अध्याय ८४ वा - श्लोक २१ ते २५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


अद्य नो जन्मसाफल्यं विद्यायास्तपसो दृशः । त्वया सङ्गम्य सद्गत्या यदन्तः श्रेयसां परः ॥२१॥

आजि आमुचें जन्मकर्म । पावलें सफलत्वाचें नाम । कैसें तेंही ऐकें क्रम । जें तव संगमें लाधलों ॥२४॥
सच्छन्दें तूं वेदवसति । सन्मात्रैकब्रह्मस्थिति । सत्पुरुषाची परम गति । त्या तव संगती पावोनी ॥१२५॥
सकळ श्रेयसांहूनि पर । निर्वाण कैवल्य अमृततर । तो तूं श्रेयसां आधार । अंत साचार अवधित्वें ॥२६॥
तव सान्निध्येंकरूनिं दृष्टी । सफळ कैसी ते ऐकें गोष्टी । जें ब्रह्मात्मबोधें अवघी सृष्टी । प्रत्यय प्रकटी दृग्वोधीं ॥२७॥
तैसेंचि तपाचें साफल्य । जें चित्तशुद्धी लाधलों अमळ । तेणें वास्तव बोधास्थळ । जालें केवळ हृत्कमळीं ॥२८॥
विद्याशब्दें बोलिजे ज्ञान । ऐक तयाचें साफल्य पूर्ण । जालें तव सान्निध्यें करून । तें तूं सर्वज्ञ जाणसी ॥२९॥
अन्यथा विपरीतवितर्तबोधा । प्रकटी केवळ ते अविद्या । वास्तव चिन्मात्र प्रकटी विद्या । सफलत्व आद्या तुझेनि तये ॥१३०॥
ऐसा तव सान्निध्यलाभ । तो आजि आम्हां जाला सुलभ । जे करणगोचर पंकजनाभ । लाधलों स्वयंभ संवादीं ॥३१॥
ज्या तव महिमा स्तवितां वेद । कुंठित जाला नेतिशब्द । वर्णूं न शकती विधिकोविद । तेथ मतिमंद कें इतर ॥३२॥
यास्तव नमनमात्रचि घडे । हें तव प्राप्ति साधन उघडें । म्हणोनि संबोधोनियां तोंडें । नमिती रोकडें तें ऐक ॥३३॥

नमस्तस्मै भगवते कृष्णायाकुण्ठमेधसे । स्वयोगमxxयया च्छन्नमहिम्ने परमात्मने ॥२२॥

त्या भगवंता तुजकारणें । नमन आमुचें अनन्यपणें । जो तूं ऐश्वर्यषड्गुणें । श्रीकृष्णपणें नटलासी ॥३४॥
सोमवंशीं यादवकुळीं । मनुजवेषें भूमंडळीं । अवतरोनि महाबळी । दैत्य निर्दळिले जेणें ॥१३५॥
त्या तुजकारणें भो कृष्णा । आम्ही नमितों सांडूनि तृष्णा । कृपेनें निरसीं भवार्कोष्णा । विज्ञापना हे आमुची ॥३६॥
एक चिन्मात्र सचराचरीं । परि ते कुंठित अविद्याम्बरीं । अकुंठित मेधा तुझी श्रीहरी । जगदुद्धारी यास्तव तूं ॥३७॥
तया अकुंठमेधावंता । नमो तुजकारणें भगवंता । स्वयोगमायेकरूनि आतां । महिमा छादिता जालासी ॥३८॥
स्वयोगमायेकरूनि महिमा । आच्छादूनियां पुरुषोत्तमा । वर्तसी तथापि तुझी गरिमा । अकुंठधामा नाच्छादे ॥३९॥
अविद्यावेष्टित व्यष्टिचैतन्य । कोटींमाजि तूं जनार्दन । दाविसी मनुजांचें अनुकरण । तो तूं परिपूर्ण परमात्मा ॥१४०॥
तया परमात्मया तुजकारणें । मायाच्छादितमहिम्ने । आम्ही नमितों कायवाङ्मनें । नमो ब्रह्मणे या मंत्रें ॥४१॥
सर्वीं सर्वत्र सर्वात्मका । वर्तोनि न होसी ठाउका । न कळे जिवलगा ही आत्मिका । मा प्राकृतां लोकां कैं कळसी ॥४२॥

न यं विदन्त्यमी भूपा एकारामाश्च वृष्णयः । मायाजवनिकाच्छन्नमात्मानं कालमीश्वरम् ॥२३॥

एके ठायीं ज्याची वसति । एक्या सुखें ज्या विश्रांति । एकात्मकत्वें त्यांसी तृप्ति । ते नेणती वृष्णीही ॥४३॥
मा हे भूतळींचे भूपती । नेणती ज्यातें हे भारती । प्रशंसावी कवणे रीती । ऐक यदर्थीं कारणही ॥४४॥
मायेचिये जवनिकेकरून । आपणां आपण आच्छादून । काळ ईश्वर सत्तावान । तें निजज्ञान लोपविसी ॥१४५॥
अखंडदंडायमान संतत । स्वसामर्थ्यें सदोदित । काळत्रयीं अबाधित । करुणातीत काळात्मा ॥४६॥
अनंतब्रह्मांडांचिया कोडी । प्रवाहे घडी मोडी । ऐशी ज्याची ऐश्वर्यप्रौढी । प्रकाशी घडी ईश्वरता ॥४७॥
ईश्वर काळात्मा परिपूर्ण । तोचि भेदातीत आपण । असतां यातें नेणती जन । मायाच्छन्न म्हणोनियां ॥४८॥
सृष्टिस्थितिलयकारणभूत । काळशब्दें तो निर्णीत । एतन्नियंता जो समर्थ । ईश्वर म्हणिजेत त्यालागीं ॥४९॥
तोचि आपण सर्वात्मक । असोनि न कळे हेचि अटक । दृष्टांतद्वारा हा विवेक । ऐक सम्यक तो कथितों ॥१५०॥

यथा शयानः पुरुष आत्मानं गुणतत्त्वदृक् । नाममात्रेंद्रियाभातं न वेद रहितं परम् ॥२४॥

निद्रिस्त पुरुष आपणातें । विपरीतबोधें जाणे निरुतें । विसरूनि वास्तव स्थूळ तनूतें । स्वप्न भ्रमातें वरपडुनी ॥५१॥
मनःकल्पित इंद्रियें स्वप्नीं । तद्भाजनित भासे अवनी । स्वप्नसृष्टि देखे नयनीं । जेंवि तो मानी सत्यत्वें ॥५२॥
खेचर भूचर जलचर वनचर । सिंह व्याघ्र कुंजर सूकर । सेना नगरें राष्ट्र नृपवर । स्वप्नीं साचार प्रत्यय त्या ॥५३॥
शब्दस्पर्श रूपरसगंध । स्वप्नेंद्रियद्वारा विशद । भासती त्याचा यथार्थ बोध । सहसा अबद्ध तैं न वटे ॥५४॥
स्वप्नाभास हा सर्वत्र । वाचारंभण नाममात्र । एवं अवघे माझेंचि गात्र । कल्पना विचित्र हे अवघी ॥१५५॥
ऐसें सहसा नेणे स्वप्नीं । सिंह व्याघ्रादि आपणा मानी । या वेगळा निद्रिस्त शयनीं । तो मी म्हणोनि नाविष्करें ॥५६॥
हाचि स्वप्नदृष्टांत आतां । दृष्टांतद्वारा प्रतिपादितां । जैसा प्रबोध होय चित्ता । तैसा तत्त्वतां अवधारा ॥५७॥

एं त्वा नाममात्रेषु विषयेष्विन्द्रियेहया । मायया विभ्रमच्चित्तो न वेद स्मृत्युपप्लवात् ॥२५॥

चिदाभास जैसा स्वप्न । प्रसुप्त स्थूळतनु विसरून । स्वयें स्वप्नसृष्टि होऊन । सत्य मानून तेथ रमे ॥५८॥
परंतु देवदत्त मी येथ । स्थूळशरीरी सुषुप्तिवंत । ऐसा नेणे स्वप्नभ्रमित । नृपगण तद्वत तुज नेणे ॥५९॥
स्वप्नीं कल्पित इंद्रियगण । मिथ्या तन्मात्रें प्रतीयमान । त्या इंद्रियीं त्याचें ग्रहण । साच मानून जेंवि करी ॥१६०॥
याचि प्रकारें नर जागृत । तूतें नेणेचि पैं प्राकृत । तया नेणण्याचा हेत । स्वप्नदृष्टांतमय अवघा ॥६१॥
स्वप्न मिथ्या क्षणिक न टिके । तेंवि जागृतीचे ही विषय लटिके । अविद्यामायेच्या उद्रेकें । सांवरूं न शके आत्मस्मृति ॥६२॥
जे जे विषयीं करणाच्या । चेष्टा प्रवर्तती भोगार्थ साच्या । तेचि अविद्यामाया तीच्या । योगेंकरून भ्रम चित्ता ॥६३॥
मायाभ्रमोपहत जैं चित्त । तैं आत्मस्मृतीचा होय अंत । विवेकनाशास्तव मग भ्रांत । नेणे प्राकृत तुजलागीं ॥६४॥
असो नृपावृष्णींची कथा । आमुची जन्मसाफल्यता । पूर्वीं कथिली तेचि आतां । उपसंहरितां अवधारीं ॥१६५॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP