समाधि प्रकरण - अध्याय चौथा

निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.


पुढें चाले वेगें गरुड अपुल्या पक्षगतिनें
विमानें चालावें किति मजपुढें याच मतिनें ।
विमानाच्या वेगा गरुड निरखी तों दिसतसे
जवें पाठीं धांवे मनपवनवेगा जिणतसे ॥१॥
पुढें आला वेगें खग हरिपदा वंदन करी
म्हणे या देखावें तुह्मि गगनयाना झडकरि ।
ययामध्यें दोघे मिरविति तुझे भक्त बरवे ।
जयांच्या सामर्थ्या त्रिभुवनपते तो न पुरवे ॥२॥

भुजंगप्रयात.
सुपर्णामुखें ऐकतां पंढरीशें । निरीक्षी नभा लोचनीं फार हर्षे ।
तदां दाखवी त्या विमानासि हरतें । प्रिया रुक्मिणीसत्यभामादिकांतें ॥३॥
म्हणे नामया येतसे यान पाहे । ययामाझि तूझा सखा दीसताहे ।
तुझा छंद हा पाळिला ज्ञानदेवें । तुला धन्य केलें त्रिलोकीं सदेवें ॥४॥
तगे तें पहा व्योमयानासि नेत्रीं । जयाच्या प्रकाश पुरेना धरित्री ।
सख्या ज्ञानिया पुंडलीकासमेतें । दिठीं देखसी भेटसी प्रेमचित्तें ॥६॥
तदां हर्ष मायीचना नामयाचा । मनीं आणि पोटीं जगीं सर्व साचा ।
त्रिलोकीं न ब्रह्मांडगर्भांत सांठे । जयालागिये लोपलें तत्व भेटे ॥५॥
नमी विठ्ठला बोलिला भक्त नामा । तुम्ही काय देवा करानात तेंमा ।
असी तूमची जाणतां श्रेष्ठमाया । नसे देव लोकत्रयींही वदाया ॥७॥
तदां साम्य येईल कोणासि तूझें । तदां तूंहुनी श्रेष्ठ कैंचा विराजे ।
म्हणोनीच म्यां घेतला आळ देवा । तुवां पाळिला मायबापा सदेवा ॥८॥
घडेना तसेंची घडों आणिसी जी । असें हें तुझी योगमाया नियोजी ।
नमो इंदिरेशा तुझ्या पादपद्मा । नमो सत्यभामाप्रिया सौख्यसद्मा ॥९॥
असें बोलुनी तो उगा मौन वाहे । पुढें पातल्या त्या विमानासिं पाहे ।
लयांताग्निचंद्रार्क तेजें लखाखी । समस्तांचिया नेत्रपात्यांसि झांकी ॥१०॥

शिखरिणी.
असें आलें पृथ्वीवरि उतरलें पुष्पक तदां
पहा त्या भक्तांच्या मनिं उसळला हर्ष समुदा ।
अम्हा झाला कैसा दिवस तरि हा धन्य सकळां
कळेना कोणातें त्रिभुवनपतीविठ्ठलकळा ॥११॥

भुजंगप्रयात.
अहो पुंडलीकासि ज्ञानेश्वरातें । तया नामया आणि लक्ष्मीधरातें ।
सतीरुक्मिणी-सत्यभामासमेतें । अम्ही पाहतों पुण्य हें काय होतें ॥१२॥
असा काय एकांत दृष्टी पडावा । असा काळ कोण्य़ा भवीं आतुडावा ।
असे तोषले गर्जती नामघोषें । दिशा सर्वही पूर्ण झाल्या विशेषें ॥१३॥
निरीक्षोनियां सन्निधीं चक्रपाणी । त्वरें ज्ञानियालागि हातीं धरोनी ।
सुखें पुंडलिकें विमानावरोनी । तदां ऊतरे धन्य तो काळ मानी ॥१४॥
नमी विठ्ठलाच्या पदी दंड तैसा । झरे प्रेमधारा दिठीं पूर तैसा ।
सुरोमांच कांटे किती दाट देहीं । दिसे पातला ते क्षणी कंप तोही ॥१५॥
असा अष्टभावी बुडाला दिसेना । तया देखते सर्वही भक्तसेना ।
म्हणे धन्य हा भक्त कीं पुंडलीक । जगीं पाहिला वर्णिजे हाचि एक ॥१६॥
जयाकारणें या क्षितीं शेषशायी । उभा राहिला पंढरीमाजि पाही ।
अम्हां हेंचि वैकुंठ याच्या कृपेनें । न लागे बहू दूर तें ऊर्ध्व जाणें ॥१७॥
मिठी घातली पुंड्लीकें पदाब्जीं । गळे बाप्षधारा तया लोचनाब्जीं ।
गळां शब्द रोधी नये बोल कांही । तया ऊठवी त्याक्षणीं देव बाहीं ॥१८॥
चहूंही भुजांनी अलिंगी स्वभक्तां । अनेकां दिसा देखिलें प्रेमयुक्ता !
कसा काळ हा धन्य झाला मला रे । दिठीं या तुला देखिलें म्यां मुला रे ॥१९॥
तदां प्रार्थिले पुंडलीकें हरीतें । म्हणे हेंचि द्यावें अखंडार्थ मातें ।
असें ज्ञानदेवीं जसे नामदेवी । तसें प्रेम माझे स्थळी नित्य ठेवीं ॥२०॥
तदां रुक्मिणी सत्यभामेसी वंदी । न माये जगीं त्यासि आनंद क्द्धीं ।
तदां भेटले भक्त ते उद्धवादी । कसा लोटला प्रेमलोटें सुखाब्धी ॥२१॥
नमी ज्ञानीया पंढरीनायकातें । महासौख्यसंपत्तिच्या दायकातें ।
तदां भेटले नामया आणि ज्ञानी । सुखें पुंडलीक स्वयें धन्य मानी ॥२२॥
म्हणे नामया तूं जगी धन्य होसी । नसे भक्त तूझ्या असा केशवासी ॥
पदीं पावल्या ज्ञानदेवासि येथें । तुझ्या कारणीं आणिलें या समर्थे ॥२३॥
युगाचेयुगीं धन्य कीं भक्त तुम्ही । अळंदी सदांही असे जाणतों मी ।
जगा उद्धरायासि हे गुह्य देवें । असें ठेविलें तत्व हें वासुदेवें ॥२४॥
जगाकारणे पंढरी आणि काशी । प्रसिद्धा जगीं उत्तरे दक्षिणेसी ।
तयांहूनि हे गुह्यदेवें अळंदी । स्वभक्तांचिया ठेविली मोक्षसिद्धि ॥२५॥
जसा भूप भांडार राखे जिवाचें । तसें मुक्तिभांडार हें केशवाचें ।
सुविश्वासिया दाखवी हे अळंदी । जया वाटतें देइजे मोक्षसिद्धि ॥२६॥
जुनें पी॑ठ वैकुंठ भूलोकिचें हें । यथें नीळकंठेश हा देव आहे ।
यथे ब्रह्मरुद्रादि सर्वां सुरातें । महासिद्धि संप्राप्त झाली पुरा ते ॥२७॥
असे साच कैलास हे भूमिभागीं । बुझे मातुलिंगाख्य हें क्षेत्रयोगीं ।
असे बोलती ते स्थळीं केशिराजा  चतुर्भूज राहे सदा स्वामि माझा ॥२८॥
यया दक्षणे पंचकोशांत पाहे । महाक्षेत्र तें पुण्यनामाख्य आहे ।
असे दिव्य नागेश लिंगासी मानी । नदी नागनाम्नी असे सन्निधानीं ॥२९॥
नद्या तेथ मूळा मुठा नागगंगा । त्रिवेणी घडे तुल्य मानी प्रयागा ।
असे पश्चिमे जाण इंदूपुरी ते । महाक्षेत्र संहार पापा करीते ॥३०॥
अळंदीस तेही वसे पंचकोशीं । तिथें दिव्य ब्रह्मेश तो सत्वराशी ।
जगा उद्धराया सदोदीत राहे । जगीं धन्य तो लोचनीं त्यासि पाहे ॥३१॥
असे उत्तरे खेटकीं सिद्धलिंग । असे पंचकोशांत तेही अभंग ।
असी भीमरा दक्षणे वाहताहे । पहा दिव्य भागीरथी तीर्थ आहे ॥३२॥
पहा पूर्वभागीच इंद्रायणीचा । कसा संग हा शोभला भीमरेचा ।
महालिंग तैं संगमेशाख्य आहे । तया पाहतां पाप कांही न राहे ॥३३॥
ययांमाजि मध्यथळी हे अळंदी । वसे मूळ सिद्धेश हा चित्सुखाब्धी ।
नदी दिव्य इंद्रायणी देवगंगा । तिच्या स्नानमात्रेंचि ने पाप भंगा ॥३४॥
पहा दक्षणे वाहते सर्वकाळी । यथें ज्ञानिया नांदतो प्रेमशाली
करी स्नान येथें तया कोटितीर्थे । कृतस्नान सत्पुण्य जोडे तयार्थे ॥३५॥
असी दिव्य काशी गया आणि वेणी । प्रयागादि येथेचि तूं सत्य मानी ।
असे नित्य येथें हरी शंकरासी । पहा मोक्ष प्रत्यक्ष दे पामरासी ॥३६॥
अशा सुस्थळी ज्ञानदेवा समाधी । दिल्ही विठ्ठलें सर्वलोकार्थसिद्धि ।
तुझें भाग्य हें नामया धन्य आहे । तुझ्याकारणीं देखिले देवराये ॥३७॥
नसे देवलोकीं न पाताळपोटी । असें तीर्थ हें सिंधूच्या सप्तबेटीं !
मिळे ज्यासि भाग्यें तरे तोचि प्राणी । नसे सूटला मागुती गर्भखाणी ॥३८॥
निवृत्तीसवें फावलें जें निदान । अह्मी हें तुम्ही देखिलें सत्य जाण ।
निवृत्ती निधी ज्ञानिया ज्ञानखाणी । महासिद्धि मुक्ता अळंदीस मानी ॥३९॥
अळंदीच हें पंढरी ज्ञानदेवें । कशी आजि केली दुजी या सदेवें ।
उभारोनि बाहे तुला सांगता हें । मुखीं एकदां जो जपे नाम लाहे ॥४०॥
हरी विठ्ठला गोपवेषा मुरारी । तया मुक्ति येवोनि ठाके पुढारी ।
कळी काळ दोघांकडे त्रास मोठा । अळंदीजनाच्या न जातीच वाटा ॥४१॥
असे येथे चिंतामणी कल्पशाखी । महा कामधेनूसि जो कां विलोकी ।
तयातें जगीं या उणें काय आहे । महादैन्यदु:खादि कोठें न राहे ॥४२॥
अजानाख्य हा कल्पशाखी विराजे । असे देवचिंतामणी सिद्धराज ।
स्वभक्तांसि दे सर्वसिद्धि दयाळू । तया देखतां तो करी काय काळू ॥४३॥
नदी हेच इंद्रायणी कामधेनू । करी काम संपूर्ण हे मुक्ति धेनू ।
असे श्रेष्ठ अश्वत्थ  हा सोनियचा । समाधिस्थळी शोभतो ज्ञानियाचा ॥४४॥
जडां आणि मूढांसि बाळां स्त्रियांते । पशू शूद्र हो अंत्यजा पामरांतें ।
हरी मोक्ष ज्ञानाविना त्यांसि देतो । अळंदीस एक्या निशीं राहतां तो॥४५॥
वदे नाम तोंडी महापाश तोडी । कथा आयके तो महासौख्य जोडी ।
जरी एक बिंदूच सेवी जळाचा । घडे नाश हो सर्व त्याच्या मळाचा ॥४६॥
असें वर्णीतां भाविकें पुंडलिकें । नभीं दाटलीं ते विमानें अनेकें ।
तदां मीनले स्वर्गिचे देव सारे । महाश्वर्य पोटीं तयांच्या न थारे ॥४७॥
अहो पुंडलीकादि भक्तांसमेतें । दिठीं देखिलें आजि वैकुंठ येथें ।
उभा देव गोपाळगायींसमेतें । पहा दीसती गोपिका सर्व येथें ॥४८॥
असे येथ राही उभी सत्यभामा । पहा भीमकी लाजवी पूर्ण सोमा ।
अशा अष्टही पट्टराण्या विभूला । समालिंगिति कल्पवल्ली तरुला ॥४९॥
पहा पैल या अंबरीषा नृपातें । तुम्ही दे३खिलें काय राया ध्रुवातें ।
पहा दीसतो धर्मबंधूसमेतें । हरी सन्निधीं देखिलें अर्जुनातें ॥५०॥
तुम्ही पाहिलें उद्धवा काय डोळां । पहा आणखी मीनला भक्तमेळा ।
विदेही महाज्ञानसंपन्न साजे । पहा श्रेष्ठ रुक्मांगदातुल्य राजे ॥५१॥
ऋषी हे महा पातले हो तपस्वी । मुनी व्यास वाल्मीक आले यशस्वी ।
पहा सिद्ध दत्तादि येथें मिळाले । चिरंजीव मार्कंडभूषुंड आले ॥५२॥
हरीदास हा मारुती मुख्य जेथें । पहा पैल लंकापती भक्त येथें ।
पहा धन्य सुग्रीव किष्किंधनाथ । महावृद्ध आला असे जांबुवंत ॥५३॥
पहा अप्सरा मुख्य येथें मिळाल्या । तयांच्या कशा कामबुद्धी गळाल्या ।
सुरांच्या ऋषींच्या मिळाल्या पुरंध्री । जया रत्नताटंक सत्कर्णरंध्रीं ॥५४॥
करीं आरत्या रत्नताटी हरीतें । उभ्या दिव्य नीराजना रत्नहस्तें ।
असा हा समारंभ आतां अळंदी । मिळाली असे ज्ञानदेवा समाधी ॥५५॥
असा काळ हा श्रेष्ठ कोणासि भेटे । कलीची महाभीति सर्वस्व आटे ।
असें बोलती देव ते एकमेकां । न माये मनीं ज्यासी संतोष तो कां ॥५६॥
भला नामदेवा भला ज्ञानदेवा । भला पुंडलीका महाशुद्धभावा ।
तुम्ही आणिलें सिद्ध वैकुंठ येथें । नसे सौख्य ऐसें पदस्थांसि तेथें ॥५७॥
म्हणोनी पहा भक्त वैकुंठवासी । क्षिती पातले मुक्तिसंगी उदासी ।
उदार स्वरें हर्ष पूर्णांतराळें । फुले वर्षती सर्वही एकमेळें ॥५८॥
तदां वंदिलें उद्धवें विठ्ठलातें । म्हणे देखिलें थोर आश्वर्य येथें ।
अम्ही द्वारका पाहिली पूर्वकाळी । नसे जाहली त्या स्थळीं हे दिवाळी ॥५९॥
मिळाला नसे यापरी भक्तमेळा । असा कोण तेथें महोत्साह झाला ।
सदानंददायी अळंदीच माने । नभीं दाटलीं कोटिशा देवयानें ॥६०॥
येथें दिव्य इंद्रायणी धन्य वाहे । इची साम्यता गोमती ते न लाहे ।
असे येथ सिद्धेश हा मुक्तिदाता । करी तारकादेश लोकां समस्तां ॥६१॥
अहो येस्थळी ग्राव चिंतामणी ते । असे द्वारके देखिले काय होते ।
बुडाली तुवां टाकितां ते समुद्रीं । असे चौयुगी सारखी ते अळंदी ॥६२॥
त्रिवेणी सदां वाहते रम्यवाणी । जरी द्वारका श्रेष्ठ केली पुराणीं ।
न ये हे कधीं थोरवी त्या पुरीला । मला विठ्ठला वाटतें साच बोला ॥६३॥
पहा वृक्ष वल्ली शिला मुक्त येथें । तुझ्या पादरेणुप्रतापें समस्तें ।
अहो भूमिका धन्य जेथें अळंदी । तुझी पादपद्मांकिता दे समृद्धी ॥६४॥
तुझें भाग्य वानूं किती ज्ञानदेवा । तुवां आणिलें या स्थळीं वासुदेवा ।
पहा सर्व वैकुंठ येथेंचि आलें । दिसे सर्व ब्रह्मांड येथें मिळालें ॥६५॥
तुझ्या या स्थळा देखतां काळ कांपे । समाधीस देखोनि देवेंद्र तापे ।
तुझ्या सेवनालागिं येतो समोरा । तुला प्रार्थितो स्वर्गवासा उदारा ॥६६॥
तदां अष्टदिक्पाळकां कोण लेखी । कटाक्षा तुझ्या इच्छिती सर्व ते कीं ।
कसें भाग्य या ज्ञानियाचें पहाहो । उभा राहिला देव त्रैलोक्यनाहो ॥६७॥
अवो रुक्मिणी ऐकसी गोष्टि माझी । परब्रह्मिंची शक्ति नोहेसि दूजी ।
खरें सांग तूं पूसतों गोष्टि तूतें । अळंदी उणी कीं उणी द्वारका ते ॥६८॥
असे जाण शैवागमी रम्य गाथा । अळंदीच हे श्रेष्ठ त्रैलोक्यमाता ।
अळंदी महापेठ आहे जुनाट । विके नाम नाणे फुका ब्रह्म भेटे ॥६९॥
तदां बोलली भीमकी धन्य होसी । अरे उद्धवा सत्य विज्ञानरासी ।
तुझी धन्य हे प्रेमगंभीर वाणी । असे साच ऐशी अळंदी पुराणीं ॥७०॥
तदां उद्धवां भेटले भक्त सारे । महाश्रेष्ठ सज्ञान होसी कसा रे ।
महानंद साम्राज्य तूला मिळालें । तुझ्या कीर्तनें पाप सारें जळालें ॥७१॥
तया रंगणी नाचतो भक्त नामा । मुखीं गात त्या विठ्ठला सार्वभौमा ॥
तदां ताळ दिंडी पताका अनंता । महाघोष गाजे विरिंच्याडेभत्ता ॥७२॥
॥ इति श्री ज्ञानेश्वरविजये समाधिवर्णने क्षेत्रमहिमावर्णनं नाम ।
चतुर्थोध्याय: ॥ श्री पंढरीशार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 28, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP