वृत्तरत्नाकरांतील प्रस्तारादि विषयांचें विवेचन
वृत्त म्हणजे कांहीं नियमित अक्षरांत लघु- गुरुंची विशिष्ट क्रमानें रचना करुन दाखविणें.
प्रस्तारो नष्टमुदिष्ट एकघ्यदिलगक्रिया ।
संख्यानमध्यवयोगश्च षडेते प्रत्यया: स्मृता: ॥
वृत्त म्हणजे काय? याचा जर आपण विचार केला तर आपणांस असें आढळून येईल की, कांहीं नियमित अक्षरांत लघु- गुरुंची विशिष्ट क्रमानें रचना करुन दाखविणें हेंच ते होय. संस्कृतांत वृत्तांच्या चरणांतील अक्षरांची संखया एकापासून सव्वीसपर्यंत सामान्यत: असते. सव्वीसपेक्षां ज्यास्त अक्षराचे कांहीं वृत्तांचे चरण आहेत, पण त्यांस वृत्त न म्हणतां दंडक, गाथा वगैरे संज्ञा देतात. त्याचा संस्कृत वाड्मयांत विशेष प्रचार नसल्यामुळें त्याविषयीं सूक्ष्म नियम अथवा बिवेचन कोणीं केलेले दिसून येत नाही. आतां चरणांत एकापासून सव्वीस अक्षरें येतात म्हणून सांगितले, ह्यांतील इच्छित विशिष्टसंख्याक अक्षरांची लघुरुंच्या क्रमभेदानें ( स्थान भेदानें ) किती प्रकारानें रचना करतां येते हें जर आपणांस समजलें तर एक प्रकारें तत्तत्संख्याविशिष्ट अक्षरांनीं किती वृत्तें करतां येतील हें अपणांस समजले असें म्हणण्यास हरकत नाही. तेव्हां हे समजण्याकरतां योजिलेला लघु - गुरु मांडण्याचा जो एक विशिष्ट क्रम त्यास प्रस्तार असें म्हणतात. ( व या प्रस्तारावरुन रचनाप्रकाराची जी संख्या निघते तीसही लक्षणेंनें प्रस्तार म्हणतात. ) विशिष्ट्संख्याक अक्षरांचा लघु - गुरु क्रमभेदानें होण्याच्या प्रकारांची संख्या ही ( प्रस्तार ) समजण्यास लघु - गुरु मांडण्याची जी एक विशिष्ट पध्दत आहे, तिची माहिती आतां लौकरच पुढें देणार आहोत. तीशिवाय खंडमेरु, सुमेरु या नांवानें प्रसिध्द, कांही आकडे मांडण्याचे प्रकार आहेत; त्यावरुनही हा प्रस्तार कळतो . व गणिताच्या कांहीं पध्दति आहेत त्यांनीही हा कळतो. असे तीन प्रकार प्रस्तार करण्यासंबंधानें आहेत. वृत्तरत्नाकरांत, फक्त लघु - गुरु मांडून प्रस्तार दाखविण्याची जी पध्दति आहे तिचेंच विवेचन केलें आहे. इतर दोन पध्दतींचे निरुपण नाही. तेव्हां या सर्व विवेचनावरुन वरच्या श्लोकांतील प्रस्तार पदाचा अर्थ लघु - गुरु मांडण्याचा एक विशिष्ट प्रकार असें आपणांस समजलें. आतां नष्ट कशास म्हणतात तें पाहूं. हें समजण्याकरतां प्रथम अगदीं लहान एक प्रस्तार घेऊं. उदाहरणार्थ दोन वर्णाचा प्रस्तार किती येतो तें पाहू. दोन वर्ण आपणांस चार तर्हेंने मांडतां येतील. ते असे. दोन्ही गुरु, एक लघु एक गुर, एक गुरु एक लघु, व दोन्ही लघु. तेव्हां दोन या अक्षरांचा प्रस्तार चार झाला. यांत दुसरा किंवा तिसरा प्रकार कसा आहे ? म्हणजे त्यांत लघु - गुरुंचा क्रम कसा आहे ? असें जर कोणीं विचारलें, तर त्याचें उत्तर बरोबर देण्यास जो कांहीं मार्ग सांगितला आहे त्यास नष्ट म्हणतात. त्याचें उलट जर कोणीं असा प्रश्न केला की, आमचा लघु - गुरुंचा क्रम कसा आहे, तर हा त्या विशिष्टसंख्याक अक्षरांच्या प्रस्तारांतील कितवा प्रकार ? तर हें समजण्याकरतां जो मार्ग सांगितलेला आहे त्यास उद्दिष्ट म्हणतात. आपणाला कोणत्याही एका वर्णसंख्येचा प्रस्तार कळल्यावर ज्यांत एकच लघु अथवा गुरु आला आहे, अथवा दोन लघु अथवा गुरु आले आहेत, इ. इ. असे प्रकार किती आहेत ? असें विचारिलें असतां त्याचें उत्तर बरोबर समजण्याकरतां जो मार्ग सांगितला आहे यास ‘ एकद्व्यादिलगक्रिया असें म्हणतात. याचा अर्थ एक, दोन इत्यादि लघु - गुरु समजण्याची क्रिया असा आहे. प्रस्ताराची संख्या म्हणजे प्रस्तारांग एकंद्र भेद किती होतात हे लागेल हें ज्यावरुन समजतें त्यास संख्या म्हणतात. व प्रस्तार लिहिण्यास किती प्रदेश लागेल हें ज्यावरुन समजतें त्यास ‘ अध्वयोग ’ म्हणतात. हे वर सांगितलेले जे सहा प्रकार त्यास मामान्यत: ‘ प्रत्यय ’ असें नाव आहे.‘ प्रतीयन्ते ज्ञायन्ते संख्याविशेषा एभिस्ते प्रत्यया: ’ अशी याची व्युत्पत्ति आहे. म्हणजे ज्यांच्या योगानें विशिष्टवर्णसंख्येंतील प्रकाराच्या ( प्रस्ताराच्या ) संख्यादि गोष्टी समजल्या जातात त्यास प्रत्यय असें म्हणतात. वृत्तरत्नाकर ग्रंथकारांनीं याप्रमाणें प्रथम ज्या गोष्टीचें विवेचन करावयाचें तिचा सामान्यत: या श्लोकांत नामनिर्देश केला आहे. व नंतर क्रमाक्रमानें प्रत्येक गोष्टीचा उलगडा केला आहे. तेव्हां आतां आपण त्याच क्रमानें विवेचन करु.
N/A
References : N/A
Last Updated : March 05, 2018
TOP