मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कोकिळा माहात्म्य|

कोकीळामहात्म्य - अध्याय सातवा

शास्त्रानुसार हे व्रत प्रथम देवी पार्वतीने, शिव पती म्हणून मिळावा म्हणून केले होते.


॥ श्रीगणेशाय नम: ॥
नारदमुनी त्वरें करुन ॥ जाते झाले कैलासभुवनीं ॥ शंकराप्रती वंदुनी ॥ वर्तमान सांगता झाला ॥१॥
ऐकतांचि कैलासनाथा ॥ खेद केला बहुत ॥ मग क्रोधें जटा आपटित ॥ वीरभद्र जन्मला ॥२॥
वीरभद्र म्हणे देवा ॥ आज्ञा करावी कांही शिवा ॥ शिव म्हणे दंक्ष अवघा ॥ कुळासहित संहारीजे ॥३॥
मग वीरभद्र महादारुण ॥ येतांचि केले सैन्य निर्दाळण ॥ दक्ष म्हणतसे तूं कोणाचा कोण ॥
येरू म्हणे तुझा प्राण हरता मी असे ॥४॥
कुटुंब दक्ष प्रजापतीचे ॥ वीरभद्रे त्याचा प्राण घेऊन ॥ अग्नि प्रवेशकरुन साचें ॥ सैन्य त्याचे मर्दिले ॥५॥
ऐसे दक्ष पाहुनियां ॥ युध्दीं प्रवर्तला शस्त्र घेऊनियां ॥ ते क्षणी वीरभद्र तया ॥ शूळें करुनी विदरिला ॥६॥
शस्त्रें शीर छेदून त्याचें ॥ पायातळी रगडिले साचे ॥ प्रेमेंकरुन स्तव शिवपुत्राचे ॥ देव करीते जाहले ॥७॥
देवें स्तवन करुनियां अपार ॥ शांत केला वीरभद्र ॥ जयजयकार करुनियां सुरवर ॥ म्हणती शिव प्रत्यक्ष हा ॥८॥
मग दक्षाचें प्रेत घेऊन बैसली त्याची कामिनीं ॥ सहस्त्र वर्षे झाली जाण ॥ प्रेतालागी कांही सोडीना ॥९॥
देवास संकट पडले फार ॥ पतिव्रता परम सुंदर ॥ इचें संकट निवारण करी कर्पूरगौर ॥ निरसेल कधीं कळेना ॥१०॥
मग समस्त सुरवर मिळोनी ॥ प्रार्थिते झाले शूळपाणी ॥ म्हणे दक्षाचें प्रेत घेवोनी ॥ श्रिया देवी बैसलीसे ॥११॥
झाली वर्षे एक सहस्त्र ॥ प्रेत सोडिना तें सुंदर ॥ धांव शंकर कर्पूरगौर ॥ पतिव्रतासी पाविकां ॥१२॥
कृपावंत सदाशिव ॥ झाले तेव्हां देवाधिदेव ॥ प्रार्थावा वीरभद्र अपूर्व ॥ शीर मागावें दक्षाचें ॥१३॥
तेव्हा मिळोनी सुराच्या दाटी ॥ वीरभद्र प्रार्थिला उठाउठी ॥ दक्षाचें शीर कृपादृष्टी ॥ करोनी द्यावें आह्मांतें ॥१४॥
वीरभद्र म्हणतसे तयेवेळीं ॥ जे शिव निंदक दुर्जन ॥ त्याचा ऐसाच शिरच्छेद करीन ॥ तेव्हा दिधलें भिरकाऊन ॥
शीर तयांचें देवाकडे ॥१५॥
वीरभद्र म्हणतसे तये वेळीं ये ॥ शीर पडातांची धरणीये ॥ चेंदिलें मत्कुणप्राय ॥ निंदक दुर्जन म्हणोनी ॥१६॥
छिन्नभिन्न पाहोनी शीर ॥ यामुखें निंदिला कर्पूरगौर ॥ दुसरें लावोनियां शिर ॥ ते लावितां दोष तु ह्यांतें ॥१७॥
मग त्या यज्ञाचे ठायीं ॥ मेषाचीं शिरें पडिले पाहीं ॥ त्यांतून एक लवलाहीं ॥ घेऊनियां लाविलें ॥१८॥
दक्ष उठला आनंद भरीत ॥ म्हणे जयजय कैलासनाथ ॥ केलें माझें पारिपत्य ॥ तुझा अव्हेर करितांची ॥१९॥
ते समयीं जगदंबा जाण ॥ कोकिला झाली पूर्ण ॥ शिवही कोकिळ होऊन ॥ उभयसंगी विचारती ॥२०॥
अंबेस पक्षीयोनी जन्म ॥ व्हावया ऐका कारण ॥ दक्ष यज्ञ केला भस्म ॥ विध्वंसोनी टाकिला ॥२१॥
त्याकर्मास्तव अंबेस पाहीं ॥ जन्म झाला पक्षा देही ॥ शंभूस दोष नसतां कांही ॥ कोकिळ झाले देवीकरितां ॥२२॥
दक्ष राजा अपमानी शिवातें ॥ त्यास्तव विघ्न झालें तयातें ॥ म्हणोनी कैलासपती शंभूतें ॥ निंदिता ऐसें होतसे ॥२३॥
यास्तव शिवाची निंदा जाण ॥ न करावी गेलिया प्राण ॥ घडे तरी करावें पूजन ॥ अक्षयीं सौभाग्य देतसे ॥२४॥
यास्तव शंभू पुराणपुरुष ॥ ध्यातो विष्णु रात्रंदिवस ॥ एकदां भवानी आणि महेश ॥ पूजनास विष्णु बैसले ॥२५॥
सहस्त्र कमळपुष्पें घेऊन ॥ करितां शंभूचें पूजन ॥ त्यामध्यें एक पुष्प न्यून ॥ आलें पूजन करितां ॥२६॥
विष्णु म्हणे कैसें करावें ॥ पूजा सोडोनी न उठावें ॥ मग उजवा नेत्र देवाधिदेवें ॥ काढोनि वाहिला शिवासी ॥२७॥
तत्समयी शंभू प्रसन्न झाले ॥ वर मागें ऐसें बोलिले ॥ इच्छा असेल येवेळे ॥ माग म्हणे गिरिजापती ॥२८॥
विष्णु म्हणी कैलासराजा ॥ कृपा तुझी वृषभध्वजा ॥ लक्ष्मी ऐसी दिव्य भाजा ॥ प्राप्त झाली तव प्रसादें ॥२९॥
गरुडा ऐसें प्रतापी वहन ॥ प्राप्त झाला तुझे दयेकरुन ॥ कांही इच्छा नसे जाण ॥ विष्णु ऐसें बोलिला ॥३०॥
मग तो शंभू दयासागर ॥ देता झाला सुदर्शन चक्र ॥ तेंहि प्राप्त झालें सत्वर ॥ शंभू पूजनें करोनी ॥३१॥
म्हणोनी कैसालनाथाची पूजा ॥ करितां भाव न धरावा दुजा ॥ अक्षयीं सौभाग्य आणि प्रजा ॥ होतसे बहुगुणी ॥३२॥
हें व्रत कोकिळेचें सुंदर ॥ आणि जे करिती नारीनर ॥ तयासी शिव कर्पूरगौर ॥ अक्षयीं सौभाग्य देतसे ॥३३॥
इति श्रीभविष्योत्तरपुराणे ॥ ब्रह्मोत्तरखंडे ॥ कोकिलामहात्म्यें ॥ सप्तमोऽध्याय गोडहा ॥ अध्याय ॥७॥ श्रीकृष्णार्पणमस्तु
॥ ओंवी ॥३४॥
॥ अध्याय ७ वा समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 29, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP