अध्याय ८५ वा - श्लोक ५६ ते ५९
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
ते नमस्कृत्य गोविंदं देवकीं पितरं बलम् । मिषतां सर्वभूतानां ययुर्धाम दिवौकसाम् ॥५६॥
गोविंद देवकी वसुदेव बळ । यांतें नमूनि अमळ सकळ । भासुर जैसें रविमंडळ । तैसे प्रांजळ देदीप्य ॥७२॥
पाहात असतां सकळ भूतें । जाते जाले सुरसदनातें । पूर्वीं अमर जैसे होते । जाले असके ते तैसे ॥७३॥
ऐसें देखूनि देवकी देवी । मानिती जाली आपुले जीवीं । मत्सुत त्रिजगाचे गोसावीं । माया आघवी हे यांचीं ॥७४॥
तं दृष्ट्वा देवकी देवी । मृतागमनिर्गमम् । मेने सुविस्मिता मायां कृष्णस्य रचितां नृप ॥५७॥
कंसहस्तें चिरकाळ मेले । सजीव मृतपुत्र ते आणिले । स्तन्य सेवूनि निष्पाप जाले । वंदूनि गेले निजभुवना ॥३७५॥
आगमनिर्गम सुतांचा ऐसा । देखूनि देवकी निजमानसा । माजि विस्मय मानी कैसा । कुरुनरेशा तो ऐक ॥७६॥
म्हणे हे अवघी कृष्णमाया । ब्रह्मादिकांही नये आया । ते प्राकृतां जाणावया । शक्य कैसेनि होईल ॥७७॥
जातमात्र कंसें वधिले । ते आजिवरी कोठें उरले । ज्यांतें हरिबळ घेऊनि आले । हें अघटित केलें श्रीकृष्णें ॥७८॥
मृतपुत्रांचीं मायिकरूपें । कृष्णें आणूनि दिधली मजपें । मी भुललें हरिसंकल्पें । मानिलीं स्तनपें स्वापत्यें ॥७९॥
स्तन प्रासूनि निष्पाप जाले । नमस्कारूनि स्वर्गा गेले । मायामय हें मज आपुलें । चरित्र दाविलें श्रीकृष्णें ॥३८०॥
ऐशी देवकी सुविस्मिता । जाहली होत्साती नृपनाथा । रामकृष्णां उभयसुतां । मानी तत्वता परेश हे ॥८१॥
एवंविधान्यद्भुतानि कृष्णस्य परमात्मनः । वीर्याण्यनन्तवीर्यस्य सन्त्यनन्तानि भारत ॥५८॥
शुक म्हणे गा कुरुकुळदीपा । परम धार्मिका परीक्षिति भूपा । श्रवणभक्तिरसामरपादपा । सत्यसंकल्पा भजलासी ॥८२॥
ऐसिये परीचीं अनेक चरितें । श्रीकृष्णाचीं परमाद्भुतें । आहेत त्यांमाजि जितुकीं विदितें । तीं तुज श्रुत जालीं कीं ॥८३॥
देहात्ममानी मंदमति । पशुसाभ्यें जे तिर्यग्वृत्ति । आहार मैथून भय सुषुप्ति । यावीण नेणती आपपर ॥८४॥
सुकृत किंवा दुष्कृत कांहीं । पशुसमान ज्यां ठावुकें नाहीं । जडमूढ पामर जे नरदेहीं । असतां हृदयीं हरि विमुख ॥३८५॥
त्यांहूनि जीवात्ममानी श्रेष्ठ । सुकृतदुष्कृत वोळखे स्पष्ट। सुकृतफळभोग मानी इष्ट । दुष्कृत अनिष्ट कष्टद पैं ॥८६॥
सुकृतसाधनीं प्रवर्ते लोभें । तेथ ही धाला घालिजे दंभें । सुकृतामाजी दुष्कृत क्षोभे । अहंता वालभें उत्पादी ॥८७॥
मग त्या मिश्रफळाच्या भोगा । सांडूनि योनि सुरतिर्यगा । पात्र होऊनि मनुष्यलिंगा । आदरी यागा सुकृतार्थ ॥८८॥
मग त्या मखसुकृतें करून । जीवात्मबोधें सुकृतवान । अधिष्ठूनियां स्वर्गभुवन । वेंची पुण्य सुरभोगें ॥८९॥
पुण्यक्षयीं अधोगति । पावें मृत्युलोकावाप्ति । मखसुकृतें जोडोनि पुढती । सुरवरसंपत्ति भोगार्थ ॥३९०॥
तंव प्रमाथी इंद्रियें क्षुब्ध । बळें आचरती विधिविरोध । यथेष्टाचरणें होती बद्ध । सहसा निषिद्ध न टकिती पैं ॥९१॥
तेणें होय अधोगती । तिर्यग्योनि दुःखद लाहती । दुःखभोगें अघनिवृत्ति । पुन्हा येती नरदेहा ॥९२॥
जीवात्मनिष्ठ ऐसे भ्रमणीं । त्यांची कथिली भ्रमकाहणी । तेथूनि सुटिकेची शिराणी । काम्याचरणीं त्यांलागीं ॥९३॥
अवचट लाहती जैं सत्संग । तैं त्यां उमजे निष्काममार्ग । इहामुत्रार्थफळविराग । उपजे चांग ते काळीं ॥९४॥
अनेकजन्मीं भोगिलें दुःख । ते तैं आठविती सम्यक । म्हणती सकामकर्मठ मूर्ख । सुरतिर्यग्मनुजादि ॥३९५॥
सकामसुकृतें स्वर्ग अनित्य । भोगूनि पावती अधःपात । देह लाहूनि नाशवंत । दुःकें अनंत अनुभविती ॥९६॥
यालागीं त्या नित्यनिवेक । करितां अनित्य दुःखदायक । जाणोनि नित्यवस्तु जे एक । ते तैं सम्यक गिंवसिती ॥९७॥
गवेषणा करितां निगुती । सहसा नावगमे आत्ममती । भाग्यें सद्गुरुचर्णीं रती । जालिया होती तन्निष्ठ ॥९८॥
सद्गुरु बोधी उपासना । सकामकर्मीं दोषदर्शना । करूनि लावी निष्कामभजन । योगसाधना रुचवूनी ॥९९॥
मानस भक्तियोगें स्तिमित । करवी व्हावया आत्मरत । विषयापासूनियां उपरत । होय तो पंथ प्रतिपादी ॥४००॥
वासना त्यागी शमसाधनीं । दमें नियोजी इंद्रिय दमनीं । मिथ्यात्वावबोधें करूनि । दृश्यापासूनी उपरमवी ॥१॥
देहवंता त्रितापसहन । न चुके जोडिल्या नृपासन । यालागीं तितिक्षावलंबन । करवी बोधन दृढ धैर्यें ॥२॥
रसास्वादना फलाभिलाष । नसतां न होय श्रमनिरास । वेदान्तवचनीं तैं विश्वास । करीं विशेष श्रद्धाळु ॥३॥
ऐशी शमषट्कसंपत्ति । नितान्तनिर्मळ चित्तवृत्ति । होतां रुचवी आत्मरति । समाधि म्हणती जिये दशे ॥४॥
आत्मरति ते म्हणाल कशी । व्यतिरेकबोधें तत्वनिरासीं । भजवी चिन्मात्र आत्मवासी । नाहंतेशीं सोहंत्वा ॥४०५॥
ऐसा साधनसंपत्तिवंत । स्वरूपनिष्ठ होय संतत । देहात्मजीवात्मनिष्ठातीत । सन्मात्र संतत स्वात्मत्वें ॥६॥
वाच्यांश शबलांश त्यागेंकरून । लक्ष्यांश सन्मात्र होय आपण । त्रिविधबंधातीत पूर्ण । आनंदघन अविनाश ॥७॥
ऐसे जीव जिये पदीं । मिळती सांडूनि सर्वोपाधी । परमात्मा तो कृष्ण त्रिशुद्धी । धर्मविरोधी संहर्ता ॥८॥
जयासि म्हणती परब्रह्म । पूर्णानंद निष्कामकाम । परमात्मा हें तयाचें नाम । अनंत विक्रम पैं त्याचे ॥९॥
अनंतयुगीं अवतरून । अनंत दैत्यांचें संहरण । करी स्वसेतुसंस्थान । अनंतवीर्यविस्तारें ॥४१०॥
अनंतवीर्यें अनंताची । अनंतचरितें असती साचीं । गाती ऐकती पढती त्यांची । भवभ्रमसंसृति विखंडिती ॥११॥
अनंतवीर्यें हरीचीं चरितें । गाती ऐकती पढती वक्ते । भगवत्पदवी सुलभ त्यांतें । ऐसें निरुतें शुक वदला ॥१२॥
सूत उवाच - य इदमनुश्रृणोति श्रावयेद्वा मुरारेश्चर्रितममृतकीर्तेर्वर्णितं व्यासपुत्रैः ।
जगदघभिदलं तद्भक्तसत्कर्णपूरं भगवति कृतचित्तो याति तत्क्षेमधाम ॥५९॥
शौनकप्रमुखां मुनींतें सूत । म्हणे जो हें मुरारिचरित । ऐके ऐकवी सप्रेमभरित । हरियश अमृतमय रुचिर ॥१३॥
व्यासपुत्र जे शुकाचार्य । तिहीं वर्णिलें सुधामय । येणें जगाचा अधभंग होय । कक्षनिचय पावकवत् ॥१४॥
कृच्छ्रादिकें प्रायश्चितें । जगदघ भंगितां असमर्थें । श्रवणमात्रें मुरारिचरितें । निःशेष त्यांतें क्षय होय ॥४१५॥
होतां निःशेष पापक्षुय । तैं भगवंतीं चित्त राहे । तोचि मोक्षाचा उपाय । लाहे अनपाय हरिभक्ति ॥१६॥
सद्भक्ताचिये श्रवणीं पूर्ण । सप्रेम रुचती भगवद्गुण । तैं तो पावे क्षेमसदन । ज्यातें निर्वाण मुनि म्हणती ॥१७॥
चित्तशुद्धीचें कारण । हरिगुणकीर्तनश्रवनपठन । चित्तशुद्धि जालिया पूर्ण । कैवल्यसदन मग सुलभ ॥१८॥
तस्मात्त हरियश गाती पढती । किंवा ऐकती ऐकविती । ते नर कैवल्यसदना जाती । व्याससुतोक्ति हे सत्य ॥१९॥
ऐशी श्रीमद्भागवतीं । श्रीशुकमुखें कैवल्यप्राप्ती । ऐकूनियां परीक्षिति । निवाला चित्तीं निजलाभें ॥४२०॥
ऐशी अनंत मुरारिचरितें । असती म्हणूनि मुनिसमर्थें । बोलिलीं ती ऐकूनि चित्तें । पुनः प्रश्नातें करी नृप ॥२१॥
तो अध्याय षडशीतितम । जेथ सुभद्राहरणोद्यम । अर्जुनाकरवीं मेघश्याम । पुसेल सप्रेम परीक्षिति ॥२२॥
आणि श्रीकृष्ण विदेहनगरा । जाऊनि विदेहा आनि द्विजवरां । भेटूनि तयाचिया मंदिरा । जाईल शरीरा द्विधा करूनी ॥२३॥
द्विधा म्हणिजे रूपें दोन्ही । समान धरूनि उभयतां भुवनीं । तोष पावूनि तदर्चनीं । वेदान्तवचनीं बोधील ॥२४॥
तिया कथेचिया श्रवणीं । स्वर्गसुखातें कुर्वंडूनी । स्वस्थ बैसावें सज्जनीं । कैवल्यदानीं हरिप्रेमें ॥४२५॥
इतुकें श्रीमत्प्रतिष्ठानीं । एकनाथाचिये आनंदभुवनीं । लाहूनि प्रसादपायवणी । भाषा वाखाणी दयार्णव ॥२६॥
तें परिसावया सज्जनीं श्रोतीं । अवधान दीजे इतुकी विनती । श्रवणमात्रें भवभयगुंती । उगवे निश्चिती हरिवरदें ॥२७॥
श्रीमद्भागवत दशमस्कंध । टीका हरिवरद अगाध । दयार्णवकृत परमविशुद्ध । अध्याय प्रसिद्ध पंचाशीतितम ॥२८॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्नवानुचरविरचितायां वसुदेवकृतवासुदेवस्तवन देवक्याः षट्पुत्रानयनं नाम पंशाशीतितमोऽध्यायः ॥८५॥
वैशाखे पञ्चमीकृष्णे सिद्धार्थेऽबदे बुधे दिवा । पञ्चाशीतितमोऽध्यायः प्रतिष्ठाने समर्थितः ॥१॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥६०॥ ओवी टीका ॥४२८॥ एवं संख्या ॥४८८॥ ( पंच्याऐशींवा अध्याय मिळून ओवी संख्या ३८१३१ )
पंच्याऐशींवा अध्याय समाप्त.
N/A
References : N/A
Last Updated : June 12, 2017
TOP