अध्याय ८५ वा - श्लोक ११ ते १५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
भूतानामसि भूतादिरिन्द्रियाणां च तैजसः । वैकारिको विकल्पानां प्रधानमनुशायिनाम् ॥११॥
द्रव्यशक्तीच्या सहकारें । तमोगुण अव्याकृति स्फुरे । तो चेतवे तामसाहंकारें । भूतें तन्मात्रें उत्पादी ॥१०५॥
यास्तव भूतादि म्हणणें तूतें । रुद्रात्मकत्वें वर्तसी तेथें । तमःप्राचुर्यें जडता यातें । अष्टधा ख्यातें तूंचि तूं ॥६॥
तमःप्राचुर्यें यांच्या ठायीं । वैशिष्ट्यकार्यपटुता नाहीं । क्रियायोगें रजःप्रवाहीं । तैजस गोगणीं तोही तूं ॥७॥
क्रियाज्ञानचेष्टाकरणें । जियें पकटलीं रजोगुणें । तो राजस अहंकार तुजविणें । कोणा म्हणणें जगदीशा ॥८॥
परि या स्वतंत्रता नाहीं । म्हणोनी प्रेरकें यांच्या ठायीं । विविधें कल्पिलीं तूंचि तियें हीं । विकल्पनाख्यें कर्तृकरणें ॥९॥
ज्ञानशक्तीच्या सहकारें । महत्तत्वें जो सात्विक स्फुरे । तो वैकारिक अहंकार धुरे । सर्वां स्वातंत्र्यें प्रेरक जो ॥११०॥
ज्ञानप्राचुय प्रेरकता । रजःप्राचुर्यें उपकरणता । तमःप्रचुर्यें भ्रामक जडता । स्फुरे तत्वता गोगणत्वें ॥११॥
एकली एक मृतिका स्पष्ट । तयेचा निर्मिला न वचे मठ । मृत्पिंडलेपनें कर्दमाविष्ट । उभारे चोखट त्रैविध्यें ॥१२॥
विकल्पनाख्यें किमर्थ म्हणणें । तें अवधारा सावध श्रवणें । अध्यात्माधिभूताधिदैवगुणें । विकल्पें होणें म्हणोनियां ॥१३॥
जळें मृत्तिका कालवली । तैसी ज्ञानशक्ति सत्वीं स्फुरली । उभययोगें रूपा आली । त्रिविधविकल्पा विकल्पना ॥१४॥
अध्यात्माधिमूताधिदै । येणें संवेद सर्वीं सर्व । अवलंबूनि विषयानुभव । लाहे जीव स्थूळपणें ॥११५॥
एवं संवेदनाशक्ती । त्रिधा विकल्पें पावे व्यक्ती । ते विकारिकता विकारवती । तूंचि श्रीपती निर्धारें ॥१६॥
हा करणांचा कारणनिचय । तूंचि अवधा जरी गुणमय । आणि जीवांचा समुदाय । अविद्यावरणीं प्रसुप्त जो ॥१७॥
जीव ब्रह्मेंशीं अभिन्न । जेणें पावती संसरण । प्रधान तयाचें कारण । तो तूं भगवान् भवहंता ॥१८॥
नश्वरेष्विह भावेषु तदसि त्वमनश्वरम् । यथा द्रव्यविकारेषु द्रव्यमात्रं निरूपितम् ॥१२॥
आणि हे चिज्जडात्मकसृष्टी । जीवासी गोचर इंद्रियदृष्टी । तियें नश्वरें पाठीं पोटीं । अनश्वर तूं द्रव्यवत् ॥१९॥
द्रव्य म्हणिजे मृत्तिका मात्र । कारणरूपें वर्ते अनश्वर । तियेच्या ठायीं मृद्विकार । भासती नश्वर कार्यरूप ॥१२०॥
घटकुड्यालयें लक्षकोटी । नामरूपात्मकें भासती सृष्टी । तियें नाश पावल्या पाठीं । जेंवि मृत्तिका शेवटीं अनश्वर ॥२१॥
तय मृत्तिकेमाजि पाहतां । नामरूपाची न दिसे वार्ता । लक्ष चौर्यायसीं योनि जातां । तैसी तत्वता घडमोडी ॥२२॥
कटक कुंडलें मुद्रिका कनकीं । नामरूपें कार्यात्मकीं । नश्वरें नाश पावल्या शेखीं । वास्तव कनकीं अनश्वरता ॥२३॥
कनक आटूनि केली खोटी । तैं कटकांगुलीयादि कार्यकोटी । त्यांमाजि एक ही न दिसे इष्टी । अनश्वर शेवटीं हेम उरे ॥२४॥
त्रिगुणात्मक कार्यरूप ही तूंची । ऐसी बोलिली गोष्टी साची । तरी मग अनश्वरता कैंची । तरी उक्ति ये विखींची अवधारीं ॥१२५॥
सत्त्वं रजस्तम इति गुणास्तद्वृत्तयश्च याः । त्वय्यद्धा ब्रह्मणि परे कल्पिता योगमायया ॥१३॥
तरी सत्वरजस्तमोगुणत्रया । यांच्या वृत्ति ज्या परिणाममया । त्मा तुज परब्रह्मींच कल्पिलिया । योगमायेनें जगदीशा ॥२६॥
परब्रह्मींचिया प्रकल्पिता । उदय पावती चिन्मय स्फुरतां । अहंकारमहत्तत्व अव्यक्ता । पर्यंत पर्णाममय अवघ्या ॥२७॥
त्या परब्रह्मींच तुझ्या ठायीं । योगमायेनें कल्पिल्या पाहीं । यालागीं तुजवीण आन नाहीं । अद्धा निश्चयीं अद्वय तूं ॥२८॥
तस्मान्न सन्त्यमी भावा यर्हि त्वयि विकल्पिताः । त्वं चामीषु विकारेषु ह्यन्यदाव्यावहारिकः ॥१४॥
तस्मात् हे अवघेचि भाव । तुजमाजि वसती हा निर्वाह । नसतां आस्तिक्यानुभव । केंवि सदैव प्रत्यय हा ॥२९॥
तरी जेव्हां कल्पिले तुझ्या ठायीं । सत्तायोगबळें करोनि पाहीं । सन्मात्रप्रतीति यांच्या ठायीं । उमटे निश्चयीं तव योगें ॥१३०॥
येर्हवीं हें अव्यावहारिक । तवानलोकें व्यावहारिक । जेंवि राजसत्ता लाहूनि रंक । समस्तलोक स्वयें शिक्षी ॥३१॥
तुझ्या ठायीं यांचें असणें । तव चैतन्यें सन्मयपणें । तुझे ठायीं यांचें असणें । अव्यवहारीं उपादानवत् ॥३२॥
घतमठवर्जित जैसें गगन । कीं नग न घडितां जेंवि सुवर्ण । तेंवि अव्यवहारीं उदासीन । अवशीष्यमाण तूंचि स्वयें ॥३३॥
ऐसा अखंडदंडायमान । स्वसंवेद्य सनातन । तेथ गुणप्रवाह भ्रमकारण । मायिक जाण सांसृतिक ॥३४॥
स्थितिलयोत्पत्तिमात्र अवघी । भासे गुणप्रवाहओघीं । तेथ आकाशमात्रेची झगमगी । भूतविभागीं गोचर जे ॥१३५॥
या नांव म्हणिजे गुणप्रवाह । विसरवी स्वसंवेद्यता वास्तव । विसरास्तव ते भेदभाव । चिदंश जीव भ्रमभूत ॥३६॥
वास्तव विसरा नाम अज्ञान । तदाविष्करण तें निबंधन । तेणेंचि पावती संसरण । चैतन्यघन होत्साते ॥३७॥
कैसें संसरण जरी तूं म्हणसी । तरी तें ऐकें हृषीकेशी । मुनिकृपेनें मम मानसी । निश्चयेंसीं प्रत्यय जो ॥३८॥
गुणप्रवाह एतस्मिन्नबुधस्त्वखिलात्मनः । गतिं सूक्ष्मामबोधेन संसरन्तीह कर्मभिः ॥१५॥
ऐसिया भवभ्रमाचे ठायीं । अबुधजीव गुणप्रवाहीं । सूक्ष्मगति नेणती कांहीं । अखिलात्मकता आत्मयाची ॥३९॥
अंतःकरणींचा चिप्रकाश । तद्भा उजळली हृषीकांस । करणबोधें विषयभास । गमे जीवास सत्यत्वें ॥१४०॥
तेणें स्थूलावच्छिन्नबोध । वास्तव वयुना करी रोध । देहात्मकत्वें कर्में विशद । आचरे प्रसिद्ध फळलाभा ॥४१॥
अनिष्ट इष्ट मिश्र फळें । भोगी स्वकृतकर्मबळें । अखिलात्मयाची गति आंधळे । नेणे म्हणोनि हे दशा ॥४२॥
कर्मफळभोगाकारणें । लक्ष चौर्यांयशी योनि फिरणें । अखिलात्मगतीच्या विस्मरणें । जीवां संसरणें तें ऐसें ॥४३॥
ऐसा भवभ्रमा वरपडोनी । कर्में भ्रमतां अनेक योनी । नरदेह लाहे यथेच्छें करूनी । अघटित म्हणोनि दुर्लभ जें ॥४४॥
N/A
References : N/A
Last Updated : June 12, 2017
TOP