अवधूतगीता - अध्याय सातवा
अवधूतगीता
श्री दत्त म्हणाले, रस्त्यातील चिंध्यांची गोधडी ज्याने पांघरलेली आहे. पुण्य व पाप यांचा मार्ग सोडला आहे, जो शुद्ध निरंजन व समरसात मग्न आहे असा सिद्ध पुरुष शून्य गृहात नम्र रहातो. ॥१॥
लक्ष्य व अलक्ष्य यांनी रहित पण लक्षणाला गोचर होणारा युक्त व अयुक्त पण दक्ष असा केवल निर्मल तत्वाचा साक्षात्कार झाल्याने पवित्र झालेला अवधूत वादविवाद कशाचा करणार ? ॥२॥
आशापाशामुळे प्राप्त बंधनापासून मुक्त पवित्रतादि आचारांनी रहित याप्रमाणे सर्व धर्मांनी रहित असलेले निरंजन संत पुरुष ते तत्व जाणतात. ॥३॥
या ठिकाणी देह विदेह विचार कसा असेल ? राग विराग विचार तरी कसा ? कारण स्वत: सिद्ध सहजरुपाने, निर्मल निश्चल गगनासारखेच तत्व येथे आहे. ॥४॥
ज्या ठिकाणी तत्वज्ञानच भरलेले आहे तेथे रुप व अरुप कोठून आले ? ज्या ठिकाणी गगनासारखा श्रेष्ठ परमात्मा आहे तेथे विषयीकरण कोठचे ? ॥५॥
तो गगनासारख्या आकराचा व निरंतर असा हंस व तत्वत: विशुद्ध व निरंजन असा हंस आहे. त्यामध्ये भिन्नता किंवा अभिन्नता कशी असणार ? कारण
बंध मोक्ष विकारांनी रहित तो आहे. ॥६॥
तत्व केवल निरंतर व सर्वत्र आहे. तर मग योग वियोग किंवा गर्व तेथे कसे ? त्याचप्रमाणे घनदाट व परिपूर्ण असे ते तत्व असताना सार किंवा असार ते कसे ? ॥७॥
ते तत्व केवल निरंजन व परिपूर्ण असे आहे. गगनाकार निरंतर शुद्ध आहे. असे असता संग व विसंग हे कसे ? अथवा तेथे रंग वा बेरंग हे सत्य कसे ?
॥८॥
योग आणि वियोग यांनी रहित असा योगी भोग आणि विभोग यांनी रहित असा भोगी, ह्याप्रमाणे मनाने सहज स्वरूपभूत आनंदाची कल्पना करीत सिद्ध पुरुष मन्द मन्द आपले आचरण जगात ठरवितो. ॥९॥
ज्ञान व अज्ञान यांनी नेहमी मुक्त असणारा पुरुष द्वैत आणि अद्वैत यापासून युक्त कसा असणार ? रक्त व विरक्त असा योगी तरी तेथे कसा मिळणार?॥१०॥
भिन्नता व अभिन्नता यांनी रहित पण भग्र, लग्र व अलग्र यांनी रहित पण संबद्ध अशा प्रकारच्या तत्वामध्ये सार किंवा असार कसा ? कारण ते अंतर्बाह्य एकरसाने व्यापून राहणारे असे तत्व आहे व तो परमात्मा गगनाकार आहे. ॥११॥
सर्वदा सर्वाहून पृथक असून युक्त व सर्व तत्वानी रहित असून मुक्त असे असताना जीवित आणि मरण ते कसे ? ध्यान आणि ध्येय यांची कर्तव्य तरी काय ? ॥१२॥
ज्याप्रमाणे मारवाड देशामध्ये भासणारे मृगजल त्याप्रमाणे हे सर्वही इंद्रजाल आहे आणि अखंड निराकार व केवल शिव असा परमात्मा पृथक आहे. ॥१३॥
धर्मापासून मोक्षापर्यंत आम्ही सर्वही प्रकारांनी निरीच्छ झालो आहोत. असे असताना ज्ञानी लोक राग आणि विराग यांनी युक्त कसे होणार ? ॥१४॥
ज्ञान ज्ञान असा शब्दच जेथे नाही तेथे छंदो लक्षणही नाहीच. समरसामध्ये मग्न झालेला असल्यामुळे ज्याचे अंत:करण पवित्र झाले आहे, असा अवधूत परम तत्वाविषयी बोलतो. ॥१५॥
सातवा अध्याय समाप्त.
===============================
N/A
References : N/A
Last Updated : March 12, 2018
TOP