अध्याय ८४ वा - श्लोक ६१ ते ६५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
वसुदेव उवाच - भ्रातरीशकृतः पाशो नृणां यः स्नेहसंज्ञितः ।
तं दुस्त्यजमहं मन्ये शूराणामपि योगिनाम् ॥६१॥
वसुदेव म्हणे बल्लवराया । ईश्वराची अगाध माया । कोण्ही समर्थ लंघावया । मनुष्यांमाजी असेना ॥८॥
ते मायेचा एक अंश । जो कां स्नेहनामक पाश । मी मानितों मनुष्यास । दुस्त्यज ऐसा निर्धारें ॥९॥
जरी तूं म्हणसी शूर बलिष्ठ । प्रतापवंत वीरश्रेष्ठ । स्नेहपाशाचे काय त्या कष्ट । छेदनीं दुर्घट काय तया ॥४१०॥
तरी तूं ऐकें व्रजेश्वरा । स्नेहपाशें चराचरां । बांधिलें असतां कोण्ही शूरां । सामर्थ्य नाहीं खंडावया ॥११॥
अथवा शूर कठोरवृत्ति । त्यांसी न करवे स्नेहनिवृत्ति । परंतु योगियां आत्मरति । फावल्या छेदिती स्नेहपाशा ॥१२॥
तरी योगियांही ज्ञानबळें । न होववे स्नेहपाशावेगळें । तस्मात् ईश्वरें मायाजाळें । विश्व मोकळें आकळिलें ॥१३॥
तेंचि स्नेहबंधन कैसें । प्रत्यक्ष अनूभूत जें अपैसें । बल्लवेश्वरा सावध परिसें । तुज मी अल्पसें निरूपितों ॥१४॥
अस्मास्वप्रतिकल्पेयं यत्कृताज्ञेषु सत्तमैः । मैत्र्यार्पिताऽफला वापि न निवर्तेत कर्हिचित् ॥६२॥
आमुच्या ठायीं तुझी मैत्री । मागें पुढें कोण्ही श्रोत्रीं । ऐकिली नाहीं तेथ नेत्रीं । न देखिली हें काय म्हणों ॥४१५॥
जये मैत्रीसी नाहीं उपमा । यास्तव म्हणिजे अनुपमा । त्रिजगीं पाहतां आम्हां तुम्हा । अपाड प्रेमा तो ऐक ॥१६॥
कृतोपकारातें जो जाणे । कृतज्ञ ऐसें त्यातें म्हणणें । तें जाणिवेचें जेथ उणें । अकृतज्ञ म्हणणें त्यालागीं ॥१७॥
सज्जनांचे जे मुकुटमणी । सत्तम म्हणिजे त्यांलागूनी । तैसे तुम्ही हें मज लागूनी । अंतःकरणीं जाणवलां ॥१८॥
आम्ही अकृतज्ञ अनुपकारी । ऐसियांही आम्हांवरी । अकृत्रिम तुमची मैत्री । हा निर्धारीं स्नेहपाश ॥१९॥
मैत्री केलिया जे ठायीं । तेथ फळाशा न दिसे कांहीं । ते प्रत्युपकारशून्या पाहीं । आमुच्या ठायीं तव मैत्री ॥४२०॥
अफळा मैत्री कळल्यावरी । उपेक्षा नुपजे तुम्हां अंतरीं । आम्हां ऐसिया अनुपकारी । अद्यावपरी स्नेहवृद्धि ॥२१॥
कोण्हे विषयीं कोण्हे काळीं । प्रेमा न परतेचि स्नेहाळीं । तस्मात् ईश्वरकृतपाशजाळीं । निबद्ध ऐसें मी जाणें ॥२२॥
तुम्ही अकृतज्ञ कैसे । म्हणोनि पुससी तरी परिसें । आमुचा अंधिकार आम्हां दिसे । अनायासें निरूपितों ॥२३॥
प्रागकल्पाच्च कुशलं भ्रातर्वो नाचराम हि । अधुना श्रीमदान्धाक्षा न पश्यामः पुरः सतः ॥६३॥
पूर्वी असमर्थ प्रत्युपकारीं । होतों कंसाचे कारागारीं । म्हणोनि आम्हांपासोनि मैत्री । सफल न झाली प्रतिकारें ॥२४॥
तये काळींची विपत्ती । बल्लवराया स्मरतां चित्तीं । आम्हां ठाव नेदी क्षिती । तैं तां संतती वांचविलीं ॥४२५॥
न धरूनि क्रूर कंसभय । आम्हां वोपिलें तुवां अभय । ऐसिया उपकारा उत्तीर्ण काय । आम्ही होवावें ते समयीं ॥२६॥
यालागीं आम्हां असमर्थपणीं । तुझिया उपकारालागुनी । अयोग्यता तें तां श्रवणीं । ऐकिलें कीं व्रजनाथा ॥२७॥
कंसमरणानंतर पाहीं । नृपैश्वर्य भोगितां गेंहीं । आम्ही मदान्ध तिये ठायीं । मित्रत्व कांहीं नुमसोंची ॥२८॥
आतां राजमदें अंधदृष्टी । पुढें सज्जन न लक्षे सृष्टी । ऐसी अनधिकाराची गोष्टी । यथार्थ वाक्पुटीं वदतसें ॥२९॥
म्हणोनि प्रार्थितों मी ईश्वरा । स्वकल्याण इच्छित्या नरा । न शिवो राज्यलक्ष्मीचा वारा । कां तें अवधारा श्लोकोक्त ॥४३०॥
मा राज्यश्रीरभूत्पुंसः श्रेयस्कारस्य मानद । स्वजनानुत बंधून्वा न पश्यति ययांधदृक् ॥६४॥
राजलक्ष्मीच्या मदें करून । सज्जन अथवा बंधुजन । त्यांतें नोळखे मदान्धनयन । स्नेहरक्षण मग कैंचें ॥३१॥
नृपश्रीमदें मदान्धदृष्टी । जालिया सज्जन न दिसे सृष्टी । सुहृदमित्रबंधुभेटी । आलिया गोष्टी अनोळखा ॥३२॥
तुमचे उपकार एवढे शिरीं । असतां आम्ही अनुपकारी । शक्ताशक्त दोहीं परी । यथार्थ वैखरी तें कथिलें ॥३३॥
श्रीशुक उवाच - एवं सौहृदशैथिल्यचित्त आनकदुंदुभिः । रुरोद तत्कृतां मैत्रीं स्मरन्नश्रुविलोचनः ॥६५॥
सुहृदस्नेहाची विस्मृति । हृदयीं स्मरोनि अनुपकृति । प्रेमशैथिल्यें द्रवला चित्तीं । आनकदुंदुभि ते काळीं ॥३४॥
तेणें न धरत आलें रुदन । स्मरोनि नंदाचें मित्रपण । टपटपां अश्रु टाकिती नयन । नंद देखोन कळवळिला ॥४३५॥
वसुदेव म्हणे नंदाप्रति । तुमचिया कृतोपकारा गणति । करूं न शकेंचि कल्पान्तीं । हें मम मति जाणतसे ॥३६॥
ऐसा वसुदेव अधोवदनीं । नंदाप्रति विनीत वाणी । वदतां अश्रु स्रवती नयनीं । नंद ते क्षणीं स्थिरावला ॥३७॥
N/A
References : N/A
Last Updated : June 12, 2017
TOP