७९
वर तेंचि विघ्न मानूनि प्रल्हाद । बोले श्रीहरीस स्मितहास्यें ॥१॥
प्रलोभन ऐसें दाखवीं न देवा । कामासक्त जीवा ऐशापरी ॥२॥
भोगभयें प्रभो, पावूनि विराग । मुमुक्षु मी तुज शरण आलों ॥३॥
हृदयग्रंथि हें मूळ संसाराचें । सत्त्व काय ऐसें पाहतोसी ॥४॥
प्रसन्न तूं होतां मागेल जो भोग । नव्हेचि तो भक्त वणिक् मात्र ॥५॥
वासुदेव म्हणे भोगेच्छा अंतरीं । धरुनि श्रीहरी चिंतूं नये ॥६॥
८०
सेव्य-सेवकत्व भासे तें असत्य । इच्छी धनादिक सेवा न ते ॥१॥
केवळ कार्यार्थ अर्पील जो धन । धनी तया कोण म्हणे ज्ञाता ॥२॥
राजा सेवकासी नसेचि हें इष्ट । निष्काम मी भक्त निरिच्छ तूं ॥३॥
कामवासनेतें समूळ विध्वंसी । देसी तरी हाचि देईं वर ॥४॥
अधर्मप्रवृत्ति उपजवी काम । विवेक विज्ञान नष्ट करी ॥५॥
निष्काम जो तोचि पावेल तुजसी । लाभ सकामासी न घडे तुझा ॥६॥
पुराणपुरुषा, भक्तविघ्नांतका । नृसिंहस्वरुपा परब्रह्मा ॥७॥
जोडितों मी कर घेईं नमस्कार । चरणीं विनम्र वासुदेव ॥८॥
८१
नृसिंह बोलला एकनिष्ठ भक्त । इहपर भोग इच्छितीना ॥१॥
परी मन्वंतर एक दैत्यराज्य । भोगीं निष्कंटक अलिप्तत्वें ॥२॥
निरंतर माझें करुनि स्मरण । प्रिय कथागानतत्पर हो ॥३॥
आराधना ऐसी करितांचि पुण्य । उपभोगें क्षीण सकल होईअ ॥४॥
सदाचारें पाप होईल विनष्ट । कालानेंचि नष्ट कलेवर ॥५॥
देवगेय ऐसी संपादूनि कीर्ति । पावसील मुक्ति दुर्लभ जे ॥६॥
स्तवन त्वकृत तेंवी हें चरित्र । स्मरुनियां मज गातील जे ॥७॥
ऐकतील तेही पावतील मुक्ति । वासुदेव वंदी नृसिंहातें ॥८॥
८२
प्रल्हाद विनवी वरदा, हे ईशा । प्रार्थितों मी आतां एक तुज ॥१॥
स्वबंधुघातकी मानूनि पित्यानें । तुजसी निंदिलें, छळिलें मज ॥२॥
दुरंत दुस्तर पातक हें त्याचें । देवा, ने लयातें कृपावंता ॥३॥
पाहिलेंसी तया तैंचि तो पुनीत । परी प्रेमें तुज मागतसें ॥४॥
देव म्हणे बाळा, त्रिसप्त पूर्वजां - । सवें, उद्धरला पिता तव ॥५॥
तुजसम पुत्र जयासी लाभला । मुक्त तो जाहला निश्चयानें ॥६॥
ऐसे भक्तश्रेष्ठ नांदती ज्या देशीं । पापीही ते होती पुण्यदेश ॥७॥
अनुसरती जे बाळा, तुजप्रति । नि:सीम ते होती भक्त माझे ॥८॥
सर्वभक्तांमाजी प्रल्हादा, तूं श्रेष्ठ । लाभला मदंक त्वत्पित्यासी ॥९॥
तेणें तो मुक्तचि, परी अंत्यक्रिया । करुनि स्वराज्या स्वीकारावें ॥१०॥
विप्रवचें कर्म करीं तूं मदर्थ । वासुदेव भक्तकथा गाई ॥११॥
८३
धर्मा, प्रल्हाद त्यापरी । क्रियाकर्मातें आंवरी ॥१॥
सिंहासनीं विराजला । पुढती अभिषेक झाला ॥२॥
शांत पाहूनि नरहरी । ब्रह्मा त्याचें स्तवन करी ॥३॥
म्हणे गुरु तूं सर्वांचा । वधिलेंसी दुष्ट दैत्यां ॥४॥
वरें माझ्या हा उन्मत्त । करी वेदधर्मनाश ॥५॥
रक्षिलेंसी प्रल्हादातें । स्मरेल जो शुद्धचित्तें ॥६॥
रुप नृसिंहा, हें तव । तया न बाधेचि भव ॥७॥
वासुदेव म्हणे हरी । भक्तकाज ऐसें करी ॥८॥
८४
नृसिंह बोलती ब्रह्मदेवा, ऐसे । वर या दुष्टांतें देऊं नये ॥१॥
सर्पासीच दुग्ध पाजणें हें बापा । नाडिती त्र्यैलोक्या स्वबळें दुष्ट ॥२॥
नृसिंहपूजन ब्रह्ययानें तैं केलें । पुढती जाहले गुप्त हरी ॥३॥
पुढती प्रल्हाद पूजी सर्व देवां । वंदूनियां तयां कर जोडी ॥४॥
आशीर्वाद तदा अर्पूनि सविधि । तयासी अभिषेकी ब्रह्मदेव ॥५॥
वेदवेत्ते विप्र करिती मंत्रघोष । देव स्वस्थळास पुढती गेले ॥६॥
वासुदेव म्हणे धर्मासी नारद । निवेदिती वृत्त ऐशापरी ॥७॥
८५
धर्मा, द्वारपाळ होती ऐसे दैत्य । विरोधें ते नित्य स्मरती ईशा ॥१॥
दशकंठ कुंभकर्ण ते पुढती । होऊनि, रामासी करिती द्वेष ॥२॥
शिशुपाल, वक्रदंत तेचि धर्मा । नेईल स्वस्थाना कृष्ण तयां ॥३॥
कथिलें द्वेष्टेही कैसे झाले मुक्त । अवतारचरित्र श्रीहरीचें ॥४॥
आदिदैत्यवध प्रल्हादचरित्र । गुणविपर्यय कथिला तुज ॥५॥
भागवतधर्म तोही निवेदिला । ऐकतां हे लीला मोक्ष लाभे ॥६॥
वासुदेव म्हणे प्रल्हादचरित्र । गाऊनि पवित्र व्हावें सदा ॥७॥
८६
धर्मा, भाग्य तुझें थोर । आप्त तुजा शारड्गधर ॥१॥
परब्रह्म साकारलें । तुमच्या सदनीं राहिलें ॥२॥
नाहीं प्रल्हादा हें भाग्य । तुम्हां कामाठी गोविंद ॥३॥
नाना साधनें जयासी । ध्यातों वश तो तुम्हांसी ॥४॥
होवो आम्हां तो प्रसन्न । पूर्ण परब्रह्म कृष्ण ॥५॥
धर्मा, पूर्वी मयासुरें । यश रुद्राचें हरिलें ॥६॥
रक्षिलें तें श्रीकृष्णानें । कथा ऐकावी ते प्रेमें ॥७॥
वासुदेव म्हणे वृत्त । निवेदिती तें नारद ॥८॥
८७
श्रीकृष्णकृपेनें बळिवंत देव । दैत्यपराभव होई यदा ॥१॥
तदा ते शरण मयासुराप्रति । जातां तो तयांसी त्रिपुरें देई ॥२॥
सुवर्णाचें एक, रौप्यमय दुजें । लोहमय तिजें पुर होतें ॥३॥
साह्य त्या पुरांचें घेऊनियां दैत्य । करिती विनाश निर्जरांचा ॥४॥
शरण ते तदा गेले शंकरासी । पाशुपत योजी शिव तेव्हां ॥५॥
मयासुर तदा मृतदैत्यांप्रति । करी सुधाकूपीं पुनर्जीवी ॥६॥
शिव त्या संकटीं प्रार्थी विष्णूप्रति । वत्स तैं ब्रह्मयासी करी विष्णु ॥७॥
धेनुरुप स्वयें घेऊनि अमृत । प्राशिती समस्त जाऊनियां ॥८॥
वासुदेव म्हणे रक्षक मोहित । मयही तैं स्वस्थ मायागुणें ॥९॥
८८
शोकाकुल दैत्यां बोध करी मय । अटळचि दैव म्हणे जनीं ॥१॥
पुढती शिवातें विष्णु अर्पी रथ । सारथी, धनुष्य, अश्व, ध्वज ॥२॥
कवच बाणादि सकळ सामुग्री । बैसे रथावरी शिव तदा ॥३॥
अभिजित् मुहूर्ती सोडूनियां बाण । त्रिपुर जाळून भस्म केलें ॥४॥
वाद्यनाद, नृत्य-गीत तदा नभीं । शंकराची स्तुति करिती देव ॥५॥
धर्मा, श्रीहरीची कृपा ऐसी श्रेष्ठ । जाहला सांप्रत तोचि कृष्ण ॥६॥
अगम्य तयाचें चरित्र गाऊन । तेवीं ऐकवून ऋषि हृष्ट ॥७॥
वासुदेव म्हणे नारदें धर्मातें । कथिलें रायातें वदती मुनि ॥८॥