अवधूत म्हणाले,
ज्या ठिकाणी गुणदोष इत्यादि विभाग (रहात नाहीत) नसतात, जे प्रीति आणि अप्रीति यांनी रह्ति आहे, जे निर्मल निष्प्रपंच, सत्वादिगुणयुक्तही नाही, व तद्रहितही नाही, व्यापक व विश्वतोमुख असे जे आहे, त्या आकाशस्वरूप कल्याणकारक परमात्म्याला मी कसा नमस्कार करावा ? ॥१॥
पांढरा तांबडा इत्यादि रंगांनी रहित व कल्याणकारक, हेच तत्व श्रेष्ठ कार्य कारण रुप आणि कल्याणकारक, याप्रमाणे संकल्प विकल्प रहित असल्यामुळे निर्मल व कल्याणकारक, असा जो मी तो मी हे मित्रा, स्वत:लाच स्वत:चे ठिकाणी कसा नमस्कार करू ? ॥२॥
अकारण व कारण यांनी रहित असा मी आहे, कारण मी सर्वदा प्रकाशरुप आहे. त्याचप्रमाणे मी सर्वदा प्रकाशरुप असल्यामुळे धूम व धूमराहित्य याहूनही निराळा आहे. तसाच मी प्रकाशरूप असल्यामुळे लौकिकप्रकाश व अप्रकाश (उजेड आणि अंधार) याहून निराळा आहे. आणि मी ज्ञानामृतरुप सर्वत्र समरस व गगनासारखा आहे. ॥३॥
ते ब्रम्ह निष्काम आहे की सकाम आहे हे मी कसे सांगू ? तसेच ते निस्संग आहे की संगयुक्त आहे, हे मी कसे सांगावे. आणखी निस्सारता व सारता या धर्मांनी रहित असलेल्या ब्रम्हाचे वर्णन मी कसे करावे ? तात्पर्य ज्ञानामृतरुप व समरस आणि गगनासारखा मी आहे. ॥४॥
सर्वही अद्वैतरुप आहे हे मी कसे बोलावे ? किंवा हे सर्व द्वैतात्मक आहे असे तरी कसे बोलू ? एक नित्य व बाकी सर्व अनित्य असे तरी मी कसे सांगू ? कारण ज्ञानामृत समरस गगनासारखा मी आहे. ॥५॥
ते स्थूल नाही, कृश नाही. त्याला गति आणि अगती नाही ते जन्मस्थितिनाशरहित आहे. ते पर नाही व अपरही नाही. मी सत्य सांगतो की ते परमार्थतत्व ज्ञानामृतरुप समरस व गगनासारखे आहे व तेच ‘मी’ आहे. ॥६॥
सर्वही इंद्रिये आकाशासारखी शून्यरुप म्हणजे असत् (मिथ्या) आहेत असे समज. सर्वही विषय आकाशाप्रमाणे आहेत असे समज. तात्पर्य एक, निर्मल बंधमोक्ष रहित ज्ञानामृतरुप, समरस गगनासारखा मी आहे (असे समज). ॥७॥
मी दुर्बोध नाही, व सुबोध नाही, म्हणू गहनही नाही. त्याप्रमाणे हे शिष्या, ज्याचे लक्षण करिता येत नाही व ज्याचे लक्षण करिता येते म्हणून गहन आहे असेही नाही आणि बाबा, मी सर्वांचे अंत:करणात अगदीच जवळ असल्यामुळे समजण्यास कठीण आहे असे नाही तर मी ज्ञानामृतरुप समरस गगनासारखा असा आहे. ॥८॥
कर्मे न करणार्याही पुरुषांच्या कर्माचे दहन करणारा मी अग्नि आहे. त्याचप्रमाणे निर्दु:खविदेही पुरुषांच्या देहाचेही दहन करणारा मी अग्नि आहे तसेच ज्ञानामृतरुप समरस व आकाशासारखा मी आहे. ॥९॥
निष्पाप व पाप यांना जाळून टाकणारा अग्नि, धर्म व अधर्म यांना जाळून टाकणारा अग्नि आणि बंध आणि निर्बंध यांनाही जाळणाराअ अग्नि व ज्ञानामृतरुप समरस गगनासारखा मी आहे. ॥१०॥
अभाव आणि भाव यानी रहित असा मी नाही. निर्योग किंवा योग यांनी रहितही मी नाही आणि बाळा अरे, निश्चित आणि चिंतारह्तिही मी नाही. तर मी ज्ञानामृतरुप समरस आणि गगनासारखा आहे. ॥११॥
निर्मोह व मोह (मार्ग) असा विकल्प मला नाही. त्याचप्रमाणे सुखमार्ग व दु:खमार्ग हाही विकल्प माझे ठिकाणी नाही. निर्लोभमार्ग किंवा लोभमार्ग असा विकल्पही माझे ठिकाणी नाही, तर ज्ञानामृतरुप समरस आकाशासारखा मी आहे. ॥१२॥
संसार प्रवाहरुपी लता मला कधीही प्राप्त होत नाही. वैषयिक संतोषप्रवाह आणि सुख ही मला नाहीत. आणि हे सर्वानुभूत अज्ञानबंधन मला कधीही प्राप्त होत नाही तर मी ज्ञानामृतरुप (समरस) व गगनासारखा आहे. ॥१३॥
संसार प्रवाहांतील रजोगुण हा माझा विकार नव्हे, तसाच त्या त्रिविधसंतापप्रवाहातील तमोगुण हा माझा विकार नव्हे. स्वधर्मजनक सत्व गुण हाही माझा विकार नव्हे, तर मी ज्ञानामृतरुप समरस आकाशासारखा आहे. ॥१४॥
संताप व दु:ख यांना देव कधी उत्पन्न करीत नाही आणि संतापाच्या योगाने मन कधीहे उत्पन्न होत नाही. कारण, सुख दु:ख संताप इत्यादि सर्व काही अहंकारच आहे. म्हणून तो माझा नव्हे. मी ज्ञानामृतरुप समरस (ओतप्रोत) गगनासारखा आहे. ॥१५॥
कंपरहित स्तब्ध, विकल्पात्मक, स्वप्न जागृति मरण, हित व अहित सारसाहित्य व सारसर्वस्व, चर अचर यांपैकी काहीही नसून मी ज्ञानामृतरुप समरस आकाशासारखा आहे. ॥१६॥
हे तत्व इंद्रियादिकांनी जाणण्यास योग्य नव्हे. हे कशाचेही वेदक म्हणजे ज्ञानसाधनही नव्हे. याचा केवळ हेतूवरून तर्क करिता येत नाही, वाचा, मन आणि बुद्धि यांना विषय न होणारे असे असताना या तत्वाचे मी कसे व्याख्यान करू? कारण ज्ञानामृतरुप समरस आकाशासारखा मी आहे. ॥१७॥
भेद व अभेद यानि रहित असे जे परमार्थ तत्व ते जर अंतर्बहिर नव्हे तर ते परमार्थ तत्व कसे ? सृष्टि उत्पन्न होण्याच्या पूर्वी ते कशाचाही उपभोग घेत नाही व ते कोणती वस्तुही नव्हे. तर मी ज्ञानामृतरुप समरस आकाशासारखा आहे. ॥१८॥
राग, लोभ, मोह, मद इत्यादि दोषांनी रहित असा मी म्हणजेच तत्व आहे. संचित, क्रियमाण आदिकरून दैवदोषरहित असा जो मी संसारापासून होणार्या शोकादिकांनी रहित असा जो मी तेच तत्व. सारांश मी ज्ञानामृतरुप समरस गगनोपम आहे. ॥१९॥
जाग्रत्, स्वप्न, सुषुप्नि, ही तीन स्थानेच जर नाहीत तर तुरीय कोठून आले ? तसेच भूत भविष्य वर्तमानादि जे कालत्रय जर नाहीत तर दिशा कोठून आल्या ? कारण अत्यंत श्रेष्ठ शांतपद जे परमार्थ तत्व व जे ज्ञानामृतरुप समरस गगनासारखे आहे, ते मीच आहे. ॥२०॥
परमार्थिक अवस्थेमध्ये एकदा लघु आणि पुन: दीर्घ असा माझे ठिकाणी विभाग नाही. तसेच त्या अवस्थेमध्ये असताना विस्तृत आणि संकुचित हाही पण माझा विभाग नाही. तर ज्ञानामृतरुप समरस गगनासारखा मी आहे. ॥२१॥
आईबाप मुलगा इत्यादिक हे माझे कधीही नव्हे तर निर्व्याकुल, स्थिर, ज्ञानामृतरूप समरस व गगनोपम असे हे परमार्थ तत्व मी आहे. ॥२२॥
ते शुद्ध आहे अथवा अशुद्ध आहे, याविषयी विचार करिता येत नाही. ते अनंतरुप आहे. त्याचप्रमाणे ते लिप्त आहे किंवा अलिप्त आहे याचाही विचार करता येत नाही. कारण ते अनंतरुप आहे. सारांश ज्ञानामृतरुप समरस गगनासारखे परम तत्व ते मी आहे. ॥२३॥
जर निर्मल एकरुप असे परमार्थ तत्व आहे, तर ब्रम्हा विष्णु इत्यादि सुरगण हे कोठून आले ? तसेच स्वर्गादिक लोक तरी तेथे कसे असणार ? सारांश ज्ञानामृतरुप समरस गगनासारखा मी आहे. ॥२४॥
असा इतिस्वरूप आनि नेतिस्वरूप ज्यावे वर्णन केले जाते, तो स्पष्ट आहे असे मी कसे म्हणू ? तसेच नि:शेष व सशेष असल्यामुळे तो निर्मल आहे हे तरी मी कसे म्हणू ? चिह्यरहित व चिह्ययुक्त असल्यामुळे तो निर्मल आहे हे तरी मी कसे म्हणू. मी ज्ञानामृतपूर्ण समरस असा गगनासारखा आहे. ॥२५॥
निष्कर्मातील श्रेष्क कर्मे मी सर्वदा करतो. नि:संग व संग, निर्देह व देह हे रहित म्हणून सर्वदा आश्चर्यकारक असे जे ज्ञानामृतरुप समरस परम तत्व मी आहे. ॥२६॥
प्रपंच रचना माया आहे हा माझा विकार नव्हे. कुटिलता व दंभता, सत्यरचना व असत्यरचना माझा विकार नव्हे, तर मी ज्ञानामृतरुप समरस परम तत्व मी आहे. ॥२७॥
संध्यादि कालानीरहित म्हणून कोणाशी वियोग नाही, अंत:करण प्रबोधरहित असल्यामुळे बधिर किंवा मुका नाही विकल्परहित म्हणून अंत:करण प्रबोधरहित असल्यामुळे बधिर किंवा मुका नाही. विकल्परहित म्हणून अंत:करण शुद्धिही नाही. सारांश ज्ञानामृतरुप समरस परम तत्व मी आहे. ॥२८॥
कोणाचाही स्वामी नसणे किंवा असणे, या उभय भावना नसल्याने क्लेशरहित, प्रवृत्ति व निवृत्ति यांनी रहित, असल्यामुळे क्लेश रहित, सर्वगत असल्याने निराकुल असे गगनाप्रमाणे असणारे ज्ञानामृतरुप समरस परम तत्व मी आहे. ॥२९॥
हे अरण्य आहे, मंदिर आहे हे कसे म्हणू ? संशयाने भरलेले तरी कसे म्हणू ? सर्वत्र सारखे निरंतर व निराकुल असे ज्ञानामृतरुप समरस परम तत्व मी आहे. ॥३०॥
निर्जिव व सजीव, निर्बिज व सबीज, बंध व मोक्ष यांनी रहित असे मला सर्वदा भासते. मी ज्ञानामृत परमतत्व आहे.॥३१॥
हे तत्व जन्मरहित, संसारबंध वर्जित भासते. प्रलय रहित असाही अनुभव येतो. सारांश, ज्ञानामृतरुप समरस परम तत्व मी आहे. ॥३२॥
केवळ निर्देश करण्यापुरतेसुद्धा नामरुप नाही, निर्भिन्न व भिन्न अशी काही तुझी वस्तु नाही असे असता हे निर्लज्ज मना, खेद कशाला ? ज्ञानामृतरुप समरस परम तत्व मी आहे. ॥३३॥
मित्रा ! तुला जरा, मृत्यू, जन्म दु:खही नाही कोणताही विकार नाही मग का बरे रडतोस. ? मी ज्ञानामृतरुप समरस परम तत्व आहे. ॥३४॥
मित्रा ! स्वरूप, विरुप व वयही तुझी नव्हेत तर मग का रडतोस ? मी ज्ञानामृतरुप समरस परम तत्व आहे. ॥३५॥
मित्रा, आयुष्य मन, इंद्रिये तुझी नव्हेत असे असता तू का रडतोस ? कारण मी ज्ञानामृतरुप समरस परम तत्व आहे. ॥३६॥
मित्रा ! काम, लोभ व मोह तुझे नव्हेत, असे असून व्यर्थ शोक कां ? कारण मी ज्ञानामृतरुप समरस परम तत्व आहे. ॥३७॥
बाबारे ! हे धन तुझे नव्हे, पत्नी तुझी नव्हे माझे म्हणण्यासारखे असे काही नसताना ऐश्यर्याची कशी इच्छा करितोस मी ज्ञानामृतरुप समरस परम तत्व आहे. ॥३८॥
लिंगदेह, प्रपंच, जन्म, हे तुझे नव्हेत आणि माझेही नव्हेत. पण हे निर्लज्ज मन हे सर्व भिन्न भिन्न असल्यासारखे भासवते. निर्भेद व भेद यांनी रहित असे तुझे काही नाही व माझेही काही नाही कारण मी ज्ञानामृतरुप समरस परम तत्व आहे. ॥३९॥
तुझे एक अणुमात्रही विरक्त रुप नाही त्याचप्रमाणे एक अणुमात्रही तुझे अनुराग (आसक्तियुक्त) रुप नाही. तसेच एक अणुमात्रही तुझे सकाम रूप नाही. तर मी ज्ञानामृतरुप समरस परम तत्व आहे. ॥४०॥
हृदयामधील ध्याता तुझा नव्हे व समाधि तुझी नव्हे, हृदयातील ध्यानही तुझे नव्हे व अंत:करणाच्या बाहेरचा प्रदेशही तुझा नव्हे. हृदयातील ध्येय तुझे नव्हे व वस्तु काल हीही तुझी नव्हेत. तर मी ज्ञानामृतरुप समरस परम तत्व आहे. ॥४१॥
जे अध्यात्म विद्येतील श्रेष्ठ सार तुला मी सांगितले ते तू नव्हेस. मी, दुसरा कोणीही मोठा, गुरु शिष्य नव्हे हे होय. तर स्वतंत्ररूप सहज आकाशासारखे ज्ञानामृत सर्वत्र सारखे, असे जे परमार्थ तत्व तेच मी आहे. ॥४२॥
जर श्रेष्ठ एक व आकाशासारख्या अशा तत्वरुपाने मी रहातो, तर हे परमार्थ तत्व आनंदरूप नव्हे तरी कसे ? त्याचप्रमाणे हे परमार्थ तत्व ज्ञान विज्ञानरूप कसे ? ॥४३॥
ते तत्व अग्नि व वायू रहित व विज्ञान रूप व एक आहे असे जाण. तसेच निरभु, गगन रहित विज्ञानरूप व एक आहे असे जाण. पण आकाशासारखे विशाल विज्ञान रूप एक आहे असे जाण.॥४४॥
ते तत्व अभाव रूप नव्हे व भाव रुपही नव्हे. शुद्धरुप नव्हे व अशुद्धरुप नव्हे. म्व्व रुप व विरुप असा दोन्ही होत नाही तर हे परमार्थ तत्व स्वरूपानेच रुपवान असते. ॥४५॥
संसाराला सोड, तसेच अभिमानाने यज्ञादिक कर्मे करणेही सर्वथैव सोड. सर्वसंग परित्याग केला असता कर्मोपभोगरूप विष हे शुद्ध सहज व नित्य अमृ्त होत. ॥४६॥
ह्या प्रमाणे श्रीदत्त्तात्रेयकृत अवधूत गीतेतील आत्मासक्ती उपदेश नावाचा तिसरा अध्याय संपूर्ण झाला.