समाधि प्रकरण - अध्याय सातवा

निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.


निवृत्तीस देखोनियां देव बोले । तुम्ही जायिजे त्र्यंबका स्वल्पकाळें ।
कुशावर्ततीर्थीं जळीं सत्समाधी । तुम्हां नेमिला पाविजे चित्सुखाब्धी ॥१॥
यया दिव्य सोपानदेवास आम्ही । असे नेमिला ठाव त्या दिव्य भूमीं ।
कर्‍हेच्या तटीं वत्सरग्राम जेथें । सुखें वास कीजेल सोपाननाथें ॥२॥
तदां तुष्टले भक्त हे सर्व कांही । अहो धन्य हा पंढरीनाथ पाही ।
स्वभक्तां कसा नेमिला ठाव येणें । त्रिलोकीं असे यापरीं अन्य कोण ॥३॥
जयाचा असे अंश तेथेंचि योजी । असा श्रीहरी भक्तकार्या नियोजी ।
असे आवडी गर्जती भक्त गाजी । महाघोष तो गाजला सत्समाजी ॥४॥

शार्दूलविक्रीडित.
मुक्तायी म्हणते मला नरहरी द्या पादसेवा बरी
तुम्हांसन्निध नित्य राहिन सुखें सप्रेम चित्तांतरीं ।
कल्पांतावधि नित्य मी तुजविना राहीचना विठ्ठला !
आशा हेच मनीं असे पुरविता तूं देव सर्वागळा ॥५॥
असें मागतां देव तात्काळ तीतें । म्हणे युक्त हें मागसी माय मातें ।
असें जे मनीं आवडे तेंचि तूला । घडे प्राप्ति तूं जाण सद्भावशीला ॥६॥
अशा गोड बोलें हरीनें दयाळें । अलिंगोनि मुक्तायिला धन्य केलें ।
पुढें मीनले इंद्रचंद्रादि सारे । नभीं वाजती शंख भेरी तुतारे ॥७॥
पुन्हा स्वर्गसंपत्ति तेथें मिळाली । तदां वाहती भक्त सन्नामटाळी ।
महाघोष ब्रह्मांड भेदोनि गेला । महानंद झाला तयां वैष्णवालां ॥८॥
ऋषीचीं स्तवें देवगंधर्व - गानें । महावेद - पारायणें सामगानें ।
असा गाजला नाद त्या पुण्यभूमी । अळंदी असे ते स्थळी रामनामीं ॥९॥
असी सर्व वैकुंठसंपत्ति येथें । हरीनें स्वतां आणिली उत्सवातें ।
असा भक्त त्यांचा करी सोहळा हो । स्वयें देतसे विष्णुभक्तांसि लाहो ॥१०॥
ऐसा समारंभ अखंड काळीं । घडे अळंदीस महादिवाळी ।
चिंता घडे केवळ पुंडलिका । हा नाठवी विठ्ठल पंढरी कां ॥११॥
येथेंचि येणें सुखवास केला । जायील हा पंढरिला कशाला ।
इंद्रायणी हेचि ययांसि मानें । श्रीचंद्रभागा त्यजिली ययानें ॥१२॥
चिंतोनि ऐसें निजचित्तपद्मीं । श्रीविठ्ठला वंदुनि पादपद्मी ।
एकांत पाहोनि करी विनंती । कां पंढरीतें त्यजिलें महंती ॥१३॥
येथेंचि देवें रहिवास केला । ज्ञानेश्वरीं आवडि हे तुम्हाला ।
तुह्माविना ते मज चंद्रभागा । न गोड वाटे गति काय सांगा ॥१४॥
ईटेवरी पाय नसेति तूझे । तूं वेगळें राउळ तें न साजे ।
त्या वेणुनादीं मुरलीवातें । ऐकेचिना, कंठल केंवि मातें ॥१५॥
त्वरें चलावें प्रभुजी स्वदेशा । कृपा करावी मज पंढरीशा ।
लोकीं समस्तीं स्थळ रुढवीलें । मत्कारणी टाकिसि काय बोलें ॥१६॥
ऐकोनि ऐशी निजभक्तवाणी । हांसोनियां बोलत चक्रपाणी ।
तूं पुंडलीका करिसील चिंता । काशासि टाकी उगली अनर्था ॥१७॥
ज्ञानेश्वराच्या अतिमोहबंधें । मी पातलों येथ पहा विनोदें ।
हा सारिला उत्सव सर्व कांहीं । आतां मला कार्य नसेचि पाहीं ॥१८॥
समाधि देवोनि ययासी आतां । जाऊं निजानंद - युतें स्वपंथा ।
झालें महत्कार्य मनाप्रमाणें । राहावया कारण सांग कोण ॥१९॥
हे ऐकतां निश्चित देववाणी । त्या पुंडलिका मनिं हर्षखाणी ।
नमोनि पादांबुज विठ्ठलाचें । सप्रेम रंगी अनुपम्य नाचे ॥२०॥
अनंत तीर्थे असतीं मिळालीं । सोपानरायासि समाधि-काळीं ।
तीर्थासिही स्थापुनि तेथ पाही । जाऊं सुखें या अनुमान नाहीं ॥२१॥
कर्‍हेतटीं स्थापुनियां स्वहस्ते । सोपानदेवाप्रति स्वस्थचित्तें ।
संवत्सरी ठेउनि यासि जाऊं । नको सख्या फार उदास होऊं ॥२२॥

शार्दुलविक्रीडित.
सोपानेश्वर विठ्ठला विनविती बीजें किजे श्रीधरा
या वैकुंठविलास-संपति- सवें जावोनि संवत्सरा ।
स्थापावें मजला सुरेंद्र समुद्रें ब्रह्मेंद्रचंद्रादि हे
आले तेतिसकोटि दैवत-कुळें सेवेंत तूझ्या उभे ॥२३॥
या देवासि मुखेंचि आगड किजी येथें तुह्मी राहिजे
इंद्राणी-सलिलांत पूत सुजना केलें तुह्मी पाहिजे ।
या गंगादि नद्या समस्त मिनल्या तीर्थे अनंतावधी
आलीं पुष्कर-मुख्य याप्रति हरी स्थापा अळंदीपदीं ॥२४॥
येथें जे करितील मज्जन तयां वैकुंठवासी किजे
ज्ञानी भक्त विरक्त सर्व परिचे येतील येथें तुझे ।
सामान्याप्रति इंद्रचंद्र - पदवी पाहोनियां अर्पिजे
ज्याचें मानस त्यापरीं पुरविजे देवें स्वयें राहिजे ॥२५॥
चालावें अतिवेळ वर्तत असे येथील कृत्या त्वरें
आटोपा म्हणवोने वंदन करी सोपान अत्यादरें ।
देवें या निरखोनि कूर्मनयनें संतोषयुक्ता गिरा
तेव्हां बोलति धन्य होसिल बरा सोपानजी साजिरा ॥२६॥
तुह्मी देव त्रिवर्ग या क्षितितळीं भूभारसंहारणीं
आलां वैष्णवमार्ग-रक्षण करुं झालां यती ब्राम्हणीं ।
केलें ते अवतारकृत्य समुदें धर्मा द्विजां स्थापिलें
बावीसा वरुषांत सर्व अपुलें सत्कार्य संप दिलें ॥२७॥
ज्ञानोबा ममरुप या कलियुगीं झाला जगोद्धारणा
येणें आर्जविलें मला बहुपरी गावोनि नारायणा ।
केला ग्रंथा विशाल सज्जनमना आनंददाता असा
पाहा प्राकृतही असोन निववी लोकांसि गीर्वाणसा ॥२८॥
गीतार्था विवरोनि भाष्य कथिलें गंभीर अर्थे बरें
नानालंकरणें सुकाव्य रचना तैं दाविली चातुरें ।
केली ते अमृतानुभूति सुजना साक्षात्सुधेची प्रपा
बोधें भाविक सज्जनासि निववी छाया तसी त्वकृपा ॥२९॥
केलें आणिक ग्रंथ ते कलिजना तात्काळ-बोधाप्रती
त्याचा अर्थ विचारिती सुजन तैं मुक्तीसही पावती ।
सारांशा निवडोनि अर्थ कथिला पाल्हाळ तो टाकिला
यासाठीं सुजनासि बोध घडतो तात्काळ येथें भला ॥३०॥
केले दिव्य अभंग भक्तिपर ते कित्तेक योगार्थकें
ते गाती जन मूढ भाविक तरी होती तयां सार्थकें ।
ऐशी हे रचना समस्त घडली लोकोत्तरा या जगीं
झाली दिव्य समाधि उत्सवयुता दुर्लभ्य हें या युगीं ॥३१॥
झाले भक्त उदंड पूर्वयुगिंचे आहेति आतां किती
भावी होतिल ते अनंत परिचे येना असी उन्नती ।
तुम्ही ज्ञाननिधी त्रिवर्ग हरिच्या अंशें जगीं जाहलां ।
यासाठीं कवणासि येईल असी सामान्य भक्तां तुळा ॥३२॥
कीर्तीने जग तारिलें सकळ या लोकीं ध्वजा लाविली ।
ऐशी हे हरिभक्ति पद्धति बरी सद्वैष्णवां दाविली ।
केला अद्वयबोध सुद्ध बरवा वारोनि भेदांकुरा
पाखंडासि विनाशिलें श्रुतिपंथा स्थोपोनियां दुर्धरा ॥३३॥
तेव्हां तीर्थसमूह तो निरखिला देवें कृपालोचनीं
त्यातें आळविलें पृथक्‍ पृथक्‍ तें नामासि पैं घेउनी ।
गंगे ये यमुने सरस्वति असी येई पुढें वारुणे
येयीं तूं मणिकर्णिके मम गिरा ऐकावयाकारणे ॥३४॥
गंगेशी मिळताति उत्तम नद्या त्यांसी अळंदीस्थळीं
राहावें सुखरुप तेंवि यमुने इंद्रायणीचें जळीं ।
रेवे गे अपुल्या सख्यांसह सुखें तापी पयोष्णी तरी
गोदा भागीरथी तसी भगवती कृष्णा महा सुंदरी ॥३५॥
कावेरी कपिला तशाच अणखी ज्या नंदिपादोद्भवा
देवी ते कृतमालिका शुभजळा ए ताम्रपर्णी शिवा
ज्या कीं पश्चिमदेशिंच्या अघहरा सिंधू तसी गोमती
अन्या ज्या असतील सर्व तितुक्या यांवे अळंदीप्रती ॥३६॥
नाना पुण्य-सरोवरें सकळही पृथ्वीतळी जेवढीं
श्रीत्पुष्कर-मुख्य सर्व वसिजे इंद्रायणीं आवडी ।
जे जे संगम ते प्रयाग-प्रभृती येथेचि त्यांनी बरें
राहावें जनपावनार्थ अमुची मानोनि आज्ञा शिरें ॥३७॥
जे कोट्यार्बुद सर्व तीर्थ गणना या कोटितीर्थातरी
राहावें निशिवासरीं सुखमनें येवोनि अत्यादरी ।
मीही संन्निध तूमच्या वसतसें या चक्रतीर्थांतरीं
होतीं जीं कलुषें तुम्हांत समुदीं चक्रें स्वथा मी हरी ॥३८॥
माझे केवळ भक्त दांत सुगुणी अद्रोह भूतीं बरें
जे शांत्यादिकळा - विशिष्ट असती निर्लोलुपी ते खरे ।
ज्ञानी भाविक सर्व - लोक - समता अद्वैत - बोधामृतें
जीवन्मुक्त विरक्त येतिल मला भेटावया आयिते ॥३९॥
ते जेव्हां तुमच्या जळीं उतरती स्नानार्थ कीं त्या क्षणीं
त्यांच्या पादरजें समस्त दुरितें जातील हो साजणी ।
जे कां निंदक धर्मदूषक महाकापट्यवंतां नरा
दंभाचाररतांसि पाप तुमचें जायील चित्तीं धरा ॥४०॥
माझे भक्तचि मुख्य तीर्थ असती, तीर्थांसि ते पाविती
माझें जे भजनाख्यतीर्थ सुजनां सर्वांसि ते दाविती
मन्नामामृतसार सेविति असे ते तूमच्याही अघा
नासूं पैं सकतील पूज्य सकळां येतील तेव्हां बगा ॥४१॥
आतां हे असली करोनि सकळां स्थापी सुतीर्थी हरी
इंद्राणीसलिलीं सदोदित सुखें ज्ञानेश्वरासन्निधीं
एकांशे सति भीमकीसहित तो भक्तार्थ दाता निधी ॥४२॥
आज्ञा मानुनि सर्व तेथ वसति गंगादि तीथावळी
बाहे मोक्षपुरीस तो हरि पुढें तुम्ही वसा या स्थळीं ।
काशी ये मथुरे पुढें त्वरित तूं येयीं अयोध्यापुरीं
येवो द्वारवती मम प्रियकरी ये उज्जनी सुंदरी ॥४३॥
ये माये मज सन्निधीस वसिजे कांची तुम्ही सात ही
स्वच्छंदें सकळाघनाशन करा हे उद्धरावी मही ।
ये कोल्हापुर कुंभकोण अणखी पृथ्वीत पुण्यप्रदें
क्षेत्रांही सकळीं सुखेंचि वसिजे मत्सन्निधानीं मुदें ॥४४॥
आज्ञा हे करितां समस्त शिरसा वाहोनि ते वर्तती
ब्रह्मांडीं असती विशेष तितुकीं आलीं अळंदीप्रती ।
पुण्य़ारण्यगणीं समस्त वसिजे नानावनीं काननीं
जेथें श्रीहरि मुख्य तिष्ठत असे लोकत्रयाचा धणी ॥४५॥
जे लिंगे असती यया वसुमती सिद्धेश्वरी येऊनी
गोकर्णेश्वर मल्लिकार्जुन महा विश्वेश्वरा घेऊनी ।
आले पूर्वदिशाधिनाथ समुदें जे पश्चिमे देशिंचे
आले दक्षिण दिक्पती सकळही पंपादि सत्क्षेत्रिचे ॥४६॥
पाताळींहुनि हाटकेश्वर तर्‍ही आला अळंदीप्रती
श्री रामेश्वर सर्व पाप हरिता तो येत सेतूपती ।
केदारादिक उत्तराख्य दिशिचे सिद्धेश्वरी राहिले
झाले ते नर धन्य या सुनयनी सिद्धेश्वरा पाहिले ॥४७॥
सोन्याचा अतिथोर पिंपळ असे सिद्धेश्वरासन्निधीं
सारे येउनियां ऋषी निवसती सानंद त्याचे पदीं ।
पानोपान सहस्त्र साठ वसती त्या वालखिल्यावळी
सारे तेत्तिस कोटि देव वसती येवोनियां राउळीं ॥४८॥
प्राकारीं धरणीस रेणु तितुके ते देव सारे गणा
लिंगें सर्व खडे, समस्त सलिलें तीर्थेचि ऐसें म्हणा ।
तेथें जे वसताति ब्राह्मण ऋषी कीजे असी भावना
नोहे हा उपचार विठ्ठल करी आज्ञा समस्तां जना ॥४९॥
तेव्हां सर्व सुराधिपीं विनविलें त्या आदिनारायणा ।
लक्ष्मीशा करिसी अम्हांसि कुतुकें आज्ञा जगत्कारणा ।
यावें या धरणीस सर्वहि तुम्ही राहा अळंदीस या
आम्ही तों शिरसा सदैव धरितों आदेश हा स्वामिया ॥५०॥
आम्ही देव अम्हांसि भूतळ हरी स्पर्शोनये या परीं
आज्ञा हे करुणाघनेंचि पहिली केली असे ते बरी ।
आम्ही वर्ततसों तसेचि, न करुं भूस्पर्श देवेश्वरा
आतां हे कथिता अळंदिस वसा येवोनियां सत्वरा ॥५१॥
याची काय अम्हांसि युक्ति कथिसी तुझी वृथा वैखरी
कैशी होयिल अंतरिक्ष वसणें होयील कैशापरी ।
याचा काय विचार आजि कथिजे सर्वज्ञ सर्वेश्वरा
आम्ही तों तुझिया निदेशसमयीं वर्तो जगत्शेखरा ॥५२॥
ऐसें ऐकुनि हांसिले मग तदां श्रीकांत त्या निर्जरां
आज्ञा हे कथिली सुतत्व परिसा चिंता त्यजा दुर्धरा ।
केली मोक्षपुरी त्रिशूल शिखरी काशी तुम्हांकारणें
श्रीचक्रावरि पंढरी विरचिली म्यां ते जगत्कारणें ॥५३॥
हे म्यां दिव्य अळंदिका विरचिली या श्रेष्ठ पद्मावरी
पूर्वी आदियुगी तुम्हांसि नहुतें हें तत्व ठावें परी ।
चौदाही भुवनें दळें विलसती मेरु महा कांचनीं
या पद्मी शुभकर्णिका घडतसे आणा तुह्मी हें मनी ॥५४॥
याचें नाळ असे भुजंगम-पती श्रीशेष माझी कळा
याचा कंद यथार्थ कूर्म परिसा तो मीचे कीं सांवळा ।
हें पातालजळांत मूळ परिसा म्या निर्मिले यापरी
पूर्वी हें तरि लक्षयोजन कृतीं होतें यया भूवरी ॥५५॥
त्रेतीं हें घडलें सहस्त्रपरिच्या गावें महापद्म हें
माझी केवळ वल्लभा कमळजा तीचें महासद्म हें ।
झाले द्वापर हें प्रवेष करितां मानें शते योजनें
आतां या कलिमाजि योजन दहा चक्राकृती पाहणें ॥५६॥
मध्ये दिव्य अळंदिका वसतसे मेरुस्थळीं कर्णिका
श्रीसिद्धेश्वर दिव्यलिंग विलसे येथें तुह्मी आयका ।
हा भूस्वर्ग तुम्हांसि म्यां विरचिला राहा सुखें यापरी
स्वर्गींचे सकळार्थ भोग मिळती तुम्हांसि पृथ्वीवरी ॥५७॥
येथें यज्ञमखादि लोक करिती नाना स्वधर्मक्रिया
किंवा ते तप होम मज्जप तरी सद्भक्त माझे तयां ।
होतें पुण्य अनंतकोटि-गुण तें माझ्य़ा वरें देव हो
हो कां कुत्सितही मनुष्य तरि तो होतो महादेव हो ॥५८॥
ऐसें ऐकुनि देवनाथ समुदें साष्टांग दंडापरीं
पायीं लोटति धन्य धन्य ह्मणती सर्वेश्वरा श्रीहरि ।
लोकोद्धारक हे विचित्र रचिली देवें अळंकापुरी
यीची त्या अमरावतीस उपमा येनाच कोण्यापरीं ॥५९॥
भोगांती पडणें ह्मणोनि लघुता पावे पुरी निर्जरी
हे तात्काळ जनांसि जीव पदवी वारोनि आत्मा करी ।
हें सामर्थ्य तुझ्या कृपेंचि विलसे काशीहुनी आगळी
जे जीवंत नरासि मोक्ष घडवी प्रत्यक्ष या भूतळीं ॥६०॥
ऐसें स्तोत्र समस्त देव करितां संतोष लक्ष्मीधरा
झाला फार तदां अनेक वर ते दिल्हे अळंदीपुरा
तेव्हां उत्सव गाजला अतिशयें वर्णावया वैखरी
माझी काय पुरेल शेष न सके वक्त्रें सहस्त्रें धरी ॥६१॥
तेव्हां पुंडलिकासि लक्षुनि करी आज्ञा हरी सावळा
येथें कीर्तन जो करील नर तो माझ्या पदा पावला ।
म्यांही येउनि कार्तिकीस करिजे उत्साह ऐसा सदां
कृष्णैकादशि पंचरात्र वसिजे येथेंचि आम्ही मुदा ॥६२॥
होजी मान्य ह्मणे सुभक्त हरिचा संतुष्ट चित्तांतरीं
देखे वाल्मिक वादरायण तया श्रीकांत आज्ञा करी ।
होतें गूढ ह्मणोनि आजिवरि या क्षेत्रा पुराणांतरी
नाही वर्णियले असेल तरि हें वर्णा सुखें यावरी ॥६३॥
देवा अंजुळिबंध ते विनविती आह्मी तयाच्या बळें
जाणों भाविक हें ह्मणोनि पहिलें आहेचि हें वर्णिलें ।
देवा हें शिवविष्णुपीठ सरिता इंद्रायणी भूवरी
वाहे विष्णुपदीं ह्मणोनि पहिली हे वर्णिली साजिरी ॥६४॥
हा तों लोहगिरी पुरातन असे येना तुळे पंढरी
काशीही गणितां नये मग असी कैंची जगीं ती सरी ।
ब्रह्मा विष्णु हरी प्रजापती सुरीं रुद्रदिकीं ये स्थळीं
केलें सुस्थिर दीर्घकाळ तप तें राहोनि पृथ्वीतळीं ॥६५॥
स्कंधातें उपदेशिली पुरहरें अध्यात्मविद्या बरी
येथें स्कंदपुराण पुत्र बरवा तो पार्वतीचा करी ।
पूर्वी जाण पुरुरवासि घडलें वैराग्य तीर्थी यया
टाकी ऊर्वसि-कामबंध समुदा, केली परेशें दया ॥६६॥
भीमेशें तरि भीमरेसि पहिलें येथोनि नेलें असे
येथें ते विषदग्ध शंकरतनु स्नानें निवाली दिसे ।
येथें सिद्धगणांसि तत्व गुज हें सिद्धेश्वरें बोलिजे
आह्मी सांगतसों पुरातन असी आहे कथा जाणिजे ॥६७॥
व्यासें हे कथितां पुरातनकथा तैं व्यासपूजा हरी
केली त्या अपुल्या करें सकळही पृथ्वीसुरां त्यावरी ।
वाल्मीकादिक सिद्ध रत्नभुवनीं सिद्धासनीं स्थापिले
देवेशें स्वकरेंचि सांग समुदें चार्‍ही करें पूजिलें ॥६८॥
गंगासागरमुख्य सर्व सलिलें काश्यादि तीर्थे बरीं
अष्टौ भैरव अष्टही गणपती चौसष्टि योगीश्वरी ।
तेहीं सर्व स्थळस्थळीं वसविले सर्वां सुरांसी हरी
येथें राहुनि सोहळा करितसे दावी जना भीतरीं ॥६९॥
झाले श्रीहरि-पंक्तिपावन पुन्हां धाले प्रसादामृतें
आले भक्त समस्त तैं मिरवती साद्वैभवें शाश्वतें ।
नंदी-भृंगिरटादि सर्व गण ते आले शिवाचे बळी
भस्मोद्धूलित कृत्तिवास समुदें रुद्राक्षमाळा गळीं ॥७०॥
आले तैं प्रमथादि भूतपतिं ते प्रेतावळी मातृका
वेताळादिक भैरवादिक महा झोटिंग ते आयका ।
आले स्कंद गणेश पार्षद सवें त्या पार्वतीच्या सख्या
येती श्रीगिरिजेसमेत कुतुकें शक्तीधरें आशिक्या ॥७१॥
ऐसें हें शिवसैन्य सर्व मिनलें वैकुंठवासी तसे
आले वैष्णव शुद्ध सात्विक पहा शोभेति विष्णू तसे ।
जे पीतांबर कौस्तुभादिक महा सद्भूषणीं भूषती ।
हातीं चक्रगदारविंदजळजें चारीं करें शोभती ॥७९॥
तै आला हनुमंत भक्तवर तो बद्धांजुळी तिष्ठतो
आला सेवक मुख्य अंडजपती भक्ताग्रणी एक तो ।
विष्वक्सेन जयादि मुख्य समुदे आले महावीर ते
जे कां कृष्णसमीप पार्षद महानंदें सदां राहते ॥७३॥
आले ते सनकादि वातरशनी संन्यासयोगें सदा
जे कां वर्तति जे कुमार वसती पंचाब्द ते सर्वदा ।
आले नारद भक्तराजसहितें श्रीब्रह्मवीणा करीं
आले तुंबरमुख्य गायक तदां गाती मुखीं श्रीहरी ॥७४॥
नाचे तैं गणराज गायन करी वीणा स्वरें शारदा
वाहे ताळमुमार देवपति तो बांधी मृदंगा तदां ।
आलाप स्वर तप्त सर्व सवनें मूर्छा अनेकापरीं
साहा राग तशाच छत्तिस पहा त्या रागिणी सुंदरी ॥७५॥
थै थै थै थतकार फार उठिला घेवोनि ताळस्वरा
आलापीं मग देहभान उरणें कैंचे घडे या नरां ।
शंभूचे गण नाम-घोष करिती त्रैलोक्य दाटे स्वरें
विष्णूचे भट नामघोष करितां ब्रह्मांड नादें भरे ॥७६॥
पाताळीं फणिराज तो दचकला आला धरामंडळीं
पाहे उत्सव हा अकल्पित दिठीं पुण्यें अळंदी-स्थळीं ।
त्या पाताळबिळांत उत्सव असा कल्पांत कोण्या घडे
चक्षू - श्रोत्र म्हनोनि गायन-सुखा विस्तारिताहे फडे ॥७७॥
संतोषे मग शंभु पूजन करी एकासनी विठ्ठला
भावें बैसविलें जया हरहरीं भावो नसे वेगळा ।
पूजी श्रीतुलसी-सुकोमलदळें बिल्वप्रवाळें सुमें
ते ना दिव्य सुगंध कल्पतरुचीं पद्में तसीं उत्तमें ॥७८॥
नाना वैभवयुक्त पूजन करा नानोपचारें बरीं
वंदी सादर पादपंकजयुगीं सप्रेम-युक्तांतरीं
केलें स्तोत्र दहशतें मुखपुटीं तैं तोषले श्रीहरी
जिव्हा तुटुनि दीधल्या दशशता त्या सन्मुखा-भीतरीं ॥७९॥
देवी सुंदर कल्पवृक्ष सुमनें पुष्पांजुळी वर्षती
वाद्यें वाजविती सुगान करिती नाट्यादिकें हर्षती ।
तैं देवेंद्र मुखे सतोष वदला सद्भाव देवाप्रती
हा तो लोहगिरी सुवर्णमय हा मेरु असे निश्चिती ॥८०॥
या माथां अमरावती सुललिता देवी अळंदीपुरी
इंद्राणी सरिता अपूर्व विलसे भागीरथां दूसरी ।
ऐसें ऐकुनि सर्व देव निकरीं प्रत्यक्ष इंद्रामुखें
झाले हर्षित फार निर्भर तदां लोकीं न मातीं सुखें ॥८१॥
इति श्रीमत्‍ ज्ञानेश्वरविजयमहाकाव्ये समाधिचरित्रवर्णने
सकळतीर्थनिवासो नाम सप्तमोध्याय: ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 28, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP