अवधूत म्हणाले
तो बालक आहे, किंवा विषयभोगामध्य्रे निमग्न आहे, किंवा मूर्ख आहे, किंवा कोणाचा सेवक आहे, किंवा तो घरातच राहणारा आहे. गुरूविषयी असे शुद्र विचार करीत बसू नये. व्यवहारामध्ये तरी अत्यंत अमंगल ठिकाणी पडलेले रत्न कधी कोणी टाकतो काय ? ॥१॥
गुणी पुरुषाने गुरुपदेशातील केवळ काव्यगुणाचा विचार करु नये. तर त्यातील सारभूत तत्वाकडेच लक्ष द्यावे. सिंधूरादि रंगांनी चित्रविचित्र न केलेली आणि म्हणूनच रुपहीन असलेली अशी नौका पार जाणार्‍यांना पलीकडच्या तीरास नेत नाही काय ? ॥२॥
प्रयत्नावाचून जे निश्वल तत्व चराचराला व्यापून आहे ते चैतन्य हे स्वभावत: आकाशाप्रमाणे शान्त आहे. ॥३.॥
जो प्रयत्नावाचून सर्व चराचर जगताकडून व्यवराह करवितो तो सर्वव्यापी एक तत्वच आहे. असे असताना ते तत्व भिन्न कसे होणार ? मला तर ते अभिन्नच आहे असा प्रत्यय येतो. ॥४॥
मीच श्रेष्ठ, सारासाराहून वेगळा कल्याणरुप, जन्ममृत्यूरहित, विकल्परहित म्हणून दु:खादिकांनी व्याकुल न होणारा आहे. ॥५॥
सर्व अवयवांनी रहित व देवादिकांनी होणारे जे विभाग ते माझे नव्हेत. ॥६॥
ज्याप्रमाणे पाण्यावर बुडबुडे उठतात व मावळतात यात संशय नाही. कारण वृत्तींनी युक्त असा मी काय करणार आहे. ॥७॥
प्राणिमात्राचे ठिकाणी आकाशादि पंचमहाभूते नित्य व्यापून असतात. मऊ पदार्थात मार्दव, कठोर पदार्थात काठिण्य, गुळात गोडी, तिखट पदार्थात तिखटपणा भरून असतो. पाण्यातही जशी मृदुता आणि शीतता जशी (एकत्रच) असते त्याप्रमाणे प्रकृति आणि पुरुष अभिन्न असल्याचे माझे मत आहे. ॥८-९॥
विकाराला प्राप्त होणारी जेवढी म्हणून नावे आहेत; त्यांनी रहित, सूक्ष्माहूनही सूक्ष्म, सर्वात श्रेष्ठ, मन, बुद्धि,वगैरे इंद्रिये यांना विषय न होणारे व निष्कलंक जगत्पति असे जे ॥१०॥
स्वभावसिद्ध आत्मतत्व तेथे ‘तू’ मी, व हे सर्व चराचर हा भेद कोठून येणार ? ॥११॥
गगनाची उपमा देऊन ज्याचे वर्णन केले, ते गगनासारखेच आहे. ते चैतन्यस्वरूप, दोषहीन व सर्वज्ञ असे आहे. ॥१२॥
पृथिवीमध्ये त्याचा व्यवहार होत नाही, वायूचे योगाने तो वाहिला जात नाही. उदकाचे योगाने तो भूपृष्ठाप्रमाणे झाकले जात नाही. मात्र ते तेजामध्ये राहिले आहे. म्हणजे ते तेजोमय आहे. ॥१३॥
त्या सच्चिदानंदस्वरूप परमात्म्याने हे सर्व व्यापून टाकिले आहे, परंतु त्याला मात्र कोणी व्यापित नाहीत त्याने सर्वही कार्य समूह आत आणि बाहेर कसा (बाह्याभ्यंतर) व्यापून टाकिला आहे. ॥१४॥
तें तत्व अत्यंत सूक्ष्म आहे, अदृश्य आहे व निर्गुण आहे म्हणून योगी जनांनी नाभिकमल, हृदयदेश आणि कंठस्थान इत्यादि ठिकाणी शालिग्राम, बाण आदींच्या आश्रयाने ध्यान करावे ! असे जे सांगीतले आहे त्याचाच क्रमाक्रमाने आश्रय करावा. ॥१५॥
दीर्घ कालपर्यंत अभ्यासाने युक्त झालेला पुरुष, ज्यावेळी निरालंब होईल त्यावेळी आश्रयाचा लय झाला असता त्याचा लय होईल. म्हणजे समाधी लागेल. परंतु अंतरातील गुणदोष टाकून दिले नाहीत तर अशी समाधी लागणार नाही. ॥१६॥
अत्यंत भयंकर मोह आणि मूर्छा उत्पन्न करणार्‍या अशा विषरुपी विश्वाचा नाश करण्याकरित कधीही निष्फळ न होणारे असे स्वभावसिद्ध अमृत (मोक्ष) हेच एक समर्थ आहे. ॥१७॥
ते तत्व अनुभवाने जाणता येण्यासारखे, तत्वत: निराकार, (परांड प्राकृत पुरुषांच्या दृष्टीने) साकार ज्ञानदृष्टीला गोचर, भाव आणि अभावरहित व मध्य स्थितीप्रमाणे रहाणारे म्हणजे अनिर्वाच्य असे ते तत्व आहे, असे म्हणतात. ॥१८॥
विश्व बाह्यरुपाने प्रतीत होते, आणि प्रकृति विश्वाच्या आत आहे असे म्हणतात.  परंतु नारळातील पाण्याप्रमाणे सर्वांच्याही आत असलेल्या प्रकृतीच्याही आत ते (ज्ञेय) आहे. ॥१९॥
भ्रांतिज्ञान हे सर्वांच्या बाहेर आहे. वास्तविक ज्ञान मध्यवर्ती आहे आणि नारळांतील पाण्याप्रमाणे, ह्या मध्यज्ञानाच्याही आत असणारे असे ते ज्ञेय आहे.॥२०॥
पोर्णिमेच्या दिवशी अत्यंत निर्मल असा एकच चंद्र असताना जसे दृष्टिदोषाने दोन चंद्र दिसतात, त्याचप्रकाराने बुद्धिभेद आहे. तो सार्वत्रिक नव्हे म्हणजे सत्य नव्हे. त्या परमात्म्या विषयींचा साधकाला दृढ निश्चय होतो, आणि तो साधक हजारो नावांनी त्याची स्तुती करितो. ॥२१-२२॥
गुरुच्या ज्ञानप्रसादाने मूर्ख किंवा पंडित कोणीही जरी असला, तरी त्याला तत्वाचा बोध होतो. आणि तत्वबोधानंतर तो या भवसागराविषयी विरक्त होतो. ॥२३॥
जो रागद्वेषांनी रहित, सर्व भूतांच्या कल्याणाविषयी तत्पर ज्यांचे तत्वज्ञान दृढ झाले आहे, व म्हणूनच जो अत्यंत धीट आहे त्यालाच प्रम पुरुषार्थ प्राप्त होतो. ॥२४॥
घट फुटला असता घटाकाश जसे महाकाशामध्ये मिळून जाते, त्याचप्रमाणे (स्थूल सूक्ष्म कारण या) देहांचा नाश झाला असता योगी परमात्म्यामध्ये मिळून जातो. ॥२५॥
कर्मद्वारा मुक्त होणार्‍या पुरुषांची मरणकाली जी मति असते ती गति त्यांना प्राप्त होते, असे सांगितले आहे. परंतु (अष्टांग) योगांनी युक्त असलेल्या पुरुषांची अंती जी मति असते, तीच त्यांना गती मिळते, असे कोठेही सांगितलेले नाही. ॥२६॥
कर्म करणार्‍या पुरुषांना जी गति प्राप्त होते, त्या गतीचे वाणीने वर्णन करिता येते, परंतु योगी पुरुषांना जी गति प्राप्त होते, व जी आपण स्वत: प्राप्त करून घेतली आहे, ती अवर्णनीय आहे. ॥२७॥
याप्रमाणे हा मार्ग आहे, असे जाणल्यानंतर योग्यांना या मार्गाविषयी मग कधीही विकल्प होत नाही. कारण ते सर्वदा संकल्पविकल्परहित असतात आणि म्हणून सिद्धि त्यांच्याकडे चालत येते. ॥२८॥
तीर्थाचे ठिकाणी किंवा चांडालाचे घरी कोठेही जरी योगी पुरुष मृत झाला तरी त्याला गर्भवास अनुभवावा लागत नाही. तर तो परब्रम्ही लीन होतो. ॥२९॥
स्वभावत:च जन्मरहित व अचिंत्य अशा स्वरूपाचा ज्याला अनुभव येतो, तो मनाला वाटेल तसा जरी व्यवहारात वागला तरी त्याला दोष सोडीत नाहीत. आणि ज्याअर्थी ह्याप्रमाणे त्याला दोष लागत नाही. त्याअर्थी एखादेवेळी त्याए जरी काही कर्म न केले, तरी त्याचे योगाने तो संयमी किंवा तपस्वी बद्ध होत नाही. ॥३०॥
आधिव्याधिरहित, अलौकिक, आकृतिरहित, निराश्रय, निराशरीर, निरिच्छ, सुख:दुख-शीतोष्णादिक द्वंद्वरहित, मोहरहित, आणि सर्वदा अकुंठित शक्ति असणार्‍या परमेश्वरस्वरूप नित्य आत्म्यला तो जाऊन मिळतो. ॥३१॥
ज्या ठिकाणी ऋग्वेदादि देव याजमानादि दीक्षा मुंडनादिक्रिया, गुरु, शिष्य, यंत्र संपत्ति, आणि मुद्रा इत्यादि चिन्हांचे भानही नाही, त्या नित्य, ईश्वराप्रत तो
प्राप्त होतो. ॥३२॥
शंभुसंबंधी, शक्तीसंबंधी, किंवा मनुष्यासंबंधी शरीररुप किंवा स्थान हे ज्याठिकाणी नाही, त्याचप्रमाणे घटादिकांचा मृत्तिकेपासून जसा आरंभ होतो तसा ज्याचा कोणापासूनही आरंभ होत नाही, असतो नित्य ईशरुप आत्मा. त्याला तो साधक प्राप्त होतो. ॥३३॥
पाण्याचा विकार होऊन जसे बुडबुडे आणि फेस पाण्यापासून उत्पन्न होतात व पाण्याच्याच आश्रयाने रहातात; आणि पाण्यामध्येच जसे नाहीसे होतात, त्याप्रमाणे ज्याच्या स्वरूपापासून हे सर्व चराचर जग उत्पन्न होते, ज्याच्या आश्रयाने रहाते आणि ज्याच्या मध्येच नाशानंतर मिळून जाते, त्या नित्य ईश्वर आत्म्याला साधक प्राप्त होतो. ॥३४॥
ज्याठिकाणी वायूचा विरोध कऋन प्राणायमादि, नासिकाग्रदृष्टी, पद्म इत्यादिक आसने व बोध किंवा अबोध यांचे भान होत नाही. ज्याठिकाणी ईडा (पिंगला) इत्यादी नाडीतून वायूची गति नाही, त्या नित्य ईश आत्म्याला तो साधक मिळतो. ॥३५॥
अनेकत्व, एकत्व, अभयविधत्व, सूक्ष्मत्व, दीर्घत्व, महत्व, प्रमाणत्व, प्रमेयत्व, (प्रमाणांनी समजण्यास योग्य) आणि समत्व यांनी रहित असा जो नित्य परमेश्वर आत्मा त्याला तो साधक प्राप्त होतो. ॥३६॥
उत्तम संयमी (इंद्रियनिग्रह करणारा) किंवा इंद्रियदमन न करणारा, सुसंग्रही किंवा संग्रहरहित, कर्म न करणारा  किंवा कर्म करणारा, असा जो नित्य ईशात्मा त्यात तो साधक प्राप्त होतो. ॥३७॥
मन, बुद्धि, इंद्रिये, शरीर, आकाशादिक सूक्ष्म भूते, स्थूल भूते व अहंकार यांपैकी तो कोणी एक नसून स्वरुपाने आकाशासारखा असा जो नित्य ईश आत्मा त्याला साधक प्राप्त होतो. ॥३८॥
कर्माचा विरोध झाला असता व योग्याला परमात्म्याची प्राप्ति झाली असता व अंत:करणांतील भेदभावना नाहीशी झाली असता, व शुद्धता अशुद्धता इत्यादी सर्व चिन्हे नष्ट झाली असता, नंतर साधकाने सर्व गोष्टी कराव्या किंवा सोडाव्या. त्याला विधिनिषेध नाही. ॥३९॥
मन ज्याच्याविषयी कल्पना करु शकत नाही. वाणी बोलत नाही तेथे गुरु उपदेशा कोठून आली. गुरुपदेशदीनेयुक्त असलेल्या पुरुषालाच सम असणार्‍या तत्वाचा बोध होतो. ॥४०॥

दुसरा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : March 12, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP