अध्वप्रत्यय
वृत्त म्हणजे कांहीं नियमित अक्षरांत लघु- गुरुंची विशिष्ट क्रमानें रचना करुन दाखविणें.
संख्यैव व्दिगुणैकोना सभ्दिध्वा प्रकीर्तित: ।
वृत्तस्यांगुलिकी व्याप्तिरध: कुर्यात्तथांगुलिम् ॥
प्रस्तार - नष्ट - उद्दिष्टादि प्रकार करावयाचे असतील तर ते मांडण्याला स्थल केवढें पाहिजे, याचा यांत विचार केला आहे. प्रस्ताराची जी संख्या येईल तितकी अंगुली दुप्पट करावी व तींत एक कमी करावा. मग जी संख्या येईल तितकी अंगुली जागा लागेल असें समजावें. यावरुन असें दिसतें कीं, प्रस्तारांतील लघु - गुरु चिन्हें करावयाचीं तीं अंगुलपरिमाणांत काढावीं, व उद्दिष्टामध्यें आकडे वर घालावे लागतात त्याकरतां त्यांस अंगुलिपरिमित जागा टाकावी. किंवा अशींच कोष्टकें करावीं. आतां याप्रमाणें कोष्टकें केलीं तर प्रस्ताराच्या संख्येच्या दुप्पट करावीं लागतील. मग त्यांत एक कमी कां करावयाचा ? अशी शंका येईल याचें उत्तर असें आहे कीं , प्रस्तारांतील पहिला जो सर्व गुरुचा प्रकार त्याचें उद्दिष्ट काढतां येत नाही. कारण तो सर्व गुरु असल्यामुळें त्यांच्यावरील कोणताच आकडा उद्दिष्टाच्या नियमाप्रमाणें जमेस धरतां येत नाही. तेव्हां त्याचें उद्दिष्टच काढतां येत नाही. म्हणून प्रथम प्रकारावर उद्दिष्टाचे आकडे टाकण्याकरितां अंगुलिपरिमित ‘ एकोना ’ असें म्हटलें आहे. असो याप्रमाणें प्रस्तारादि सहा प्रत्ययांचें विवरण केलें आहे. त्याच्या युक्तायुक्ततेचा पंडितांनीं विचार करावा. वृत्तरत्नाकरीतील या विषयाचें येथें विवेचन करण्याचा हेतु एवढाच कीं ही माहिती वाचकांस झाली म्हणजे जोशीबुवांनीं जें या विषयासंबंधाने विवेचन केलें आहे तें समजण्यास सोपें जाईल. असो. आपण जोशीबुवांनीं संस्कृतांत दिलेला मजकूर प्रथम देऊन नंतर त्याचें संक्षेरुपानें मराठींत विवेचन करुं.
N/A
References : N/A
Last Updated : March 05, 2018
TOP