॥द्वितियोऽध्याय:॥
श्री गणेशायनम: विदयार्णवकेसरी भक्तिये निबरघट्ट, गुरु आसने भिक्षेस जात, एके गृही आलक्ष निरंजन भिक्षा वदत्, त्यागृही होते श्राध्द दिन ॥१॥
माईने तरुणपणाजोगते, पान वाढले रसभरितें, चटण्या कोशिंबिरी रायतें, भाज्या बहुत प्रकारच्या ॥२॥
शिव साळुंकी भात शोभला, वडे चमचमित, चव जिभेला, गोरक्ष अंतरी संतोषला, आशिर्वाद देऊन निघतसे ॥३॥
भिक्षा ठेवूनी गुरुपुढें, गुरु संतोषी म्हणती आणखी वडे, गोरक्ष निघती तातडे, त्यागृही पुनरपि विनविती ॥४॥
वडा मागसी गुरुचे निमित्त करुनी, फुकट नसे म्हणता, जननी, नयन मोल कळतां, दे काढोनी, वडा घेऊन निघतसे ॥५॥
नेत्र झाकुनी वडा ठेवला, डोळा कांरे तुवां झाकिला, ठणका बधु दे आग्रहे गुरुला, सांगतसे सत्यकथा ॥६॥
शंकरे हेरंभ थोपटीला, तेवीं सतशिष्या जवळ घेतला, प्रतिसूर्य नेत्र बसविला, पसरण्या दिगंगत किर्ते ॥७॥
तेथून गुरुशिष्य पुढे चालले गोरक्षाकडुनी मंत्र घोकविले, शिशु-खेळीं संजीवनी भलें, घोकता महदाश्चर्य जाहले ॥८॥
कर्दमाचा करभाजन केशव, अवतार झाला गहिनीभाव, मधु-गंगेस सांभाळण्या ठेव निघती पुढती गुरुशिष्य ॥९॥
प्रति शुक्राचार्य मच्छिंद्र म्हणत, तपाविना तेज ना लाभत, गोरक्षास बद्रिकाश्रमी बैसवित मुहुर्तवेळी शिवसाक्षी ॥१०॥
मच्छिंद्र आले रामेश्वरी, मारुती स्मरण दे वचन वैखरी, स्त्री राज्यां जाती सामोरी किलोतमा उभयतांच्या ॥११॥
संकल्प सांगुन हनुमान निघुन जाय, कवि-किलोतलेस मीनानाथ होय, जेथे असे सर्व स्त्रीराज्य, कालक्रमणा चालली ॥१२॥
दुसरे कथानक यज्ञ करी बृहद्रवां, अग्निप्रसाद अंतरिक्ष संभवा, जालंदर जाय संगोपिला बरवा, राणीस लग्नविचार सुचला ॥१३॥
लग्न कार्यकारण कळता मनी, रमणीं रमणे रुचे न, विपिनी जाई निघोनी सर्वा चुकवूनी, अग्नी उचलुनी, दे दत्तां ॥१४॥
दत्ते वरदहस्त अंगिकारीला, सेवा घेवून नाथपंथ देवविला, मच्छिंद्र सम अस्त्रीं प्रवीण केला, कानिफ आणविला गजकर्णी ॥१५॥
साबरि विदयेची करुनी वाटणी, नवनाथ घेती कुशले करोनी, चौतीस कोटी बारा लक्ष जालंदर-मुनी, कानिफास प्रसन्न दैवते ॥१६॥
जेथे बसविले गोरक्षाला, बद्रिकाश्रमी कानिफा बसविला, परि त्याचे त्यांस न ठावे कुणाला, बारा वर्षे नेम असे ॥१७॥
जालिंदर-हेलापट्टणी पातलां, अधर तृणधारा बघितला, पौत्राच्या ममतें अनिले उचलिला, मौनावती आश्चर्यली ॥१८॥
दासीसह जाऊन सेवा केली, परिक्षा घेतां अनुग्रहित झाली, गोपिचंदा लाभ देण्यां उभारली, जन्म सार्थक करावया ॥१९॥
चंदनचौकी गोपीचंद, दंतधावनी, सकल स्त्रियावृंद, स्नाना अत्तर तेल सुगंध, उष्ण बुंद वरुन आदळला ॥२०॥
गोपीचंद गेला मातेपुढे, नमून म्हणें काय पडले साकडे, कां घडले वेडवाकुडे, मजसह कोणा शिक्षा निश्चयें ॥२१॥
मूषकवत काळ टपला. यांत कोणी नाही वांचलां, जो हरिनामी रंगला, तो एक तरला सांप्रदायी ॥२२॥
मग मुख्य-मुख्य सांप्रदाय, महिमा गाई ती माय, याच मार्गाने तू जाय, जालिंदर कृपयेने ॥२३॥
त्यांचे महत्व मी ताडिले, सकल देववृंद नमिते झाले, त्यांचे अनायासे येणे झाले, अपुल्या राज्यातच पै ॥२४॥
क्षणाच्या पळाचा ना भरवसा, गुरुवरी ठेवी पूर्ण भरवसा, राजा देई मातेस दिलासा, विचार करील आजीचे दिनी ॥२५॥
विपरीत अर्थे लुभावंती, सांगे गोपीचंदा प्रती, जोग देऊन तुम्हां प्रती, मैनावती बैरागी राज्य करतील ॥२६॥
राजास कळता हा प्रकार, रागे जाहला क्रोधांगार, गर्ता खणिली खोलवर, ध्यानस्थ जालंदर लोटला ॥२७॥
नाथपंथ दृढदुणावा, मैनावतीचा अपार ठेवा, जतन करावा या शुध्द भावा, राग गिळी ज्वाळामौळी ॥२८॥
मैनावती परी हिरमुसली, कोठे गेली गुरुमाऊली, नशिबी नव्हती मुलांच्या सावली, कर्मावरी हात ठेवी ॥२९॥
कानिफाचे तप जाहले, गुरु कोठे शोधू लागले, तैसेच गोरक्ष तळमळले, गुरुचरणास्तव पै ॥३०॥
अविर्हत रागविस्मृती, प्रबुध्द कृपे वैभवात विरक्ती, वामन कृपे ज्यामनीं जागृती, जैसी भक्ति गुरुची शक्ति ॥३१॥
इतिश्री नवनाथसार, गोरक्षमुखीचा प्रचार, अठरा पुराणे वेद चार । द्वितीयोध्याय गोड हा ॥३२॥
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥