श्रीकल्हळिवेंकटेश देवचरित्र - अध्याय ६

श्रीकल्हळिवेंकटेश


॥ श्रीगणेशाय नम: ॥
॥ श्रीसदाशिवाय नम: ॥
॥ श्रीदत्तात्रेयाय नम: ॥

॥ जयजय निर्गुण सगुण ॥ जगत्कारणाकारण ॥ मुनिजनवंदित चरण ॥ नारायण तुज नमो ॥१॥
जयजयाजी निर्विकल्पा ॥ सच्चिदानंदा विश्वरुपा ॥ मायातीता अरुपा ॥ मायबापा मापते ॥२॥
ज्याचा असेल जसा भाव ॥ त्यापरीच पावसी देवाधिदेव ॥ विघ्नें हरोनियां सर्व ॥ इच्छिलें स्वयमेव देतोसी ॥३॥
करशी भक्ताची चाकरी ॥ स्वयंपाकही तयाचिया घरीं ॥ यावनाळही भक्षण करी ॥ भक्तकैवारी म्हणोनियां ॥४॥
ऐशा या सुखधामा ॥ कोण वर्णील पुरुषोत्तमा ॥ देतां कल्पद्रुमोपमा ॥ न साजे सर्वोत्तमा निश्चयें ती ॥५॥
पुढील कथेचें निरुपण ॥ जैसे वदवतील नारायण ॥ तैसेंच प्रेमयुक्त वर्णीन ॥ श्रोतेजन तोषावया ॥६॥
भक्तार्ति हरावया पूर्ण ॥ कैसे प्रभु जाती धांवोन ॥ कमलापती कमललोचन ॥ करीन कथन तें ऐका ॥७॥
जमखंडीग्रामानजीक ॥ आलबाळनामें असे एक खेटक ॥ तेथील पाटील कारणिक ॥ शेषप्पानाम तयाचें ॥८॥
जो होता बलाढय पूर्ण ॥ शौर्यें न मानी कोणालागून ॥ अन्यग्रामाधिकारी जाण ॥ रहाती नमोन तयासी ॥९॥
शेंकडों कृत्यें नानापरिचीं ॥ करीतसे धाडसाचीं ॥ परी मन:पूर्वक साची ॥ भक्ति वेंकटेशाचि करितसे ॥१०॥
कोणत्याही कृत्यांस जाण ॥ केल्याविना नामस्मरण ॥ प्रवर्त न होय आपण ॥ ऐसें आचरण तयाचें ॥११॥
जो पूर्वजन्मींचा संस्कार ॥ त्याचाच हा प्रकार ॥ मुखें यावया निरंतर ॥ नामोच्चार वाटतें ॥१२॥
यापरी करतां कालक्रमण ॥ नसता आरोप आणोन ॥ राष्ट्राधिपतींनीं जाण ॥ नेला धरोन तयासि ॥१३॥
न करितां विचार त्वरित ॥ नेती पन्हाळगडावरत ॥ ठेविला कारागृहांत ॥ तया जन्मांत वाटला ॥१४॥
शेषाप्पाचा व्हावया नायनाट ॥ बंदोबस्त करती अटोकाट ॥ पहारा चौकी चोखट ॥ मुंगी शिरण्या वाट नसेचि ॥१५॥
मिळेना पाणी ना अन्न ॥ इतर वस्तूंतें पुसतो कोण ॥ झाला शुष्ककाष्ठासमान ॥ कुडींत प्राण उरलासे ॥१६॥
जयजयाजी वेंकटेशा ॥ दिनानाथा आदिपुरुषा ॥ भक्तभवभयनाशा ॥ हृषीकेशा तुज नमो ॥१७॥
गरुडध्वजा गोविंदा ॥ गोवर्धनधारि मुकुंदा ॥ गोपाळा आनंदकंदा ॥ वरवरदा दयानिधे ॥१८॥
देवदेवा वेंकटपति ॥ म्यां ऐकिली तव विमलकीर्ति ॥ येवोनि कल्हळिगिरीवरति ॥ असंख्य भक्तार्ति नाशिल्या ॥१९॥
मी तों तुझा भक्त दीन ॥ सदा करितसें नामस्मरण ॥ पडलों या संकटीं गहन ॥ काढावें रमारमण बाहेरी ॥२०॥
ऐसें स्तवितों रात्रंदिनीं ॥ परि न उध्दरिसी अजोनि ॥ मज वाटतें ही दीनवाणी ॥ प्रभकर्णीं पडेचिना ॥२१॥
करिवर हा मूक प्राणी ॥ त्याची ऐकोनि विनवणी ॥ धांवलासि तूं चक्रपाणी ॥ प्रेमेंकरोनि दयाळा ॥२२॥
ब्रह्मांडांतील सर्व शब्द ॥ पिपीलिकादिपदनिनाद ॥ सवेंचि ऐकशी विशद ॥ परि मम वचनाद नायकशी ॥२३॥
हे तों कधींच न घडेल ॥ ऐसें मम मन बोलती बोल ॥ माझी वाचा गेली खोल ॥ विशालबोली बोलवेना ॥२४॥
तव ब्रीद पतितपावन ॥ ऐसें वदती सुरऋषिगण ॥ तें आज होईल व्यर्थ जाण ॥ वाटे मजकारणें लक्ष्मीपते ॥२५॥
त्याची वाटे मजला आर्ति ॥ ह्मणोनि बापा जगत्पति ॥ उध्दरावें या दीनाप्रति ॥ त्वरित गरी परेशा ॥२६॥
आतां कळेल तैसें करीं ॥ मज बोलवेना याउपरी ॥ ऐसें म्हणोनियां हरि हरि ॥ वदत भूवरी पडियेला ॥२७॥
यापरिचें ऐकतां प्रेमस्तवन ॥ कळवळलें प्रभूचें अंत:करण ॥ उठाउठीं गेले धांवोन ॥ कृष्णवर्ण ब्राह्मण वेषधारी ॥२८॥
म्हणती शेषप्पा ऐक ॥ दे सोडोनि दु:खशोक ॥ तुज करावया बंधमुक्त ॥ आलों नि:शंक येथें मीं ॥२९॥
पाहोनि तयातें दचकला ॥ शेषप्पा उठोनि बैसला ॥ म्हणे कोण तुम्ही येथें कसे आलां ॥ हेंचि मजला कळेना ॥३०॥
मी आहें कारागृहांत ॥ बंदोबस्तार्थ शिपाई आहेत ॥ कळतां ते येतील धांवत ॥ ब्राह्मणा तव घात होईल कीं ॥३१॥
यास्तव आलेली वाट ॥ धरोनि जावें तुवां नीट ॥ मज न्यावयाची खटपट ॥ व्यर्थ असें स्पष्ट दिसतसे ॥३२॥
अरे मी कल्हळीचा ब्राह्मण ॥ वेंकापामाझें नामाभिधान ॥ विसरलास ओळख जाण ॥ काय तुजलागोन म्हणावें ॥३३॥
नाहीं मज कवणाची भीती ॥ हें तुवां जाणावें निश्चितीं ॥ ऐसें ब्राह्मणें वदोनि भ्रांतिगर्तीं ॥ शेषप्पाप्रति बुडविलें ॥३४॥
सवें तयातें उचलोन ॥ कृष्णानदी उल्लंघोन ॥ तिच्याच तटाकीं ठेवोन ॥ भ्रांति काढोन घेतली ॥३५॥
शेषप्पातें मग बोलती ॥ आतां मात्र विसरुं नको मजप्रती ॥ हा तुझा अलबाळ गांव निश्चितीं ॥ दिसतसे पुढती पाहेंपां ॥३६॥
ऐसें प्रेमें वदोन ॥ सवें गेले गुप्त होवोन ॥ शेषा चहूंकडे पाहे निरखोन ॥ कोठेंच ब्राह्मण दिसेना ॥३७॥
तेणें अती वेडावला ॥ क्षण एक स्तब्ध बैसला ॥ म्हणे म्यां स्वप्न देखिला ॥ कीं काय माझें मजला कळेना ॥३८॥
हें स्वप्नच म्हणावें तरी ॥ अलबाळ दिसतसे पुढारी ॥ कृष्णा वाहे मजशेजारीं ॥ पहातों खरोखरी प्रत्यक्ष ॥३९॥
यास्तव स्वप्न नोहे हें सत्य ॥ तो ब्राह्मण नव्हे भगवान साक्षात् ॥ म्हणोनियां झालासे गुप्त ॥ मनुष्य देखत होय कैसा ॥४०॥
मी वेंकप्पा कल्हळीचा ॥ ऐशीही वदली तयाची वाचा ॥ तोच श्रीवेंकटपति साचा ॥ झाला मम मनाचा निश्चय ॥४१॥
वदे नंदबाला गोपाला ॥ देवा तुझी अघटित लीला ॥ कळेना ब्रह्मादिकाला ॥ शेषही थकला वर्णितां ॥४२॥
तेथें मी जड मूढ किती ॥ वर्णाया तव विमलकीर्ती ॥ मौनेंच बापा कमलापति ॥ तव चरणाप्रति वंदावें ॥४३॥
ब्राह्मणवेश धरोन ॥ प्रभो दर्शन दिलें कृपा करोन ॥ तेणें झालों परम पावन ॥ वाटे बेचाळिस जाण उध्दरलीं ॥४४॥
प्रभो तुझें कोमल शरीर ॥ चरणसंवाहनीं लक्ष्मीचा कर ॥ तोही समयीं लागे कठोर ॥ मग मम भार कैसा साहिला ॥४५॥
देवा तुझें काय हें कृत्य ॥ मज आणितां खांदयावरत ॥ श्रमला अससी कीं अत्यन्त ॥ दु:ख अतिरिक्त मज वाटे ॥४६॥
तुझी उतरायी व्हावया ॥ काय देऊं व्यंकटराया ॥ स्थिरचरादिक सखया ॥ तुझेंचि सदया सर्वही ॥४७॥
तें तुझें तुज दयावयासी ॥ लज्जा वाटे मम मानसीं ॥ म्हणोनि हे काया हृषीकेशी ॥ तव चरणासी अर्पिली ॥४८॥
यापरी करोनि स्तवन ॥ केलें कृष्णेंत सचैल स्नान ॥ तडक निघोनियां तेथोन ॥ आला गिरिवर जाण आनंदें ॥४९॥
होतां श्रीचें दर्शन ॥ घातलें चरणकमलीं लोटांगण ॥ म्हणे श्रीशा तुजवरोन ॥ हें शरीर ओवाळून टाकिलें ॥५०॥
सवें बोलाविला परिवार ॥ आला धांवतो तो गिरिवर ॥ ब्राह्मणभोजनादि प्रकार ॥ करोनि रमावर तोषविला ॥५१॥
श्रीची आज्ञा घेवोन ॥ पाटील आला गांवीं जाण ॥ आनंदें प्रभूचें पूजनस्मरण ॥ करीत कालक्रमण राहिला ॥५२॥
शेषप्पा जातीचा लिंगायत ॥ परी तैं पासोनि आजपर्यंत ॥ व्यंकटेशाचींच नामें समस्त ॥ त्याचे पुरुष वंशांत ठेविती ॥५३॥
इकडे पन्हाळगडावर ॥ काय घडला प्रकार ॥ तो सांगतसें सविस्तर ॥ श्रोतेहो सादर परिसावें ॥५४॥
धरोनि आणलेला नूतन ॥ कैदी गेला कैदेंतून ॥ रखवालादार हें वर्तमान ॥ धन्यासी जाण जाणविती ॥५५॥
तेणें कैदखान्यावरील नोकर ॥ तैसें तयावरील कामगार ॥ आणवोनियां सत्वर ॥ क्रोधोत्तरें बोलतसे ॥५६॥
कडक बंदोबस्तांतून ॥ तुमच्या सल्ल्यावांचोन जाण ॥ गेला नाहीं कैदी पळोन ॥ ऐसें मज पूर्ण वाटतसे ॥५७॥
यास्तव तुम्हां कामावरोन ॥ महकुब केलें सर्वां जाण ॥ सत्वर कैदी आणा धरोन ॥ नातरी जबर शिक्षा देईन तुम्हांसी ॥५८॥
ऐशी वाणी भयंकर ॥ ऐकोनि सर्वांचें अंतर ॥ भ्यालें म्हणती आम्हांवर ॥ कोपला ईश्वर निर्धारें ॥५९॥
नित्यापरी पहारेकरी जागृत ॥ कैदखाना असे सुरक्षित ॥ कुलुप काढोनि पाहतां आंत ॥ बंदिवान तेथ दिसेना ॥६०॥
घडलें असें खरोखर ॥ परी धन्या कैसें सत्य वाटणार ॥ सांगों जातां शिक्षा देणार ॥ खोटें बोलणार म्हणोनि ॥६१॥
यास्तव सर्व मिळोनियां ॥ जाऊं कैदी शोधावया ॥ मिळाल्या आणोनी तया ॥ सरकारपायां हजर करुं ॥६२॥
ऐसा विचार मनांत ॥ करोनि निघाले समस्त ॥ पैकीं कांहीं जमखंडींत ॥ येवोनी तपासार्थ राहिले ॥६३॥
आलबाळचे पाटलास ॥ येवोनि झाले थोडे दिवस ॥ ऐसा लागतां तपास ॥ आनंदलें मानस तयांचें ॥६४॥
त्यांत एक मुख्य ब्राह्मणपुत्र ॥ जो असे अती बळवंत ॥ त्वरेनें गेला तो धांवत ॥ आलाबाळांत प्रवेशला ॥६५॥
शेषप्पानें दुरुनी देखला ॥ तया यमदूतसा भासला ॥ तेणें अत्यंत घाबरला ॥ आळवों लागला श्रीहरीतें ॥६६॥
देवा गोवर्धनधारी ॥ मुरारी शौरी कंसारी ॥ गोविंदा गोकुलविहारी ॥ भक्तकैवारी दयानिधे ॥६७॥
नको म्हणतां त्वां येथें आणिलें ॥ तैसें आतांही पाहिजे रक्षिलें ॥ मज हे धरावया आले ॥ धांव दयाळे श्रीमूर्ती ॥६८॥
मज आतां धरोनि नेती ॥ पुनश्च बंदीं घालती ॥ तेथील जाचणी किती ॥ भोगूं श्रीपती अनिवार ॥६९॥
त्या यमयातना एक कीं दोन ॥ सांगों तुज किती म्हणोन ॥ कमलापति कमललोचन ॥ हें तूं सर्वज्ञ जाणसी कीं ॥७०॥
यापरी करीत स्तवन ॥ ईशचरणीं लावोनियां मन ॥ उभा राहिला निशंक जाण ॥ धैर्य धरोन शेषप्पा ॥७१॥
तंव बोले ब्राह्मणपुत्र ॥ क्रोधें होवोनि संतप्त ॥ मूर्खा पळोनि आलास येथ ॥ बांधोनि तुजप्रत नेतों मीं ॥७२॥
कोण तुझा साह्यकारी ॥ येवों दे माझे पुढारी ॥ त्यासह तुज सत्वरी ॥ पन्हाळ्य़ावरी नेतसें ॥७३॥
ऐसें वदोनि शेषप्पाचा हस्त ॥ धांवोनि धरितां अकस्मात ॥ होवोनियां मूर्च्छित ॥ पडला निचेष्टित भूमीवरी ॥७४॥
राहिलें त्याचें चलनवलन ॥ वहातसे नुस्ता श्वास जाण ॥ हें पाहोनियां संगतिजन ॥ घाबरे होवोन वेडावले ॥७५॥
जेथें प्रभूचें संरक्षण ॥ तेथें काय करील कवण ॥ शेषप्पा बाजूस राहोन ॥ धरणार अचेतन पडलासे ॥७६॥
ईशेच्छा काय न करी ॥ घडीमोडी ब्रह्मांडें सत्वरी ॥ आधार नसतां आकाशवरी ॥ आधंतरीं राहिलें ॥७७॥
पंचभूतें परस्परी ॥ वैरी असती खरोखरी ॥ परी एकत्र वसती शरीरीं ॥ मित्रापरी स्वभावें ॥७८॥
असो शेषप्पानें ही स्थिति ॥ पाहोनि म्हणे वेंकटपति ॥ ब्रह्महत्याही माझे माथीं ॥ येवों पहाती गोविंदा ॥७९॥
तंव ते लोक तया पुसती ॥ हा प्रकार काय निश्चितीं ॥ शेषा वदे श्रीवेंकटपति ॥ रुष्टला तुम्हांवरती वाटतें ॥८०॥
यास्तव यास येथोन ॥ न्यावें कल्हळिवरी जाण ॥ वेंकटेशचरणीं ठेवोन ॥ सेवा मनेंकरोन करावी ॥८१॥
तेणें थोडयाच दिवसांत ॥ बरा होईल निश्चित ॥ ऐसें ऐकोनि तद्वत ॥ त्यांहीं त्वरित पैं केलें ॥८२॥
त्यांतून कांहीं जण धांवत गेले ॥ धन्या सकळ वृत्त कथिलें ॥ तेणें अत्याश्चर्य मानिलें ॥ द्रव्य पाठविलें रक्षणासी ॥८३॥
नंतर स्वल्प दिवसांत ॥ निस्तोष झाला ब्राह्मणपुत्र ॥ करवोनि पूजा अर्चनादि समस्त ॥ ब्राह्मण आतृप्त जेवविले ॥८४॥
मीं पुण्याचा रहाणार ॥ उदरपूर्तीस आलों येथवर ॥ श्रींनीं केला माझा उध्दार ॥ दयावी आज्ञा रमावर या दासा ॥८५॥
पुन: पुन: नमन करोन ॥ वेंकटेशाचें करीत ध्यान ॥ गेला ब्राह्मणपुत्र जाण ॥ आनंदें करोन गृहासी ॥८६॥
पाटलानेंही आनंदान ॥ चतु:सीमापूर्वक जमीन ॥ श्रीवेंकटेशप्रीत्यर्थ जाण ॥ इनाम लिहोन अर्पिली ॥८७॥
ती जमीन अदयावत ॥ स्वभक्तांचे मनोरथ ॥ पुरविणार जो समर्थ ॥ आहे चालत तयाकडे ॥८८॥
आतां आणखी एक अघटित ॥ श्रीवेंकटशाचें चरित ॥ कथितों ऐका समस्त ॥ देवोनियां चित्त श्रोते हो ॥८९॥
पूर्वीं जमखंडीमाझारीं ॥ कोणी गंगाप्पा नामधारी ॥ होता जातीचा निळारी ॥ करोनि साहुकारी रहातसे ॥९०॥
पन्नास वर्षें वयाला ॥ पांच कमी तयाच्या स्त्रियेला ॥ झालीं असतीं या जोडप्याला ॥ परि आंच जिवाला एक असे ॥९१॥
संपत्ति घरीं पुष्कळ ॥ परंतु संततीचा दुष्काळ ॥ पुत्रावांचोनि ते निष्फळ ॥ हेचि तळमळ दिनराती ॥९२॥
आपुल्या स्वधर्मावरी ॥ व्रतवैकल्यें नानापरी ॥ तेंवि दानधर्म बहु करी ॥ परि दिसेचना सुचिन्ह ॥ तेणें उद्विग्न मन जाहलें ॥९५॥
ह्मणे आपुल्या प्राक्तनीं ॥ नाहीं लिहिलें विधींनीं ॥ मग पुत्र होईल कोठुनी ॥ देणार कुणी कितीचे ॥९६॥
ऐसा विचार करित ॥ दु:खित मनें निश्चित ॥ अष्टाक्षरी मंत्र जपत ॥ दिनरात राहिला ॥९७॥
पूर्वार्जित कांहीं पुण्य ॥ घडलें होतें त्याचे हातोन ॥ त्याच पुण्यानें जाण ॥ केली इच्छा पूर्ण तयाचि ॥९८॥
दोघें असतां उदास मनीं ॥ पुढें कांहीं दिवसांनीं ॥ गंगाप्पाची प्रियपत्नी ॥ झाली गर्भिणी परियेसा ॥९९॥
दोहद लागतां जाण ॥ दासी कळविती वर्तमान ॥ तेणें गंगाप्पाचें मन ॥ मोदार्णवीं लीन झालें ॥१००॥
म्हणे मी झालों धन्य ॥ कुळीं होतां पुत्रजनन ॥ बेचाळीस उध्दरती जाण ॥ ऐसें सज्जन बोलती ॥१०१॥
अकालीं गर्भधारण ॥ ही देवाचीच कृपा पूर्ण ॥ होईल पुत्ररत्न यावरोन ॥ ऐसें मम मन सांगतसे ॥१०२॥
तयाचे ज्ञातिलोक ॥ पाहुनि हें ईशकौतुक ॥ डोहाळजेवणें करिती देख ॥ एकापुढें एक होवोनियां ॥१०३॥
गौरवर्ण डोहाळकरीण ॥ कचकलापही शुभ्रवर्ण ॥ ऐशी परिस्थिति पाहोन ॥ आश्चर्य सकल जन करिताती ॥१०४॥
नवमास होतां पूर्ण ॥ प्रसवली ते पुत्ररत्न ॥ उल्हासलें पतीचें मन ॥ रहाया त्या गगन पुरेना ॥१०५॥
पंचमी-षष्टी-पूजन ॥ तसेंच बारसें करोन ॥ घातलें ब्राह्मणभोजन ॥ होवोनी आनंदित मन तयानें ॥१०६॥
यापरी आनंदांत ॥ दंपती असे काल क्रमीत ॥ पुत्राचे लाड करीत ॥ कौतुक पहात राहिलीं ॥१०७॥
दोन वर्षें झालिया पूर्ण ॥ बाळ रांगूं खेळूं लागलें जाण ॥ परि तयाच्या मुखांतोन ॥ एकही भाषण निघेना ॥१०८॥
पुत्राची बोबडी वाणी ॥ ऐकावी प्रेमेंकरोनी ॥ मामा काका म्हणम्हणोनि ॥ शिकविती तयालागुनी उभयतां ॥१०९॥
पांचवें वर्ष पूर्ण झालें ॥ शिकवितां उभयतां थकले ॥ परि एकही शब्द न बोले ॥ निर्फल झाले प्रयत्न ॥११०॥
पालथ्या कुंभावर ॥ धरली पाण्याची धार ॥ परिही त्याचें अभ्यंतर ॥ राहे निरंतर कोरडेंचि ॥१११॥
जें कां ईश्वरीय घटित ॥ तें कोण मोडों शके जगतींत ॥ त्याचा तोचि मोडाया समर्थ ॥ दुजा अन्यत्र नसेची ॥११२॥
कुब्जेस दिलें सरळपण ॥ नैध्रुवास दिले नयन ॥ अंत्यज वदे वेद जाण ॥ ऐसें एका देवावांचोन न घडे कधीं ॥११३॥
गंगाप्पा ह्मणे आतां काय करुं ॥ कवणा विचार विचारुं ॥ पुत्रानंदाचा पाडोनि विसरु ॥ दु:खानें पुढाकारु घेतला ॥११४॥
जयाचें जैसें पूर्वार्जित ॥ तैसें त्यास फल प्राप्त ॥ ऐसें बोलती ज्ञानवंत ॥ तेंचि सत्य मज वाटे ॥११५॥
यापरि मनाचें समाधान ॥ करोनि जातां कांहीं दिन ॥ त्याचा बाळमित्र गांवाहून ॥ तयासि येवोन भेटला ॥११६॥
तयासि आपुलें इहवृत्त ॥ सांगितलें आदयंत ॥ तो म्हणे ऐक देवोनि चित्त ॥ कथिन तुजप्रत गंगाप्पा ॥११७॥
शेषाद्रिवासी वेंकटरमण ॥ अवतरले कल्हळीगिरीवर जाण ॥ दयावया निजभक्तां दर्शन ॥ आले धांवोन सत्वरी ॥११८॥
प्रभुंनीं पहा आजवर ॥ कैक उध्दरिले भक्तवर ॥ नाना संकटांचा परिहार ॥ लक्ष्मीवर करिताती ॥११९॥
ऐशी वेंकटेशाची सुकीर्ति ॥ त्वांही ऐकिली असेल संप्रति ॥ तीतें वर्णावया मम मति ॥ कुंठित निश्चितीं होतसे ॥१२०॥
यास्तव मित्रा अवधारीं ॥ जावें तुवां कल्हळीवरी ॥ श्रीसन्निधानीं सत्वरी ॥ सेवा करी सुमनानें ॥१२१॥
सेवा करितां कांहीं दिवस ॥ कृपा करोनि श्रीनिवास ॥ वाचा देतील तव पुत्रास ॥ सांगे मम मानस निश्चयें ॥१२२॥
यापरिचें निष्कपट भाषण ॥ आपुल्या स्नेहयाचें ऐकोन ॥ संतोषलें गंगाप्पाचें मन ॥ म्हणे हेंचि प्रमाण मज वाटे ॥१२३॥
करोनि सर्व तयारी ॥ सस्त्रीक सपुत्र गिरिवरी ॥ गेला धांवोनि सत्वरी ॥ गंगाप्पा निर्धारी प्रेमानें ॥१२४॥
मिळोनियां जायापती ॥ अनन्यभावें सेवा करिती ॥ उपवासादि नाना रीती ॥ प्रदक्षिणाही घालिती भावयुक्त ॥१२५॥
यापरी जातां एक वत्सर ॥ तयांचें जाणोनि अभ्यंतर ॥ प्रसन्न होतां गिरिधर ॥ घडला प्रकार तो ऐका ॥१२६॥
अन्यभक्त पूजा सारोन ॥ गर्जती गोविंदनाम उच्चारोन ॥ तैसेंच गंगाप्पाचा पुत्र जाण ॥ एकदिन गर्जिन्नला ॥१२७॥
हें ऐकोनि जन समस्त ॥ झाले आश्चर्यभरित ॥ त्यांतून दोघे गेले धांवत ॥ गंगाप्पाप्रति सांगती ॥१२८॥
आली दंपति धावोन ॥ वत्सातें आलिंगोन ॥ वदती गोविंद उच्चारोन ॥ आमुचें श्रवण तृप्त करीं बा ॥१२९॥
तें बालक त्या अवसरीं ॥ वदे गोविंद नारायण श्रीहरि ॥ बोलों लागलें नानापरी ॥ लीला परमेश्वरी अगाध ॥१३०॥
इच्छामात्रें उत्पन्न करी ॥ हुंकारे नाश सत्वरीं ॥ ऐसा जो मधुकैटभारि ॥ त्यातेंही नवल परि कायसें ॥१३१॥
ऐकतां पुत्राचें भाषण ॥ आनंदीं गेलें बुडोन ॥ देखोनि श्रीवेंकटेशचरण ॥ घालिती लोटांगण उभयतां ॥१३२॥
प्रार्थिती देवा जगदीशा ॥ पुरविली आमुची आशा ॥ कृपाळुवा हृषीकेशा ॥ श्रीवेंकटेशा वेंकटपति ॥१३३॥
कैसें करावें तुझें स्तवन ॥ ना ठावें आम्हांलागोन ॥ असों आम्ही ज्ञातिहीन ॥ रमारमण गोविंदा ॥१३४॥
ऐसें विनयें भाषणवंदन ॥ करिती उभयतां हस्त जोडोन ॥ तेणें संतोषले नारायण ॥ पतितपावन जगदीश ॥१३५॥
मग षोडशोपचारें जाण ॥ महापूजा करवोन ॥ नैवेदय आणि ब्राह्मणभोजन ॥ प्रेमें करोन करविलें ॥१३६॥
भूदेवा दक्षणा वांटली ॥ अन्यजात भोजनें तृप्त केली ॥ अनाथजनां वस्त्रें दिधलीं ॥ ही सर्व कृति अर्पिली श्रीचरणीं ॥१३७॥
गंगाप्पा म्हणे हें सर्व ठीक झालें ॥ मज ईशें नाहीं कमी केलें ॥ येथें स्थावर कांहीं पाहिजे केलें ॥ ऐसें आणियेलें मनांत ॥१३८॥
राहोनि तेथेंच कांहीं दिन ॥ तीन तीन कमानीच्या दोन ॥ दोन कमानीची एक जाण ॥ ऐशा ओहर्‍या तीन बांधविल्या ॥१३९॥
श्रीचे दक्षिणेस मजबूत ॥ बांधविल्या त्या समस्त ॥ निळारिनामें प्रख्यात ॥ अदयावत त्या असती ॥१४०॥
श्रीची आज्ञा घेवोन ॥ मग गंगाप्पा आनंदेंकरोन ॥ स्त्रीपुत्रांसहित जाण ॥ गृहीं परतोन पैं आला ॥१४१॥
यापरि लोटतां कांहीं संवत ॥ मुलगा येतां वयांत ॥ आपुला कारभार समस्त ॥ तयाचे हातांत वोपिला ॥१४२॥
आपण गोविंद नारायण ॥ मधुसूदन रमारमण ॥ ऐसें करीत नामस्मरण ॥ रात्रंदिन राहिला ॥१४३॥
हा अध्याय कल्पद्रुम जाण ॥ त्याचे भक्तिछायेंत बैसोन ॥ करितां पठण श्रवण ॥ होती कामना पूर्ण निश्चयें ॥१४४॥
हरिहर दोघे एकचि जाण ॥ भावापरी दिसती भिन्न ॥ त्यांचें चरणकमल वंदोन ॥ हा षष्ठाध्याय सर्मपण हरि करी ॥१४५॥

इति षष्ठोऽध्याय: ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : March 16, 2021

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP