अध्याय ८५ वा - श्लोक ४१ ते ४५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
दैत्यदान्वगन्धर्वाः सिद्धविद्याध्रचारणाः । यक्षरक्षःपिशाचाश्च भूतप्रमथनायकाः ॥४१॥
दितिसंभव ते दैत्यजाति । दानव म्हणिजे दनुसंतति । गंधर्वलोकींचे गंधर्व नृपति । सिद्ध म्हणिपति सिद्धिवान ॥८८॥
यक्ष राक्षस विद्याधर । जे कां धनदाचे किंकर । साध्य चारण आणि किन्नर । योनि समग्र निष्कृष्टा ॥८९॥
ईशानाचे प्रमथगण । शाकिनी डाकिनी इत्यादि भिन्न । भूत प्रेत पिशाच जाण । विनायक म्हणिजे विघ्नपति ॥२९०॥
एवं राजस तामसा योनी । सात्विकेंसीं प्रतीपाचरणीं । विरोध चाळिती म्हणोनि वचनीं । वैरोचनी प्रतिपादी ॥९१॥
विशुद्धसत्वधाम्न्यद्धा त्वयि शास्त्रशरीरिणि । नित्यं निबद्धवैरास्ते वय चान्ये च तादृशाः ॥४२॥
शुद्धसत्वाचें विशेषेंकरून । साक्षाद्धाम तूं जनार्दन । त्या तुझ्या ठायीं दैत्यादिगण । वैर बांधोन वर्तती ॥९२॥
वेदविहित अनुशासन । तच्छासना शास्त्राभिधान । तदनुशासन शरीरी पूर्ण । शास्त्रशरीरी यास्तव तूं ॥९३॥
तया तुझे ठायी सर्व । वैरें वर्तती दैत्यदानव । आम्हीही दैत्यान्वयसंभव । परी हें अपूर्व अवधारीं ॥९४॥
दैत्यकुळीं जन्मोनि आम्ही । रंगलों संतत श्रीपदपद्मीं । तेणें दर्शनावाप्ति सद्मीं । लाधलों स्वामी यदृच्छया ॥२९५॥
तस्मात सर्वसंपत्तीकरून । संपन्न जे निर्जरगण । ते निकटही समाधान । प्राकृतांसमान न लाहती ॥९६॥
प्राकृत म्हणसी कोण कैसे । तव पदभजनें भावनावशें । यथाधिकारें पूर्णदशे । पावले तोषें तें ऐक ॥९७॥
केचनोद्बद्धवैरेण भक्त्या केचन कामतः । न तथा सत्त्वसंरब्धाः सन्निकृष्टाः सुरादयः ॥४३॥
उत्कर्षें उद्बद्धवैर एक । जे कां शाल्वचैद्यादिक । कामें गोपिकाराधाप्रमुख । सैरंध्र्यादि स्मरतप्ता ॥९८॥
पाण्डव भक्तिप्रेमभाग्यें । श्रीदामादि मित्रप्रसंगें । वयस्कबल्लव अंगसंगें । क्रीडायोगें कैशोरीं ॥९९॥
भयें कंसादि दुर्जन । द्वेषें मागधप्रमुख जाण । अक्रूरप्रमुख वंदनें करोन । ऋजुत्वें बिभीषण समरसला ॥३००॥
एवमादि दैत्यान्वयीं । रजस्तमप्रचुरप्रकृति पाहीं । हृदय बांधोनि तुझ्या ठायीं । पावले सर्वही त्वदात्मकता ॥१॥
तैसे न पावतीच ते जाण । सुरप्रमुखही सत्त्वसंपन्न । तुझें अत्यंत संनिधान । त्यांलागून न तैसें ॥२॥
जरी मानावें हें अघटित । जें सात्विकांहूनिही रजस्तमाक्त । तुझी सन्निकृष्टता प्राप्त । तो इत्यर्थ मुनि बोले ॥३॥
इदमित्थमिति प्रायस्तव योगेश्वरेश्वर । न विदन्त्यपि योगेशा योगमायां कुतो वयम् ॥४४॥
इदं म्हणिजे ऐसेंचि वर्म । जे रजस्तमाक्तां तव प्राप्ति सुगम । सत्वसंपन्न सुरसत्तम । न पवती तव धाम निश्चय हा ॥४॥
बहुतेक तुझी हे योगमाया । योगेश्वरही जाणावया । समर्थ न होती तेथ वांया । आम्ही प्राकृत केउते ॥३०५॥
अथवा सात्विकां देवादिकां । सत्वस्वरूपें तव प्राप्ति देखा । हाही निश्चय ब्रह्मादिकां । योगिप्रमुखां न करवे ॥६॥
विरोधें अथवा आराधनें । घडे तव प्राप्ति विशेष गुणें । हा ही निश्चय अंतःकरणें । केला कोणें न वचेची ॥७॥
परंतु इतुकाची भरंवसा । अनन्यशरण पदसारसा । तुझिया होती त्या भवफांसा । गोवूं न शके कल्पांतीं ॥८॥
निष्काम सप्रेम अनन्यपणें । तुझिया चरणां शरण होणें । इतुकेन माया स्वबंधनें । बांधूं न शके कोणाही ॥९॥
होत कां रजस्तमाक्तही असुर । अथवा सत्वसंपन्न सुरवर । निष्काम सप्रेम भजनादर । न होतां दूरतर गुणबद्ध ॥३१०॥
आराधकां कीं विरोधकां । समान तव प्राप्तीच्या लेखा । असो तथापि मज निजरंका । योजीं सात्विका भजनातें ॥११॥
इतुकी प्रार्थना माझी हरी । जे सत्वसंपन्न आम्हां करीं । निष्काम सप्रेम भक्तांपरी । दृढनिर्धारीं पद भजवीं ॥१२॥
तन्नः प्रसीद निरपेक्षविमृग्ययुष्मत्पादारविन्दधिषणान्यगृहान्धकूपात् ।
निष्क्रम्य विश्वशरणाङ्घ्रुपलब्धवृत्तिः शान्तो यथैक उत सर्वसखैश्चरामि ॥४५॥
तैसा प्रसीद आम्हांप्रति । जैसा निरपेक्षी विरक्ति । पूर्णकामही जालिया पुढतीं । तव पदप्राप्ति गिंवसिजेत ॥१३॥
तुमचें जें कां पादारविंद । धिषण म्हणिजे तो आश्रय शुद्ध । त्याहूनि इतर गृहसंबंध । तो भवभ्रम अंधकूपची ॥१४॥
तया अंधकूपापासून । विभ्रम विरक्त होऊनि पूर्ण । निर्मतत्वें निष्क्रमण । करूनि निर्जन वसवीं मी ॥३१५॥
विश्वाचे जे सदनरूप । ऐसे सदय सफळ पादप । त्यांचे मूळीं विगतताप । वंदूनि अल्प उपसर्गा ॥१६॥
आपणचि गळती सुपक्व फळें । यदृच्छें लाहूनि यथाकाळें । जीविका करूनि दैवबळें । सुशांत विचरें एकाकी ॥१७॥
अथवा जे कां विश्वसखे । महांत अमृतमय अशिके । तयांच्या संगीं सुशांत सुखें । विचरें कौतुकें तेंचि करीं ॥१८॥
जरी तूं म्हणसी पुरुषोत्तमा । अल्पसुकृतियां दैत्यां तुम्हां । ऐसा कैंचा सद्भावप्रेमा । उपजे रजस्तमांमाजि असतां ॥१९॥
तरी ऐकें गा कलुषांतका । जेणें झाडणी रजस्तमपंका । होऊनि लाहूं सद्भावसुखा । तेंवि शिक्षका मज शिक्षीं ॥३२०॥
N/A
References : N/A
Last Updated : June 12, 2017
TOP