निरंजन माधव - अद्वैतबोध
निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.
अद्वैतबोध घडला बरवा मनाला ॥ तो काय मीं कथिन बाह्यमुखी जनाला ॥
विश्वास ज्यासि न वसे गुरुतत्वबोधीं ॥ चिद्वस्तु जे परम त्याप्रति कोण बोधी ॥१॥
श्रीसज्जनांघ्रिकमळी नत जो घडेना ॥ त्याला कदापि गुरुतत्व दिठीं पडेना ॥
जो साधुसंग धरि त्यासचि लाभ होतो ॥ चित्सार सेउनि निरंतर तृप्त होतो ॥२॥
अतितर परमार्थी वेधलें चित्त ज्याचें ॥
तरिच सफल झालें जन्म या मानवाचें ॥
त्यजुनि सकल दृश्याभास आत्माचि डोळां ॥
निरखिल तरि जीवन्मुक्त तो साच झाला ॥३॥
आत्मा देह नव्हे खरें जग नव्हे चैतन्य नाना नव्हे ॥
माया सत्य नव्हे गुरु नर नव्हे तद्वाक्य वाणी नव्हे ॥
हा जीवेश्वरभेद वास्तव नव्हे कांहीच कांही नव्हे ॥
वेदांताविण शास्त्र शास्त्र शास्त्रचि नव्हे सिद्धांत मित्या नव्हे ॥४॥
ज्ञानी श्रीभगवंत मानव असें मानू नये त्याजला ॥
स्वच्छंदें विचरे म्हणोनि जगती बोलों नये माजला ॥
राजा हो अथवा अकिंचन घडो विताढ्य भोगी तरी ॥
वानप्रस्थ करो महाव्रत धरो सानंद राहो घरीं ॥५॥
जातीचा भलता असो द्विज नसो सत्कर्मकर्ता नसो ॥
वैराग्यें विषयी उदास विलसो सप्रेम चित्तीं असो ॥
सर्व ब्रह्म म्हणोनि निश्चय असा अद्वैतबोधीं असो ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : February 28, 2018
TOP