समाधि प्रकरण - अध्याय नववा

निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.


ऐकोनि ऐशी स्तुति ज्ञानदेवी । संतोष पावे हरि फार जीवीं ।
प्रफुल्लवक्त्रें मग भक्तिमेळीं । तैं बोलले विठ्ठल त्या सुकाळीं ॥१॥
ज्ञानेश्वरें स्तोत्र अपूर्व केलें । माझ्या मना हें तरि फार आलें ।
पढेल कोणी मम भक्त भावें । वाटे मला मत्पद त्यासि द्यावें ॥२॥
कृष्णाष्टमी पासुनियां अमांत । कार्तिकमासी ममभक्त येथ ।
यिवोनियां स्त्रोत्र करील कोणी । मद्रूप मी देयिन चक्रपाणी ॥३॥
या अष्टमी कीर्तन जो करी तो । सर्वार्थसिद्धी इह तो वरीतो ।
त्यानंतरें पाउनि लोक माझा । भोगी समृद्धीसुख सर्व वोजा ॥४॥
नौमी तिथी कीर्तनवंत कोणी । न गुंततां ये मम सन्निधानीं ।
येतों विमानीं वळघोनि जाणा । मी तुष्टतों त्यावरि देवराणा ॥५॥
कथा करी जो दशमीस नाचे । मी पाद वंदोनि तयां जनांचे ।
स्वरुप माझें निज त्यासि देतों । आज्ञेसि त्यांच्या मुकुटिं धरितों ॥६॥
एकादशीच्या दिवशीं निशीथीं । जागे करी कीर्तन - शुद्धभक्ती ।
सायुज्य माझें निज त्यासि जोडे । असे मला केवळ भक्त थोडे ॥७॥
क्षीराब्धिचा उत्सव द्वादशीला । करी महाकीर्तन त्या नराला ।
स्त्रजावया ब्रह्मकटाहकोटी । मी शक्ती देतों अनुपम्य मोठी ॥८॥
त्रयोदशी आणि चतुर्दशी अमा । तिन्ही तिथी केवळ जाण उत्तमा ।
शतां कुळाशीं ममलोकवासी । मद्रूपमद्भाग्यविभाग त्यासी ॥९॥
त्यासीच खेळें मग त्या निराळें । नसे मला आणिक साच बोलें ।
तो सोयरा मित्र समस्त माझा । मी वीकलों त्याप्रति जाण वोजा ॥१०॥
म्यां त्याजला आणिक काय द्यावें । मदीय सर्वस्व तया वहावें ।
दारीं बळीचा अतिदास झालों । भक्तीबळें केवळ वश्य केलों ॥११॥
द्वारी वसें त्याचपरी ययातें । मी विकलों अन्य नसेचि मातें ।
या अष्टही पुण्यतिथी पवित्रा । होती मला केवळ प्रीतिपात्रा ॥१२॥
लक्ष्म्यादि या अष्टहि नायकांची । नसे मला प्रीति जशी तयांची ।
या कौस्तुभाहोनि विशेष मातें । खगेंद्र येना समते तयांते ॥१३॥
हे तों घडेना मग शेष माझा । पलंगही त्यासम काय मोजा ।
ऐशा तिथी अष्ट मला प्रिया या । जाणोनिया भक्त धरील माया ॥१४॥
करील जो कीर्तन त्यांत माझें । कैचें भवाचें मग त्यासि वोझें ।
ऐसा मुखें बोलत केशिराजा । तैं नाचती ऊडति भक्त वोजा ॥१५॥
आनंद जो त्या समयांत झाला । वर्णूं कसा एक-मुखेंचि बोला ।
ब्रह्मादि वेडे घडताति जेथें । मी मानवी काय विशेष तेथें ॥१६॥
वदोनि ऐसा महिमा तिथीचा । बोले पुढें पुंडलिकास वाचा ।
त्वां पंढरी एक जगांत केली । प्रख्यात मुक्तिप्रद तेच झाली ॥१७॥
या ज्ञानदेवें रचिली अळंदी । मुक्तिप्रदा भूमितळीं त्रिशुद्धी ।
हे पंढरीहून विशेष माने । गीतार्थ केला ह्मणवोनि येणें ॥१८॥
तैं बोलिजे तोषुनि पुंडलिकें । यथार्थ देवा वदलासि ऐकें ।
मी भक्त तो केवळ तूंच होसी । ज्ञानस्वरुपीं सुख-पूर्णरासी ॥१९॥
हे पंढरीहून विशेष आहे । अर्थे यया अन्य कदापि नोहे ।
महासुखें तोषुनि देवभक्त । ऐसें मुखें बोलति सत्ययुक्त ॥२०॥
सानंद तैं देखुनि देवभक्तां । निवृत्तिनाथें अति-बोधयुक्ता ।
रम्याक्षरें त्या स्तविलें हरीतें । श्री रुक्मिणीनायक विठ्ठलातें ॥२१॥
===============================
निवृत्तिस्तोत्र.
तूं ब्रह्म तूं परम तूं परमात्मज्योती
तूं धर्म तूं परम तूं प्रिय पुण्यकीर्ती ।
आत्माचि तूं अकळ तूंचि निरंजना रे
तूं तो अनंत कळसील कसा जना रे ॥२२॥
तूं तो विवेकधन या अविवेकवंता
कैसा दिसों सकसि सूक्ष्मतमा महंता ।
हृत्सारसा विकसना करिसील भानू
चैतन्य तूं परम तूं तुज काय वानूं ॥२३॥
विश्वेश तूं अखिल तूंचि चराचराचा
धाता पिता म्हणविसी विभु पंढरीचा ।
तूं पांडुरंग जगतारक तूंचि देवा
ईटेवरी विलससी विभु वासुदेवा ॥२४॥
तूं आदि अक्षर परात्पर बीज होसी
तूं तो अनादि सुखमूर्ति असाचि ठासी ।
अंभोद - शामल - तनू पट पीत कासे
सौदामिनीसम सुवर्णयुगें विकासे ॥२५॥
कंदर्प - कोटिसम सुंदर मोहनांगा
आदित्यकोटिसम तेजधरा विहंगा ।
आरुढसी असि-गदांबुज - चक्रधारी
सर्वांग रत्नमणिमंडित तूं मुरारी ॥२६॥
फुल्लांबुजेक्षण शुचिस्मित तूं दयाळा
कूर्मासमान अवलोकिसि सज्जनांला ।
माथां किरीट अतितेज विराजताहे
कानीं झ्षाकृति सुकुंडल - युग्म आहे ॥२७॥
तूंतें विलोकन असें करितां दयाळा
तेव्हां रजस्तमविलास दिसे गळाला ।
तूझी असी तनु मनोहर देखिजेते
तैं सत्व शुद्ध अति मानस हें करीतें ॥२८॥
अष्टांगही भरत सात्विक अष्टभावें
रोधे गळा बहुत बोल नये स्वभावें ।
रोमांच ऊठति तनूवरि वारिधारा
नेत्रीं गळे निरखितां तुजला उदारा ॥२९॥
ब्रह्मांडकोटि वसती तव रोमराजीं
देवा अनंतगुण तूं अससी असा जी ।
वर्णावया तुज सहस्त्रमुखासि कोडें
मी काय एक मुख वर्णिन दीन वेडें ॥३०॥
त्वां ज्ञानदेव अपुल्या परमार्थरुपीं
केला विभू समरसोनि बरा अरुपीं ।
दीनें अम्हीच उरलों न करी उपेक्षा
त्वां तारिजे म्हणुनि नित्य मनीं अपेक्षा ॥३१॥
ऐशा स्तवें परम तोषुनि मंद हांसे
पाहे कृपार्द्रनयनें करुणाविलासें ।
होसी निवृत्ति गुणसागर मीच तूंही
तुह्मा अह्मांत तरि भेद कदापि नाहीं ॥३२॥
ज्ञानेश मी नरहरी शिव तूं निवृत्ती
चैतन्य एक घडलों निज चारि मूर्ती ।
देवत्रयांत परि कल्पुनि भक्त तीनी
म्यां हाचि खेळ रचिला विभु सत्य मानी ॥३३॥
आतां असे कवण भिन्नपदार्थ सांग
मीतूंपणा दिसत भास दुजा प्रसंग ।
हेमेंचि निर्मुनि किजे कटकादि-मुद्रा
कैचा तरंगकृत भेद महा - समुद्रा ॥३४॥
आकाश काय मठ कुंभ तयांत भेदे
दृष्टी जरी दिसत भिन्न नव्हे विनोदें ।
तूं आमची स्तुति असी करसील देवा
हें चोज वाटत मनासि निवृत्तिदेवा ॥३५॥
ब्रह्मांड पूर्ण सगळें तव रोमरंध्रीं
माया स्त्रजी सकळ तेचि तुझी पुरंध्री
तूं तो विराटतनु सर्व तुझ्याच आंगी
शोभे जगतत्रय असें भजताति योगी ॥३६॥
घेसी हरा विविध तूं अवतार जेव्हां
आह्मी करुं सकळही तवपादसेवा ।
ब्रह्मादि देव मग कोण गणील तेव्हां
दासानुदास घडती अष्ट तुझ्या विभूती
मी एक सर्व घडलों परमार्थमूर्तीं ।
हे काय शैलतनुजा मजवीण आहे
मी शक्ती तूं पुरुष हे श्रुति बोलताहे ॥३८॥
हेरंब षण्मुख वृषेंद्र गणेंद्र नंदी
हे पार्षदादि समुदें घडलोंचि आधीं ।
वांचोनि मी कवण अन्य घडेल तूझें
सर्वस्व तूंचि अससी परतत्व माझें ॥३९॥
सांगाल तें करिन साच निवृत्तिनाथा
नासूं त्रिलोकजनदुर्धरघोरचिंता ।
शोषूं भवार्णव अह्मीं अपुल्या चरित्रें
तारुं रचूं सुगम सुंदर नाममंत्रें ॥४०॥
जेव्हा धरोनि भवसागर जाहलाहे
तेव्हां धरोनि अह्मिं तारक निश्चयें हें ।
जे आमुचे भजति भक्त अह्मां अभेदें
तेव्हां भवाब्धि तरताति महा विनोदें ॥४१॥
हें ऐकतां मधुरभाषण तो निवृत्ती
लोटांगणें हरिस घालित पुण्यकीर्ती ।
तूं धन्य धन्य अमुतें अति गौरवीसी ।
लोकांत सद्यश असें बहु गाजवीसी ॥४२॥
होसील तूं सकळ आजि अह्मां कुवांसा
साहाय सर्वविषयीं करिसी परेशा ।
हें जाहली सकळ सिद्ध तपें तुझ्यांनीं
नारायणा अखिलनायक चक्रपाणी ॥४३॥
या विष्णुभक्तिपथिं आजि अम्हांसि देवा
केलें धुरीण जगतीप्रति वासुदेवा ।
दासानुदास अह्मिं त्वांचि कृपा करावी
माया असीच परिपूर्ण मनीं धरावी ॥४४॥
बोले हरी ’सकळदर्शक विष्णुमार्गा
होसील तारक गुरु त्रिजगा अनेगा ।
तूं मोक्षसिद्धिकर लाविसि याच वाटे
नानाजना फिरविसी पडले अव्हाटे ॥४५॥
पाळी असे हरि लळे निजसेवकाचे
स्थापी असा भजनमार्ग वदोनि वाचे ।
देवोनियां निजसमाधिस ज्ञानदेवा
स्थापीतसे कलयुगीं हरि धर्मसेवा ॥४६॥
ऐसें वदोनि पद वंदुनि तेचि काळीं
श्रीविठ्ठला पुसुनि तोषमनांतराळीं ।
केलें प्रयाण अपुल्या निजधामपंथें
श्रीत्र्यंबकेश्वर वसे निजलिंग जेथें ॥४७॥
जेथें कुशाव्रत असे हरिरुप गंगा
तेथेंच हा मिळत जाउनि अंतरंगा ।
गेला अनंतसुखधामपदासि तो कीं
जो जाहला प्रकट साधुजनार्थ लोकीं ॥४८॥
निवृत्ति जातां प्रति ज्ञानदेवें । तैं प्रार्थिले श्रीवचना करावें ।
जावें तुह्मी ब्रह्मगिरीस देवा । तीर्थी समर्पा तनु शुद्धभावा ॥४९॥
त्यानंतरें विष्णुपदासि पाऊं । त्रिवर्ग आह्मी सुखपूर्ण होऊं ।
पाऊं तया चिन्मयविष्णुधामीं । क्रीडा करुं श्रीहरिसींच आह्मी ॥५०॥
मुक्ता ह्मणे तैं मज विठ्ठलातें । समर्पिजे ज्ञानविधी स्वहस्तें ।
चंद्रार्क तों राहिन पंढरीसी । सेवोनियां विठ्ठल सौख्यरासी ॥५१॥
दया असों द्या मज लेंकरावरी । आयीस मातें निरवा परोपरीं
हे पुंडलीकादिक भक्त सोयरे । आहेति बंधू मज हेचि साजिरे ॥५२॥

इतिश्रीज्ञानेश्वरविजमहाकाव्ये समाधिवर्णननिवृत्तिप्रयाणं
नाम नवमोध्याय: ॥ श्रीसद्‍गुरुचरणारविंदार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 28, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP