मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कोकिळा माहात्म्य|

कोकीळामहात्म्य - अध्याय बारावा

शास्त्रानुसार हे व्रत प्रथम देवी पार्वतीने, शिव पती म्हणून मिळावा म्हणून केले होते.


॥ श्रीगणेशाय नम: ॥
युधिष्ठिर म्हणे श्रीहरीसी ॥ पुढती कथा सांगावी आम्हासी ॥ योजनगंधाते कैसी ॥ तिचे मूळ सांगिजे ॥१॥
आणिक दुसरा प्रश्न ॥ योजनगंधेचा व्यास नंदन ॥ कैसा झाला हें समूळ कथन ॥ सांगिजे आतां दयानिधी ॥२॥
तूं आमुचा असे दातार ॥ तरीच आम्ही पुसतो वारंवार ॥ आमुचा संशय थोर ॥ दुजा कोण निवारी ॥३॥
श्रीकृष्ण म्हणे नृपोत्तमा ॥ संशय सांडी पुसीजे आम्हां ॥ धर्मा तुझी सुकृत सीमा ॥ न वर्णवें शेषातें ॥४॥
अनमान न करिता जाण ॥ पुसावें धर्मा मजलागून ॥ वर्तला जो पूर्वीचा वर्तमान ॥ तोच ऐकीं एकचित्तें ॥५॥
योजनगंधेची उत्पत्ति ॥ सांगतों आतां तुजप्रती ॥ सावधान असावें चित्तीं ॥ कथा निश्चितीं परिसीजे ॥६॥
कथा केवळ पुण्यपावन ॥ श्रवणें पातकें जाति जळोन ॥ धर्मा तूं पवित्र परिपूर्ण ॥ कथा निर्धारें श्रवण करी ॥७॥
होऊन आतां सावचित्त मन ॥ ऐकें कथेचें अनुसंधान ॥ पूर्वी राजा धर्मसेन ॥ सूर्यवंशी जन्मला ॥८॥
तयाची भार्या परम सगुण ॥ पतिव्रता गुणनिधान ॥ पतीसेवा अनुदिन ॥ एकचित्ते करीतसे ॥९॥
म्हणुनी धर्मा संकोच न धरीं मानसीं ॥ कथा ज्या ज्या मज पुसशी ॥ त्या त्या सांगेन तुजसी ॥ सादर ऐक आनंदें ॥१०॥
तुम्ही निजभक्त माझे पूर्ण ॥ मजविण तुमचें समाधान ॥ कोण दुसरा करीलजा म्हणून ॥ अपमान करुं नको ॥११॥
आतां सावधान होईजे ॥ कथा अनुसंधान परिसीजे ॥ तुम्हीं पुशिले जें जें ॥ तेच सांगतों मी आता ॥१२॥
तुम्ही पुशिलें पंडु लागून ॥ कैसें प्राप्त झालें पुत्र निधान ॥ कुंती माद्री दोघे जन ॥ काय करीते जाहाले ॥१३॥
कुंति म्हणे पंडु राया ॥ पुत्राचें जीवित्व करावया ॥ कोणता उपाय योजावा ॥ चिंतन कोणाचे करावें ॥१४॥
पुत्रावीण यमाचे घरीं ॥ पुत्र नसतां यमपुरी ॥ भोगावी लागल निर्धारी ॥ पुत्रावीण व्यर्थ संसार ॥१५॥
ऋषीश्रापें पंडु राजेश्वर ॥ तुह्मां दु:ख झालें अपार ॥ तरी आतां प्राणेश्वर ॥ उपाय कोणता योजावा ॥१६॥
ऐसें ऐकोनी वचन ॥ सद्गद झाले पंडुचें मन ॥ अंत:करण दु:खीत जाण ॥ नेत्रीं अश्रुवाहती ॥१७॥
तंव बोलती कुंती ॥ स्वामी चिंता न करावी चित्ती ॥ दुर्वासऋषीनें मजप्रती ॥ मंत्र षष्ठ उपदशिलें ॥१८॥
मी असतां पितृ सदनी ॥ येथें आले दुर्वास मुनी ॥ जो माहाराज पूर्णज्ञानी ॥ शिवाचा अवतार प्रत्यक्ष ॥१९॥
साठ सहस्त्र शिष्यांसहवर्तमान ॥ पितृगृहीं राहिले जाण ॥ त्यासी भक्षावया अन्न ॥ साठ खंडया पाहिजे ॥२०॥
इतुके भक्षुण साचार ॥ परितो असे निराहार ॥ अठयाऐशी सहस्त्र रुषेश्वर ॥ तेही होते समागमें ॥२१॥
त्या दुर्वासानें कृपा केली मजवरी ॥ तुह्मीं आतां कराल मजवरी ॥ तरी हे मंत्र उच्चार निर्धारी ॥ प्रत्ययास येतील ॥२२॥
एकमंत्र सूर्याचा ॥ दुजामंत्र यमाचा ॥ तिसरामंत्र इंद्राचा ॥ वायुमंत्र चवथा निर्धारें ॥२३॥
दोन मंत्र सत्यजाणा ॥ आश्विनो देवाचे जाण ॥ ऐसे सहा मंत्र निर्वाणा ॥ मजलागी दिधले ऋषीराया ॥२४॥
सूर्याचा मंत्र म्या प्रथम ॥ प्रचिती पाहिली जपोन ॥ तेणें झाला पुत्र जाण ॥ तो म्या गंगेंत टाकिला ॥२५॥
विवाहाआधी पुत्र ॥ झाला तो कैसा छपावा निर्धार ॥ म्हणोन टाकिला तो पुत्र ॥ गंगेमाजी तेसमयीं ॥२६॥
त्या जीवनामाजी जाण ॥ त्यासी रक्षिता सूर्यनारायण ॥ नित्य कामधेनू येऊन ॥ दुग्ध पाजीत तयासी ॥२७॥
तो कोणे एकेदिवशीं ॥ गांधारी आली स्नानासी ॥ तिनें तो दृष्टीसी ॥ देखिला जळामध्यें ॥२८॥
गांधारी झाली विस्मित ॥ बाळ काढोन पदरें पुसत ॥ सप्रेमें ह्रदयीं आलगित ॥ स्तन मुखीं लाविला ॥२९॥
गांधारीनें आपुल्या घरीं जाऊन ॥ नेला तो कुंतीपुत्र जाण ॥ गृहीं त्यांचें पाळीग्रहण ॥ करिती झाली ते समयीं ॥३०॥
कर्णपुत्र कुंतीचा सत्य ॥ परि गंधारीनें वाढविला निश्चित ॥ म्हणूनी कर्ण दुर्योधना घरी राहत ॥ कैवार करि
दुर्यौधनाचा ॥३१॥
जन्मला कुंतीच्या कर्णापासुनी ॥ म्हणोनी कर्णनाम तयालागोनी ॥ स्वरुप तयांचे कोण वर्णिल ॥ प्रत्यक्ष सूर्य दुसरा ॥३२॥
शूरत्व तयाचे अपार ॥ दुसरा साम्यतेसी नसे वीर ॥ परमभक्त आणि उदार ॥ दुसरा त्यातुल्य नसे कोणी ॥३३॥
ऐसा कर्णपुत्र कुंतीचा ॥ प्रताप कोण वर्णील त्याचा ॥ तो पाठीराखा दुर्योधनाचा ॥ कुंती उदरी येवोनी ॥३४॥
कुंती म्हणे पंडुसी ॥ ऐसा कर्ण झाला मजसीं ॥ परी तो आहे गांधारी गृहासी ॥ तो प्राप्त आतां न होय ॥३५॥
आतां उरले पांचमंत्र ॥ आज्ञा कराल तरीच पुसा चार ॥ अवश्य म्हणे पंडु नृपवर ॥ आज्ञा माझी सत्य त्रिवाचा ॥३६॥
मग ते कुंती देवी होऊनी पवित्र ॥ जपती झाली यमाचा मंत्र ॥ तेणें यम आला सत्वर ॥ क्षण न लागतां तेथें पैं ॥३७॥
तेणें दिधले भोगदान ॥ गर्भ राहिला न लागतां क्षण ॥ पुत्र प्रसवली केवळ रत्न ॥ धर्म नाम तयासी ॥३८॥
मग आराधिला समीर ॥ तोहि पावला सत्वर ॥ भोग देता झाला साचार ॥ गर्भीण कुंती झाली तेव्हां ॥३९॥
पुत्र झाला अतिउत्तम ॥ तयाचें नाम भीम ॥ पराक्रमी अतिपरम ॥ बळास नीति नसे त्याच्या ॥४०॥
तदनंतर इंद्र आराधिला ॥ तो तात्काळ आला तयेवेळां ॥ कुंतीस भोग देता जाहला ॥ गर्भिण तात्काळ जाहली ॥४१॥
पुत्र पराक्रमी झाला थोर ॥ नाम ठेविलें अर्जुन वीर ॥ त्याचा पराक्रम अतिथोर ॥ न वर्णवे शेषातें ॥४२॥
आतां उरले दोन मंत्र ॥ तंव माद्रि विनवी जोडोनी कर ॥ म्हणे माझा जन्म निर्फळ थोर ॥
मायबहिणी जाऊं म्हणे तो ॥४३॥
येव्हडे दोनमंत्र कृपाकरुनी ॥ जरी देशील मजलागुनी ॥ तरी तुझे उपकार पूर्ण मनी ॥ होतील मज जननीये ॥४४॥
अनमान न करी तत्वतां ॥ मंत्र द्यावे मज आतां ॥ म्हणोनी चरणी ठेविला माथा ॥ अश्रु नयनीं वाहती ॥४५॥
पाय न सोडी कुंतीचें ॥ कुंतीचें समाधान केलें तिचें ॥ अश्रूं पुसिले नेत्रीचे ॥ ह्रदयीं दृढ आलिंगिली ॥४६॥
म्हणे माद्री शोक न करी ॥ मंत्र तुज देतें निर्धारी ॥ मग दोन मंत्र ते अवसरी ॥ देती झाली माद्रीस ॥४७॥
माद्रिनें दोन्ही मंत्र जपोन ॥ केलें अश्विनी देवाचे आराधन ॥ तंव ते आले तेथें धांवोन ॥ भोग दिधले माद्रीसी ॥४८॥
अश्विनो देवापासून ॥ झाले पुत्र दोन ॥ नकुल सहदेव नामाभिधान ॥ ठेविते झाले दोघांचे ॥४९॥
ऐसा मंत्राचा महिमा ॥ तिन पुत्र प्रसवली उत्तम ॥ त्याच्या पराक्रमाची सीमा ॥ कोणासही न करवे ॥५०॥
प्रथम झाला तो धर्मराज पुत्र ॥ तो केवळ सत्यवादी पवित्र ॥ सत्य वचनावीण अनुमात्र ॥ असत्य न बोले कदापी ॥५१॥
इंद्र आणि रंकदरिद्री ॥ दोघे समसमान त्यास ॥ एकची दृष्टी सर्वापरी ॥ लहान थोर समान त्याचें ॥५२॥
हरिभक्त केवळ परम ॥ नामस्मरणीए निष्कामा ॥ स्मरण करितां पुरुषोत्तमा ॥ क्षणक्षणा सांभाळी ॥५३॥
ऐसा तो धर्मराज पवित्र ॥ कुंती उदरीं अवतार ॥ श्रीकृष्ण परम मित्र ॥ प्राणापरीस आवडता ॥५४॥
दुसरा झाला तो वृकोदर ॥ तो केवळ प्रताप दिनकर ॥ नवनागबळ सहस्त्र ॥ दुजा नसे पृथ्वीवरी ॥५५॥
येवढा ब्रह्मांड गोल थोर ॥ क्षणें चेंदा करील सत्वर ॥ मनी शंकती हरिहएर ॥ दैत्य चळचळां कांपती ॥५६॥
जेव्हां देत प्रचंड आरोळी ॥ त्रैलोक्य गजबळी ते काळीं ॥ भीमा ऐसें प्रचंड बळी ॥ नसे त्रिभुवनी शोधितां ॥५७॥
ऐसा तो भीमसेन ॥ श्रीकृष्णासी आवडे जैसा प्राण ॥ सर्वदां करी हरिभजन ॥ न विसंबे अहोरात्रीं ॥५८॥
तिसरा झाला अर्जुन ॥ धनुर्विद्या निपुण ॥ एकाच बाणेंकरुनी ॥ ब्रह्मांड अंबर निर्दाळिलें ॥५९॥
स्वरुपवंत जैसा तरणीं ॥ प्रतापवंत उत्तम गुणी ॥ बहुशस्त्रें अस्त्रें करुनी ॥ समुद्र जैसा भरला असे ॥६०॥
धनुष्य तयाचें फार भारी ॥ ऐसा वीर कोण पृथ्वीवरी ॥ धनुष्य तयाचे घेईल करी ॥ कदापि नुचले कोणातें ॥६१॥
ऐसा तो अर्जुन वीर ॥ प्रतापीयानाजी म्हणवीश्वर ॥ हरीचा तो प्राणमित्र ॥ प्राणाहुनी अधिक पैं ॥६२॥
नकुल सहदेवाचा पराक्रम ॥ वर्णील ऐसा आहे कोण ॥ ज्ञान दोघांचें अतिउत्तम कांहीएक न्यून नसेची ॥६३॥
एक शशि एक दिनकर ॥ एक उमावर एक रमावर ॥ एक इंद्र एक ब्रह्मा थोर ॥ तैसे दोघे दिसती पैं ॥६४॥
ऐसे दोघे महाज्ञानी ॥ हरीस आठविती आसनी शयनीं ॥ भोजन बैसतां चक्रपाणी ॥ विसर न पडे सर्वथा ॥६५॥
तिघेजन कुंती उदरीं ॥ दोघे प्रसवली माद्री सुंदरी ॥ तेणें पंडुचे अंतरी ॥ हर्ष झाला तो न वर्णवे ॥६६॥
प्राण जातां मिळे अमृत ॥ की चोरी नागवितां धांवणेंधांवत ॥ समुदीं बुडतां तारू भेटत ॥ अकस्मात तयेवळी ॥६७॥
की दरिद्रें बहुत पिडिला ॥ त्यास द्रव्य कूप सांपडला ॥ की क्षुधेनें व्यापिला ॥ मिळे पंचामृत तयासी ॥६८॥
की वृक्षा लागली वणीए ॥ तों अकस्मात गंगा येऊनी ॥ की वणव्यांत जळतां तेक्षणीं ॥ पर्जन्य आला अद्भुत ॥६९॥
ऐसा पंडुराज आनंदला ॥ चिंतेचा विटाळ फिटला ॥ बहुत ब्रह्मानंद झाला ॥ रायासी तयेवेळीं ॥७०॥
हे पांच पुत्र पंडुचे ॥ हे पृथ्वीवरी सूर्य स्वतंत्र ॥ की हे पांच सिंह परम पवित्र ॥ दुर्जन जग संहारावयासी ॥७१॥
ह्या पंच सूर्याचा प्रकाश पडतां ॥ दुष्ट अंध:काराचा करी नाश ॥ की पंच औषधें रसायनासी ॥ दुष्ट रोग नासती ॥७२॥
कीं पांच वज्रें प्रत्यक्ष ॥ दुष्ट पर्वाताचे छेदीपक्ष ॥ कीं पांचही नागेश ॥ दुष्ट काचमणी तयापुढें ॥७३॥
हे पांचही पुरुषार्थी पूर्ण ॥ वर्णी ऐसा आहे कोण ॥ स्वयंमेव सदाशिव आपण ॥ भूमीवरी अवतरले ॥७४॥
पंचऋष सदाशिव ॥ पाचांचा महिमा वर्णिता देव ॥ क्षणार्धे शत्रु पराजय ॥ हे पांचजण करतील ॥७५॥
धेनुच्यारुपें करुनी ॥ पार्वती हे द्रौपदी जननी ॥ धेनु श्राप सत्य करावयालागुनी ॥ भवानी हे अवतरली ॥७६॥
पांच पांडव आणि ही द्रौपदी भवानी ॥ अवतार दुष्ट वधावयालागुन ॥ पाचांचा पाठिराखा मोक्षदानी ॥
द्वारकावासी असे हो ॥७७॥
श्रीकृष्णहरी पांडवहर ॥ द्रौपदी हे भवानी साचार ॥ दोघी हे अवतरोनी दुष्ट संहार करतील पुढें अनुक्रमें ॥७८॥
धर्मा हे उत्पती तुमची ॥ जे ऐकती पातकें त्यांची ॥ शत दहासहस्त्र जन्मांचीं ॥ जाती जळोन एकसरें ॥७९॥
हें तुमचे कथन ॥ श्रेष्ठ असे अतिउत्तम ॥ जे कां करती पठण ॥ ते होती विजयी सर्वदा ॥८०॥
पातकाचा होईल नाश ॥ ऐकतां महिमा विशेष ॥ कोकिळेचें पूजन सावकाश ॥ करुनी कथा ऐकावी ॥८१॥
हरी म्हणी धर्मासी ॥ तुमची उत्पत्ती हे ऐसी ॥ कोकिळाव्रत निश्चयेसीं ॥ करावें स्त्रियांही आदरें ॥८२॥
तरी धर्मा आइकें निश्चित ॥ तुम्ही करावें कोकिळा व्रत ॥ तेणें तुम्हा राज्य प्राप्त ॥ होईल हें सत्य जाण ॥८३॥
प्रात:स्नान करुनी जान ॥ मग करावें कोकिळा पूजन ॥ तदनंतर कथा श्रवण ॥ अत्यादरें करावी ॥८४॥
धर्म म्हणे यदुपती ॥ फेडिली आमुची भ्रांती ॥ म्हणोनी मस्तक ठेविती ॥ चरणावरी हरीच्या ॥८५॥
कोकिळाव्रत हें जाणा ॥ केवळ उमामहेश्वर पूर्ण ॥ करिती हे स्वर्गभुवन ॥ नांदती सहकुटुंबें ॥८६॥
स्त्रियासीं वैधव्य निर्धारीं ॥ कधीही न होय जन्मवरी ॥ धर्मास सांगे श्रीहरी ॥ व्रत सर्वास उत्तम हें ॥८७॥
इति श्रीभविष्योत्तरपुराणे ॥ ब्रह्मोत्तरखंडे ॥ कोकिळामहात्म्ये ॥ द्वादशोऽध्याय: ॥ ओंवी ॥८८॥
॥ अध्याय १२ वा समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 29, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP