समाधि प्रकरण - अध्याय अकरावा

निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.


पुढें पुंडलिकादि भक्तासमेतें । उभे राहिले मुख्य सोपान तेथें ।
तदां देव लक्ष्मीपती त्यासि पाहे । उजू आपल्या सन्निधीं शीघ्र बाहे ॥१॥
तदां सर्व गंगादितीर्थावळीतें । पुढें बाहिलें देवदेवें अनंतें ।
जशा राहिला अंश येकें अळंदी । तसें राहिजे सर्वही या समाधी ॥२॥
जसी ज्ञानदेवीं अह्मां प्रीति भारी । तसा देव सोपान मत्प्रीतिकारी ।
नसे भेद यामाजि कांहीच साचा । ममाज्ञा असी पाळिजे हे त्रिवाचा ॥३॥
पुढें ब्रह्मरुद्रादि देवेंद्र आले । उभे राहिले दिक्पती एकमेळें ।
महासिद्ध चौघे मुनी ब्रह्मपुत्र । जया देखतां होत पापी पवित्र ॥४॥
समस्तां ऋषीतें विलोकी दयाळू । ह्नणे राहिजे ये स्थळीं सर्वमेळू ।
अम्हींही वसों नित्य या भीमकींसी । तुह्मांही वसा नित्य आम्हाचपासीं ॥५॥
तदां वर्षती देव सारे फुलांनीं । उभे राहिले व्योमपंथीं विमानीं ।
तदां भीमकी दिव्य जोडोनि पाणी । पदीं लागली वल्लभप्रेमखाणी ॥६॥
‘कसा भक्त सोपान हा भाग्यवान । जयाकारणें देव आले विमानें ।
पहा सर्व आले ऋषी ब्रम्हवेत्ते । चतुर्वेद सर्वांग संपूर्ण धर्तें ॥७॥
नद्या गौतमी सूर्यजा आणि गंगा । जयां देखतां शुद्धि ये अंतरंगा ।
पहा पुष्करादीक तीर्थे अनंतें । नये लेखितां मीनलीं सर्व येथें ॥८॥
पुरी सातही क्षेत्रवृंदें समस्तें । तुम्हां पाठिसी पातलीं सर्व येथें ।
समस्ताद्यदेवा तुम्ही एक आलां । म्हणोनी हरी मीनला विश्वमेळा ॥९॥
महाधन्य हा वाटतो दीस मातें । तुम्ही पातला भक्तकार्यार्थ येथें ।
असा पक्षपाती जगी कोण आहे । महादीनबंधू असें नांव साहे ॥१०॥
तुम्ही आजि संवत्सरग्रामवासी । हरी काय जाणोनि केलें ययासी ।
मला तत्व हें सांगिजे देवदेवा । मना आवडे भाव याचा पुसावा ॥११॥
असें पूसतां बोलतीं देव वाणी । ‘अहो रुक्मिणी ऐक तूं प्रेमखाणी ।
महागोप्य तेंही तुला सांगताहे । नसें बोलिलें आजपर्यंत पाहें ॥१२॥
तुला काय ठावें नसे लोककाजा । सती पूससी जाणतों भाव तूझा ।
तुवां पूसिलें या जगातें कळाया । म्हणोनी तुला सांगतांहे सुकाया ॥१३॥
अहो इंद्रकीलाख्य या पर्वतातें । सती जाण आधीं महापुण्यदातें ।
येथे मार्ग पाताळिचा थोर आहे । महानाग शेषादि येतील पाहे ॥१४॥
म्हणे वैनतेयासि जा शेषलोकीं । महापन्नगातें सुभावें विलोकीं ।
समस्तांसी येथेंचि वाहोनि आणी । असें सांगती सेवका चक्रपाणी ॥१५॥
महाक्षेत्र हें भूतळीमाजि नारी । पुरी दिव्य कौंडण्यनामेंचि भारी ।
पहा योगिनी येथ प्रत्यक्ष नांदे । जगाच्या अभिष्टार्थ सर्वस्वही दे ॥१६॥
महाभैरवानंद या क्षेत्रपाळा । पहा मल्लनाथासि येथेंचि डोळां ।
पुरा ये स्थळीं नांदला तो विधाता । विरंची किती काळ येथेंचि होता ॥१७॥
पहा भूतळीं राहिला इंद्र येथें । ऋषी कोटिशा नांदले जाण पूर्ते ।
पुरी विश्वकर्मेचि निर्माण केली । विरंची वसे या स्थळीं देवमेळीं ॥१८॥
ऋषीदेवपित्रादि तीर्थव्रतातें । असे स्थापिलें ब्रह्मयानें महंतें ।
कर्‍हा वाहते ब्रह्मपात्रांत होती । झरोनी स्वयें चालिली पूर्वपंथे’ ॥१९॥
असें सांगतां रुक्मिणीलागि देवें । तदां पूसिला प्रश्न सोपानदेवें ।
‘कधी नांदला सांगिजे आदिधाता । पुसों आवडे हे कथा देवनाथा’ ॥२०॥
म्हणे श्रीहरी ‘ऐक बा भक्तराया । तुला सत्कथा सांगिजे पूर्विका या ।
अम्ही राहिलों पुंडलीकार्थ आर्तें । धरामंडलीं पंढरी श्रेष्ठ जेथें ॥२१॥
अम्ही राहिलों या जगीं चिद्विलासें । अम्ही टाकिला लोक वैकुंठ ऐसें ।
समस्तां सुरी ऐकतां त्याचिकाळीं । वरे पातले हे विधी चंद्रमौळी ॥२२॥
महादेव शंभू असे माणदेशी । अह्माकारणीं टाकिली दिव्य काशी
तदां हा विरंची मर्दितां राक्षसातें । रणीं शक्ति जैं लागली लक्ष्मणातें ।
तदां आणिला तो गिरी द्रोणनामा । तया मारुतीनें महाश्रेष्ठ तो मा ॥२४॥
तयाचा पडे अंश कांहीं तुटोनी । यया इंद्र्कीलासि तूं सत्य मानी ।
अरे औषधी दिव्य अद्यापि येथें । निशीं दीसती स्वर्णवर्णे समस्तें’ ॥२५॥
असें वृत्त सांगितलें सर्व देवें । समाधीस येथें सुखें तां बसावे ।
असी श्रीश आज्ञा करी त्याच काळीं । नमी दिव्य सोपान पादाब्ज भाळीं ॥२६॥
समाधि-स्थळीं आसनी बैसवीला । महानंद उल्हास चित्तासि झाला ।
हरीचें करी स्तोत्र सोपानदेव । स्तुतिप्रीत जाणोनि हा देवदेव ॥२७॥

सवायाहेमकळा.
देव अगण्य गुणागुणसागर तूं गुणरत्न गुणाकार होसी
काळ समस्त तुझा निज किंकर शासक तूं असशील तयासी ।
काळ विनाशक भक्तजनाप्रति पीडिल यास्तव दंडुनि त्यासी
तांचि विभू पद-पंकज - तोडरिं बांधियला नवनूपुर पाशीं ॥२८॥
अक्षरशून्य त्रिमात्रक आदि तयांहुनि अक्षर तूं हरि हीरा
आद्य समस्त सुरासुर त्यांप्रति तूंचि वडील विराजसि सारा ।
तूंचि महेश्वर सर्वसुरेश्वर तूंचि अनंत गुणाद्य अपारा
तूज नमो पुरुषोत्तम जी प्रभु वेद असे वदती सुखसारा ॥२९॥
वेद विदग्ध तुला हरि जाणति वेदहि जाणसि तूंचि निवांत
वेद अनंत तुझे गुण ते हरि वर्णित्ति त्या न कळे तव अंत ।
नेति मुखें निरसोनि समस्तहि दाविते ते तुजलाचि सुशांत ॥३०॥
विश्रम पावत चित्त तुला नमितां मग टाकुनि सर्वहि वृत्ती
ध्यान करी तरि लीन घडे पद पंकजिं केवळ चिन्मय मूर्ती ।
ध्यान मनासि अगम्य नमो तुज गम्यहि होसिल तूं निजशांती
राम गुणार्णव निर्गुण तूं ह्नणवोनि तुला धरिलें दृढ संतीं ॥३१॥
तूंचि अशेष अपार समस्त महेश्वर होसिल तूज नमो जी
तूंचि समस्त चराचरधारक तूंविण कोण पराप्रति मोजी ।
जीव शिवादि सदोदित प्राकृत भावपदार्थ यथार्थ असो जी
तूंचि विभू नटलासि असाच अनंत विलास तुझे हरि हे जी ॥३२॥
देव तनू जितक्या असती हरिनामरुपासि धरोनि निराळ्या
ज्या असती गुणकर्मविधायक ज्या सकळांप्रति कारण झाल्या ।
त्या सकळा तुझियाच रुपाहुनि भिन्नपणें जरि व्यक्तिस आल्या
तूज नमो हरि सागरिच्या लहरीसम सर्व तुलाचि मिळाल्या ॥३३॥
कृष्ण कृपालय विष्णु सनातन जिष्णु जगन्मय शुद्ध स्वरुपा
तूंचि चिदात्मक तूंचि प्रकाशक भासक तूं भुवनत्रय - दीपा ।
नाथ अनादि सुरासुर - नायक पालक तूं करिसी अनुकंपा
तूज नमो अतिगूढ जनाप्रति दीससि एक अह्मांप्रति सोपा ॥३४॥
योगविदांप्रति दीससि तूं सकळा जसला मनि भाविति तूतें
हें वदतें जग सर्व खरें परि प्रत्यय हा न घडेचि मनातें
तूं अपरंपर पारविहीन कसा घडसील मनासम त्यांतें
हे न कळे गुज तूज नमो न कळों सकसील कदापि मतीतें ॥३५॥
तूं जगदादि जगज्जनका जगजीवन तूंचि जगन्मय होसी
तूंचि जनीं नटलासि जनार्दन सर्जक पाळक तूंचि जनांसी
हें जग याप्रति तूंचि धणी मणि सूत्रसमान धरोनि विशेषीं
अंतरयामिं निरंतर तूं वससी तुजलागि नमो गुणरासी ॥३६॥
काय कुतूहलवर्णन मी करुं अद्भुत खेळ तुझाचि पराद्या ।
भक्तिपरायण प्रेमळ पंडित सज्जन त्या परिपाळिसि सद्या
तूंचि परात्परमूर्ति निदान समस्तजगाप्रति तूं श्रुतिवेद्या
तूज नमो मदनायुत-सुंदर मंगळनामक तूं अतिहृद्या ॥३७॥
तूं परतत्व परेहुनि वर्तसि - नाहि गुणत्रयलाग स्वरुपीं
तूं निगमागममार्ग चराचरिं वाढविसी महिमा बहुरुपी
रक्षिसि धर्म अधर्म विनाशिसि हे रचिसी चरितें अतिसोपीं
योग अनंतपरी जगि दाविसि योग तपोमय तूंचि अधीशा
ज्ञानसमाधि तुझ्या स्वरुपीं असती प्रकटे सकळांतरवासा
तूं असला शिवशांतसनातन तूज नमो परिपूर्णविलासा
होय जयांवरि हे करुणादिठि तो नर पावत सौख्य अपैसा ॥३९॥
यां मनुजां इह भुक्ति परत्र सुमुक्ति अशा हरि दोनिच आशा
त्या नसती मज तूजविना नलगे प्रभु कांहिंच तें जगदीशा
सांडुनि सत्वरजात्मक लिंगशरीर मिळेन तुझा तुज ईशा
सागरिची लहरी जशि सागरिं ते मिळते सहजेंचि अपैशा ॥४०॥
जो अतिबोध तुझा अतिशेखर तयावरि जे झळके
मुक्तिशिरीं पदपंकज ठेउनि टाकिलिसे बहुता हरिखें ।
यास्तव मी नमितों तव पंकज साम्यपदीं विनयें अधिकें
तेंचि मला जरि देखिल तूं तरि दे नलगे दिधलीं अणिकें ॥४१॥
मूल निराकृति घेउनि आकृति सर्वरुपीं नटसी नट तैसा
हेंचि मला कळलें श्रुतिच्या वचनें धरिला बहुसाल भरोसा
भेदविकार निरासुनि एक पदींच करी मजला सरसासा
भेदमहाभयनाशक तूं भवशोषक तूं कमलांगनिवासा ॥४२॥
जो शम जो दम जो मद-निग्रह सर्व तयासम होत तुझेनी
आदि अनादि वरिष्ठ गुरु तुजपासुनि पावति चित्पद ज्ञानी ।
तें पद दाखवि पूर्ण निरामय आयकतों अति सुंदर कानीं
पावति सौख्य अनंत तुझे नर पाउनि जें न फिरे मग कोणी ॥४३॥
ईश्वर तूंचि उदार अनंत अनंद अपार अनेक रुपाचा
ऊर्णक-नाभिसमान जगा रचितोसि सविस्तर तूं स्वगुणाचा ।
तूं रचिलासि अभेद असी मज दृष्टि तुझी उघडी हरि देयीं
सांठवि हृत्कमळी अपुल्या पदरीं निज किंकर पाळुनि घेयीं ॥४४॥
दीन अनाथ जनांप्रति नाथ तुह्मांविण आणिक कोण असे जी ।
जीव-शिवासहि आदि विभू तुजवीण दुजा भवभेद नसे जी
वर्तसि तूंचि अभेद चराचरिं तेंवि हरी वससी मजमाजी ॥४५॥
राम नमो रमणीय - वपू घनशाम नमो सुखधाम नमो
दिव्य-शरासन- बाण विधारक राक्षसनायकनाश नमो ।
काम नमो कमनीय-गुणाकार कोटि - दिवाकर - धाम नमो
व्योम नमो विबुधाधिप योगिजनांसि मना सुखधाम नमो ॥४६॥
दत्त महा अवधूत नमो निज सत्यसनातन एक नमो
ज्ञानदृशांसि अभिन्न नमो परभेदवतांसि अलभ्य नमो
नम्य नमो नमनादि नमो हरि वामन याचित-भूमि नमो ॥४७॥
देव नृसिंह मुकुंद नमो हरि वामन याचित - भूमि नमो
सर्व-दिगंतर - पॄर्ण नमो अध ऊर्ध्व तदांतर दिक्षु नमो ।
तूं चतुराचतुरांहुनि भिन्न न जाणति आगमनैगम मौना
वाहति पाहति नांदसि तूं सभराभरिता सकळांत समाना ॥४८॥
मंजुळ-शब्द कसा मुरलीरव भूलवितो सकळा भुवनांसी
मंजुळ नाम तुझें अति -पावन ध्यान तुझें भवबंध विनासी ।
विश्व चराचर रुप विकुंठानिवास रमाधव उंदर होसी
हे भजते भजकावळि यीप्रति सौख्य अनंत अपारचि देसी ॥४९॥
मूळ जगद्‍गुरु हे जगपाळक हे जगचाळक हे जगदादी
हे सर्वसर्जक हे जगनाटक हे जगतारक वर्णित वेदीं ।
तूं परमेश्वर तूं जगदीश्वर तूंचि जडाजड-भूत विनोदी
सत्यसनातन देव निरंजन वर्णिति भक्त तुतें बहु शब्दी ॥५०॥
पुंडलिकाप्रति सांपडलासि अरुप असोनि रुपा धरितोसी
व्यापक सर्व चराचरिं हौनि पंढरिमाजि उभा दिसतोसी ।
विठ्ठलमूर्ति युगानयुगीं हरि तिष्ठसि भक्तजनार्थ सुखेंशीं
नीट इटेवरि धीट तुला अवलोकिति भेटति चित्सुखरासी ॥५१॥
भीमरथी पदपंकजसन्निध वाहत सुंदरि ते शशिभागा
राउळ रम्य तुझें विलसे अति दक्षिणतीर धरोनि शुभांगा ।
दीनजना कनवाळ कृपालय भक्तजना सुजना सुखसंगा
बाललिला करिसी गुणसागर गोचरगोचर पांडुरंगा ॥५२॥
जन्मशतीं तरि देखति जे तुज जन्मशतोद्भव पातकरासी
जाळुनि टाकिसि एक पळांत पलार्घं जरीं वसती तुजपाशीं ।
पावति मोक्षपदाप्रति धन्य प्रयागगया नलगे मज काशी
तूं असला विभु दीससि गोचर दृष्टि भरोनि हृदब्जनिवासी ॥५३॥
देव नमो दनुजेंद्रविनाशक दिव्य समाधि मला तुज हातें
त्वां दिधली किति काय वदूं मम पुण्य पुरातन अद्भुत होतें ।
प्रेमळ त्यांवरि प्रेमपरायण दाखविसी निजभाव जनातें
वंदन वंदन वंदन वंदन वंदन कोटि पदांबुरुहातें ॥५४॥
यापरिची स्तुति ऐकुनि विठ्ठल बोलति भक्तमणीप्रति तोषें
‘पूर्ण करीं स्तुति प्रेमळ तूं अससी परिपूर्ण निजांतर हर्षे ।
अक्षरपंक्ति अपूर्व तुझी श्रवणीं पडतां अति तृप्त मि झालों
मीतुंपणीं तरि अंतर काय असे अम्हि एकपणेंचि मिळालों ॥५५॥
तूं अवतार चतुर्मुख हे मनुजाकृति घेउनि वर्तसि लोकीं
पुण्यवतांप्रति हें कळलें गुज याचपरीं तुज मानिति ते कीं ।
तीनिच देव अम्ही प्रकटोनि महीवरि सारुनि अद्भुत लीला
दाखविली निजभक्तजनांप्रति पार नसेचि तुझ्या महिमेला ॥५६॥
चातुर तूं सकळागम जाणसि सर्व सुविद्यविवेकविचारा
सर्व पवित्र पवित्र पदार्थ तयांत पवित्रपणेंचि उदारा ।
शोभसि तूं मम भक्तिपरायण सर्व जगा जगदोद्धरसारा
तीर्थ पदांबुजिचें रज इच्छिति जे धरिती बहु पातकभारा ॥५७॥
यापरिचें हरि स्तोत्र करी तंव मौनचि तो अवलंबुनि राहे
भक्तशिखामणि दिव्य सुपान सुधासम गौरव पाउनि धाये ।
त्यावरि तो हरि तीर्थजळें अभिषेक करोनि यथाविध यातें
सर्वऋषीसमवेत पढोनि महागमदर्शित तें श्रुतिसूक्तें ॥५८॥
भागिरथी यमुनादिक सर्वहि दिव्य नद्या वनितातनुधारी
आरतिया स्वकरें अतिसुंदर घेउनि पावति मध्य दुपारीं ।
श्रेष्ठ मुहूर्त महासमयीं अति उत्सव ते स्थळिं अद्भुत झाला
सर्व सुरासुर सिद्धमुनी हरिदास समाज समरत मिळाला ॥५९॥
वर्षति देव फुलें गगनींहुनि गायक नारदतुंबर गाती
नाचति देववधू अतिहर्षित भूचर खेचर सर्व पहाती ।
थोर महाजयकार तदां उठिला रव दिक्तट भेदुनि गेला
तैं स्तविती सुरकिन्नरसिद्ध निशाचरभार अनेक मिळाला ॥६०॥
दिव्य समाधिस बैसविलें हरिनें तव निर्जर मंगळवाद्यें
वाजविती गगनीं क्षितिमंडळिं जाउनि सांगत तो फणिकानीं
ऊर्ध्व विरंचिकटाह विभेदुनि जात महावरणांत भरोनी ॥६१॥
यापरिचा अति उत्सव वर्तत तैं नमिले पदपंकज तेणें
श्रीहरिचे बहुतां विनयें मग पूजियले निजभक्त सुपानें ।
प्रार्थितसे हरि नित्यनिरंतरि रुक्मिणिसीं मजसन्निध राहे
देव अवश्य ह्मणे पदपंकज भक्तिपुर:सर मस्ताक वाहे ॥६२॥
पाहतसे हरिलागि दिठी चरणाब्ज धरोनि शिखांतवरीतो ।
शामल कोमल सुंदर सोज्वळ दिव्य तनूसि मनांत धरीतो ।
पीतपटीं परिवेष्टित कौस्तुभकंधर चक्रगदांबुजपाणी
नेत्र विशाल सुहास्य मुखीं करुणाघन विठ्ठल ठेउनि ध्यानीं ॥६३॥
नेत्रनिमीलन तो करि अंतरिं हृत्सरसीरुहपीठनिवासी
पाहत पाहत हर्षभरें जळसांद्रप्रवाह सुटे नयनासी ।
मंद मुखांबुजिं हास्य विराजत तें पुलकें तनुमाजि उदेलीं
मौन गिरेसि पडे मुरडे मन बाह्य नुरे निजप्रेम सुकाळी ॥६४।
॥ इतिश्री ज्ञानेश्वरविजयमहाकाव्ये समाधिवर्णने सोपानस्तुति
समाधिनिवेशोनाम एकादशोध्याय: ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 28, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP