कोकीळामहात्म्य - अध्याय अठरावा
शास्त्रानुसार हे व्रत प्रथम देवी पार्वतीने, शिव पती म्हणून मिळावा म्हणून केले होते.
N/A॥ श्रीगणेशाय नम: ॥
धर्म म्हणे नारायण ॥ सांगा कथेची उत्तम रचना ॥ दशरथाचा मृत्यु जाणा ॥ काय निमित्य पैं जाहला ॥१॥
हेंचि सांगा कृपाकरोनी ॥ म्हणोनी धर्म लोटला चरणीं ॥ श्रीकृष्ण म्हणे तुजलागुनी ॥ सांगतों आतां सावधान ॥२॥
दशरथाची कथा उत्तम ॥ श्रवणें पुसती सर्व काम ॥ धर्मा ऐकावें सप्रेम ॥ कथा आतां परिसावी ॥३॥
कोणे एके अवसरीं ॥ दशरथ गेला युध्दानिर्धारी ॥ शत्रुसी युध्द करी नानापरी ॥ तंव अपूर्व वर्तलें ॥४॥
रथाचा मोडला अंक ॥ हे दशरथास न कळी देख ॥ युध्दामाजी निमग्न सुरेख ॥ देहभान तया नाहीं ॥५॥
केग रायाची ललना ॥ तेही समागमें आली जाणा ॥ कैसी युध्द रचना ॥ पहावी म्हणोनी आली ते ॥६॥
रथाचा अंक मोडिला ॥ हा कैकयीस वृतांत कळला ॥ धांवोनी आली तेवेळां ॥ रथाजवळी कैकयी ॥७॥
चाकामध्यें आपुला हात ॥ घालिती झाली तेव्हां स्वस्थ ॥ युध्द होऊं दिले समस्त ॥ हस्तामध्यें घालुनियां ॥८॥
दशरथें शत्रु पराभविले ॥ सैन्य घेऊनी परतला ॥ मार्ग सत्वर क्रमिता जाहला ॥ आनंद झाला समस्तांसी ॥९॥
दशरथाची दृष्टी ॥ खालीं अवलोकित सृष्टी ॥ तवं कैकयी परम कष्टी ॥ हस्तामध्यें चक्राच्या ॥१०॥
रुधिर वहात असंख्यात ॥ हात सोसिला समस्त ॥ कायकाय झाली मात ॥ दशरथ खालीं उतरला ॥११॥
कैकयीचा हस्त देखोन ॥ दशरथ विस्मित पूर्ण ॥ म्हणे इचें धैर्य शहाणपण ॥ धन्य आजी पाहिलें ॥१२॥
कैकयीप्रती म्हणे दशरथ ॥ वर माग जो आवडे यथार्थ ॥ देईजे मी तुज निश्चित ॥ अनर्थ होतां वांचविला ॥१३॥
कैकयी म्हणी राजेश्वरा ॥ कांही अपेक्षा नसे अवधारा ॥ परी मज वचन द्यावें सत्वरा ॥ पुढें मी कांही मागेन ॥१४॥
दशरथानें दिलें वचन ॥ दुसरें रथीं आरोहण ॥ कैकयीचा हस्त काढुन ॥ वस्त्रें करोन पुसियेला ॥१५॥
कैकयी दुसरे रथीं ॥ बैसवी राजा निश्चिती ॥ उपकार बहुत मानी चित्ती ॥ कैकयीचा ते काळीं ॥१६॥
ऐसें कथन झालीयावरी ॥ गांवात आले ते अवसरीं ॥ कांही दिवस लोटलियावरी ॥ नवल झालें तें ऐका ॥१७॥
भरत आणि शत्रुघ्न ॥ दोघे पुत्र कैकयीचे जाण ॥ परम सात्विक सुलक्षण ॥ प्रतापी पूर्ण निजबळें ॥१८॥
सुमित्रा दुसरी ललना ॥ तीस लक्ष्मण झाला जाणा । त्याच्या गुणाची गणना ॥ शेष अवतार प्रत्यक्ष ॥१९॥
तिसरी कौसल्या सुजाण ॥ तीस झाले श्रीरामनिधान ॥ जें अनादिसिध्द रत्न ॥ उपमा त्यासी नसेची ॥२०॥
नाहीं उपमा संसार दु:खास ॥ नाहीं उपमा हळहळास ॥ नाहीं उपमा ब्रह्मानंदास ॥ श्रीरामास उपमा तैसी नसे ॥२१॥
श्रीराम जन्म आणि गुण ॥ वर्णावें समूळ कथन ॥ तरी शतकोटी रामायण ॥ केलं असे वाल्मिकें ॥२२॥
न गणवेल पृथ्वीवरील तृण ॥ न गणवे सिंधुजीवन ॥ न करवें पृथ्वीचें वजन ॥ अंबर किती न वर्णवें ॥२३॥
हेही गणवेल जाण ॥ परी न करवे राम गुण गणन ॥ ऐसा श्रीराम महिमा जाण ॥ भक्तपोषणा अवतरला ॥२४॥
चार पुत्र दशरथातें ॥ भरत शत्रुघ्न नामें दोघांचे ॥ रामलक्ष्मण यांच्या गुणाचे ॥ पार नसती सर्वथा ॥२५॥
द्शरथास कैसे आवडती ॥ प्राणकुर्वंडी करावी निश्चित ॥ राजया दशरथाचे चित्तीं ॥ ब्रह्मानंद न समाये ॥२६॥
दोघेजन रामलक्ष्मण ॥ हे सर्वास आवडती जैसे प्राण ॥ दशरथ दोघांस एकक्षण ॥ न विसंबे सर्वथा ॥२७॥
दशरथ विचारी अंतरीं ॥ रामास राज्यीं स्थापावें निर्धारी ॥ म्हणोनी साहित्य सर्व करी ॥ वसिष्ठ असे करोनियां ॥२८॥
देशोदेशीचे नृपवर ॥ त्यासी दशरथ पाचारी सत्वर ॥ दूत पाठवूनी ॥ घरोघर ॥ सहकुटुंबी पाचारिलें ॥२९॥
मग बोलाविले ऋषीश्वर ॥ जे शापानुग्रह समर्थ थोर ॥ विश्वामित्रादि मुनेश्वर ॥ उत्साह पाहों पातलें ॥३०॥
प्रजा ऋषी ब्राह्मण ॥ सर्व आले उत्साहालागुन ॥ दशरथाचें अंत:करण ॥ तृप्त तेव्हां सर्वदा ॥३१॥
हा वर्तमान कळला कैकय़ीस ॥ राज्यीं स्थापिती रामास ॥ म्हणोनी तिचे मानस ॥ दु:खित झालें सर्वथा ॥३२॥
ते गेली दशरथा जवळी ॥ म्हणे तुम्ही मज भाक दिधली ॥ तें सत्य करा ये वेळीं ॥ वचन माझें मान्य करा ॥३३॥
राज्य न द्यावें रामापती ॥ राम नसतां पावा निश्चितीं ॥ भरतासी राज्य यथानीति ॥ अभिषेक आतां करावा ॥३४॥
तरीच तुमचें वचन सत्य ॥ नाहींतरी सत्व जाईल निश्चित ॥ ऐसी ऐकतांची मात ॥ दशरथ मूर्छित पडियेला ॥३५॥
अटाहासें करी रुदन ॥ निचेष्ठित पडिलें शरीर पूर्ण ॥ ऋषी राजे प्रजाजन ॥ अहा राजिया काय झालें ॥३६॥
आणीक कैकयी बोलत ॥ रामलक्ष्मण पाठवावें वनांत ॥ तरीच वचन तुमचें सत्य ॥ राया जाण सर्वथा ॥३७॥
राव विनवी कर जोडून ॥ आणिक मागें आवडे तुजलागुन ॥ येरी म्हणी नलगे याहुन ॥ राम पाठवा वनाप्रती ॥३८॥
भरत म्हणे जीताता ॥ मी राज्य न करी सर्वथा ॥ श्रीराम सेवा तत्वतां ॥ मज आवडे मनींहूनी ॥३९॥
भरथ ऐसें बोलिला ॥ रायासी परम आनंद झाला ॥ राज्यीं स्थापावयाचा विचार राहिला ॥ राम जातो वनाप्रती ॥४०॥
रामवना जातां देखोनी ॥ द्शरथ दु:खी झाला मनीं ॥ म्हणे मी व्यर्थ वांचोनी ॥ आतां काय करावें ॥४१॥
शरीरांतून जाय प्रण ॥ तैसे झालें दशरथालागुन ॥ निचेष्ठीत पडला मूर्छना येवोन ॥ आक्रोश पुन्हां करीत ॥४२॥
राम वना गेला जाण ॥ प्रजाजन करिती रुदन ॥ कौसल्येचा शोक गहन ॥ तो कोणा न वर्णवे ॥४३॥
शोकाचा समुद्र उचंबळला ॥ तेणें दशरथ अंतरीं दु:खावला ॥ तेणें तो मृत्यु पावला ॥ रामराम स्मरणेंची ॥४४॥
जैसी श्रावणाची मातापिता ॥ पुत्रशोकें मेलीं तत्वतां ॥ तैसाच द्शरथ अवचिता ॥ पुत्रशोकें करुनी मेला ॥४५॥
ऐसें झालें दशरथ मरण ॥ सत्य झालें श्रावण पित्याचें वचन ॥ ऐसी कथा धर्मालागून ॥ श्रीकृष्ण देवें सांगितली ॥४६॥
हे कोकिळामहात्म्य ॥ श्रवणें पुरती सर्व काम ॥ धन ऐश्वर्य वाढे परम ॥ आयुष्य वर्धक कथा हे ॥४७॥
कोकिळेची पूजा करुनी ॥ कथा ऐकावी उत्तम गुणी ॥ पुत्र होती तिये लागोनी ॥ एकचित्ते ऐकतां ॥४८॥
सर्वदां लाभ आणि जय ॥ श्रावणमात्रें प्राप्त होय ॥ कोकिळाव्रत उत्तम होय ॥ करितां स्वर्गवास ॥४९॥
भावे कथा करावी श्रवण ॥ करावें पुराणिकाचें पूजन ॥ भोजन यथा सांग घालून ॥ यथाशक्ती दक्षिणा द्यावी ॥५०॥
ब्राह्मण जातां रिक्तहस्तें ॥ तेणें करुन दुरिते समस्तें ॥ येवोनी झगडती अगाते ॥ यथाशास्त्र ऐसें असे ॥५१॥
इति श्रीस्कंदपुराणे ॥ ब्रह्मोत्तरखंडे ॥ कोकिळामहात्म्ये ॥ अष्टादशोऽध्याय गोडहा ॥ ओंवी ॥५२॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥
॥ अध्याय १८ वा समाप्त: ॥
N/A
References : N/A
Last Updated : October 29, 2019
TOP