श्रीकल्हळिवेंकटेश देवचरित्र - अध्याय ५

श्रीकल्हळिवेंकटेश


॥ श्रीगणेशाय नम: ॥
॥ श्रीसांबसदाशिवाय नम: ॥
॥ श्रीदत्तात्रेयाय नम: ॥

॥ जयजयाजी वेंकटनायका ॥ कंजनाभा कंदर्पजनका ॥ कमलावरा कल्मषध्वंसका ॥ करिवरवरदायका करुणानिधे ॥१॥
जयजया वेंकटरमणा ॥ त्रिविक्रमा त्रितापशमना ॥ त्रिगुणातीता त्रिजगत्पालना ॥ त्रिनयनमनरंजना त्रिपाता ॥२॥
जयजयाजी नारायणा ॥ दीनवत्सला दयाघना ॥ जयजया लक्ष्मीरमणा ॥ दानवदमना दयानिधे ॥३॥
पुढील कथेची रचना ॥ लिहविशी करोनी करुणा ॥ तैशीच लिहीन राधारमणा ॥ तव भक्तजना पढावया ॥४॥
श्रीवेंकटेश इंदिरावर ॥ तयांचा प्रत्यूष पूजाप्रकार ॥ सांगतों सविस्तर ॥ भक्तजन सादर परिसावें ॥५॥
उदया येतां देव अरुण ॥ पुजारी याणें त्वरें उठोन ॥ शुचिर्भूत होवोन ॥ काकडार्ति जाण करावी ॥६॥
मग जावोनि गर्भालयांत ॥ श्रीवरील अलंकारादि समस्त ॥ काढोनियां यथास्थित ॥ यावें त्वरित बाहेरी ॥७॥
जावें नंतर ब्राह्मणांनीं ॥ सचैल स्नानें शुची होऊनी ॥ षोडशोपचार संकल्प करोनी ॥ पुरुषसूक्तन्यास करावा ॥८॥
सवें पूजाप्रारंभ जाण ॥ करावा भक्तिभावेंकरोन ॥ आगमार्थंतु मंत्र म्हणोन ॥ घंटापूजन करावें ॥९॥
ओषधय, महिद्यौ: पृथजीवन ॥ आकलशे, इमंमेगंगे, गंधद्वारा जाण ॥ या: फलनीर्या, सहिरत्नानि, या मंत्रेंकरोन ॥ कलशस्थापन करावें ॥१०॥
तत्वायामि उच्चारोन ॥ करावें वरुणावाहन ॥ कलशस्यमुखे म्हणोन ॥ कलशार्चन करीजे ॥११॥
करा तुम्ही शंखदेवतापूजन ॥ शंखादौचंद्रदैवत्यं म्हणोन ॥ कलशजल करीं घेवोन ॥ पूजाद्रव्य आत्मन प्रोक्षावें ॥१२॥
ध्यायेद्वेंकटनायकं श्लोकेंकरोन ॥ श्रीवेंकटेश रमारमण ॥ चरणीं प्रेमेंकरोन ॥ ध्यान समर्पण करावें ॥१३॥
सहस्त्रशीर्षा मंत्र आवाहनीं ॥ पुरुषवेदं म्हणावा आसनीं ॥ एतावानस्य वदोनि ॥ पादयश्रीचरणीं अर्पिजे ॥१४॥
अर्ध्य दयावयाप्रीत्यर्थ ॥ वदा त्रिपादूर्ध्व मंत्र ॥ तस्प्राद्विराळ म्हणत ॥ आचमन देवाप्रत ओपावें ॥१५॥
माकांत पतितपावन ॥ प्रभूसि घालावया स्नान ॥ म्हणिजे मंत्र यत्पुरुषेण ॥ चरणीं मन ठेवोनियां ॥१६॥
कनिक्रदज्जनुषं प्रब्रुवाण ॥ हे म्हणोनि मंत्र तीन ॥ घालावें मांगल्य स्नान ॥ तेणें नारायण संतोषे ॥१७॥
अहंरुद्रेभिर्वर्ग दोन ॥ तसेंच मन्युसूक्ताचे वर्ग जाण ॥ वदोनि सूक्तें अशीं तीन ॥ घाला मलापकर्ष स्नान भक्तीनें ॥१८॥
आप्यायस्वेति क्रमान ॥ क्षीरदधिघृतमधु जाण ॥ तेविं शर्करा कदलीफल घेवोन ॥ पंचामृतस्नान घालिजे ॥१९॥
आपोहिष्ठा मंत्रेंकरोन ॥ घालिजे शुध्दोदकस्नान ॥ मग पंचोपचार करोनि पूजन ॥ महाभिषेकाभ्यादान करावें ॥२०॥
महाभिषेका पुरुषसूक्त ॥ समुद्रज्येष्ठा विष्णुसूक्त ॥ समुद्रसूक्त व घर्मसूक्त ॥ श्रीसूक्तहि म्हणावें ॥२१॥
अधिबलइंद्रियंवा ॥ हीं ब्राह्मणखंडें देवा ॥ म्हणावीं श्रीवासुदेवा ॥ भूदेवांही अभिषेका ॥२२॥
येथवरी करोनि पूजन ॥ नंतर मंडपांत येवोन ॥ पंचसूक्त पवमान ॥ करीत पारायण बसावें ॥२३॥
इतुकिया अवसरीं ॥ पुजार्‍यानें जावोनि अंतरीं ॥ पूजा बांधावी अति कुसरी ॥ वस्त्राभरणें करोनियां ॥२४॥
बाहेर येवोनि मागुती ॥ करावी तेणें धूपार्ति ॥ पुढील करावया अपचिति ॥ द्विजांनीं जावें पुनश्च ॥२५॥
तंयज्ञंबहिंषि मंत्रेकरोन ॥ श्रीस अर्पावें वस्त्रप्रावर्ण ॥ तस्मादयज्ञात्सर्वहुत मंत्रेण ॥ यज्ञोपवीत अर्पण करावें ॥२६॥
तस्मादयज्ञात्सर्वहुत ऋच: उच्चारोन ॥ अर्पावें मैलागिरिचंदन ॥ तस्मादश्वा अजायंत म्हणोन ॥ परिमल पुष्पें जाण समर्पावीं ॥२७॥
यत्पुरुषंव्यदधु मंत्र म्हणावा ॥ तेणें सुगंधी घालावा ॥ ब्राह्मणोस्य मंत्रें देवा ॥ दीप ओंवाळावा प्रेमानें ॥२८॥
चंद्रमामनसोजात ॥ हा म्हणोनियां मंत्र ॥ नैवेदय अर्पिजे घृतयुक्त ॥ तेणें रमानाथ सुखावे ॥२९॥
नैवेदयमध्ये जीवन ॥ उत्तराशोन हस्तप्रक्षालन ॥ मुखप्रक्षालन करोद्वर्तन ॥ श्रीदेवा समर्पण करावें ॥३०॥
तेविं तांबूल फलदक्षिणा ॥ नाभ्याआसी मंत्रें प्रदक्षिणा ॥ सप्तास्या मंत्रें लक्ष्मीरमणा ॥ नमोनम: म्हणावें ॥३२॥
यज्ञेनयज्ञमजयंत ॥ या मंत्रें पुष्पें घ्यावीं हातांत ॥ मग देवे त्रयस्त्रिंशत् ॥ सा सौभगायासहित म्हणावे ॥३१॥
राजाधिराजाय जाण ॥ योवैतांअग्नेयशखि म्हणोन ॥ पुष्पांजली समर्पण ॥ करोनि वंदन करावें ॥३३॥
या अन्य जन्मांतरीचें पातक ॥ नाशें प्रदक्षिणाप्रति पदीं देख ॥ केले सहस्त्रापराध नि:शंक ॥ तें वेंकटनायक क्षमा करी ॥३४॥
छत्रचामर नृत्य गीत ॥ वादयें अंदोलनादि समस्त ॥ राजोपचार दिनानाथ ॥ तव चरणाप्रत समर्पिले ॥३५॥
मापते मी मंत्रहीन ॥ भक्तिक्रियाहीन दीन ॥ यास्तव पूजेंतील न्यून ॥ न मानोन ती पूर्ण करी ॥३६॥
पुरुषसूक्तन्यासपूर्वक ॥ पंचामृत पंचसूक्ताभिषेक ॥ पवमानपारायण देख ॥ ध्यानवाहनादि सर्व हीं ॥३७॥
षोडशोपचारें यथामति ॥ तुज पूजिलें बा वेंकतपति ॥ तें सर्वहि तव चरणाप्रति ॥ समर्पिलेती गोविंदा ॥३८॥
अयंमेहस्तो मंत्र देख ॥ मायावी परमानंद पौराणिक श्लोक ॥ हीं दोनहि म्हणोनि वरदायक ॥ श्रीवैकुंठनायक प्रार्थावा ॥३९॥
नमोब्रह्मण्यदेवाय ॥ नमो गोब्राह्मणहिताय ॥ जगध्दिताय कृष्णाय ॥ गोविंदाय नमो नम: ॥४०॥
गोविंदा करितां सकृत् नमन ॥ आधिक दशाश्वमेधाहून ॥ दशाश्वमेधें पुनर्जनन ॥ प्रणामें तें नये कधीं ॥४१॥
दधिषेदि मंत्रेंकरोनी ॥ घंटाशंखधूपार्त्यादि स्थापोनि ॥ बलित्यातद्वपुषे मंत्र वदोनी ॥ सनकादि पूजा श्रीनिर्माल्यवस्तुनि करावी ॥४२॥
अरित्रंवा तीर्थमंत्रेण ॥ तीर्थाचमन करा व्हा पावन ॥ नीचा वर्तत मंत्र म्हणोन ॥ अंगाराधारण करीजे ॥४३॥
पूजासांगतासिध्दयर्थ देख ॥ करा उत्तरन्यास विधिपूर्वक ॥ वदोनि श्रीवत्समणिकौस्तुभ श्लोक ॥ मोक्षदायक प्रार्थावा ॥४४॥
आतां सायंपूजाविधान ॥ ऐका श्रोते भक्तसज्जन ॥ देवोनिया अंत:करण ॥ जेणें पापौघहरण होतसे ॥४५॥
झालिया दिनाचा अंत ॥ होवोनियां शुचिर्भूत ॥ प्रथम द्विजांनीं शांतिसूक्त ॥ नंतर रात्रिसूक्त म्हणावें ॥४६॥
इतुकिया अवसरीं ॥ शुची होवोनियां सत्वरी ॥ उच्चारित गोविंद गोविंद हरी ॥ धूपार्ति पुजारी करीतसे ॥४७॥
तदुपरी द्विजांनीं जावोन ॥ करावें पंचोपचारपूजन ॥ मंत्रपुष्पादि सकल विधि जाण ॥ प्रात:पूजेसमान करावा ॥४८॥
वराहपुराणोक्त वेंकटेशाष्टक ॥ वायुपुराणांतर्गत वेंकटेशस्तोत्र देख ॥ वेंकटेशसहस्त्रनाम फलश्रुति आणिक ॥ ब्रह्मांडपुराणोक्त तैसीच ॥४९॥
मुद्गलकृत वेंकटेशाष्टक ॥ तीर्थोपंडित विरचित मंगलाष्टक ॥ एवं स्तोत्रपाठ भक्तलोक ॥ म्हणती श्रीनायक तोषावया ॥५०॥
इतुकें झालियावरी ॥ मधिल गाभारीं मंचकावरी ॥ श्रीची दिव्यमूर्ति गोजरी ॥ आणोनि पुजारी ठेवितसे ॥५१॥
परिमलद्रव्यादि भोग साहित्य ॥ तांबुलादि विविध वस्तु समस्त ॥ मंचकावरी ठेविलिया प्रेमयुक्त ॥ भजन भक्तजन आरंभिती ॥५२॥
अनंतर चार वेदसेवा ॥ पुराणसंगीतादि केशवा ॥ निरुपण करोनियां महादेवा ॥ शेजार्ति देवा करावी ॥५३॥
त्रातारोदेवा, कालेवर्षतु म्हणोन ॥ करी राष्ट्रपति प्रजापालन ॥ ऐशी प्रार्थना केल्यावरी जाण ॥ घाली देवा पांघरुण पुजारी ॥५४॥
आतां देवा सुखेंकरोनी ॥ निद्रा करींबा मोक्षदानी ॥ ऐशी प्रार्थना सर्वानीं ॥ करद्वय जोडोनि करावी ॥५५॥
जयजय अनंत ब्रह्मांडनायक ॥ देवदेवोत्तम त्रिजगत्पालक ॥ कर्तुंअकर्तुं समर्थ तूंचि एक ॥ श्रीमद्रमानायक गोविंदा ॥५६॥
यापरी सर्वीं स्तवन करोनी ॥ हृदीं प्रेमभक्तिभाव धरोनि ॥ वेंकटेशचरणचिंतनीं ॥ आपुलाल्या स्वस्थानीं मज जावें ॥५७॥
एणें परी प्रात:सायंपूजाविधान ॥ गेला ब्रहमैया सांगोन ॥ त्याचि क्रमेंकरोन ॥ अदययावत् जाण चालतसे ॥५८॥
श्रीचें आगमन झाल्यापासोन ॥ नागणैयानें पुजारित्व केलें जाण ॥ वया चवर्‍याणउ वर्षें होतां पूर्ण ॥ तयाचें निर्याण पैं जाहलें ॥५९॥
तैं तयाचा पुत्र एक ॥ होता वेंकटशिदैयाख्य ॥ तें पांच वर्षाचें बालक ॥ लीला अलोलिक देवाची ॥६०॥
ब्रह्मैयाचे आज्ञेवरोन ॥ त्रिमलाचारि याणें जाण ॥ पुजारिपणा द्वादश हायन ॥ केला मुलगा अज्ञान तोंवरी ॥६१॥
ब्रह्मवृंद वदती आचार्यासी ॥ तंव संपर्क सदा शूद्रांसी ॥ तेंवि श्रीपूजा मोडतोसी ॥ ऐसा तूं पापराशी पापात्मा ॥६२॥
प्रायश्चित्तें होइजे पावन ॥ तोंवरी अपंक्त अससी जाण ॥ ऐसें वच ऐकोनि दीनवदन ॥ ब्रह्मैयातें निवेदन करीतसे ॥६३॥
नको यास दुजें प्रायश्चित्त ॥ करोनि स्नान कोनेरितीर्थांत ॥ पठण करी पवमान पंच सूक्त ॥ तेणें होशी पवित्र निर्धारें ॥६४॥
ऐकोन स्वामीचें हें भाषण ॥ त्यापरी करितां स्नानपठन ॥ तेणें आचार्याचें मन ॥ तत्काळ पावन जहालें ॥६५॥
ज्या देवा शूद्रस्पर्शन ॥ त्यातें करावें कैसें वंदन ॥ ऐसें कैकांचें शंकेल मन ॥ हें चित्तीं आणोन ब्रह्मैया ॥६६॥
करविती तेथें शालिग्रामस्थापन ॥ त्यासह करितां मूर्तिपूजन ॥ करण्या तीर्थप्राशन वंदन ॥ कोणाचें मन शंकेना ॥६७॥
पूजाविच्छेद करावयास ॥ प्रभूनें निर्मिलें खिन्न ॥ करोनियां म्लान वदन ॥ ब्रह्मैयानीं तें जाणोन ॥ प्रसन्न होवोन बोलती ॥६९॥
श्रीवेंकटेशाचें पुजारित्व ॥ तव पित्यानें केलें भक्तियुक्त ॥ तें म्यां दिधलें तुजप्रत ॥ वंशपरंपरागत जाणपां ॥७०॥
येथेंच राहिजे पूजा करीत ॥ वेंकटेश ठेवील तुज आनंदांत ॥ अवभृतस्नान करीं पुष्करणींत ॥ तेणें दोष समस्त हरतील ॥७१॥
ऐसा आशीर्वाद देवोन ॥ करविलें पुष्करणींत स्नान ॥ त्रिमलाचार्याकडोन ॥ नाममंत्रोपदेश जाण करविला ॥७२॥
सांगितलें गोपिचंदनमुद्राधारण ॥ ब्रह्मैयानीं कृपा करोन ॥ वेंकटशिदैयास जाण ॥ पूजाधिकारी करोन ठेविलें ॥७३॥
आतां अंतिम नवरात्रोत्सवप्रकार ॥ ब्रह्मैयानीं करविला साचार ॥ जो चालला असे आजवर ॥ तोचि सविस्तर परिसावा ॥७४॥
आदौ सपत्नीक यजमानानीं ॥ सवें ब्रह्मवृंदादि घेवोनि ॥ करीत नाना वाद्यध्वनी ॥ जावें श्रीचरणीं नमावया ॥७५॥
श्रीपुढें नारळप्रदक्षिणा जाण ॥ तांबूल पूर्णघट ठेवोन ॥ नमोमहभ्दयो आदि मंत्रेंकरोन ॥ साष्टांग नमन करावें ॥७६॥
म्हणावें हे जगन्निवास ॥ लक्ष्मीकांत हृषीकेश ॥ कराया तव रथोत्सवास ॥ दयावा निदेश स्वामिया ॥७७॥
रथोत्साहांगभूत ॥ करावा मृदाहरण संकल्प सत्य ॥ श्रीस स्थापोनि शिबिकेंत ॥ वादयघोष करीत मग जावें ॥७८॥
जावें पांडवतीर्थावरी ॥ शुध्दासनीं स्थापा मूर्ति गोजरी ॥ स्योनापृथिव्यादि मंत्रें करी ॥ प्रार्थना सत्वरी वसुधेची ॥७९॥
शन्नइंद्राग्नि म्हणोन ॥ धरेचें करा प्रोक्षण पूजन ॥ सहस्त्रोल्काय मंत्रेण ॥ तिचें खनन करावें ॥८०॥
वेणुपात्रीं मृत्तिका भरावी ॥ सुवस्त्रें आच्छादित करावी ॥ तंतुंन्वंनिति ऋचा वदावी ॥ मागुती वेष्टावी श्वेतसूत्रें ॥८१॥
भूसूक्तादि पठण करीत ॥ निघावें श्रीमूर्तिसहित ॥ पूर्ववत वाजत गाजत ॥ देवालयांत प्रवेशावें ॥८२॥
राष्ट्राधिपतीची दयानिधी ॥ व्हावी आयुरारोग्याभिवृध्दी ॥ तेविं धनधान्यसमृध्दी ॥ ज्ञानसुबुध्दी तसीच ॥८३॥
व्हावा राष्ट्रीं सुपर्जन्य ॥ आनंदें राहोत प्रजानन ॥ रोगदुष्काळ देशांतून ॥ जावेत पळोन गोविंदा ॥८४॥
इत्यादयनेक व्हावया प्राप्त ॥ मृदाहरणादि अवभृतांत ॥ उक्त कर्में करितों त्वदर्थ ॥ ऐसा विध्युक्त संकल्प  करावा ॥८५॥
मग स्वस्तिपुण्याहवाचन ॥ तसेंच मातृकापूजन ॥ नांदिश्राध्दादिकरोन ॥ ऋत्विक् वर्णन करावें ॥८६॥
अमुक गोत्रनाम यजमान ॥ अमुक गोत्रनाम ब्राह्मण ॥ ऐसें नामगोत्र उच्चारोन ॥ आचार्यत्व जाण ओपावें ॥८७॥
ब्रह्मा सादस्य गाणपत्य ॥ तो उपद्रष्टा बलीआचार्यप्रत ॥ अर्पोनियां आधिपत्य ॥ मग द्वारजापक समस्त वर्णावें ॥८८॥
तैसें वेंकटेशमहात्म्य जाण ॥ ऋग्वेद यजुर्वेद पारायण ॥ यांसी नेमोनियां ब्राह्मण ॥ अधिकारसंपन्न करावे ॥८९॥
ब्राह्मण पूर्वद्वारीं ऋग्वेदी ॥ दक्षिणद्वारीं यजुर्वेदी ॥ पश्चिमद्वारीं सामवेदी ॥ उत्तरे अथर्वणवेदी असावे ॥९०॥
मधुपर्कालागीं जाण ॥ विष्टर कांस्यपात्र मधु वस्त्राभरण ॥ धूपदीपनैवेदयादिकरोन ॥ ऋत्विज पूजोन प्रार्थावे ॥९१॥
नंतर करिजे रक्षाबंधन ॥ कार्पाससूत्र पंचगुणित करोन ॥ सोदकुंभावरी ठेवोन ॥ गायत्र्यादिमंत्रेण मंत्रावें ॥९२॥
सूत्रा हरिद्रागंधलेपन ॥ करा जातवेदसे मंत्र वदोन ॥ विश्वेत्ता इति मंत्र ह्मणोन ॥ श्रीदक्षिणकरीं कंकण बांधावें ॥९३॥
ऋत्विजादि ब्राह्मण ॥ तेविं उत्सवयजमान ॥ यांसहि बांधिजे कंकण ॥ शतंजीवेति मंत्रेण जाणपां ॥९४॥
यजमान पत्नीसहित ॥ पूर्णकलश फलदधिदूर्वायुक्त ॥ आचार्या दिसुवासनींसह त्वरित ॥ भेरिध्वजताडणरोहणार्थ मग निघावें ॥९५॥
श्रीवेंकटेशातें प्रार्थोनी ॥ शिबिकीं गरुडपट श्रीप्रतिमा स्थापोनी ॥ करित नानाविध वादयध्वनी ॥ ध्वजस्तंभासन्निधानीं पोंचावें ॥९६॥
चतुर्हस्त वेदिका सोज्वळ ॥ तेथें घालोनि तांदूळ ॥ त्यावरी अष्टदळ ॥ पद्म निर्मळ काढावें ॥९७॥
भेरीस नववस्त्र वेष्टोन ॥ तयावरी ठेवावी जाण ॥ कृध्दोल्काय मंत्रें प्रोक्षण ॥ करा मग देवताआवाहन त्यावरी ॥९८॥
तया देवतेचें जाण ॥ धूपदीपनैवेदयादिकें करोन ॥ यथासांग करोनि पूजन ॥ करा साष्टांग नमन प्रेमानें ॥९९॥
प्राड्मुख उभें राहोन ॥ प्रथम मंत्र ब्रह्मजज्ञान ॥ इदंविष्णुत्र्यंबकंयजामहे वदोन ॥ त्रिवार पृथक् भेरिताडण करा तुम्ही ॥१००॥
ध्वजारोहणस्थान ॥ क्रदलिस्त्म्भादि लावोन ॥ तोरण पताका उभवोन ॥ करा सुशोभित जाण निर्धारें ॥१०१॥
हरिद्राचूर्णं करोन ॥ ध्वज करीजे लेपन ॥ मग गरुडध्वजारोहण ॥ संकल्प जाण करावा ॥१०२॥
गरुडस्तंभमूलाशीं ॥ करावी तांदुळाची राशी ॥ त्यावरी अष्टदल पद्माशीं ॥ कुंकुमेशीं काढावें ॥१०३॥
तदुपरि वादयघोषपूर्वक ॥ गरुडपट स्थापोनि सुरेख ॥ कुसुमाक्षता घेवोनि देख ॥ देवतादिक आवाहनावें ॥१०४॥
क्षिपॐस्वाहा इति गरुडमंत्रान ॥ षोडशोपचारें पूजोन ॥ त्याच मंत्रें जपप्रार्थनाध्यान ॥ करावें जाण निश्चयेंसी ॥१०५॥
तत्पट मूलाग्राशीं ॥ तेविं तयाचे मध्य प्रदेशीं ॥ सूत्रें बांधोनियां खाशीं ॥ गंधपुष्पादिकेंशीं पूजावें ॥१०६॥
आचार्य ऋत्विजासहित ॥ स्वस्तिमंत्र पठण करीत ॥ सर्व वादयें वाजवीत ॥ गरुडपंचाक्षरी मंत्रान ॥ करा होमहवन भक्तीनें ॥१०८॥
प्रभो पक्षिराज वंदोन ॥ त्याच पंचाक्षरी मंत्रेण ॥ इमं माषभक्त बलिदान ॥ करावें ग्रहण म्हणावें ॥१०९॥
पूर्ववत् समारंभें निघोन ॥ शाकुंतसूत्र करीत पठण ॥ देवतामंडप सव्य घालोने ॥ पश्चिमद्वारीं येवोन रहावें ॥११०॥
मग करावी भूमिप्रार्थना ॥ फलपुष्पादिकीं जाणा ॥ देवोनियां अर्घ्यप्रदाना मंडपप्रवेशना करावें ॥१११॥
नैऋत्ये हस्तमात्र वास्तुपीठ ॥ करा त्याचे चहूं कोपर्‍यांस थेट ॥ विशंतुभूतमंत्राच्चारोनि स्पष्ट ॥ शंकुरोपण नीट करावें ॥११२॥
नैऋत्य वायव्य अग्नयेशान ॥ चारी शंकूंचें करोनि पूजन ॥ तत्पार्श्वभागीं जाण ॥ माषभक्तबल्यर्पण करावा ॥११३॥
वास्तुपीठावरी देखा ॥ सुवर्णशलाकादिकें नवरेखा ॥ पूर्व पश्चिम दक्षिणोत्तर सारख्या ॥ काढाव्या सुरेखा निर्धारें ॥११४॥
मध्यपद चतुष्टये ब्राह्मण ॥ पूर्व पदद्वये आर्यमण ॥ दक्षिणपदद्वये विवस्वान ॥ मित्रामन पश्चिमद्वय पदे ॥११५॥
उत्तरद्वयपदे पृथ्वीधर जाण ॥ एतत्प्रकारें करोन ॥ वास्तुपट प्रतिपदीं अन्य ॥ देवताआवाहन करावें ॥११६॥
महिदयौरिति मंत्रेण ॥ करावें कलशस्थापन ॥ तत्पूजा देवतापूजन ॥ करोनियां नमन प्रार्थावें ॥११७॥
करा पीठाग्रे चतुरस्त्र मंडल एकहस्त ॥ वरी पायसादि बली ठेवा निश्चित ॥ ब्राह्मणा पायसबली देवानि समस्त ॥ अन्यदेवताहि तृप्त करीजे ॥११८॥
आतां मंडापपूजाविधानक ॥ सांगतसें तुम्हां तांत्रिक ॥ विस्तारइच्छा झालिया देख ॥ नवरात्रौत्सवपुस्तक पहावें ॥११९॥
कुंडमंडपा द्वारें चार ॥ पूर्व दक्षिण पश्चिमोत्तर ॥ तयावरी तोरणें परिकर ॥ नानावर्णी सुंदर उभवावीं ॥१२०॥
याच अनुक्रमेंकरोन ॥ प्रत्यहीं एकेक कलश स्थापोन ॥ तत्तन्मंत्र उच्चारोन ॥ तोरणदेवतापूजन करावें ॥१२१॥
आदौ प्रतिद्वारीं कलश दोन ॥ पुनरावृत्तिहि दोन जाण ॥ ऐसें उक्त मंत्रें स्थापोन ॥ यथाविधि तत्तद्देवतापूजन करावें ॥१२२॥
इंद्रादि लोकपालार्थ ॥ प्रत्येकीं एकेक कलश यथार्थ ॥ स्थापोनियां मंत्रोक्त ॥ करा विधियुक्त पूजन देवतांचें ॥१२३॥
कलशावाहित देवतांकारण ॥ तयांचीं नामें उच्चारोन ॥ माषभक्तबलिदान ॥ करावें समर्पण पूजांतीं ॥१२४॥
आतां अंकुरार्पणार्थ ॥ म्हणा देशकालौसंकीर्त्य ॥ श्रीवेंकटेशप्रीत्यर्थ ॥ संकल्प यथार्थ करावा ॥१२५॥
अंकुरमंडप शुचि करोन ॥ श्वेत चूर्णं पद्म अष्टदल काढोन ॥ त्यावरी शराव ठेवोन ॥ देवतावाहन अष्ट दिशें करावें ॥१२६॥
हिरण्यवर्णा: शुचया मंत्रेण ॥ तेविं अस्त्रमंत्रें करोनि जाण ॥ शरावां करिजे मार्जन ॥ प्रार्थोनि पूजन करावें ॥१२७॥
तया पात्रांची समस्तां ॥ गोमयचूर्ण आणि सिकता ॥ तेविं मृदाहरणमृत्तिकासहिता ॥ पात्रपूर्णता करावी ॥१२८॥
नवीन सूत्र घेवोन ॥ पात्रांसभोंवतें जाण ॥ तंतुंतंन्वन मंत्र म्हणोन ॥ तयांसी वेष्टन करीजे ॥१२९॥
तत्पात्रीं घालावें जीवन ॥ झालिया तयाचें मिश्रण ॥ ब्रह्मजज्ञादि मंत्रें करोन ॥ करा बीजारोपण निर्धारें ॥१३०॥
यव सर्षपादि पेरिल्यावरी ॥ करा देवतावाहन तयावरी ॥ बीजदेवता त्या अवसरीं ॥ षोडशोपचारी पूजाव्या ॥१३१॥
ब्रह्मादि स्थापित देवतांकारण ॥ पायसआज्यद्रव्यें करोन ॥ सोमोधेनुमिति मंत्रेण ॥ अंकुरार्पण हवन करावें ॥१३२॥
ब्रह्मा विष्णु त्रिनयन ॥ इंद्र चंद्र यम वरुण ॥ अष्टदिक्पाल गजानन ॥ रुद्रगण मरुद्गण सर्वही ॥१३४॥
यमुना गोदा सरस्वती ॥ नर्मदा सिंधु भागीरथी ॥ वेदमाता सरस्वती ॥ याही निश्चितीं जाण पां ॥१३५॥
इत्यादिदेवतांसि जाण ॥ भावेंकरोनियां नमन ॥ प्राड्मुख उभें राहोन ॥ हस्त जोडोन प्रार्थावें ॥१३६॥
म्हणावें सपुत्र पार्श्वगणासहित ॥ यावें श्रीवेंकटेशउत्सवार्थ ॥ नासोनियां विघ्नें समस्त ॥ सुमंगल निश्चित करावें ॥१३७॥
मग होमकुंडावरी जावोन ॥ करा मेखलयोनिदेवता स्थापन ॥ उपरि मेखलावरी जाण ॥ विष्णुआवाहन करावें ॥१३८॥
मध्य मेखला वरती ॥ ब्रह्मा स्थापावा निश्चितीं ॥ अधर मेखलाप्रती ॥ लक्ष्मीमूर्ती स्थापावी ॥१३९॥
तत्तद्देवताआवाहन ॥ उक्तमंत्रें करोनि जाण ॥ तेविं तयांचें पूजन-अर्चन ॥ प्रार्थना वंदनही करावें ॥१४०॥
अग्निबीज मग त्रिवार उच्चारोन ॥ विष्णुवीर्यात्मक बलिवर्धन ॥ नामाग्नि प्रतिष्ठापोन ॥ निघावें मुख्य देवतास्थापन करावया ॥१४१॥
महैदयौपृथ्वीचन ॥ या मंत्रें भूमी प्रार्थोन ॥ तदुपरि तंडुलपुंज घालोन ॥ अष्टदल पद्म काढावें ॥१४२॥
त्यावरी विचित्र यंत्र ठेवोन ॥ लक्ष्मीनारायणआवाहन ॥ करावें मूळ मंत्र उच्चारोन ॥ प्रेमेंकरोन जाणपां ॥१४३॥
पीठाष्टदिशांचे खालींवर ॥ तदंगदेवता स्थापाव्या सत्वर ॥ तदस्तुमित्रावरुणा करीत उच्चार ॥ प्रतिमा तदुपरि स्थापावी ॥१४४॥
सहस्त्रशीर्षामंत्रेण ॥ प्रतिमेवरी आवाहन ॥ लक्ष्मीवेंकटेशाचें करोन ॥ षोडशोपचारें पूजन करावें ॥१४५॥
नंतर सातही आवर्णीं जाण ॥ तत्तद्देवता आवाहन ॥ उक्त मंत्र उच्चारोन ॥ करावें जाण निर्धारें ॥१४६॥
अर्घ्य पादय आचमन ॥ आसन मधुपर्कस्नपन ॥ गंधपुष्पविभूषण वसन ॥ इहीं पृथक् तयांचें पूजन करावें ॥१४७॥
वदोनि पुरुषसूक्त ॥ पीठावर्णदेवतांसहित ॥ पूजोनि लक्ष्मीकांत ॥ जोडोनी हस्त प्रार्थावें ॥१४८॥
मुख्यपीठ ईशान्येस जाण ॥ करावें पीठ एक हस्तप्रमाण ॥ नव ग्रहांचें ज्या त्या मंत्रेण ॥ तयावरी आवाहन करावें ॥१४९॥
तदस्तुमित्रामंत्र म्हणोन ॥ करावा तेथें कलश स्थापन ॥ सूर्यादयावाहित देवतांसह जाण ॥ करावें पूजन षोडशोपचारें ॥१५०॥
अग्नयोर्मध्ये जाण ॥ करा चतुरस्त्र पीठ हस्तप्रमाण ॥ सुदर्शनायविद्महे मंत्रेण ॥ स्थापोनि सुदर्शन पूजावें ॥१५१॥
पुनश्च अग्निसन्मुख जावोन ॥ चत्वारिशृंगादि मंत्र वदोन ॥ अग्निदेवता प्रार्थोन ॥ सवें ध्यानहीं करावें ॥१५२॥
प्रणवसंस्कृतआज्येन ॥ गर्भादानादि षोडशसंस्कारार्थ जाण ॥ करावें व्याहृति होमहवन ॥ प्रथम जाण निर्धारें ॥१५३॥
अनंतर होम अन्वाधान ॥ तसाच नवग्रहांचा करोन ॥ द्वारऋत्विजांनीं जाण ॥ आपापल्या स्थानापन्न मग व्हावें ॥१५४॥
पूर्वद्वारीं श्रीसूक्तादिपठण ॥ दक्षिणद्वारीं रुद्रसूक्तादि जाण ॥ पश्चिमद्वारीं रुद्रसामादिसूक्त रक्षोहण ॥ अथर्वशीर्षादिपठण ॥ उत्तरद्वारीं करावें ॥१५५॥
मग पुरुषसूक्तें करोन ॥ करावा होम सुदर्शन ॥ अवर्ण ध्वजदेवतांकारण ॥ यामागोन होम करावे ॥१५६॥
होम अंकुरारोपण ॥ करोनि करावा स्विष्टकृत जाण ॥ ध्वजारोहण अंकुरारोपण प्रथम दिन ॥ प्रतिदिन ते न करावे ॥१५७॥
या सर्व होमांचे मंत्र ॥ तशींच हवनद्रव्यें स्वतंत्र ॥ सांगितलीं असतीं तद्वत ॥ होमहवनकृत्य तुम्ही करा ॥१५८॥
मग बली आचार्यें उष्णीष घालोन ॥ घालावें नेत्रीं नेत्रांजन ॥ गंधमालाधारण करोन ॥ हातीं कूर्च धरोन सजावें ॥१५९॥
तैसेंच शिष्यां सजवावें ॥ ताम्रपात्रीं बलिद्रव्य ठेवावें ॥ पात्रांतरीं गंधपुष्प भरावें ॥ यापरी सिध्दा व्हावें बलिदाना ॥१६०॥
भो चक्रराजदेवता सुदर्शन ॥ अपरमित तेज गहन ॥ बलिदानार्थ महाराज आपण ॥ यावें कृपा करोन स्वामिया ॥१६१॥
ऐशी करोनियां प्रार्थना ॥ शिबिकीं करावी स्थापना ॥ वादयें वाजवीत नाना ॥ बलिदाना निघावें ॥१६२॥
देवालयमंडपापुढती ॥ तेविं पश्चात् भागावरती ॥ अष्टौदिक्पाल नवग्रहांप्रति ॥ कुक्कुटांड परिमिति बली दयावा ॥१६३॥
याशिवाय अन्य स्थान ॥ जीं केलीं असती कथन ॥ तेथेंही तत्तन्मंत्रेंकरोन ॥ करावा बली अर्पण विध्युक्त ॥१६४॥
यापरी नित्य कृत्य ॥ करावें रथोत्सवापर्यंत ॥ आतां रथोत्सवही तथ्य ॥ सांगतों निश्चित परिसावें ॥१६५॥
आचार्यादिकीं रथसन्निध जावोन ॥ प्रथम पंचगव्ये रथ करावा सिंचन ॥ रक्षोघ्नसूत्रेंकरोन ॥ दर्भरज्जुवेष्टन करावा ॥१६६॥
रथ प्रत्येकावयावरी ॥ तसेंच सबाह्य अभ्यंतरीं ॥ तत्तन्मंत्रें निर्धारीं ॥ देवता सत्वरी स्थापाव्या ॥१६७॥
मग षोडोशोपचारें पूजन ॥ यानिकानिच मंत्रें प्रदक्षिणा तीन ॥ करा उरसाशिरसा वदोन ॥ रथदेवतादिकां नमोन प्रार्थावें ॥१६८॥
इतुकें झालियावरती ॥ जावें अग्निकुंडाप्रति मागुती ॥ नित्य होम होतां समाप्ती ॥ इतुकें झालियावरती ॥ जावें अग्निकुंडाप्रति मागुती ॥ नित्य होम होतां समाप्ती ॥ रथहोम निश्चिती करावा ॥१६९॥
ज्या त्या मंत्रेंकरोन ॥ आहुति दिलिया संपूर्ण ॥ रथदेवतादिपूजन ॥ यथासांग जाण करावें ॥१७०॥
नित्य बली झालियावर ॥ रथचक्राचे पुर:सर ॥ तेविं रथ जाणेच्या वाटेवर ॥ चक्राकार बली अर्पावा ॥१७१॥
जयजयाजी श्रीनिवासमूर्ति ॥ देवादिदेव जगत्पति ॥ अस्मिन् रथोत्सवे लक्ष्मीपती ॥ रथावरुती आरुढावें ॥१७२॥
ऐशियापरी प्रार्थोन ॥ करा रथीं देवतास्थापन ॥ प्रासादा करावया प्रदक्षिण ॥ वेदवादयघोषेंकरोन निघावें ॥१७३॥
रथ जातांना वाटेंत ॥ जावें गायन नृत्य करीत ॥ तेवीं फलें लाजादि समस्त ॥ सुमनें आनंदभरित उधळावीं ॥१७४॥
रथ आलिया परतोन ॥ श्रीस रथाखालीं घेवोन ॥ वाजत गाजत जाण ॥ पूर्वस्थानीं स्थापन करावें ॥१७५॥
मग नाना उपचारेंकरोन ॥ परिमळद्रव्यादिकें जाण ॥ श्रीनिवासमूर्ती पूजोन ॥ करा ब्राह्मणसंतर्पण यथाशक्त्या ॥१७६॥
आतां अवभृतस्नान ॥ सांगतों तयाचें विधान ॥ ऐकावें चित्त देवोन ॥ श्रोतेजनहो सादरें ॥१७७॥
प्रात: आचार्यांनीं उठोनि ॥ नित्य कृत्यें सारीं सारोनी ॥ श्रीपुढें जावोनि विनवणी ॥ हस्त जोडोनी करावी ॥१७८॥
उत्तिष्ठ उत्तिष्ठ श्रीनिवास ॥ लक्ष्मीकान्त जगदीश ॥ अवभृतयात्रा करावयास ॥ आज्ञा हृषीकेश मज दयावी ॥१७९॥
यापरी देवा प्रार्थोन ॥ प्राड्नित्य होम सारोन ॥ नंतर अवभूतहोम जाण ॥ उक्त मंत्रेंकरोन करावा ॥१८०॥
मग करा स्विष्टकृत होम ॥ तैसाच व्याहृतीहोम जाण ॥ सवें प्रायश्चित्तार्थ होमहवन ॥ सकलारिष्टशमन व्हावया ॥१८१॥
नंतर इंद्रयमहुताशन ॥ निऋत्यवायुवरुण ॥ तेवीं सोम आणि ईशान ॥ नवग्रह देवगण तैसेचि ॥१८२॥
ब्रह्मा विष्णु त्रिनयन ॥ तेवीं उत्सवांगभूत देवता जाण ॥ यांतें माषभक्त बली अर्पण ॥ तत्तन्मंत्रें करोन करावा ॥१८३॥
नंतर वेणुपात्र घ्यावें ॥ माषयुक्तान्नें भरावें ॥ त्रिकोण मंडल करोन बरवें ॥ त्यावरी ठेवावें दीपयुक्त ॥१८४॥
क्षेत्रपालातें प्रार्थोन ॥ अष्टभिश्चकरैर्भीम मंत्रेण ॥ तयावरी आवाहन ॥ करोनि पूजन करावें ॥१८५॥
भो क्षेत्रपाल परिवारयुक्त ॥ दीपतांबूलदक्षिणासहित ॥ य इमं बलिं माषयुक्त ॥ अर्पितसें तुजप्रत ग्रहण कीजे ॥१८६॥
यापरी प्रार्थना करोन ॥ अघोरेभ्यो मंत्र म्हणोन ॥ शूद्रहस्तें तो बली जाण ॥ चारवाटे नेवोन ठेववावा ॥१८७॥
तया बलीचे मागोन ॥ शांतिसूक्तें करावें जलसिंचन ॥ हस्तपाद प्रक्षालोन ॥ नंतर आचमन करावें ॥१८८॥
पूर्णाहुति वसोरधारा जाण ॥ तत्तन्मंत्रें करोनियां पूर्ण ॥ अवभृतस्थानीय पात्रपूर्ण ॥ तत्तज्जळेंसी मार्जन करावें ॥१८९॥
मानस्तोके इति मंत्रान ॥ करावें विभूतिधारण ॥ नैवेदयतांबूलादिकीं जाण ॥ अग्न्यर्चन करावें ॥१९०॥
नंतर देव स्थापोनी शिबिकेंत ॥ संगें ऋत्विजादि ब्राह्मण समस्त ॥ घेवोन अंकुरार्पण पात्रासहित ॥ वादयघोषें अवभृतार्थ निघावें ॥१९१॥
चक्रदेवता पुढें करोन ॥ करीत मंगलाष्टकें पठण ॥ देवालया सव्य घालोन ॥ पुढती गमन करावें ॥१९२॥
मार्गीं हरिद्राकुंकुममिश्रित ॥ एकमेकांवरी रंग उडवीत ॥ नानापरी कवतुक करित ॥ आनंदभरित चालावें ॥१९३॥
पुष्करणीवरते जावोन ॥ करा वेदीवरी देवस्थापन ॥ मग चक्रदेवतासह जाण ॥ तीर्थीं प्रवेशन करावें ॥१९४॥
हिरण्यशृंगंवरुणं म्हणोन ॥ वरुणपार्थना करोन ॥ सार्धकोटित्रय तीर्थावाहन ॥ तया तीर्थावरी जाण करावें ॥१९५॥
जलस्थित देवतांकारण ॥ अर्घ्य, पादय, आचमन, आसन ॥ मधुपर्क, स्नपन, वसन ॥ गंधपुष्पें करोन अर्चावें ॥१९६॥
पौरुषं, विष्णुसूक्त जाण ॥ घर्म, समुद्रसूक्त, सूक्त पवमान ॥ नारायणवर्मादि अष्टमंत्रेंकरोन ॥ चक्रदेवता अभिषिंचन करावें ॥१९७॥
मग आचार्यादि ब्राह्मण ॥ तसे मिळालेले सर्वजन ॥ यांहीं करावें अवभृतस्नान ॥ सर्व पापक्षालन व्हावया ॥१९८॥
नंतर देवा वस्त्रें समर्पावीं ॥ पुनश्च पूजा करावी ॥ गमनार्थ विनंति करावी ॥ हस्त जोडोनि बरवी देवाची ॥१९९॥
श्रीशा शिबिकेंत बसवोनि ॥ पुनश्च वादयघोषें येवोनि ॥ देवालया सव्य घालोनि देख ॥ नमन करावें भक्तिपूर्वक ॥ श्रीचरणीं मस्तक ठेवोनियां ॥२०१॥
वंदोनि लक्ष्मीनारायण ॥ कालेवर्षतु म्हणोन ॥ यथाशक्त्या भूदेवभोजन ॥ भक्तिभावेंकरोन करावें ॥२०२॥
मंडप ईशान्य दिशेशीं ॥ बसवोनि प्राड्मुखेंशीं ॥ शंनइंद्राग्नि इत्यादि सूत्रेंशीं ॥ ऋत्विजाचार्यें यजमानाशीं अभिषेकावें ॥२०३॥
मग आचार्यांनीं येवोन ॥ करोनि व्याहृतिउच्चारण ॥ वास्तुग्रह पीठावर्ण सुदर्शन ॥ देवतांचें उद्वासन करावें ॥२०४॥
तेच दिनीं सायंकाळीं जाण ॥ करावें ध्वजाचें अवरोहण ॥ अग्निविसर्जन करोन ॥ कर्म समापन करावें ॥२०५॥
हे महाराज यजमान ॥ तवाज्ञें जपजाप्य होमहवन ॥ केलें तेणें जें श्रेय उत्पन्न ॥ झालें तें तवार्पण करीतसों ॥२०६॥
ऋत्विजें ऐसें वदोन ॥ होवोनि सुप्रसन्न वदन ॥ हातीं घेवोनियां जीवन ॥ तें यजमानहस्तीं जाण सोडावें ॥२०७॥
उत्सवसांगतासिध्दयर्थ ॥ यजमानानें हर्षयुक्त ॥ ऋत्विज पूजोनि यथास्थित ॥ दक्षिणा त्वरित समर्पावी ॥२०८॥
सभ्य कर्मनिष्ठ ब्राह्मण ॥ तैसे जे कां असती विद्वान ॥ तयांही शक्तिप्रमाण ॥ द्रव्यादि अर्पण करावें ॥२०९॥
श्रीपुढें नृत्य गायन करणार ॥ तैसे वादयादि वाजविणार ॥ तेविं अन्य चाकरनोकर ॥ यां किंचित् देवोनि तोषवावें ॥२१०॥
फलमंत्राक्षता देवोनि बोळवावें ॥२११॥
आतां नव वाहनप्रकार ॥ सांगेन तुम्हां सविस्तर ॥ ऐकावें श्रोते चतुर ॥ मन स्थीर करोनियां ॥२१२॥
पुष्पमंडप प्रथम दिन ॥ द्वितीये शेषवाहन ॥ त्रितीये कामधेनु जाण ॥ मुख्य प्राण चतुर्थीं ॥२१३॥
गरुढारुढ पंचमी दिन ॥ सिंहवाहन षष्ठि जाण ॥ सप्तमी मयूरवाहन ॥ गजवाहन अष्टमी ॥२१४॥
अश्वारुढ नवमी दिवशीं ॥ यापरि प्रतिदिनीं निशीं ॥ निघावें वादयगजरेंसी ॥ प्रदक्षिणा प्रासादासी घालावी ॥२१५॥
वाहनावरोन उतरोन ॥ मूर्ति स्वस्थानीं स्थापोन ॥ चारवेदादि सेवा जाण ॥ श्रीचरणार्पण कराव्या ॥२१६॥
नित्योत्सवासमान ॥ तत्तद्दिनिं शयनोत्सव जाण ॥ भक्तिभावेंकरोन ॥ ईशचरणचिंतन करावे ॥२१७॥
चित्रानक्षत्रावरी ध्वजारोहण ॥ उत्तराषाढीं रथप्रयाण ॥ व्हावें हीं नक्षत्रें दोन ॥ ध्यानीं पूर्ण ठेवावीं ॥२१८॥
द्वादशीचे दिवशीं निशीं ॥ ललित करावें भक्तीशीं ॥ कषाय करोनियां प्रेमेशीं ॥ श्रीवेंकटेशासीं समर्पा ॥२१९॥
यापरी उत्सव देख ॥ करावा यथाविधि मन:पूर्वक ॥ तेणें श्रीवैकुंठनायक ॥ जाणा नि:शंक संतोषे ॥२२०॥
तेणें येतील चारी मुक्ती ॥ सहज सुभक्तां हातीं ॥ ऐसें ज्ञानवंत बोलती ॥ तें निश्चितीं जाणावें ॥२२१॥
यापरी नवरात्रोत्सव पूर्ण ॥ करविला ब्रह्मैयानीं जाण ॥ करावया अवभृतस्नान ॥ श्रीसंगें आपणही पातले ॥२२२॥
द्वय भक्तांचे हस्त धरोनि ॥ पुष्करणीतीर्थीं शिरोनि ॥ प्रथम अघमर्षण करोनि ॥ बुडी त्यांसह मारली ॥२२३॥
तेथें श्रीचा विशाल मंडप ॥ तेविं श्रीचें दिव्यरुप ॥ दावोनि म्हणती हा अमोप ॥ तीर्थप्रताप पहाहो ॥२२४॥
जें काय तुमचें मनेप्सित ॥ तें मागा प्रभूसी त्वरित ॥ पूर्ण करील मनोरथ ॥ वैकुंठनाथ सत्यत्वें ॥२२५॥
ऐसा चमत्कार दावोन ॥ आले श्रीसह देवालयीं जाण ॥ उजडतां द्वादशीं दिन ॥ करविलें ब्राह्मणभोजन तयांनीं ॥२२६॥
यापरी रथोत्सव वार्षिक ॥ करावा तुम्ही मन:पूर्वक ॥ तेणें रमावर वैकुंठनायक ॥ इहपरसौख्य देख देतसे ॥२२७॥
एवंरीत्या सर्वाशीं बोलोनियां प्रेमेशीं ॥ निरोप देती सौख्यराशि ॥ जाया स्वस्थानाशीं आनंदें ॥२२८॥
तेच दिवशीं मध्यरात्र ॥ न उलटे तो अकस्मात ॥ ब्रहमैयादि श्रीचे चारी भक्त ॥ गेले गुप्त होवोनियां ॥२२९॥
त्रयोदशीचा दिन ॥ एक घडी वर आला विकर्तन ॥ परी करण्या वेंकटेशार्चन ॥ न आले चवघांतून एकही ॥२३०॥
ऐसें कधींच न जाहलें ॥ म्हणोनियां आश्चर्य वाटलें ॥ झणीं पहावया भक्त गेले ॥ कोणीही न दिसले मठींत ॥२३१॥
धुंडावया दुजे भक्त ॥ गेले दूरवरी बहुत ॥ न मिळतां आले परत ॥ अस्वस्थ चित्त होवोनियां ॥२३२॥
मग बोलती आपापल्यांत ॥ हे मानव नव्हेत देव सत्य ॥ आम्हां दावोनियां उत्तम पंथ ॥ वाटे गेले गुप्त होवोनियां ॥२३३॥
जे कां सदाचारसंपन्न ॥ वेंकटेशचरणीं सदालीन ॥ कामिनी धन कांचन ॥ जे विष्टेसमान मानिती ॥२३४॥
जे सदां रत परोपकारीं ॥ प्रेम सारखें सर्वांपरी ॥ कधीं न बोलती क्रोधोत्तरीं ॥ शांति अंतरीं वाहतसे ॥२३५॥
तयांचें किती तरी वर्णन ॥ करावें तितकें थोडेंच जाण ॥ आमुचें सुकृत सरलें म्हणोन ॥ गेले आम्हां सोडोन वाटतें ॥२३६॥
हे कोठील कवण ॥ येथें आले तरी कोठोन ॥ हें आजवरी जाण ॥ कोणालागोन नकळेचि ॥२३७॥
हें सर्व देवताकृत्य ॥ असें आणोनियां मनांत ॥ वेंकटेशचरण चिंतित ॥ राहिले निश्चिंत सर्वही ॥२३८॥
तुगलिवृक्षाखा लील ब्रह्मदेव तो ब्रह्मैया ॥ महादेवाचे देवुळिं, सांबैया त्रिनामैया ॥ भंडिरंगैया तोच रंगैया ॥ ऐसें तयां मानोनियां भजताती ॥२३९॥
हा अध्याय जाण माउली ॥ करोनि कृपेचि साउली ॥ मुखीं बोधस्तन घाली ॥ मुलें आपुलीं म्हणोनियां ॥२४०॥
कीं हा अध्याय भागीरथी ॥ भक्ती माघमासीं जे स्नान करती ॥ म्हणजे भावें पठण करती ॥ तयांसि पुनरावृत्ती असेना ॥२४१॥
किंवा हा अध्याय मुक्ताफळ ॥ भक्तराज हंसाचा कवळ ॥ पाखांडिवायस अमंगळ ॥ तयांसि अनुकूळ असेचिना ॥२४२॥
श्रीप्रादुर्भवापासोन ॥ तयांनीं केलेल्या लीला जाण ॥ त्या करावया कथन संपूर्ण ॥ ममायुष्यप्रमाण न पुरेची ॥२४३॥
श्रीवेंकटपतींनीं माहिती ॥ कृपें मिळवोनि दिली मज हातीं ॥ तेविं अन्यजना देवोनि स्मृति ॥ त्यांकरवीं स्वकीर्ति बोलविली ॥२४४॥
त्या कथा परम पावन ॥ पुढील अध्यायापासोन ॥ जैसें लिहवील उमारमण ॥ तैसेंच लिहीन श्रोतेहो ॥२४५॥
सत्यत्वें एकरुपी हरहरी ॥ हा भाव धरोनियां अंतरीं ॥ तयांचे चरणकमलांवरी ॥ हा पंचमाध्याय हरि समर्पी ॥२४६॥

इति पंचमोऽध्याय: ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 16, 2021

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP