अवधूतगीता - अध्याय आठवा

अवधूतगीता

अध्याय आठवा
श्रीदत्त म्हणाले, यात्रेने तुझी व्यापकता नाहीशी झाली. ध्यानाच्या योगाने तुझे अंत:करणातून असणे नष्ट झाले. माझ्या स्तुतीने वाणीहून तुझे पर असणे नष्ट केले. म्हणून हे प्रभो कायिक , वाचिक व मानसिक दोषांची क्षमा कर. ॥१॥
वासनेच्या योगाने ज्याची बुद्धि नष्ट झाली नाही, ज्याने इंद्रियांचे दमन केले आहे, जो मृदु, शुद्ध, दरीद्रि, निश्चेष्ट, मित भोजन करणारा, शांत, स्थिर असा असतो तो मुनि माझा असतो. ॥२॥
जो सर्वदा सावध, उदार बुद्धिचा, धैर्यवान, सहाही गुण जिंकिले आहेत, मान सोडलेला पण दुसर्‍याला मान देणारा, सर्वत्र सारखा, मित्र कारूणिक, कवि, कृपाळू, द्रोह न करणारा,शीतोष्ण द्वंद्वे सहन न करणारा, सत्य हेच सार घेणारा, पवित्र आणि सर्वत्र सम व सर्वांवर उपकार करणारा असतो.॥३॥
अवधूताचे लक्षण वेदवर्ण व त्यांचा अर्थ यांचे तत्व जाणणार्‍यांनी वेद आणि वेदांत याविषयी वाद करणार्‍यांनी श्रेष्ठ भगवंतांना जाणावे. ॥४-५॥
आशापाशातून मुक्त, आदि मध्य आणि अंत्य या अवस्थांमध्ये निर्मल असणारा, सर्वदा आनंदामध्ये असणारा अशा गुणयुक्त अवधूतांचे अकार हे लक्षण आहे. ॥६॥
सर्व वासना ज्याने सोडल्या आहेत, ज्याला निरोगी म्हणता येते, वर्तमान अवस्थेमध्ये जो असतो त्या अवधूताचे वकार हे लक्षण आहे. ॥७॥
धुळीमुळे अवयव मलीन झालेला, चित्त अत्यंत निर्मल व आधिरहित असणारा, धारणाध्यान यापासून जो निर्मुक्त झाला आहे त्या अवधूतांचे धूकार हे लक्षण आहे. ॥८॥
जो नित्य तत्वविचार करतो व लौकिक चिंतेने घडणार्‍या चेष्टांनी, अज्ञान व तत्कार्य अहंकार यांनी रहित आहे, अशा अवधूतांचे तकार हे लक्षण आहे.॥९॥
अभिन्न, अक्षय व मोक्षरुप अमृत जो आत्मा त्याचा अव्हेर करुन हा मनुष्यरुपी दुष्ट काक कुठून गेला व आता नरकामध्ये स्वस्थ रहात आहे. ॥१०॥
मनाने, कर्माने व वाणीने सुंदर स्त्रीचा अव्हेर करावा, कारण तिच्यापासून हृदय आनंदित झाले, तरी स्वर्ग व मोक्ष हे तुला प्राप्त होणार नाहीत. ॥११॥
त्या विश्वकर्म्याने ही स्त्री कशी उत्पन्न केली कोण जाणे ? ही स्वर्ग व मोक्ष यांपासून होणार्‍या सुखाची विघातक आहे व विश्चासघातकी आहे असे जाण. ॥१२॥
मूत्र व शोणित यांनी दुर्गंधियुक्त असलेल्या अत्यंत अपवित्र दाराने, दूषित झालेल्या अशा चर्मकुंडामध्ये जे रममाण होतात, ते दोषाने लिप्त होतात यांत काही संशय नाही. ॥१३॥
सर्व प्राण्यांना बद्ध करणारी कुटिलता व दंभ यांनी युक्त, सत्य व निर्मलता यांनी रहित अशी ही स्त्री कोणी बरे निर्माण केली ? ॥१४॥
त्रैलोक्याला उत्पन्न करणारी, त्याचे पालन करणारी छिद्रयुक्त स्त्री म्हणजे शुद्ध नरकच आहे, तिच्या ठिकाणीच उत्पन्न होऊन पुन: तिच्या ठिकाणीच पुरुष रममाण होतो, हरहर ! काय ही संसार स्थिती ? ॥१५॥
स्त्री हा नरक आहे हे मी जाणतो. तसेच निश्वयाने तो बंध हे मी जाणतो. ज्या ठिकाणी उत्पन्न होतो त्याच ठिकाणी रतही  होतो आणि पुन: जन्म घेण्याकरिता तेथेच धाव घेतो. ॥१६॥
योनिछिद्रापासून स्त्ननापर्यंत स्त्रीचा भाग म्हणजे नरकच आहे असे समज. असे असून जे त्या नरकात निमग्न होतात, ते नरकापासून कसे तरणार? ॥१७॥
विष्ठादिघोर नरक आणि भग ही स्त्रीच्या ठिकाणी निर्माण केली आहेत, असे असता हे चित्ता त्याचकडे काय पहातोस? आणि पुन: तिकडेच धावतोस ?॥१८॥
छिद्रयुक्त चर्मकुंडाने व दुर्गंधयुक्त व्रणाने, देव, राक्षस व मनुष्य यासहवर्तमान सर्वज जग नाहीसे करून टाकले आहे. ॥१९॥
ज्या महाघोर देह समुद्रामध्ये सर्वत्र रक्त भरून ठेविले आहे व जी अधोमुख छिद्रानी अशी ही स्त्री कोणी उत्पन्न केली ? ॥२०॥
स्त्रीच्या आंत नरक भरलेला आहे व बाहेर ती कुटिलतेने भूषित झाली आहे असे जाण. ज्ञानी पुरुष स्त्री ही महामंत्राला विरोध करणारी आहे असे जाणतात ? ॥२१॥
जीवित कोठून प्राप्त झाले हे न जाणता त्याच ठिकाणी प्राणी संसार करतात. अहो जेथून उत्पन्न होतो, तेथेच पुन: प्राणी रममान होतो. कोण ही जन्माची विटंबना ? ॥२२॥
देव, असुर व मनुष्य या सहवर्तमान जे मूर्ख प्राणी तेथे रममाण होतात,ते घोर नरकात पडतील यात काही संशय नाही. ॥२३॥
स्त्री ही अग्निकंडासारखी आहे. घृताच्या कलशाप्रमाणे पुरुष आहे. या दोहोंचा संसर्ग झाला असता घृत वितळणारच त्याअर्थी अग्निकुंडरुपी स्त्रीचा सर्वथैव त्याग करावा. ॥२४॥
गौडी, माध्वी आणि पैष्टि अशा तीन प्रकारचा सुरा आहेत. पण स्त्रीही एक चौथी सुरा आहे असे समज. कारण तिने हे सर्व जग मोहून टाकले आहे. ॥२५॥
मद्यपान जसे महापाप आहे त्याचप्रमाणे स्त्रीसंगही महापातक आहे. म्हणून या दोन्ही महा व्यसनांचा त्याग करुन पुरुषाने तत्वनिष्ठ मुनी व्हावे. ॥२६॥
शरीर रस, रक्त, व मांस यांनी दृढ झालेले, चित्ताच्या स्वाधीन असते. पण चित्त नष्ट झाले असता सातही धातु नष्ट होतात. त्या अर्थी पुरुषाने सर्व प्रकारचे चित्ताचे रक्षण करावे कारण चित्त स्वस्थ झाले असता शुद्ध विचार उत्पन्न होतात. आनंदरुप दत्तात्रेय अवधूतानी केलेल्या गीतेचे जे पठन करतात किंवा श्रवण करतात, त्यांना पुनर्जन्म लागत नाही. ॥२७॥
इति श्री दत्तात्रेयकृत अवधूत गीतेतील स्वामी कार्तिकाशी झालेल्या संवादातील स्वात्मसंवित्ति उपदेशातील आठवा अध्याय समाप्त झाला.
॥ श्रीकृष्णार्पण मस्तु ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-03-12T20:09:26.6670000