॥तृतियोऽध्याय:॥
श्री गणेशायनम: सांगा मच्छिंद्र पाहिला कां म्हणती, येणार्या जाणार्यास पुसती, गोरक्ष पातलें हेळापट्टणाप्रती, गर्ते संनिध आदेश ॥१॥
आदेशाने आले उत्तर, हरि पुसे कोण ? जालंधर गुरुवर कानिफास सांग समाचार, तोवरी राही निरुत्तर ॥२॥
तो इकडे कानिफ शोधित आला हनुमान बुभुकार संरक्षणाला न मानी परि किलोतला, मोहुन घ्यावा शिष्यासह ॥३॥
परी कानिफ योगी विरक्त शील शिष्यगण मायें न सामिल मच्छिंद्र कानिफाचे बोल प्रेमळ, आदेशादेश कुशलपणे ॥४॥
राम भरत भेटीप्रद कृष्णा-कोयना आनंदीत, गोरक्ष-कानिफा भेटलो, महायशस्वी अच्युत वृक्षातळी ॥५॥
कोण प्रसात, कोण पंथी, विचारती एकमेकां प्रती, कानिफ आम्रफळें आणती आदारातिथ्य निमित्ते ॥६॥
गोरक्ष लवंग फळे आणुन, जेथल्या तेथे तरुवरी द्या ठेवून, कानीफ म्हणें कोण ब्रह्मावाचून, गोरक्ष म्हणे गुरुकृपा ॥७॥
प्रबुध्द म्हणें आहे ठाऊक गुरु तुझा, स्त्री राज्यामध्ये माळेचा बोजा, काय विरक्तपणाचा काजा थोरवी सांगसी मजपुढें ॥८॥
हरी म्हणें गुरु जालंदर, गोपीचंदे गर्ती आजवर, दैवते प्रसन्न गेली कुठवर स्पर्शास्ते फळें तरुवरी ॥९॥
विरुध्द भाषण टाकून, वादविवादी गुरु ठिकाण, कळलें म्हणून आनंदून, कानिफा आला गौडबंगाली ॥१०॥
राजयोगी कानिफा पाहून, गोपीचंद गेला हुरळून, ऐसा योग्य गुरु सोडून आई शोधी बैरागी ॥११॥
कानीफ म्हणें मज गुरु करु पाहसी, ज्याचा अनुग्रह तों तू गर्तेसी, तवभाग्य थोर म्हणून शांतीसी, ज्वाळामौळी गंगामय ॥१२॥
पश्चात्तापी भाच्याप्रती, क्षमा करा विनवी मैनावती, गर्तेबाहेर गुरु काढण्याहिती, कानिफा तुम्हीच पहावे ॥१३॥
पंच धातूचे पंच पुतळे, भस्म लावून गोपीचंदा उभें केले, घाव घालता एक एक जळें, आश्चर्य वाटे सर्वांना ॥१४॥
ज्या अर्थी ज्वाळेत वाचला, गोपीचंदा चिरंजीव केला, नाथ पंथ दीक्षे देवविला, भिक्षामागें मैनावतीस ॥१५॥
छळु न आम्ही विषय भावा, बांधून देवू पर्ण कुटिया, विनविती गोपीचंद राया, राण्या सकळ लुभावंती ॥१६॥
षडरस मंचक ऐषारामासी, फले भूमिषयन कां अवस्थेसी, ऐसें नाना प्रकारे दासदासी, परि काजळे न लिंपीला जाय ॥१७॥
मुक्तचंदा राज्यी स्थापून, गोपीचंद निघाला तीर्थाटण, नगरलोक गेले हळहळुन, रायाचे गुण आठविती ॥१८॥
भिक्षा मागतां कौल बंगली, जेथे भगिनी चंपा दिधली, तिलोकचंदाची स्नुषा भली, तेथे भिक्षा मागतसे ॥१९॥
राज्य सोडुन भीक मागतो, सोयर्यास कमीपणा आणत, नणंदा-जावा टोचून बोलत, निर्लज्ज बंधू दाविती ॥२०॥
राजा असुन अश्वशाळी, भणंगासम न ओशाळी, बोलबोलून चंपाबाई केली जरजर दु:खमय ॥२१॥
भावना वेशे घेई खंजिर, भावाकरिता झाली उदार, रक्त थारोळी उदर बाहेर, दास-दासी ओरडल्या ॥२२॥
कोल्हाळ गेला बंधू कर्णी, शव आणले जेव्हां स्मशानीं, गुरुप्रताप दावूया म्हणुनी, जाळा न शव विनवितो ॥२३॥
गुरुचा फुगीरपणा सांगशी याला जाळा भगिनी संगतीसी, वाम हस्त काढून देती त्यासी उठवी भगिनी गुरुकृपे ॥२४॥
परतून निघता गोपीचंद, व्यान अस्त्रे आले जालंदर वंदय, चंपावती उठविता जना आनंद, परि स्मशान वैराग्य जैसे थे ॥२५॥
तिलोकचंद पश्चात्तापी, राहवून घे, आतिथ्य ओपी, चंपावतीस अनुग्रह अर्पी, उच्चिष्ठ ग्रास घालोनिया ॥२६॥
जालंदर सांगे तिलोकचंदा राज्यभार अजाण मुक्तचंदा, सोपविला असे त्यास सर्वदा, संरक्षण असो तुझेच ॥२७॥
येथून संपले गोपीचंदाख्यान, अठराध्याय, अठरापुराण, तेथून पुढे हरि शोधन, मच्छिंद्राचे करतसे ॥२८॥
गुरुसाठी काय क्लृप्त्या, करावया लागतील काय युक्त्या रण न मानावे शक्य तो शक्त्या, ऐसा विचार करतसे ॥२९॥
नको जरी स्वाद वाद रळीनेही होई गुरुचा शोध लवंग, आम्रफळ स्वाद खास मिळे वामन कृपे ॥३०॥
इति श्री नवनाथसार, गोरक्षमुखीचा प्रचार, अठरा पुराणे वेद चार, तृतियोध्याय गोड हा ॥३१॥
श्रीकृष्णार्पणमस्तु॥