श्रीकल्हळिवेंकटेश देवचरित्र - अध्याय १

श्रीकल्हळिवेंकटेश


॥ श्रीगणेशाय नम: ॥
॥ श्रीसांबसदाशिवाय नम: ॥
॥ श्रीदत्तात्रेयाय नम: ॥
नमूं आधीं विघ्नहरा ॥ भक्तजनांचे माहेरा ॥ आदि अनादि लंबोदरा ॥ विघ्नेश्वरा ज्ञाननिधि ॥१॥
अज अव्यय निर्गुण ॥ परि स्वजनांलागिं होशी सगुण ॥ गजतुंड हे निर्गुण ॥ नरदेह सगुण गणपति ॥२॥
सर्व नायकांचा ॥ म्हणून म्हणती विनायक ॥ त्रिजगीं तूंचि एक ॥ दुजा आणिक असेचिना ॥३॥
सरळ शुंडा लंबायमान ॥ वक्र तुंड सुहास्य वदन ॥ चतुर्भुजीं बाहुभूषण ॥ विराजमान दोंदिल ॥४॥
कटितटीं शोभे पीतांबर ॥ नागयज्ञोपवीत सुंदर ॥ गळां रुळती मौक्तिकहार ॥ शमी मांदार दूर्वांचें ॥५॥
दिव्यांगना रिध्दिसिध्दी ॥ शोभती अंकीं दयानिधी ॥ तव नामें चित्तशुध्दी ॥ होते त्रिशुध्दी गुणेशा ॥६॥
तुझिया नामें जगदीशा ॥ विघ्नें पळती दशदिशा ॥ म्हणोनियां गणेशा ॥ तव चरणार्णवीं परेशा लीन झालों ॥७॥
नमो तुज आदयंतहीना ॥ निर्विकारा निरंजना ॥ तेजोमय निधाना ॥ पार्वतीनंदना दयाब्धे ॥८॥
मम मनिंची आशा ॥ पूर्ण करीं बा भवनाशा ॥ वेदवंदया पुराणपुरुषा ॥ गुणेशा गणपति ॥९॥
देवी कमलोद्भवदुहिता ॥ सद्भावें नमितों आतां ॥ चहूं वाचेची देवता ॥ आदिमाता सरस्वती ॥१०॥
चतुर्भुज पुस्तक धारिणी ॥ विदयादात्री मयूरवाहनी ॥ सुरवरादि ऋषि मुनी ॥ सदा चरणीं सादरु ॥११॥
माते तव कृपेंकरुन ॥ पंगु करिति गिरि उल्लंघन ॥ मूक बृहस्पतिसमान ॥ होती जाण निर्धारें ॥१२॥
तव गुणमहिमासागर ॥ भरला असे अपरंपार ॥ सुरवरां नलगे पार ॥ तेथें हा दीन पामर काय वर्णी ॥१३॥
तुकोबादि साधुसंत ॥ ज्ञानियांमाजी ज्ञानवंत ॥ तया चरणारविंदीं अत्यंत ॥ भावयुक्त नमन माझें ॥१४॥
देशीविदेशीय सज्जन ॥ तैसे कवीश्वर विद्वज्जन ॥ मातापिता गुरु-ब्राह्मण ॥ तयांचे पदीं वंदन साष्टांगें ॥१५॥
श्रीकालभैरव जाखमाता ॥ या माझ्या कुलदेवता ॥ तयांचे चरणाब्जीं माथा ॥ ठेऊनि तत्वतां वंदिले ॥१६॥
नमूं आतां आराध्यदैवत ॥ देवाधिदेव कैलासनाथ ॥ सनत्कुमारादि देव समस्त ॥ आनंदभरित नमिती जया ॥१७॥
जय जयाजी मायाचक्रचाळका ॥ शशिधरा मदनदाहका ॥ मखविध्वंसका त्रिपुरांतका ॥ भक्तवरदायका जगद्गुरो ॥१८॥
भूताधिपते विश्वेश्वरा ॥ परात्परा त्रितापहरा ॥ कर्पूरगौरा दिगंबरा ॥ परमोदारा दयानिधे ॥१९॥
गौरीहृदयाब्जभ्रमरा ॥ निगमागमा अगोचरा ॥ पुराणपुरुषा त्रिशूलधरा ॥ भवभयहरा तुज नमो ॥२०॥
तुहिननगप्रियनंदिनी ॥ कात्यायनी मुरहरभगिनी ॥ गजास्य षडास्यजननी ॥ दाक्षायणी जगदंबे ॥२१॥
जगद्वंदये त्रिपुरहरजाये ॥ प्रणवत्सले आदिमाये ॥ करुणालये महासदये ॥ नमितों विनयें तव चरण ॥२२॥
पिनाकपाणी त्रिशूलधरा ॥ पंचवदना उमावरा ॥ पंकजलोचना वरदकरा ॥ मम दीनगिरा परिसीजे ॥२३॥
जे सदाचारसंपन्न ॥ हरीहरचरणीं ज्यांचें मन ॥ सतत करिती नामस्मरण ॥ रात्रंदिन प्रेमानें ॥२४॥
दिसती संसारीं अनुरक्त ॥ परि त्याहुनी अलिप्त ॥ असति जैसें कमलपत्र ॥ असोनि जीवनांत निराळें ॥२५॥
ऐसे जे सात्विक सज्जन ॥ त्यांहीं परोपकारार्थ जाण ॥ भक्तिभावेंकरुन ॥ मजलागून आज्ञापिलें ॥२६॥
श्रीमन्नारायण अनंत ॥ जो का रहित आदयंत ॥ ज्यांचा श्रुतिशास्त्रां नलगे अंत ॥ रमाकांत शेषषाई ॥२७॥
शंखचक्रपीतांबरधर ॥ चतुर्भुज मूर्ती सुंदर ॥ सुहास्यवदन मनोहर ॥ स्तविती सुरवर जयातें ॥२८॥
ज्याचें नांव वेंकटपति ॥ भक्तोध्दारार्थ निश्चितीं ॥ वेंकटाद्रिवरती ॥ केली वसती निजांगें ॥२९॥
ऐसे दीनदयाळु प्रभुवर ॥ कवण्या भक्तवरावर ॥ अनुग्रह करण्या सत्वर ॥ कल्हळिगिरीवर अवतरले ॥३०॥
निज जनार्थ तेथें राहुनी ॥ भक्तरक्षणीं प्रेमें करुनी ॥ दावियली विचित्र करणी ॥ जगद्गुरुंनीं लीलेनें ॥३१॥
तें श्रीचें सुयश पूर्ण ॥ यथामति कथावें संपूर्ण ॥ तेणें संतोषे नारायण ॥ मधुसूदन गोविंद ॥३२॥
हरि तो हर हर तो हरी ॥ एकचि परपुरुष निर्धारीं ॥ जैसें देहद्वय योगि धरी ॥ तैसे हरिहर दिसताति ॥३३॥
श्रीहरिहरांत भेद ॥ अणुमात्र नसे असती अभेद ॥ व्यासशुकादि आणि वेद ॥ ऐसें निर्विवाद बोलती ॥३४॥
तव उपास्यदैवत ॥ श्रीउमावल्लभ कैलासनाथ ॥ तेहि होती आनंदभरित ॥ वेंकटेशचरित वर्णिलिया ॥३५॥
ऐसें आज्ञापिती संतसज्जन ॥ तेणें उल्हासलें माझें मन ॥ न करितां विचार जाण ॥ त्यांचें वचन आदरिलें म्यां ॥३६॥
नाहीं संस्कृतीं ज्ञान ॥ नाहीं वर ग्रंथश्रवणपठण ॥ असा मंदमति मी ज्ञानहीन ॥ प्रभुवर्णन कैसें करावें ॥३७॥
संतां देवोनियां वचन ॥ वेंकटाद्रिपति रमारमण ॥ तयांचें चरित न करिथां कथन ॥ त्या सत्पुरुषां वदना केंवि दाऊं ॥३८॥
घडलें ऐसें अविचारपण ॥ तेणें मज तळमळ लागून ॥ राहिली असे रात्रंदिन ॥ वावरलें मन कांहीं सुचेना ॥३९॥
तव नाम पतितपावन ॥ करिशी सदां भक्तरक्षण ॥ म्हणुनियां धरिले दृढ चरण ॥ करुणाघन शंकरा ॥४०॥
गौरीहृदयाब्जभ्रमरा ॥ पंचवदना परमेश्वरा ॥ दीनोध्दारा करुणासागरा ॥ भवभयहरा त्रिपुरारि ॥४१॥
ऐसें करुनियां स्तवन ॥ हृदीं धरिले शिवांबाचरण ॥ वदनीं करीत नामस्मरण ॥ रात्रौ शयन केले म्यां ॥४२॥
तों एक स्वप्नमाझारीं ॥ आला पुरुष दिव्य-शरीरी ॥ भस्मोध्दूलित जटाधारी ॥ त्रिशूल करीं ज्याचिया ॥४३॥
पायीं पादुका दिव्य कांती ॥ हातीं रुद्राक्षमाला शोभती ॥ सुहास्यवदन सुंदरमूर्ति ॥ वदनीं उच्चारित रामनाम ॥४४॥
तेणें मज जागृत करुन ॥ वदला हें प्रेमवचन ॥ कां गा करिशी कष्टी मन ॥ ऊठ कवन आरंभीं ॥४५॥
वेंकटेश तोचि उमारमण ॥ त्यांत भेद नसे अणुप्रमाण ॥ त्याचेच कृपें करुन ॥ ग्रंथ संपूर्ण होईल ॥४६॥
ऐसें वदोनी त्वरित ॥ तेथेंचि जाहला स्वयें गुप्त ॥ काय वदों तयाची मात ॥ पुनश्च मजप्रत दिसेना ॥४७॥
पुरुष नोहे तोचि हर ॥ निजमनाचें माहेरघर ॥ देवोनियां अभयवर ॥ त्रिपुरहर गुप्त झाला ॥४८॥
यापरि होतां प्रभुदर्शन ॥ श्रीशंकरचरणारविंदीं जाण ॥ घालतांचि लोटांगण ॥ अस्थिर मन स्थिरावलें ॥४९॥
आतां हरिहररुपें सर्वां वंदन ॥ मनोभावें प्रेमें करुन ॥ जे कां अवतरले कल्हळगिरीवर येऊन ॥ दयावया दर्शन निजभक्तां ॥५०॥
जे षड्‍गुणैश्वर्यसंपन्न ॥ वेंकटपति जगज्जीवन ॥ तयाचें करितों चरित्र कथन ॥ नमूनियां चरण प्रेमानें ॥५१॥
जशी काष्ठपुतळी परिकर ॥ नृत्यगायनादि प्रकार ॥ दावितसे अति मनोहर ॥ परि सूत्रधार तो निराळा ॥५२॥
तैसा मी अजाण मूढमती ॥ श्रोत्यां ठाउकी सर्व स्थिती ॥ परि जसें लिहवील गिरिजापती ॥ तसेंच निश्चितीं लिहितसें ॥५३॥
मंगलाचरण आणि स्वात्मनिरुपण ॥ झालें आतां तुम्ही श्रोतेजन ॥ पुढील कथेचें अनुसंधान ॥ देउनियां मन परिसावें ॥५४॥
शंकरा भक्तलेकरांची सोय ॥ पाहसी जेविं जनितमाय ॥ तुझे वंदुनियां चरणद्वय ॥ प्रथमाध्याय अर्पिला ॥५५॥

इति श्रीकल्हळिगिरिवास वेंकटपतिचरित्रकथनं नाम प्रथमोऽध्याय: ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 16, 2021

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP