सप्तम स्कंधाचा सारांश
या स्कंधांत अध्याय १५, मूळ श्लोक ७५०, त्यांवरील अभंग १२५
सर्वत्र समबुद्धीच्या परमेश्वरासहि दैत्यांविषयीं विषमभाव कां ? या धर्मराजाच्या प्रश्नास नारदांनीं उत्तर देऊन, या स्कंधांत प्रल्हादाची भक्तिरसपूर्ण कथा सांगितली आहे. विरोधी भक्तीचें महत्त्व सांगून शिशुपालव-क्रदंतांचा पूर्वेतिहास सांगतांना, वैकुंठातील जय-विजयांना सनत्कुमारांदिकांचे शाप कसे झाले तें लीलामय वृत्तच विरोधी भक्तीला कसें कारण झालें तेंहि सांगितलें आहे. पुढें हिरण्यकशिपूच्या सूडबुद्धीमुळें त्याचें तप व त्याला ब्रह्मदेवाकडून मिळालेला वर व त्यामुळें उन्मत्त होऊन त्याच्याकडून त्रैलोक्यास झालेली पीडा वर्णून, भगवंतानें देवांस दिलेलें अभयवृत्त निवेदिलेलें आहे. हिरण्यकशिपु आपला ईश्वरभक्त पुत्र जो प्रल्हाद, त्याचा छळ करील व त्यांतच तो नष्ट होईल; अशी आकाशवाणी झाली होती. प्रल्हादाचें शिक्षण सुरु असतां एकदां हिरण्यकशिपूनें त्याला मांडीवर घेऊन ‘तूं काय काय शिकलास तें सांग पाहूं’ असे प्रेमानें विचारलें. तेव्हा निर्भयपणें प्रल्हादानें नवविधा भक्तीचा उल्लेख केला. हिरण्यकशिपूला त्या गोष्टीचा भयंकर राग आला. त्या रागाच्या भरांत प्रल्हादाला त्यानें मांडीवरुन खालीं ढकलून देऊन ‘याचा वध करा’ अशी त्यानें राक्षसांना आज्ञा केली व शंडामर्कास, “तुम्हीं हें माझ्या मुलाला काय शिकविलेंत" असेंही क्रोधानें विचारलें. गुरुजी म्हणाले, “राजा, तुझ्या मुलाला हें आम्हीं शिकविलें नाहीं.” राजआज्ञेमुळें प्रल्हादाचा वध करण्यासाठीं शस्त्रप्रहार, हत्तीच्या पायाखालीं तुडविणें विष देणें, सर्पदंश करविणें इ० अनेक क्रूर उपाय करूनहि कांहीं उपयोग होईना. शेवटीं राजाचा नाइलाज झाला. पुढें एकदां संधि मिळतांच प्रल्हादानें आपल्या सर्व जोडीदारांस ‘दैत्यभाव सोडून भक्ति करा’ असा परिणामकारक उपदेश केला. पुढें राजानें कांहीं दिवसांनीं पुन्हा प्रल्हादाला पूर्ववत् प्रश्न केला. तेव्हां त्यालाहि प्रल्हादानें तेंच सांगितलें. प्रल्हादानें मुलांना केलेला उपदेश व पित्याला केलेलें निवेदन हीं दोन्हीहि अभ्यसनीय आहेत. प्रल्हादाची नारायणावरील ही श्रद्धा पाहून संतप्त झालेल्या हिरण्यकशिपूनें ‘दाखव तुझा तो नारायण मला’ असें म्हणून प्रल्हादावर चाल केली. तेव्हां प्ररमेश्वर स्तंभांत प्रगट होऊन त्यानें हिरण्यकशिपूचा नृसिंहरुपानें वध केला. व निरिच्छ प्रल्हादाला अनेक वर दिले. पुढें प्रल्हादाची पुढील कथा व धर्मविवेचन आणि शेवटीं अद्वैतत्रयीचें निरुपण करुन हा भक्तिरसानें ओथंबलेला स्कंध संपविला आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 13, 2019
TOP