एकदान्तःपुरे तस्य वीक्ष्य दुर्योधनः श्रियम् । अतप्यद्राजसूयस्य महित्त्वं चाच्युतात्मनः ॥३१॥

राजा म्हणे जी सर्वज्ञा । हेचि आवडी माझिया मना । कैसा विषाद दुर्योधना । संभवला तें ऐकावें ॥७७॥
हें ऐकूनि व्यासतनय । म्हणे श्रवणीं सादर होय । धृतराष्ट्रात्मज कौरवराय । कोण्हे एके दुःसमयीं ॥७८॥
धर्मराजाचे अंतःपुरीं । पाहोनि उद्दाम ऐश्वर्यश्री । संतापला अभ्यंतरीं । विषाद शरीरीं प्रज्वळिला ॥७९॥
दुग्धें बाचटे नवज्वर । तैलें प्रोक्षितां वैश्वानर । हस्तें स्पर्शितां विखार । तेंवि गान्धार संक्षुब्ध ॥२८०॥
आणि राजसूयमखाच्या ठायीं । युधिष्ठिरमहिमा लोकीं तीन्ही । नरसुरपितरीं गाइला तोही । अवलोकूनि निजनयनीं ॥८१॥
राजसूयाचें अगाधपण । साद्यंत साङ्गोपाङ अविघ्न । धर्म अच्युतात्मा म्हणोन । सिद्धी यजन हें एलें ॥८२॥
ऐशी विश्वतोमुखीं कीर्ति । ऐकूनि दुर्योधनदुर्मति । परम संतापला चित्तीं । तें तूं नृपति अवधारीं ॥८३॥

यस्मिन्नरेंद्रदितिजेंद्रसुरेंद्रलक्ष्मीर्नाना विभांति किल विश्वसृजोपक्लृप्ताः ।
ताभिः पतीन्द्रुपदराजसुतोपतस्थे यस्यां विषक्तहृदयः कुरुराडतप्यत् ॥३२॥

धर्मराजाच्या अंतःपुरी । लक्ष्मी गान्धारें देखिली पुरी । अपर भूमंडळावरी । कोण्हां घरीं ते नाहीं ॥८४॥
लक्ष्मीशब्दें बोलिजे शोभा । सुरनरपार्थिवां सदनीं प्रभा । त्या सर्वही युधिष्ठिरसभा । सदनगर्भामाजि वसती ॥२८५॥
नरसुरासुरां घरींच्या लक्ष्मी । तितुक्या धर्माचे सभासद्मीं । असुर विश्वस्रष्टा मयनामीं । तेणें स्वकर्मीं प्रकटिलिया ॥८६॥
त्या मयनिर्मिता नाना विभूती । धर्ममंदिरीं विराजती । तिहीं सहित द्रौपदी सती । पाण्डवां प्रती उपासिते ॥८७॥
म्हणाल लक्ष्मीशोभा मात्र । देखूनि भुलती बालिशनेत्र । तैसें नव्हे जें स्वतंत्र । ऐश्वर्यपात्र त्रिजगाचें ॥८८॥
शक्रप्रमुख अमरां सदनीं । हिरण्याक्षप्रमुखदितिजां भुवनीं । विप्रचित्त्यादि असुरायतनीं । ललामश्रेणी प्रचुर श्री ॥८९॥
मनुपुत्रादिभूपां गृहीं । जिया समृद्ध विलसती पाहीं । तिया समस्ता धर्मा निलयीं । भाग्योदयीं विराजती ॥२९०॥
तिच्या विभूती सालंकृता । तिहींशीं मंडित द्रुपदसुता । जिये अंतःपुरीं तत्वता । उपासी पार्था सतीधर्में ॥९१॥
सुभगा कुशला शतशा दासी । सादर द्रौपदीचिये आज्ञेसी । असतां स्वयेंचि पाण्डवांसी । प्रेमें उपासी पाञ्चाळी ॥९२॥
सालंकृता वसनाभरणीं । सुभगा सलज्जा लावण्यखाणी । चातुर्यमंडित सर्वसद्गुणीं । देखोनि तरुणी हरिणाक्षी ॥९३॥
तियेच्या ठायीं आसक्त चित्त । पूर्वींच विषादें होतां ज्वरित । धर्मलक्ष्मी द्रौपदीयुक्त । देखोनि संतप्त गान्धार ॥९४॥
ऐसें धर्मान्तःपुर । तेथें कृष्णवनितांचें सहस्र । सर्वाभरणीं सालंकार । तेंही रुचिर अवधारा ॥२९५॥

यस्मिस्तदा यदुपतेर्महिषीसहस्रं श्रोणीभरेण शनकैः क्वनदंघ्रिशोभम् ।
मध्येसुचारु कुचकुंकुमशोणहारं श्रीमन्मुखं प्रचलकुंडलकुंतलाढ्यम् ॥३३॥

अष्टनायिका पट्टमहिषी । म्हणाल अपर गौण विलासीं । ऐसें नव्हे तो हृषीकेशी । वरते सर्वांसीं समभावें ॥९६॥
एकलक्ष्मीचे अवतार । श्रीकृष्णाचें अंतःपुर । सम सद्गुणीं सोळा सहस्र । साष्ट शतोत्तर महिषी ॥९७॥
महिषीसहस्र हें एकवचन । बहुत्वाचें उपलक्षण । समाहारार्थक व्यासनंदन । वदला म्हणोन जाणावें ॥९८॥
तें महिषीसहस्र कैसें । वाखाणिलें विशेषणवशें । श्रोतीं श्लोकान्वयविशेषें । जाणिजे ऐसें सुचविलें ॥९९॥
क्कणित भूषणें मंदगमनीं । शोभायमान तिहीं चरणीं । महिषीसहस्र ऐसें सुज्ञीं । प्रतिविशेषणीं जाणावें ॥३००॥
मेखळा निबद्ध श्रोणीतटीं । क्कणित कंकणें मणगटीं । झणत्कारिती क्षुद्रघंटी । तेणें सृष्टी विराजत ॥१॥
सूक्ष्म मध्य नितंब पृथुळ । नाभि रुळती तेणें शोण भासुर । येरव्हीं ते धवळतर । कुन्दमंदारकुसुमांचे ॥३॥
परिधान सुरंग रुचिरास्वरें । कंचुक्या तगटी कनकसूत्रें । करकौशल्यें चित्रविचित्रें । सूचिकारें विनिर्मित ॥४॥
मौळाग्रभागीं हिमकर तरणी । वरी ग्रथिलिया सुमनश्रेणी । विरचित वेणिका सर्वाभरणीं । कुण्डलें श्रवणीं जडितांचीं ॥३०५॥
गंडमंडित कुण्डलप्रभा । मधुकरभासुरकुन्तलशोभा । कुङ्कुमतिलक ललाटीं उभा । कनकसन्निभा वक्त्रश्री ॥६॥
अंजनरंजित नयनलक्ष्मी । आकर्ण विलसे चंचल पक्ष्मीं । वदनप्रभा सलक्ष्मसोमीं । कविसत्तमीं उपमिजती ॥७॥
मुक्ताफळभा विलसे घ्राणीं । दशन गमती वज्रमणी । सुरंग ताम्बुलरंगें वदनीं । माणिक्यकिरणीं विकसती ॥८॥
विद्रुमकान्ति विलसे अधरीं । भाषणं पियूषरसमाधुरीं । ऐसें महिषीसहस्र चतुरीं । सालंकारीं अवगमिजे ॥९॥
अल्पज्ञ शंका करितील येथ । नसतां मौळभूषा श्लोकोक्त । विशेष व्याख्यान तें अनुचित । ऐसें प्राकृत जरी म्हणती ॥३१०॥
श्लोकीं वसनें वदला नाहीं । तरी नग्नचि होत्या कायी । एवं मूर्खांची चतुराई । सर्वज्ञांहीं नादरिजे ॥११॥
लबाड तरमुंड थोताण्डें । क्लिष्टकल्पना बोलूनि तोंडें । पंडितसभेसी हालविती मुण्डें । वृथा पाखाण्डें रूढविती ॥१२॥
हषामाजी करिती विष । ऐसे निन्दक जे सदोष । पादत्राणें शिक्षा त्यांस । वॄश्चिकासमान मुनि वदती ॥१३॥
धर्मराजाचें अंतःपुर । विशेष मधुपतीचें महीषीसहस्र । सद्गुणमंडित सालंकार । देखोनि गान्धार संतप्त ॥१४॥
द्रौपदी लावण्यरत्नखाणी । हृदयीं रुतली शस्त्राहूनी । तेणें वैक्लव्य दुर्योधनीं । गमे करणीं सन्निपात ॥३१५॥
सन्निपात होतां ज्वरिताप्रति । बाह्याचरणीं पदे भ्रान्ति । दुर्योधना ते दशाप्राप्ति । परिसिजे श्रोतीं यावरी ती ॥१६॥

सभायां मयक्लृप्तायां क्वापि धर्मसुतोऽधिराट् । वृतोऽनुजैर्बंधुभिश्च कृष्णेनापि स्वचक्षुषा ॥३४॥

कोणे एके अपूर्व दिनीं । मयनिर्मित सभास्थानीं । धर्मराजा सिंहासनीं । अनुज वेष्टुनी विराजला ॥१७॥
बंधु संबंधी सुहृद आप्त । सचिव अमात्य मंत्री समस्त । हितोपदेष्ट्या कृष्णासहित । मखेन्द्रदीक्षित चक्रवर्ती ॥१८॥
ज्ञानचक्षु जे तिहींकरून । हिताहिताचें परिज्ञान । चार वार्तिक नृपांचे नयन । राष्ट्रदर्शन तद्द्वारा ॥१९॥
ऐशा स्वचक्षूंकरूनि नृपति । सार्वभौम चक्रवर्ती । काञ्चनासनीं धर्ममूर्ति । विराजमान उपविष्ट ॥३२०॥

आसीनः काञ्चन साक्षादासने मघवानिव । पारमेष्ठ्यश्रिया जुष्टः स्तूयमानश्च बंदिभिः ॥३५॥

रत्नखचित सिंहासन । भद्रपीठ जें देदीप्यमान । तेथ पृथेचा ज्येष्ठनंदन । सुखासीन स्वानंदें ॥२१॥
जैसा इंद्र अमरभुवनीं । विराजमान भद्रासनीं । वेष्टित अमरगणांच्या श्रेणी । तेंवि कुरुमणि विराजला ॥२२॥
पारमेष्ठ्यलक्ष्मी आंगीं । सूतमागधबंधुवर्गीं । स्तवित असतां तत्प्रसंगीं । आला सवेगीं सुयोधन ॥२३॥
कुरु सृंजय कैकयभूप । मत्स्यकोसलप्रमुख अमूप । अजातशत्रु पाण्डुनृप । वेष्टूनि समीप तिष्ठती ॥२४॥
भाट पढती बिरुदावळी । पारमेष्ठ्यश्रीसुखकेली । धर्मनंदन स्वधर्मशाली । उडुमंडळीं शशी जैसा ॥३२५॥
कीं अमरमंडळीं जेंवि मघवा । कीं विरंचि विराजे वेष्टित देवां । कीं गगनमंडळीं भुवनदिवा । तेंवि कौरवांसह धर्म ॥२६॥
साम्राज्यविभवें देदीप्यमान । काञ्चनासनीं पाण्डुनंदन । बैसला असतां दुर्योधन । आला आपण तें ऐका ॥२७॥

N/A

References : N/A
Last Updated : June 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP