिन्हें दोन ॥ तेणें उद्विग्न मन तयाचें ॥१२०॥
ऐका हो जन समस्त ॥ कोणांकडोनहि अवचित ॥ चुकोन घडलें असेल कृत्य ॥ तें श्रीपुढें सत्य वदावें ॥१२१॥
तो सर्व जाणता दयाळूपूर्ण ॥ करील अपराध क्षमातूर्ण ॥ न वदतां आतां धरतां मौन ॥ पुढें जाईल कठिण निश्चयें ॥१२२॥
ऐशी ऐकोन आबाची वाणी ॥ तो ब्राह्मण दचकला अंत:करणीं ॥ मनीं म्हणे ही करणी ॥ मजकडोनी घडलीसे ॥१२३॥
झणीं झाला भयाभीत ॥ पुढें माझी काय गत ॥ पडेन कोण्या नरकांत ॥ हें कांहीं मजप्रत कळेना ॥१२४॥
अपराध घडला मज हातीं ॥ तो कथन करावा श्रीपुढती ॥ करुणाघन श्रीवेंकटपति ॥ क्षमा निश्चिती करतील ॥१२५॥
ऐसा सुविचार करोनि मनीं ॥ भयग्रस्त श्रीसन्मुख उभा राहोनि ॥ आधोवदनी जोडोनि पाणी ॥ विनयें विनवणी करीतसे ॥१२६॥
कालच शुक्रवार जाण ॥ श्रीस घालतां मंगलस्नान ॥ म्यां निर्दयें ताब्यांभर चुकोन ॥ अधणाचें जीवन घातलें ॥१२७॥
ऐसा मी पापीयस् पापात्मा ॥ दु:ख दिलें तुज पुरुषोत्तमा ॥ आतां परब्रह्मा करोनि क्षमा ॥ या अधमाधमा रक्षावें ॥१२८॥
यापरि करोनि विनवणी ॥ राहिला स्तब्ध दु:खित मनीं ॥ सूज्ञ वदती पश्चात्तापें करोनि ॥ मुक्त होशील झणीं ईशकृपें ॥१२९॥
आबादिसकल भक्त ॥ बुडाले तैं चिंताब्धींत ॥ श्री व्हावया कष्टमुक्त ॥ कांहीं कोणाप्रत सुचेना ॥१३०॥
देवा तव पीडेचा परिहार ॥ आम्हीं मानव बापुडे काय करणार ॥ तुझा तूंचि वदोनि प्रकार ॥ व्यथाप्रतिकार करवावा ॥१३१॥
यापरि भक्तांची दीनवाणी ॥ ऐकोनि तोषले चक्रपाणी ॥ पूर्वील ब्राह्मणवेश धरोनि ॥ पुनश्च त्याचेच स्वप्नीं पातले ॥१३२॥
बोलती ऐक मम वचन ॥ कां करशी कष्टी मन ॥ दिनत्रय मधु लावितां जाण ॥ पूर्ववत माझें संहनन होईल ॥१३३॥
आज्ञेसरि दिवस तीन ॥ करितां माक्षिकलेपन ॥ पहिल्यापरी जाहलें श्रीकरण ॥ तेणें मोदें भक्तजन नाचती ॥१३४॥
जयजयाजी रमारमणा ॥ भक्तवत्सला नारायणा ॥ पतितपावना दयाघना ॥ जगदोध्दारणा जगत्पते ॥१३५॥
जयजया देवा समर्था ॥ देवकीसुता मदनताता ॥ कर्माध्यक्षा मायातीता ॥ अच्युतानंता तुज नमो ॥१३६॥
यापरी करोनियां स्तवन ॥ श्रीची अनुज्ञा घेवोन ॥ आबा गेला परतोन ॥ करीत प्रभुचिंतन आनंदें ॥१३७॥
बारा गांवें ज्वलन ॥ जेणें गिळिला लीलेंकरोन ॥ जेविं समुद्रीं रज:कण ॥ तेविं अधणाचें भुवन त्या काय करी ॥१३८॥
परि आपुलें अस्तित्व जाण ॥ दावावया निजभक्तांकारण ॥ प्रभु करते झाले विंदाण ॥ क्षीरसारज्यारमण यापरी ॥१३९॥
कर्तुं अकर्तुं समर्थ ॥ ज्याची करणी अतिविचित्र ॥ तया वर्णाया कोण समर्थ ॥ लोकत्रयांत असेना ॥१४०॥
विष्णु आबा वैदयनामें करोन ॥ कोणी एक देशस्तब्राह्मण ॥ वैदयक्रिया आचरोन ॥ तासगांवीं जाण रहातसे ॥१४१॥
जो असे सदाचारी ॥ सदसत् विचारी ॥ वागतसे स्वधर्मापरि ॥ निष्ठा देवावरी ठेवोनियां ॥१४२॥
जो राजवैदय निश्चित ॥ सत्वगुणी सत्यव्रत ॥ सदा वाचेसि सत्य ॥ कदा अनृत वदेना ॥१४३॥
श्रीवेंकटेश शेषाद्रिनाथ ॥ तें जयाचें आराध्यदैवत ॥ तच्चरणीं दिनरात ॥ अनुरक्त असे जो ॥१४४॥
साधुसंत विद्वज्जन ॥ देखतां करीतसे वंदन ॥ मिळेल त्यांत सौख्य मानोन ॥ कालक्रमण करीतसे ॥१४५॥
तया जवळ आली पन्नाशी ॥ शिथिलत्व ये गात्रांशीं ॥ परी पाहिना संततीशीं ॥ तेणें तो मानशीं उद्विग्न ॥१४६॥
संततीप्रीत्यर्थ देख ॥ तत्पत्नीनें व्रतें अनेक ॥ केलीं नवसिले बहुलेख ॥ परी सकलही विमुख जाहले ॥१४७॥
तेणें ती दंपती जाण ॥ चिंताब्धी मग्न होवोन ॥ दैवावरी हवाला देवोन ॥ अस्वस्थ मन राहिली ॥१४८॥
ऐसे जातां कांहीं दीन ॥ सती पतीतें कर जोडोन ॥ विनविती झाली विनयान ॥ मम वचन इकडोन परिसावें ॥१४९॥
व्रतें केलीं बहुतापरी ॥ देवही नवसिले आजवरी ॥ परी नच फळले निर्धारी ॥ तरी दैवावरी कां रुसावें ॥१५०॥
प्रयत्नांवांचोनी दैव अशक्त ॥ ऐसें बोलती ज्ञानवंत ॥ जें कां आलें माझे मनांत ॥ तें चरणाप्रत निवेदितें ॥१५१॥
मी तरी वंध्या ठरलें सत्य ॥ वंध्येस संतती कैंची प्राप्त ॥ यास्तव कृपा करोनी नाथ ॥ दुजी वधू यथार्थ वरावी ॥१५२॥
तियेतें भगिनीसमान ॥ सत्यत्वें वागवीन जाण ॥ हें माझें सत्यवचन ॥ प्रमाण आपुले चरण स्वामिया ॥१५३॥
ऐकोन प्रियेचे मधुर भाषण ॥ संतोषलें आबाचें मनापरी तिचें खरें अंत:करण ॥ कसाला लावोन पहाती ॥१५४॥
स्त्रियांचे हृदींचें हृदगत ॥ देवासही न समजे सत्य ॥ तियेचे विरुध्द येतदर्थ ॥ बोलावें मनांत आणोन ॥१५५॥
वदे आलें कीं वृध्दत्व मजला ॥ वृध्दातें कन्या दयाया कोण सुजला ॥ तव या उपरोधिक भाषणाला ॥ काय ह्मणूं मजला कळेना ॥१५६॥
तुझ्यावरी माझी प्रीती ॥ तुझीहि तशी मजवरती ॥ मग दुजी कशी वरुं निश्चिती ॥ तूंच सांग मजप्रति प्रियतमे ॥१५७॥
नाहीं माझें कपटी मन ॥ मीच स्वत: सत्वरें जावोन ॥ आणितें वधू शोधोन ॥ स्वामीलागोन निश्चयें ॥१५८॥
ऐसें वदोनियां सुंदरी ॥ गेली कोल्हापूरनगरीं स्वस्वसेतें बोधोनि परोपरी ॥ तियेची कन्या नोवरी ठरविली ॥१५९॥
त्या मुलीचें पाणीग्रहण ॥ विधिपूर्वक करोनि जाण ॥ तिजसहवर्तमान ॥ आबा आनंदान राहिला ॥१६०॥
सवतीस पाहातां सवत ॥ मनीं चडफडे अत्यंत ॥ धन्य या साध्वीचें जीवित ॥ आपण होवोन सवत आणली ॥१६१॥
द्वितीय पत्नी गोदावरी ॥ कुलीन सद्गुणी सुविचारी ॥ पतिशुश्रूषा चाकरी ॥ भावें परोपरी करीतसे ॥१६२॥
ऐशीं गेलीं बरींच हायन ॥ परि दिसेना संततिचें लक्षण ॥ तेणें वेडावलें मन ॥ आबाचें जाण सुचेना ॥१६३॥
धाकटीकडोनहि व्रतें नाना ॥ करविलीं घालविल्या प्रदक्षिणा ॥ देवा अश्वत्थनारायणा ॥ परि करुणा कवणा नयेचि ॥१६४॥
आतां पुढें काय उपाय ॥ कोणा पुसावा धरावे पाय ॥ वृध्दत्वाचा तर पुढेंच पाय ॥ करावें काय तें सुचेना ॥१६५॥
बसतां चिंताग्रस्त होवोन ॥ ज्येष्ठ पत्नी वदे स्वादुवचन ॥ इकडचें आराध्य दैवत वेंकटरमण ॥ तयातें आपण विसरलां ॥१६६॥
आतां चिंतोन श्रीचे चरण ॥ नवसावी संतति पूर्ण ॥ भक्तवत्सल कमललोचन ॥ देतील निश्चयेंकरोन मज वाटे ॥१६७॥
हें स्त्रीचें सुधेसम भाषण ॥ कर्णपात्रें करोन प्राशन ॥ सवें शुचिर्भूत होवोन ॥ श्रीगिरीचरण प्रार्थितसे ॥१६८॥
जयजया शेषाद्रिनाथा ॥ भक्तवत्सला भगवंता ॥ आदिमध्यांतरहिता ॥ मायातीता मापते ॥१६९॥
जयजयाजी वेंकटेशा ॥ सर्वसाक्षि पुराणपुरुषा ॥ भक्तभवभयविनाशा ॥ हृषीकेशा तुज नमो ॥१७०॥
अनंत भक्तांच्या वासना ॥ पुरविल्या तुवां नारायणा ॥ पूर्ण केलिया मम कामना ॥ येईन प्रभुदर्शना गिरिवरी ॥१७१॥
यापरी करोनियां स्तवन ॥ भक्तकल्पतरु लक्ष्मीरमण ॥ तयांचें करीत नामस्मरण ॥ रात्रंदिन राहिला ॥१७२॥
कांहीं दिन गेल्यावरती ॥ आबाची द्वितीय सती ॥ गोदावरी झाली गर्भवती ॥ श्रीवेंकटपतिकृपेनें ॥१७३॥
हें शुभवर्तमान जाण ॥ जाणोन आनंदलें तयाचें मन ॥ वदे प्रसन्न झाले शेषशयन ॥ इंदिरारमण गोविंद ॥१७४॥
नव मास सुपूर्ण होतां ॥ प्रसवली झाली दुहिता ॥ आबा म्हणे जी वैकुंठनाथा ॥ नवसा समर्था पावलासी ॥१७५॥
पुढती होईल दुजा सुत ॥ ऐसें वाटतें मजला सत्य ॥ कृपाळु बाप दिनानाथ ॥ तोचि एक समर्थ दयावया ॥१७६॥
दुसर्‍या खेपेस त्या सतीला ॥ परेशकृपें पुत्र जाहला ॥ तैं आबाचा प्रमोद मायाला ॥ नाकहि झाला लघुतर ॥१७७॥
त्यापुढें तत्पत्नी सुजाण ॥ करती झाली तृतीयगर्भधारण ॥ तरी संसृतीं होवोन निमग्न ॥ नवसाची आठवण विसरला ॥१७८॥
आपुलें काम सरलियावरती ॥ कर्त्याची आठवण विसरती ॥ तैशीच जाहली हे कृती ॥ आबाची निश्चितीं जाणपां ॥१७९॥
तेणें क्षोभले घननीळ ॥ अवचित उठविला पोटशूळ ॥ तेणें तो करी तळमळ ॥ असह्य कळ सोसवेना ॥१८०॥
वैदयोपचार सकळ जाण ॥ थकले कांहीं न ये गुण ॥ तेव्हां निरुपाय होवोन ॥ परेशचिंतन करीतसे ॥१८१॥
हे परमेश्वरा पद्मारमणा ॥ पद्मनाभा पन्नगशयना ॥ परात्परा पतितोध्दरणा ॥ पन्नगाशनवाहना तुज नमो ॥१८२॥
मायबापा जतत्पती ॥ सोडवीं या दु:खांतूनि श्रीपती ॥ तुजवांचोनियां अन्यगती ॥ नाहींच मजप्रती दयाळा ॥१८३॥
जेथें कोपला सर्वेश्वर ॥ तेथें करील काय करणार ॥ त्याचा तोचि सूत्रधार ॥ दु:खपरिहार करील पैं ॥१८४॥
असो यापरीचें स्तवन ॥ ऐकोनि संतोषले लक्ष्मीरमण ॥ स्वयें तयाच्या स्वप्नीं जाण ॥ वाडववेश धरोन पैं गेले ॥१८५॥
जयाचा घनशामवर्ण ॥ मुद्रांकित संहनन ॥ बोललासे सुहास्यवदन ॥ काय वचन तें ऐका ॥१८६॥
अरे नवस फेडिल्यावांचोन सत्य ॥ कैसा होशील रोगमुक्त ॥ इतकें पाहोनियां त्वरित ॥ आबा जागृत जाहला ॥१८७॥
पाहे चहूंकडे विलोकुनी ॥ नाहीं ब्राह्मण ना कोणी ॥ विचार करी आपुले मनीं ॥ देखिलें स्वप्नीं हें काय ॥१८८॥
सवें नवस आठवला तयाला ॥ दर्शना जाण्याचा निश्चय केला ॥ अंगारा लावितां ललाटाला ॥ रोग हटला तत्काळ ॥१८९॥
कैशी दैवाची विचित्र गती ॥ पुनश्च पडला भवनदी-आवर्ती ॥ म्हणे जातां येईल पुढती ॥ दर्शना गिरिवरती प्रभूच्या ॥१९०॥
पुढें कांहीं दिन लोटतां ॥ सांपडला खुनांत तो तत्वतां ॥ जन वदती आबा आतां ॥ यांतोन मुक्त होतां दिसेना ॥१९१॥
तेणें घाबरलासे अती ॥ नसता आरोप मजवरती ॥ आतां कैशी होईल माझी गती ॥ पुढती मजप्रती कळेना ॥१९२॥
जयजया वेंकटरमणा ॥ देवा भयकृत भयनाशना ॥ मुक्त करावें या दीनजना ॥ भवदन्य कवणा शरण जाऊं ॥१९३॥
चुकलों चुकलों स्वामिया ॥ प्रभो तव नवस फेडावया ॥ सर्वापराध क्षमा करोनियां ॥ मूढ पामरा या रक्षावें ॥१९४॥
हे विष्वक्सेन जनार्दन ॥ मधुसूदन जगज्जीवन ॥ आतां उपेक्षा करितां जाण ॥ जाईल प्राण निश्चयें ॥१९५॥
यांतोनि केलिया मुक्त ॥ तव दर्शना येईन सत्य सत्य ॥ याउपरी देवा माझा अंत ॥ अच्युतानंत पाहूं नये ॥१९६॥
प्रभू श्रीवत्सलांछन ॥ हरीच्या कृपाकटाक्षें करोन ॥ आल्या आरोपांतून तूर्ण ॥ मुक्त झाला जाण निर्धारें ॥१९७॥
होतां आरोपांतूनि मुक्त ॥ जयजय वेंकटेश वदत ॥ आबा नाचों लागला प्रेमयुक्त ॥ आनंदभरित होवोनियां ॥१९८॥
पुढें दोन तीन दिवसांनीं ॥ प्रसूत झाली तयाची कामिनी ॥ पुत्ररत्न प्रसवे ईशकृपेंकरोनी ॥ तैं आनंदीआनंद भरोनी राहिला ॥१९९॥
ही वेंकटेशदया जाणोन ॥ वेंकटेश ठेविलें नामाभिधान ॥ तयातें बाळाचारी म्हणोन ॥ सकलजन वदताती ॥२००॥
पुढती श्रीदर्शनाची तयारी ॥ करोनी राहिला सत्वरीं ॥ तों तयाचे हृदयांतरीं ॥ शंका दुसरी प्रवेशली ॥२०१॥
लहान मुलासह परिवार ॥ घेवोनि इतक्या दूरवर ॥ कैसें जाऊं त्या गिरिवर ॥ श्रीमंदरधरदर्शना ॥२०२॥
ऐशी उद्भवतां चिंता ॥ तेणें अस्वस्थता होय चित्ता ॥ तैं करद्वय जोडोनि श्रीसमर्था ॥ झाला विनविता प्रेमानें ॥२०३॥
त्याच रात्रीं स्वप्नीं जाण ॥ पुनश्च आला तोच ब्राह्मण ॥ वदे कां चिंता करशी निष्कारण ॥ मम सत्यवचन परिसिजे ॥२०४॥
वेंकटाचलवासी नारायण ॥ दयानिधी रमारमण ॥ कराया भक्तसंरक्षण ॥ कल्हळीगिरिवरी जाण अवतरले ॥२०५॥
तेथें जावोनियां त्वरित ॥ नवस फेडावा यथास्थित ॥ तेणें श्रीशेषाद्रिनाथ ॥ होती संतोषित निश्चयें ॥२०६॥
ती ईशाज्ञा धरोनि शिरीं ॥ आबा निघाला सत्वरी ॥ आला वेदाद्रिगिरवरी ॥ भक्तकैवारी दर्शना ॥२०७॥
श्रीचरणकमल देखोन ॥ तयानें घातलें लोटांगण ॥ म्हणे या पतीता देवोन दर्शन ॥ पतितपावन धन्य केलें ॥२०८॥
या पामरें प्रभुसुकीर्ति ॥ काय वानावी मंगळमूर्ति ॥ आतां हेंचि दयावें दासाप्रती ॥ निरंतर तव स्मृति असावी ॥२०९॥
सवें महापूजा बांधवोन ॥ यथाशक्त्या केलें ब्राह्मणभोजन ॥ प्रभुवरा सन्निध कांहीं दीन ॥ सेवा करीत जाण राहिला ॥२१०॥
मिळतां श्रीचा निदेश ॥ साष्टांगें वंदोनि वेंकटेशास ॥ आला तासगांवास ॥ आनंदित मानस परतोनी ॥२११॥
पहा क्षीराब्धिजारमण ॥ कैसें करताती भक्तसंरक्षण ॥ हें हृदयीं दृढ ठेवोन ॥ मुमुक्षूंनीं जाण रहाटावें ॥२१२॥
हा अध्याय मौक्तिक घोस ॥ भक्षण करोत भक्तराजहंस ॥ अभक्त पाखांडीवायस ॥ दुर्मिळ तयसि सत्यत्वें ॥२१३॥
श्रीउमारमारमण ॥ भुजगभूषण भुजगशयन ॥ वृषभेंद्र-खगेंद्रवाहन ॥ करती त्रितापशमन दोघेही ॥२१४॥
या एकरुपी हरहरींतें स्मरोन ॥ साष्टांगें करोनि वंदन ॥ हा नवमाध्याय जाण ॥ तयांचे चरणीं अर्पण करी हरी ॥

इति नवमोऽध्याय: ॥२१५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 16, 2021

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP