चाल - उध्दवा अजब तुझे सरकार
गोरखा, अजब तुझा संचार
गुरुभक्ति प्रिय, गुरु सवाइ जय, नाथांचाच प्रचार ॥धृ.॥
गुरु माऊलिला आवडे वडा,
नयन मोल दे भक्तित निधडा,
पारंगतता शास्त्र साबरी, कर्णाहुन उदार ॥१॥
सहज घोकता मंत्र संजिवनि
मातीचा सारथी हो गहिनी,
वारकरी सांप्रदाय उदया, ज्ञानेश्वर अवतार ॥२॥
गुरुशोधास्तव वाद प्रबुध्दा,
वाढे वाढे तत्त्व बोधा,
साल कोय फल पुन्हा तरुवर, जणु विधि जादूगार ॥३॥
चलो मछिंदर मृदंग घुमविती,
स्त्रीवेषी गुरुशेला जिंकिती,
पानी तेरा रंग कैसा ऐसा नाटककार ॥४॥
मीना मारुन पुन्हा उठविला,
गर्भागिरी सोन्याचा केला,
संतमीलना गुरु दक्षणा गुरु महिमा गाणार ॥५॥
लक्षावधि दावुनी पिंगला,
भर्तरीस योग्यांत आणला,
भंगित कुंभा दावि अभंगा, चतुर धोरणि फार ॥६॥
हस्तपदाविण बसवि तपाला,
चौरंगी रंगात आणला,
कुडया मतीच्या मातेलाहि धाके चमकविणार ॥७॥
प्रजाहितास्तव गुरु त्रिविक्रम
गुरुशोधास्तव दावी विक्रम,
वीरभद्र अस्थी शिव म्हणती, कर्णी ओळखणार ॥८॥
धर्मनाथ अनुग्रही बिजेला,
अंबिल घुगर्या प्रसाद काला,
व्रच आचरता, ना कमतरता, आशीर्वाद देणार ॥९॥
बोलण्यांत आडव्या माणीका
भूक शमविता करति कौतुका,
बारा वर्षे मोळी भारा, मौलि कर उध्दार ॥१०॥
भगवानसे भगवान गोरख,
सिध्दोसे सिध्दराज गोरख,
गौरव गुरुमुखि, श्रवणि भक्तसुखी मच्छिंद्रनाथा प्यार ॥११॥
योगाब्जिनी सरोवर श्रीहरी,
विषय विध्वंसक श्रीहरी,
विठामाई भक्तां प्रसन्नता, कविबाला उपकार ॥१२॥
श्री. ना. कन्हेरीकर