श्रीवेंकटाचलवासी वेंकटपति हे, आपल्या एका प्रियभक्तावर अनुग्रह करण्याकरितां, वेंकटगिरीहून वेदाद्री (कल्हळिगिरि) वर धांवून आले; व तेथें एका शिलेवरतीं प्रकट होऊन निजभक्तास प्रत्यक्ष दिलें; आणि त्याच्या प्रेमळ विनवणीवरुन त्याच गिरीवर लोकानुग्रहास्तव वास्तव्य करुन राहिले. या गोष्टीस सुमारें ४०० वर वर्षें जाहलीं. ज्या शिलेवर प्रथमत: श्री प्रकट झाले त्या शिलेच्या शेजारींच, पुढें त्या डोंगरांत एका गुहेंत श्रीवेंकटपति-इच्छेनें सहा उत्तम मूर्ती सांपडल्या. त्या मूर्तीपैकींच आतां असलेली श्रीवेंकटेशाची मूर्ति स्थापन करण्यांत येऊन, बाकीच्या दुसरीकडे तेथें जवळच स्थापिल्या आहेत. श्रीनीं कल्हळगिरीचें वसतिस्थान केल्यापासून आजपर्यंत अनेक भक्तांचे उध्दार केले. कुष्ठयांचें कुष्ठ घालविलें, जन्ममूकास वाचा दिली, भक्तांस कारागृहांतून उचलून आणिलें, कोणास संतति दिली, कोणास संपत्ति दिली आणि कैक रोगग्रस्त रोगमुक्त केले, या प्रकारें करुन या भक्तकामकल्पद्रुमांनीं नानाविध लीला केल्या त्यांचें वर्णन करावें तितकें थोडेंच. माझ्या पणज्याचे अन्नदाते यजमान, वीरशिरोमणि, श्री. कै. परशुरामपंत भाऊसाहेब पटवर्धन यांपासून सांप्रतचे माझे यजमान स्वामी, धैर्यशाली, लोकप्रिय, श्रीमंत परशुरामराव भाऊसाहेब के. सी. आय. ई यांच्यापर्यंत सतत पांच पिढया भक्तिपूर्वक या देवाची सेवा चाकरी करीत आले; कोणीं श्रीस इनाम जामीन दिली, कोणीं गांवगन्ना नेमणका करुन दिल्या, कोणीं सुंदर इमारती बांधविल्या, कोणीं नानाप्रकारच्या जिनसा दिल्या. शिवाय वर्णीं, पूजा, नैवेदयही सतत आजपावेतों चालू आहेतच. याखेरीज अन्य संस्थानिक, बादशाही कामगार, आणि साहुकार वगैरे यांनीं भक्तिपूर्वक, कोणीं इनाम जमिनी दिल्या आहेत, कोणीं देवालयें, इमारती वगैरे, बांधविल्या आहेत. तेणेंकरुन हें देवस्थान अत्यंत रमणीय झालें आहे.
अशा दीनदयाळु भक्तवत्सल प्रभूचें चरित्र असणें सर्वतोपरि योग्य असून तें कोठें उपलब्ध नाहीं. अशींच आणखी कांहीं वर्षें जाऊं दिलीं तर, यासंबंधीं यत्किंचितहीं पुढें माहिती मिळणें दुरापास्त होईल, असें वाटून श्रीचें चरित्र यथाशक्त्या लिहावें असें जें फार दिवसांपासून माझे मनांत होतें त्यास पुढें श्रीचीही प्ररणा झाल्यामुळें हें महत्वाचें काम आनंदानें हातीं घेतलें. या कामीं मोठया श्रमानें व काळजीनें आज दोन वर्षें सतत परिश्रम करुन, वर दर्शविलेली व त्याशिवाय आणखी पुष्कळ प्रकारची कागदोपत्रीं व कांहीं तोंडीं माहिती मिळविली. आणि त्या आधारें यथामति हें अल्पचरित्र श्रीकृपेनें लिहिलें आहे. यांत वर निद्रिष्ट केलेल्या सर्व व अन्यही गोष्टी प्रसंगाप्रमाणें वर्णिल्या असून श्रीचें स्वरुपदर्शन, नित्य पूजाविधान, नवरात्रोत्सवपध्दतिही वर्णिली आहे. शिवाय देवालयें व इतर इमारती कोणीं कधीं बांधविल्या, याची मिळाली ती माहिती दिली आहे. ब्राह्मण व ब्राह्मणेतर अन्य जातींचे अनेक भक्त या देवाचे असल्यामुळें सर्वांस समजावें या हेतूनें होईल तितक्या सोप्या भाषेंत हें चरित्र लिहिलें आहे. व कठीण शब्द वाटले त्यांवर टीपाही दिल्या आहेत. या चरित्राचे अध्याय ११ झाले असून ओव्या १७८८, आरती १, गीती १२, आणि श्लोक १ मिळून ग्रंथसंख्या १८०२ झाली आहे. प्रत्येक अध्यायांत काय विषय आला आहे हें शेवटचे अध्यायांत सांगितलें आहे. हें चरित्र लिहून झाल्यानंतर तें, गुणज्ञ व गुणग्राहक माझे धनी, श्रीमंत भाऊसाहेब यांचे चरणसन्निधानास अवलोकनाकरितां पाठविलें होतें; त्यांनीं कृपेनें योग्य ती सूचना केली त्याजबद्दल मी श्रीमंताचा अत्यंत आभारी आहे. तसेंच श्रीमंतांनीं दया करुन पेन्शन दिल्यानंतर मीं श्री. कै. अप्पासाहेब यांचें यथामति चरित्र लिहिलें, त्या कामीं हरएक प्रकारें उदार आश्रय दिला. एवढेंच नव्हे तर याही श्रीचे चरित्रास उदार आश्रय दिला, येणेंकरुन मी श्रीमंतांचा अत्यंत ऋणी आहें. याही चरित्राचें सर्व श्रेय श्रीमंतांकडेच आहे. श्रीरामेश्वर आणि श्रीवेंकटपति उभयतां एकरुपी असल्यानें ते श्रीमंतास पत्नीपुत्रकन्यांसह चिरायु करोत व श्रीमंतांच्या सकल कामना सुफलित करोत. हें चरित्र लिहिण्याचा माझा हा दुसरा प्रसंग असून तें ओवीछंदांत वगैरे लिहिलें असल्यानें त्यांत दोष राहण्याचा संभव आहे. तरी सुज्ञ व गुणग्राही वाचकांनीं दोषाकडेच विशेष लक्ष न देतां, अल्पस्वल्प गुण असतील तेवढेच ग्रहण करावेत, अशी त्यांस सविनय प्रार्थना आहे ज्या सद्गृहस्थांनीं कृपा करुन लेखी व तोंडी माहिती दिली व ज्यांनीं वेळोवेळीं मन:पूर्वक मदत केली त्यांचाही मी फार उपकारीं आहें.