श्री दत्त म्हणाले, ॐ असे पद गगनासारखे आहे असे सांगतात, पण परापराच्या सारभूत विचाराशी ते जुळत नाही. कधीही क्षय न पावणारा सबिंदू ॐकाराचा उच्चार अविलास व विलास या सृष्टिधर्माचे निराकरण कसे करणार ? ॥१॥
अशा चिंतेने ’तत्वमसिं’ प्रभृति श्रुतीनी, ते तू आहेस असे आत्म्याचे प्रतिपादन केले असता तूं उपाधिरहित व सर्व ठिकाणी सारखा असा होतोस. मग मन सर्वसम झाल्यानंतर व्यर्थ का शोक करीत आहेस. ॥२॥
खाली किंवा वर नसून सर्वत्र सारखे अंतर्बाह्य नसून सर्व सारखे, तसेच जर एकतत्वाने रहित असून सर्व सम असे ते तत्व आहे व त्याच्या सर्व साम्याविषयी मनाचा निश्चय झाला आहे तर मग का उगाच शोक करतोस ? ॥३॥
कल्पिलेले अनेक विचार व कार्यकारण व कार्यकारण विचार नाही, त्या अर्थी सर्व सम ते आहे असा निश्वय झाला असता व्यर्थ शोक करतोस. ॥४॥
मन सर्वत्र सम असता ज्ञान अज्ञान प्रयुक्त समाधान नाही म्हणून देश विदेश प्रयुक्त काल अकाल प्रयुक्त समाधान नाही म्हणून का व्यर्थ शोक करतोस. ॥५॥
घटाकाशही नाही व घटही नाही म्हणून जीवाचे शरीर व जीव आणि कार्यकारण विभाग नाही म्हणून का व्यर्थ शोक ? कारण मन स्वस्थ असता सर्व समत्वाचा अनुभव येतो. ॥६॥
मन सर्वत्र सम झाले असता ते निर्वाण पद सर्वत्र अंतर रहित आहे. लघु, दीर्घ व वर्तुळ कोण असे त्याचे विभाग नसतात या विचारांनी रहित असे आहे व्यर्थ शोक का? ॥७॥
सम मन झाले असता ते तत्व शून्य व अशून्य, शुद्ध व अशुद्ध, सर्व आणि पृथक यांणी रह्ति असे आहे म्हणून व्यर्थ शोक का करितोस ? ॥८॥
भिन्न व अभिन्न बहि:संधि व अंत:संधि यांचा विचार नाही म्हणून शत्रु मित्र या भावनेने रहित असे असता व्यर्थ शोक का ? ॥९॥
मानस सर्व सारखे झाले असता शिष्य किंवा अशिष्य, चराचर भेद विचार नाही सर्वत्र अंतर रहित मोक्षपदच एक आहे म्हणून का व्यर्थ शोक करितोस. ॥१०॥
रुप आणि विरुप, पृथकरव व अपृथकरव, उत्पत्ती व प्रलय यांनीरहित आहे म्हणून मन सम झाल्यावर व्यर्थ शोक का ? ॥११॥
गुण व निर्गुण या पापानी बद्ध झालो नाही म्हणून ऐहेक व पारमार्थिक कर्म कसे करु. या विवंचनेने मन सर्वत्र सम झाले असता शुद्ध निरंजन सर्वत्र सम अशा तत्वाविषयी का शोक ? ॥१२॥
मन सम झाले असता ते तत्व भाव व अभाव आशा व निराशा यांनी रहित आहे म्हणून ते तत्व बोधमय व मोक्षरूप असल्यामुळे व्यर्थ शोक का ? ॥१३॥
मानस एक झाले असता तत्व अंतर रहित, तसेच संधि व विसंधि यांनी रहित जरी सर्व रहित व सर्वत्र आहे तरी शोक का ? ॥१४॥
घर नसलेल्या, परिवार नसलेल्या, संग-असंग संबंध नसलेल्या, जाणते-नेणतेपणाचा विचार नसलेल्या एखाद्या सामान्याप्रमाणे तू येथे मनात का रडत आहेस ? ॥१५॥
विकारांनी विकृत न होणारे, असत्य म्हणून कोणत्याही तक्षणांनी लक्षित न होणारे व असत्य म्हणून जरी आत्मतत्व हेच एक केवळ सत्य आहे, तर सर्वत्र मन सम झाले असता शोक का ? ॥१६॥
सर्व सर्व म्हणून जो काय तो जीवच आहे. त्याचप्रमाणे या सृष्टीमध्ये अंतर रहित, केवल निश्चल असा एक जीवच आहे असे असता शोक का ? ॥१७॥
अविवेक, विवेक व अज्ञान, अविकल्प, विकल्प व अज्ञान जरी एक निरंतर ज्ञान असे ते आहे तर तू शोक का करितोस ? ॥१८॥
मन सर्वत्र सम असता, मोक्षपद, बंध पद, पुण्यपद, पापपद, पूर्णपद रिक्तपद नाही असे असताना शोक का? ॥१९॥
जर वर्ण, विवर्ण, कार्य, कारण, भेद अभेद यांनी रहित सम आहे तर शोक का? ॥२०॥
या ठिकाणी सर्व अंतर रहित सर्व ओतप्रोत भरलेले, केवल निश्चल व सर्व व्यापी, द्विपदादिकांनी रहित व सर्व व्यापी असे तत्व व मन साम्य पावले असता का रडतोस ? ॥२१॥
मानस साम्यतेला पावले असता सर्वांचे अतिक्रमण करणारे निरंतर व सर्वगत, क्रीडेने निर्मल व निश्चय व सर्वगत, दिवस व रात्र यांनी रहित अशा सर्वगत तत्वाविषयी शोक का करतोस ? ॥२२॥
मानस सम झाले असता बंध मोक्ष, योग, वियोग, तर्क कुतर्क प्राप्ति नाही; मग का रडतोस ? ॥२३॥
या ठिकाणी काल व अकाल यांचे निराकरण करणे म्हणजे थोड्याशा दीप्तीचे निराकरण करण्यासारखे आहे, पण ते केवल सत्य निराकरण नव्हे, त्या अर्थी मन सम झाले असता का व्यर्थ शोक करतोस ? ॥२४॥
या ठिकाणी देह आणि विदेह, स्वप्न आणि सुषुप्ति यांनी रहित असून, श्रेष्ठ नामनिर्देशानेही, ते रहित तर मग शोक का व्यर्थ करतोस? ॥२५॥
गगनाप्रमाणे शुद्ध विशाल व सारखे, सर्व सम, सार आणि असार विकारांनीरहित असून, मन:साम्य झाल्यावर शोक का करतोस ? ॥२६॥
मन:साम्य झाले असता धर्म व अधर्म, वस्तु आणि अवस्तु काम आणि अकाम यांची अत्यंत विरक्ति हे असता व्यर्थ शोक का करतोस. ॥२७॥
सुख आणि दु;ख शोक आणि अशोक, श्रेष्ठ व गुरुशिष्य भाव रहित असे श्रेष्ठ तत्व असताना व मन सम झाले असता शोक का ? ॥२८॥
खरोखर सृष्टीमध्ये सार व असार, चल व अचल, साम्य झाले असता का रडतोस ? ॥२९॥
आपल्या मनोभावांच्या भेदामुळे या ठिकाणी सर्व साराचेही सार सांगितले आहे. कारण विषयांचे ठिकाणी साधनत्व हे असत्य आहे. मनाचे साम्य असता तू का शोक करतोस. ॥३०॥
ज्या अर्थी बहुत प्रकारांनी श्रुति हे सर्व आकाशादिक जगत मृगजलाप्रमाणे असल्याचे सांगतात तथापि तत्व निरंतर व सर्व सम आहे, तर मन:साम्य झाले असता का रडतोस ? ॥३१॥
ज्ञान हे ज्या ठिकाणी मुळीच नाही छंदोलक्षण ही जेथे नाही. साम्य रसामध्ये मग्न झाल्याने ज्याचे अंत:करण परम पवित्र झाले आहे असा अवधूत श्रेष्ठ तत्व सांगतो. ॥३२॥
ह्याप्रमाणे दत्तात्रेय विरचित अवधूत गीतेतील स्वामी कार्तिक संवादविषयक आत्मसंवित्युपदेशापैकी शमदृष्टीकथन नावाचा पांचवा अध्याय संपूर्ण झाला.